जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 214/2020. तक्रार दाखल दिनांक : 15/12/2020. तक्रार निर्णय दिनांक : 11/08/2022.
कालावधी : 01 वर्षे 07 महिने 27 दिवस
समद अजीजसाब उंटवाले, वय 51 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. देवणी, ता. देवणी, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) प्रोप्रा. दिपक कृषि सेवा केंद्र, रा. मेन रोड, देवणी, ता. देवणी, जि. लातूर.
Email : deepakkskdeoni@gmail.com.com
(2) कार्यकारी अधिकारी, ईगल सिडस् ॲन्ड बायोटेक लि.,
117, सिल्व्हर संचोरा कॅस्टल, 7, आर.एन.टी. मार्ग,
इंदौर (मध्यप्रदेश) फोन नं. +91-731-2528048, 49. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- एस. एच. शेख
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- गणेश पी. शिंदे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, ते शेतकरी असून मौजे देवणी, ता. देवणी, जि. लातूर येथे त्यांना गट क्र. 193/205 मध्ये क्षेत्र 2 हे. 49 व गट क्र. 211/233/ख/7 मध्ये 70 आर. अशी एकूण 3 हे. 19 आर. शेतजमीन आहे. दि.11/6/2020 रोजी त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून विरुध्द पक्ष क्र.2 यांनी उत्पादन केलेल्या सोयाबीन ईगल सिडस् जे.एस. 335 बियाण्याच्या 7 पिशव्या; प्रतिपिशवी 30 कि.ग्रॅ. असणा-या; ज्याचा लॉट क्र. NOV-19-13-2826-3813; प्रतिपिशवी रु.2,640/-; देयक क्र. 880 अन्वये रु.18,480/- मुल्य देऊन खरेदी केल्या. योग्य मशागतीनंतर व योग्य पाऊस पडल्यानंतर एकूण क्षेत्रामध्ये बियाण्याची पेरणी केली. परंतु बियाण्याची 100 टक्के उगवण झाली नाही. त्याबाबत विरुध्द पक्ष क्र.1 यांना कळविले असता त्यांनी दखल न घेता नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ केली. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी तालुका तक्रार निवारण समिती, पंचायत समिती तथा तालुका कृषि अधिकारी, देवणी यांच्याकडे बियाण्यासंबंधी तक्रार केली. त्या अनुषंगाने समितीने दि.27/6/2020 रोजी तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीस भेट देऊन पंचनामा व अहवाल तयार केला आणि बियाणे सदोष असल्यामुळे 100 टक्के उगवण झाली नाही, असे अहवालामध्ये नमूद केले. तक्रारकर्ता यांना दुबार पेरणी करणे भाग पडले आणि त्याकरिता विरुध्द पक्ष जबाबदार असून त्यांनी तक्रारकर्ता यांना देय सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे असे कथन आहे की, त्यांना प्रतिएकर 10 ते 12 क्विंटल उत्पन्न अपेक्षीत होते आणि हमी भाव रु.3,800/- असल्यामुळे त्यांना 80 क्विंटलकरिता रु.3,04,000/- चे नुकसान झाले. तसेच खते, मशागत, पेरणी, बियाणे, नोटीस इ. साठी केलेला खर्च व मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- असे एकूण रु.4,76,080/- चे नुकसान सहन करावे लागले. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना सूचनापत्र पाठवूनही नुकसान भरपाई देण्याबाबत दखल घेतली नाही. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने रु.4,76,080/- नुकसान भरपाईसह रु.5,000/- तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 यांना सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर ते विधिज्ञांमार्फत उपस्थित राहिले. परंतु त्यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द विनालेखी निवेदनपत्र आदेश करण्यात आले.
(4) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने अमान्य केली आहेत. त्यांचे कथन असे की, ते नामांकीत कंपनी आहेत आणि बियाण्याच्या विक्रीपूर्व प्रयोगशाळेद्वारे परीक्षण करण्यात येऊन व मान्यतेनंतरच बियाणे बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध करण्यात येते. जे.एस.-335 बियाणे उत्कृष्ठ दर्जाचे आहे आणि त्याबाबत इतर शेतक-यांकडून तक्रार प्राप्त झालेली नाही. तालुका तक्रार निवारण समितीने पंचनामा करताना त्यांना सूचना दिलेली नव्हती आणि पंचनामा प्रत उपलब्ध करुन दिली नाही. शासन परिपत्रकाप्रमाणे पंचनामा न करता ऐकीव बाबीवर करण्यात आला आहे. बियाणे नियमन, 1968 चे नियम 23 प्रमाणे बियाणे निरीक्षक यांनी बियाणे नमुना तपासणीसंबंधी कार्यवाही करणे आवश्यक आहे.
(5) विरुध्द पक्ष क्र.2 यांचे पुढे कथन असे की, खरीप 2019 मध्ये सोयाबीन पक्वतेच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसाने नुकसान झाले. वाहतूक करताना बियाण्याच्या अंकुरास धक्का पोहोचल्यास त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होत असतो. बियाण्याची थप्पी, आद्रतेअभावी पेरणी, अपुरा पाऊस, जमिनीतील उष्णता, खोलवर पेरणी, बुरशीनाशकांचा वापर नसणे, अनियमीत पर्जन्यमान, वातावरणातील बदल, पेरणीची सदोष पध्दती इ. घटक उगवण क्षमता कमी होण्यास कारणीभूत ठरतात. तसेच बियाण्याची हाताळणी, साठवणूक, वाहतूक इ. चा परिणाम बियाण्याच्या गुणवत्तेवर होतो. त्यामुळे बियाण्यामध्ये कोणत्याही स्वरुपाचा दोष असल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रारकर्ता यांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.2 यांनी केलेली आहे.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.2 यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच तक्रारकर्ता यांचेकरिता विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांचेद्वारे उत्पादीत व
विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून खरेदी केलेले सोयाबीन बियाणे
दोषयुक्त असल्याचे आणि त्यामुळे तक्रारकर्ता यांचे नुकसान
झाल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ता विरुध्द पक्ष यांच्याकडून नुकसान भरपाई
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय (अंशत:)
3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 एकमेकांशी पुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. विरुध्द पक्ष क्र.2 हे जे.एस.335 सोयाबीन बियाण्याचे उत्पादक आहेत, ही मान्यस्थिती आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून जे.एस. 335 बियाण्याच्या 7 बॅग एकूण रु.18,480/- मुल्य देऊन खरेदी केल्या, असे पावती क्र.880 वरुन निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार योग्य मशागतीनंतर व योग्य पाऊस पडल्यानंतर बियाण्याची पेरणी केली असता त्याची 100 टक्के उगवण झाली नाही आणि त्यांच्या तक्रारीनंतर तालुका तक्रार निवारण समिती, पंचायत समिती तथा तालुका कृषि अधिकारी, देवणी यांनी केलेल्या पंचनामा व अहवालानुसार बियाणे सदोष असल्यामुळे 100 टक्के उगवण झालेली नाही. उलटपक्षी, तक्रारकर्ता यांचे वादकथने अमान्य करुन बियाण्याच्या उगवणक्षमतेकरिता अनेक बाबी कारणीभूत असल्यामुळे बियाण्यामध्ये दोष असल्यासंबंधी विरुध्द पक्ष यांनी खंडन केले आहे.
(8) प्रथमत:, विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तालुका तक्रार निवारण समितीच्या अहवालास आक्षेप घेतला आणि तो शासन परिपत्राकाच्या विसंगत असल्याचे नमूद केले. तालुका तक्रार निवारण समितीचा अहवाल अभिलेखावर दाखल आहे. त्याचे अवलोकन केले असता बियाण्याची पेरणी दि.15/6/2020 रोजी केल्याचे नमूद आहे. तसेच पाहणी दि.27/6/2020 रोजी केलेली आहे. तालुका तक्रार निवारण समितीने क्षेत्रीय भेट देऊन तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीतील सोयाबीन पिकाचा अहवाल व पंचनामा तयार केल्याचे दिसून येते. अहवालाचे अवलोकन केले असता तालुका कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषि विद्यापिठाचे प्रतिनिधी; कृषि अधिकारी व तक्रारकर्ता यांच्या अहवालावर स्वाक्ष-या दिसून येतात. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे निरीक्षण व निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहे.
शास्त्रज्ञ यांच्या मताशी सहमत आहे. 2 एकर क्षेत्र बियाणे खोलवर पेरल्यामुळे उगवले नाही. 2.00 हे. क्षेत्रावर बियाणे कमी उगवले. ओल व खोली बरोबर होती. कमी उगवण बियाणे दोषामुळे झाल्याचे दिसून येते.
(9) बियाण्याच्या तक्रारीनंतर पंचनामा व अहवाल तयार करण्यासाठी शासकीय स्तरावर तालुका तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. अहवालामध्ये बियाण्याचे उगवणशक्तीचे प्रमाण 19.09 टक्के नमूद आहे. आमच्या मते, तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती शासकीय यंत्रणेद्वारे नियंत्रीत आहे आणि समितीमध्ये कृषी क्षेत्रातील तज्ञ व अधिकारी वर्गाचा समावेश आहे. त्यामुळे उचित पुराव्याअभावी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने तयार केलेला अहवाल अमान्य करण्याचे कारण नाही.
(10) विरुध्द पक्ष क्र.2 यांचा प्रतिवाद असा की, बियाण्याची थप्पी, आद्रतेअभावी पेरणी, अपुरा पाऊस, जमिनीतील उष्णता, खोलवर पेरणी, बुरशीनाशकांचा वापर नसणे, अनियमीत पर्जन्यमान, वातावरणातील बदल, पेरणीची सदोष पध्दती, बियाण्याची हाताळणी, साठवणूक, वाहतूक इ. चा परिणाम बियाण्याच्या गुणवत्तेवर होतो. परंतु प्रस्तुत प्रकरणामध्ये वादकथित बियाणे न उगवण्याकरिता वरीलपैकी बाब कारणीभूत होती, हे सिध्द झालेले नाही.
(11) ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 38 (2) (सी) [तत्कालीन ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13 (1) (सी)] नुसार ज्यावेळी वस्तुमध्ये दोष असल्याची आयोगाकडे तक्रार प्राप्त होते, त्यावेळी दोषयुक्त वस्तू उचित प्रयोगशाळेकडे परिक्षणासाठी पाठविण्याची तरतूद आहे. विरुध्द पक्ष क्र.2 हे वादकथित सोयाबीन बियाण्याचे उत्पादक आहेत आणि विरुध्द पक्ष क्र.1 विक्रेते आहेत. तक्रारकर्ता यांनी सोयाबीन बियाण्याचा नमुना उचित प्रयोगशाळेद्वारे तपासणीसाठी पाठविण्याकरिता जिल्हा मंचाकडे सादर केलेला नाही. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनीही बियाण्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधीत लॉटचे बियाणे नमुना तात्काळ प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविलेला नाही. अशा स्थितीत वादकथित सोयाबीन बियाणे निर्दोष व उगवणयोग्य होते, हे सिध्द करण्यास विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे असमर्थ ठरले आहेत. परिणामी, वादकथित सोयाबीन बियाणे दोषयुक्त होते आणि त्यामुळे तक्रारकर्ता यांचे नुकसान झाले, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(12) तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार त्यांना प्रतिएकर 10 ते 12 क्विंटल उत्पन्न अपेक्षीत होते आणि हमी भाव रु.3,800/- असल्यामुळे त्यांना 80 क्विंटलकरिता रु.3,04,000/- चे नुकसान झाले. तसेच खते, मशागत, पेरणी, बियाणे, नोटीस इ. साठी केलेला खर्च व मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- असे एकूण रु.4,76,080/- चे नुकसान सहन करावे लागले. तक्रारकर्ता यांनी नुकसान भरपाईपृष्ठयर्थ उचित पुरावे सादर केलेले नाहीत. समिती अहवालाचे अवलोकन केले असता 19.09 टक्के उवगण झालेली होती. तसेच 2 एकर क्षेत्रावर खोल पेरणी केल्यामुळे व 2 हेक्टर क्षेत्रामध्ये बियाण्यातील दोषामुळे कमी उगवण झाल्याचे त्यामध्ये नमूद आहे. तक्रारकर्ता यांनी दुबार पेरणी केली, असे नमूद केले आहे. तसेच उगवणशक्तीचे 19.09 असे अत्यल्प प्रमाण पाहता ते पीक पुढे जोपासल्यानंतर येणारे उत्पन्न अत्यल्प असल्यामुळे तक्रारकर्ता यांनी दुबार पेरणी केली, हे ग्राह्य धरावे लागेल. निश्चितच तक्रारकर्ता यांनी दुबार पेरणी केल्यामुळे त्या हंगामामध्ये त्यांना उत्पन्न मिळाले, हे स्पष्ट आहे. त्यामुळे बियाणे, पेरणी व खते इ. खर्च त्यांना पुनश्च: अतिरिक्त करावा लागला आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी ज्या नुकसान भरपाईची मागणी केली, ती अवास्तव व असंयुक्तिक ठरते. असे दिसते की, 2 हेक्टर क्षेत्रामध्ये बियाण्याच्या दोषामुळे अत्यल्प उगवण झालेली आहे. बियाण्याच्या दोषामुळे बियाण्याच्या 5 पिशव्या त्यांना पुनश्च: खरेदी करणे भाग पडले असावे. तसेच खते व पेरणी खर्च इ. बाबत उचित पुरावा नसला तरी सर्वसाधारण अनुमान काढले असता 2 हेक्टर क्षेत्राकरिता रु.10,000/- खर्च असू शकतो. अशाप्रकारे बियाण्याकरिता रु.13,200/- व पेरणी व खते यांच्याकरिता रु.10,000/- याप्रमाणे एकूण रु.23,200/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतात.
(13) तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. असे दिसते की, सोयाबीन पिकाची उगवण कमी झाल्यामुळे तक्रारकर्ता यांना शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच त्यांना दुबार पेरणी करावी लागलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. शिवाय, जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत.
(14) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष क्र.2 यांनी उत्पादीत केलेले सोयाबीन बियाणे विक्री केलेले आहे. नुकसान भरपाई देण्याचे दायित्व निश्चित करताना विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार आहेत काय ? याचाही विचार व्हावयास पाहिजे. बियाण्यातील दोषामुळे विवाद निर्माण झालेला असला तरी बियाण्याच्या विक्रीपश्चात तक्रारकर्ता यांच्या तक्रारीनंतर योग्य दखल घेणे किंवा बियाणे नमुना तपासणीसाठी पाठविणे इ. कार्यवाही विरुध्द पक्ष क्र.1 यांनी केलेली नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 यांनी सुध्दा सेवेमध्ये त्रुटी केलेली असल्यामुळे ते विरुध्द पक्ष क्र.2 यांच्यासह दोषी ठरतात आणि नुकसान भरपाई देण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे संयुक्त दायित्व निर्माण होते. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ते यांना रु.23,200/- नुकसान भरपाई द्यावी.
(3) आदेश क्र.2 चे अनुपालन 45 दिवसाचे आत न केल्यास आदेश तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देय राहील.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-