जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 338/2019. तक्रार दाखल दिनांक : 06/12/2019 तक्रार निर्णय दिनांक : 07/12/2021.
कालावधी : 02 वर्षे 05 महिने 25 दिवस
बाबासाहेब रंगराव सोमवंशी, वय सज्ञान,
व्यवसाय : वकिली, रा. राठोडा, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) आनंद टुर्स आणि ट्रॅव्हल्स, प्रोप्रा. जयप्रकाश मंत्री,
पापनाश रोड, लातूर, जि. लातूर.
(2) मुख्य शाखाधिकारी, ट्रबो मेधा एअरलाईन्स प्रा.लि.
प्लॉट नं. एस.1, टेक्नोक्रिएट इंडस्ट्रीयल इस्टेट,
बालानगर, हैद्राबाद (तेलंगना) 500 037. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- बी.ई. कवठेकर
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- अनिल के. जवळकर
विरुध्द पक्ष क्र.1 एकतर्फा
न्यायनिर्णय
मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारीबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारकर्ता व त्याचे मित्र यांनी सर्वांनी मिळून हैद्राबाद येथून तिरुपतीला जाण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.1 मार्फत विरुध्द पक्ष क्र.2 कडे विमानाचे तिकीट आरक्षीत केले होते. दि.15/8/2019 रोजी त्यांना हैद्राबाद येथून तिरुपती येथे जावयाचे होते. त्याप्रमाणे दि.15/8/2019 रोजी ते हैद्राबादला गेले व तिरुपतीला जाण्यासाठी म्हणून विमानतळावर गेले असता सकाळचे असलेले विमा रद्द होऊन ते संध्याकाळी 7.00 वाजता जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना विमानतळावरच थांबावे लागले व त्यांचे आर्थिक नुकसान, खर्च इ. रु.5,000/- चे झाले. नंतर असा मेसेज आला की, संध्याकाळचे विमान रद्द झाले आहे. त्यामुळे त्यांना हॉटेलवर मुक्काम करावा लागला व रु.10,000/- चे आर्थिक नुकसान झाले. दि.16/8/2019 चे रात्रीचे विमान उपलब्ध झाले. त्यासाठी त्यांना लॉज, जेवनखान इ. खर्च करावा लागला. तक्रारकर्त्याची जी नियोजीत महत्वाची मिटींग होती, त्याला हजर राहता आले नाही. त्यामुळे त्याला आर्थिक व मानसिक त्रास झाला. मानसिक त्रासापोटी रु.3,00,000/- व आर्थिक नुकसान रु.4,00,000/- चे झाले. अशी रु.7,00,000/- ची मागणी नोटीसद्वारे केली. परंतु विरुध्द पक्षांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. विरुध्द पक्षांच्या या गैरकृत्यामुळे तक्रारकर्त्यास आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास झाला. म्हणून त्याने या तक्रारीद्वारे विरुध्द पक्षांकडून नुकसान भरपाई रु.3,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व आर्थिक नुकसानीपोटी रु.75,000/- मिळावेत व कार्यवाहीचा खर्च रु.20,000/- मिळावा, अशी मागणी केली आहे.
(2) या तक्रारीची नोटीस मिळूनही विरुध्द पक्ष क्र.1 गैरहजर राहिले. म्हणून तक्रार त्याच्याविरुध्द एकतर्फा चालविण्यात आली.
(3) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी आपले सविस्तर म्हणणे सादर केले. ज्यात त्याने तक्रारीबद्दल नकार दिला आहे. त्यांच्या मते ही तक्रार तक्रारकर्त्याने चुकीची व खोटी दाखल केली आहे. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्र.2 चा ग्राहक नाही. विरुध्द पक्ष क्र.1 हा विरुध्द पक्ष क्र.2 चा एजंट नव्हता. हैद्राबाद येथून तिरुपतीला जावयाचे तिकीट असल्यामुळे लातूर आयोगाला कार्यक्षेत्र प्राप्त होत नाही. तिकीट व्यापारी कारणासाठी खरेदी केले असल्यामुळे आयोगासमोर तक्रार चालू शकत नाही. तक्रार अपरिपक्व आहे. तक्रार दाखल करण्यासाठी कुठलेही कारण नाही. एकूण 6 जणांनी तिकीट बुक केले होते. परंतु इतर 5 व्यक्तींना यात पक्षकार केलेले नाही. त्यामुळे देखील तक्रार चालू शकत नाही. विरुध्द पक्ष क्र.2 हा सिव्हील एव्हीएशन रिक्वावयरमेंट (सी.ए.आर.एस.) मार्फत एअर ॲक्ट 1972 व 2009 याप्रमाणे व्यवसाय करतो. त्यानुसार त्यांना परिस्थितीनुसार विमा उशिराने सोडणे, उड्डाण रद्द करणे इ. अधिकार प्राप्त झालेले आहेत. दि.25/5/2019 रोजी तक्रारकर्ता व इतरांनी दि.15/8/2019 रोजीच्या प्रवासाच्या विमानाचे तिकीट बुक केले होते. 3 महिने आधी हे तिकीट बुक केले होते. दि.15/8/2019 रोजीच्या संध्याकाळी हैद्राबाद ते तिरुपती जाणा-या विमानाचे उड्डाण रद्द झाल्याबद्दल दि.19/6/2019 लाच तक्रारकर्त्याला एम.एम.एस. द्वारे कळविले होते. 57 दिवस अगोदरच त्यांना तशी कल्पना दिलेली होती. तसेच दि.14, 15 व 16 ऑगस्ट, 2019 रोजी दुस-या विमानात जावयाची तयारी असेल तर कळवा, असेही त्यांना सूचित केले होते. परंतु त्याबद्दल त्यांनी योग्य ते उत्तर पाठविले नाही. इतर प्रवाशांना त्याप्रमाणे इतर विमानामध्ये बसवून सहयोग केलेला आहे. त्याच प्रमाणे दि.12/9/2019 रोजी मोबाईलवर मेसेज पाठवून दि.15/8/2019 चे विमान रद्द झाल्याचे 3 दिवस अगोदर कळविले होते. तक्रारकर्त्याने एस.एम.एस. च्या अनुषंगाने कॉल सेंटरला फोन करुन विचारणा केली की, दि.16/8/2019 चे तिकीट मिळेल काय ? त्याप्रमाणे त्यांना दि.16/8/2019 रोजी हैद्राबाद ते तिरुपती विमानाचे 6 लोकांना तिकीट दिले व त्यांनी तसा प्रवास देखील केला. विनाकारण खोटी तक्रार सादर केलेली आहे. तथाकथित नुकसान, आर्थिक नुकसान व शारीरिक नुकसान सिध्द केलेले नाही. जी नोटीस दिली होती, त्यामध्ये व तक्रारीत वेगवेगळा मजकूर नमूद केला आहे. खोटी तक्रार दाखल केली असल्यामुळे ती फेटाळण्यात यावी व विरुध्द पक्ष क्र.2 ला रु.10,000/- खर्च मिळावा.
(4) उभय बाजुंचे निवेदन, पुरावे विचारात घेता निकालासाठी मी खालील मुद्दे निश्चित करतो व त्यावरील माझा निर्णय पुढीलप्रमाणे देत आहे.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्त्याने हे सिध्द केले काय की, विरुध्द पक्षाने त्याला
चुकीची व दोषपूर्ण सेवा पुरविली ? अंशत: होकारार्थी
(2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 व 2 :- या प्रकरणात हे स्पष्ट आहे की, तक्रारकर्ता व इतरांनी मिळून दि.25/9/2019 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 मार्फत विरुध्द पक्ष क्र.2 च्या विमानाच्या तिकिटाचे आरक्षण केलेले होते. त्यांना दि.15/8/2019 रोजी हैद्राबाद येथून तिरुपतीला विमानाने प्रवास करावयाचा होता. त्याप्रमाणे ते तिकीट पैसे भरुन काढलेले होते. हेही स्पष्ट आहे की, दि.15/8/2019 रोजीच्या संध्याकाळचे नियोजीत हैद्राबाद ते तिरुपती विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले होते. मुळ वादाचा मुद्दा हा की, ते उड्डाण रद्द झाल्याचे तक्रारकर्त्याला पूर्वीच कळविले होते की नाही ? तसेच विमान रद्द झाल्यानंतर त्याची योग्य सोय व पर्यायी सुविधा केली होती की नाही ? त्याच प्रमाणे विमान उड्डाण रद्द झाल्याने तक्रारकर्त्याचे आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान झाले आहे काय ?
(6) अशा मुद्दयाकडे जाण्यापूर्वी जे तांत्रिक मुद्दे विरुध्द पक्षातर्फे नमूद करण्यात आले, त्याचा सुरुवातीला विचार करणे जास्त संयुक्त्कि ठरेल. विरुध्द पक्षाचे म्हणणे असे की, 6 लोकांनी तिकीट काढले होते; परंतु तक्रार फक्त एका व्यक्तीने केली. तक्रारीत देखील असे नमूद आहे की, तक्रारकर्ता व इतरांनी मिळून प्रवास करण्यासाठी विमानाचे तिकीट काढलेले होते. परंतु ज्या इतरांनी तक्रारकर्त्यासोबत प्रवास करावयाचे ठरविले होते, त्या इतर इसमांनी तक्रार केलेली नाही. त्यांना या तक्रारीत पक्षकार केलेले नाही. परंतु अशा कारणावरुन तक्रारकर्त्याला एकट्याला तक्रार करता येणार नाही अथवा त्याची एकट्याची तक्रार चालू शकणार नाही, हे विरुध्द पक्षाचे निवेदन योग्य वाटत नाही. अशा तांत्रिक कारणावरुन तक्रार नाकारणे संयुक्तिक ठरणार नाही.
(7) विरुध्द पक्षातर्फे असेही निवेदन करण्यात आले की, तक्रारकर्त्याला तक्रार करण्यासाठी कारण नाही. परंतु हे स्पष्ट आहे की, दि.15 ऑगस्ट, 2019 चे नियोजीत उड्डाण रद्द करण्यात आले होते आणि याच उड्डाणाच्या प्रवासाचे तिकीट तक्रारकर्त्याने काढले होते. त्यामुळे त्याला ग्राहक म्हणून विरुध्द पक्षांविरुध्द अशी तक्रार करण्यासाठी योग्य कारण दिसून येते.
(8) विरुध्द पक्षाचे असेही म्हणणे आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 त्याचा एजंट नाही. म्हणून तक्रारकर्ता विरुध्द पक्ष क्र.2 चा ग्राहक ठरत नाही. परंतु उपलब्ध पुराव्यावरुन हे स्पष्ट आहे की, जरी विरुध्द पक्ष क्र.1 मार्फत तिकीट काढण्यात आले तरी विरुध्द पक्ष क्र.2 ने त्याप्रमाणे तिकीट दिले होते. पास देखील इश्यू केला होता. त्याचा पुढील पत्रव्यवहार हेच दर्शवितो की, विरुध्द पक्षांनी दि.15/8/2019 चे नियोजीत विमानाचे उड्डाण रद्द केल्याचे कळविले होते व पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न देखील केले होते. अशाप्रकारे झालेला व्यवहार पाहता तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक ठरतो आणि म्हणून त्याला अशी तक्रार करता येईल.
(9) विरुध्द पक्षाचे असेही म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने दि.16/8/2019 रोजी पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवास केला आणि त्या वेळी काही तक्रार केली नाही. परंतु त्यावेळी तक्रार केली नाही म्हणून तक्रारकर्त्याने आपला तक्रार करण्याचा हक्क सोडूनच दिला, असे म्हणता येणार नाही. तक्रारकर्त्याला नंतर तक्रार करता येणार नाही, असेही म्हणता येणार नाही.
(10) विरुध्द पक्षाचे असेही म्हणणे आहे की, त्याने तिकीट देताना ज्या अटी व शर्ती लावल्या होत्या; त्यानुसार त्यांना ठराविक कारणासाठी विमानाचे उड्डाण रद्द करणे अथवा उशिराने उड्डाण करणे, अशाप्रकारची योजना करण्याचा अधिकार आहे आणि जे तक्रारकर्त्याने मान्य देखील केलेले आहे. परंतु या ठिकाणी तक्रार अशी आहे की, विरुध्द पक्षाने अचानक विमानाचे उड्डाण रद्द करुन पर्यायी व्यवस्था योग्य त्याप्रमाणे केलेली नाही. त्याच प्रमाणे विमानाचे उड्डाण रद्द झाल्यामुळे तक्रारकर्त्याचे काही नुकसान झाले, याबद्दल त्याने ही तक्रार केली आहे.
(11) असे दिसते की, दि.15/8/2019 चे विमानाचे उड्डाण रद्द झाल्यानंतर दि.16/8/2019 ला तक्रारकर्ता व इतरांनी पर्यायी व्यवस्था म्हणून विमान प्रवास केला आहे. वादाचा मुद्दा एवढाच शिल्लक राहतो की, दि.15/8/2019 च्या विमानाचा प्रवास करु न शकल्यामुळे तक्रारकर्त्याचे काही आर्थिक, शारीरिक अथवा मानसिक नुकसान झाले किंवा कसे ?
(12) तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की, त्याचे रु.4,00,000/- चे आर्थिक नुकसान झाले. परंतु एवढे रु.4,00,000/- आर्थिक नुकसान दर्शविण्याइतपत सबळ पुरावा तक्रारकर्त्याने आयोगासमक्ष सादर केलेला नाही. केवळ शपथपत्राव्यतिरिक्त असा कुठलाही दस्त समक्ष हजर केला नाही; ज्यावरुन असे ठरविता येईल की, तक्रारकर्त्याचे रु.4,00,000/- चे नुकसान झाले. त्याच प्रमाणे या नुकसानीचा आकडा देखील वेगवेगळा सांगितला आहे. तर तक्रारीच्या शेवटी मागणीमध्ये रु.3,00,000/- नुकसान भरपाई मागितली आहे व मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- मागितले आहेत. तक्रारीच्या कलम 5 मध्ये मानसिक त्रासापोटी वेगळे रु.3,00,000/- नमूद केले आहेत व एकूण रु.7,00,000/- ची मागणी दर्शविली आहे. परंतु तक्रारीच्या अंतीम विनंतीच्या वेळी तशी मागणी नमूद केलेली नाही. त्याच प्रमाणे तक्रारकर्त्याने दि.12/7/2019 व 22/8/2019 रोजी जी नोटीस पाठविली, त्या नोटीसमध्ये देखील नुकसानीचा आकडा वेगवेगळा दर्शविलेला आहे. विरुध्द पक्षाचे म्हणणे असे की, त्यांना अशी नोटीस मिळाली नव्हती. ही नोटीस विरुध्द पक्षांना मिळाली की नाही, याबद्दल देखील वाद आहे.
(13) विरुध्द पक्षाचे स्पष्ट निवेदन असे आहे की, दि.15/8/2019 चे उड्डाण रद्द झाल्याबद्दल 50 दिवसापेक्षा जास्त अगोदर तक्रारकर्ता व इतरांना कळविले होते व त्यांच्या पर्यायी व्यवस्थेबद्दल देखील विचारणा केली होती. त्यावेळी तक्रारकर्ता व त्यांच्या सोबतची व्यक्ती विश्वंभर यांनी असे स्पष्ट केले की, दि.16/8/2019 चे तिकीट त्यांना चालेल. त्याप्रमाणे दि.16/8/2019 ची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु या ठिकाणी संबंधीत विश्वंभर यांचे असे कुठलेही शपथपत्र समक्ष आयोगासमक्ष सादर करण्यात आलेले नाही अथवा तसा पुरावा जो हे सिध्द करेल की, विश्वंभरने अशाप्रकारची संमती तक्रारकर्ता अथवा त्याच्यासाठी अधिकृतरित्या दिली, अशाप्रकारचा सबळ पुरावा आढळून येत नाही. तक्रारकर्त्याने आपल्या पुराव्यासोबत अंकुश राजे यांचे देखील शपथपत्र सादर केले, जे तक्रारीशी सुसंगत आहे. परंतु विश्वंभर याचे अशाप्रकारे कुठलेही शपथपत्र सादर करण्यात आलेले नाही.
(14) जेव्हा तक्रारकर्ता स्वत: विशिष्ट रकमेच्या नुकसान भरपाईची मागणी करतो तेव्हा ही तक्रारकर्त्याची जबाबदारी आहे की, त्याने त्याचे झालेले नुकसान सिध्द करण्यासाठी पुरेसा पुरावा सादर केला पाहिजे. केवळ शपथपत्र हा त्याबाबतचा तसा पुरेसा पुरावा मानता येणार नाही. तक्रारकर्ता व इतरांची नेमकी कोणती मिटींग होती; जिला त्यांना मुकावे लागले व मिटींगमुळे त्यांचे रु.3,00,000/- चे नुकसान झाले, याबद्दलचा स्पष्ट पुरावा तक्रारकर्त्यातर्फे सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाईपोटी रु.3,00,000/- अशी रक्कम देण्याइतपत पुरेसा पुरावा नाही. तसेच तक्रारकर्त्याने शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- ची मागणी केली आहे. परंतु त्याने आपल्या तक्रारीत मानसिक त्रासाबाबतची रक्कम रु.3,00,000/- दर्शविली आहे. नोटीसमध्ये अशी रक्कम जास्त दर्शविलेली आहे. पुरावा व तक्रारीमधील तपशील व नोटीस यामध्ये अशाप्रकारची तफावत आढळून येते.
(15) एकंदरीत पुराव्यावरुन हे दिसून येते की, दि.15/8/2019 चे विमानाचे उड्डाण रद्द झाले असले तरी दुस-या दिवशी तक्रारकर्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याप्रमाणे त्याने प्रवास देखील केला. तरीही हे स्पष्ट आहे की, नियोजीत दि.15/8/2019 चे प्रवासाचे तिकीट तक्रारकर्त्याला त्या दिवशी वापरता आले नाही व ते उड्डाण रद्द करण्यात आले होते. त्यामुळे तक्रारकर्त्याची गैरसोय झाली. त्याचे काहीसे आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान झाल्याचे दिसते. जर या नुकसानीचा आकड्याबाबत स्पष्ट अथवा पुरेसा पुरावा नसला तरी काही प्रमाणात तक्रारकर्त्याचे नुकसान झाले असावे, असे अनुमान काढण्याइतपत पुरावा समक्ष आलेला आहे.
(16) तक्रारकर्त्याने 1(2011) सी.पी.जे. 317, प. बंगला राज्य आयोगाच्या "इंडियन एअरलाईन्स (इंडिया) /विरुध्द/ सुदर्शन रॉय" या प्रकरणाचा हवाला दिला. या प्रकरणात देखील अशाच प्रकारच्या परिस्थितीत काही अनुतोष तक्रारकर्त्याला दिल्याचे दिसते. आपल्या या प्रकरणात विरुध्द पक्षाने दि.15/8/2019 चे उड्डाण रद्द करुन तक्रारकर्त्याची गैरसोय केली व त्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास झाला. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला चुकीची व दोषपूर्ण सेवा पुरविली. प्रकरणात तक्रारकर्त्याचे किती नुकसान झाले, त्याला किती खर्च आला इ. बाबतचा तपशील सुस्पष्टपणे मांडण्यात आलेला नाही. शपथपत्रात जरी काही बाबी नमूद असल्यातर त्यापृष्ठयर्थ पुरेसा दस्तऐवज पुरावा सादर करण्यात आलेला नाही आणि म्हणून अशा सर्व बाबी विचारात घेता तक्रारकर्त्याच्या मागणीप्रमाणे एवढी मोठी रक्कम त्याला देणे संयुक्तिक ठरणार नाही. परंतु त्याला जो आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास झाला, याप्रीत्यर्थ काहीतरी रक्कम विरुध्द पक्षातर्फे तक्रारकर्त्याला देणे योग्य ठरेल. त्याप्रमाणे मुद्दा निर्णीत करुन मी खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
(1) तक्रार अशंत: मंजूर.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 उभयतांनी व्यक्तीश: व संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रास व नुकसान भरपाईपोटी एकूण रु.30,000/- या आदेशापासून 30 दिवसाच्या आत अदा करावेत.
या मुदतीत रक्कम अदा केली नाही तर विरुध्द पक्षांना या रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देखील तक्रारकर्त्याला द्यावे लागेल.
ग्राहक तक्रार क्र. 338/2019.
(3) विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला या कार्यवाहीच्या खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
(4) उभय पक्षकारांना या निवाड्यांच्या प्रती विनामुल्य त्वरीत देण्यात याव्यात.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-