Maharashtra

Latur

CC/355/2019

रजियाबी नसीरखान पाठाण - Complainant(s)

Versus

प्रो. प्रा. कासिम महमदसाब शेख अल कासीम टुर्स अ‍ॅण्ड - Opp.Party(s)

अ‍ॅड. ए. एम. के. पटेल

13 Apr 2023

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/355/2019
( Date of Filing : 17 Dec 2019 )
 
1. रजियाबी नसीरखान पाठाण
y
...........Complainant(s)
Versus
1. प्रो. प्रा. कासिम महमदसाब शेख अल कासीम टुर्स अ‍ॅण्ड
y
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. REKHA R. JADHAV PRESIDENT
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 13 Apr 2023
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 355/2019.                           तक्रार दाखल दिनांक : 17/12/2019.                                                                           तक्रार निर्णय दिनांक : 13/04/2023.

                                                                                       कालावधी : 03 वर्षे 03 महिने 27 दिवस

 

रजियाबी भ्र. नासीरखान पठाण, वय 55 वर्षे, व्यवसाय : काही नाही,

रा. व्यंकटेश नगर, अंबा हनुमान, अंबाजोगाई रोड, लातूर, ता. जि. लातूर.               तक्रारकर्ता

 

                        विरुध्द

 

(1) अल कासीम टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स् तर्फे प्रोप्रा. कासिम मंहमदसाब शेख,

     वय 67 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. मदिना मस्जीदजवळ,

     खोरी गल्ली, मित्र नगर, लातूर, ता. जि. लातूर.

(2) असिल टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स् तर्फे प्रोप्रा. मीर इरशाद अली महेमुदअली,         

     वय 50 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. 301, तळमजला, 297, इसाक मंजील,

     एस.व्ही.पी. रोड, डायमंड ज्युबली गर्ल्स हायस्कुलसमोर, डोंगरी मुंबई-400 003.

     (तक्रारकर्ता यांच्या लेखी विनंतीवरुन नांव कमी करण्यात आले.)

(3) मीर इरशाद अली महेमुदअली, प्रोप्रा. असिल टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स्,          

     वय 50 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. कमरुनिस्सा व्हिला,

     प्रियदर्शनी कॉलनी, पडेगाव, औरंगाबाद.

(4) व्यवस्थापक, अल बुरख टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स, रा. हाजी बिल्डींग, शॉप नं. 9,

     प्लॉट नंबर 96, तळमजला, डिमटिमकर रोड, नागपाडा पोलीस

     स्टेशनजवळ, नागपाडा, मुंबई सेंट्रल, मुंबई - 400 008.

(5) व्यवस्थापक / संचालक, एटलस टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स प्रा.लि.,

     मुख्य कार्यालय, 53 हाजी महेल, मोहम्मद अली रोड, शॉप नं. 1,

     नुर हॉस्पिटलजवळ, मस्जिद बंदर, मुंबई - 400 003.                                      विरुध्द पक्ष

गणपूर्ती :          श्रीमती रेखा जाधव, अध्‍यक्ष (अतिरिक्त कार्यभार)

                        श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :-  ए.एम.के. पटेल

विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :-  आय.ए. शेख

विरुध्द पक्ष क्र.3 :-  अनुपस्थित / एकतर्फा

विरुध्द पक्ष क्र.4 यांचेकरिता विधिज्ञ :-  एस.एम. कोतवाल

विरुध्द पक्ष क्र.5 यांचेकरिता विधिज्ञ :-  फारुक कासिमसाब शेख

 

आदेश 

 

श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-

 

(1)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, विरुध्द पक्ष क्र.1 हे विरुध्द पक्ष क्र. 2 ते 5 यांच्यासह ईस्लाम धर्माचे पवित्र स्थळ मक्का, मदिना (सौदी अरेबिया) हज / ऊमरा यात्रेसाठी यात्रेकरुंना पाठविण्याचा व्यवसाय करतात. विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यात्रेसाठी सर्व कायदेशीर कागदोपत्री पूर्तता करतात आणि विरुध्द पक्ष क्र.1 तर्फे नोंदणी झालेल्या यात्रेकरु व्यक्तींना हज / उमरा पवित्रस्थळी पाठविण्याचा व सर्व सोई-सुविधा पुरविण्याचा व्यवसाय करतात. विरुध्द पक्ष क्र. 4 हे विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्याद्वारे यात्रेसाठी जाणा-या व्यक्तींचे जाणे-येण्याचे विमान प्रवासाचे तिकीट काढण्याचा व यात्रेकरुंना परदेशामध्ये सर्व सोई-सुविधा पुरविण्याचा व्यवसाय करतात. विरुध्द पक्ष क्र.5 हे हज / उमरा जाणा-या व्यक्तींचे व्हिसा काढण्याचा व्यवसाय करतात. विरुध्द पक्ष क्र.1 यांना यात्रेचे प्रतिफल दिल्यानंतर त्या रकमेतून विरुध्द पक्ष क्र.2 ते 5 हे विमान प्रवास तिकीट, व्हिसा व आवश्यक सेवा पुरवितात. अशाप्रकारे विरुध्द पक्ष क्र.1 ते 5 यांची साखळी आहे.

 

 

 

 

 

 

(2)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी त्यांना हज / उमरा यात्रेस जाण्याकरिता योग्‍य सेवा देण्याचे आश्वासन दिलेले होते. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2018 पूर्वी त्यांनी योजलेल्या पवित्र उमरा / हज 15 दिवसाच्या यात्रेमध्ये मक्का व मदिना येथे अनुक्रमे 7 दिवस निवास व्यवस्था, भोजन, नाष्टा, चहा-पाणी इ. व्यवस्थेसह स्थानक दर्शनाकरिता वाहन व्यवस्था सेवेचा समावेश होता. त्याकरिता विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांच्याकडून एकरकमी रु.40,000/- आकारणी केले आणि त्या रकमेमध्ये उक्त सर्व सेवा-सुविधा पुरविण्याची हमी दिलेली होती.

 

(3)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी यात्रेस जाण्याकरिता एकूण 27 व्यक्तींना तयार केले. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 हे स्वत: यात्रेकरुसोबत सौदी अरेबिया येथे मार्गदर्शक म्हणून राहणार होते. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांच्याकडे रोखीने व खात्यामध्ये रक्कम जमा केली. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 यांना गट नेता नियुक्त करुन 27 यात्रेकरुंना मुंबई येथून पाठविण्यात येणार होते. विरुध्द पक्ष क्र.1 ते 5 यांनी एकूण 27 यात्रेकरुंपैकी 13 यात्रेकरुंना दि.19/10/2018 रोजी मुंबई येथून पवित्र उमरा / हज यात्रेसाठी पाठविण्याचे निश्चित केले आणि त्यांचे जाण्याचे विमान प्रवास तिकीट व व्हिसा काढून ठेवला. तसेच 13 यात्रेकरुंचे मक्का, मदिना सौदी अरब येथून भारतामध्ये परत येण्याकरिता दि.4/11/2018 रोजीचे विमान प्रवास तिकीट निश्चित केलेले होते.

 

(4)       तक्रारकर्ता यांनी पवित्र उमरा / हज यात्रेकरिता जाणा-या 13 यात्रेकरुंचा व अन्य उर्वरीत 14 यात्रेकरुंचा पासपोर्ट क्रमांक, जन्मतारीख, व्हिसा क्रमांक व तारीख इ. तपशील तक्त्याद्वारे नमूद केला आहे.

 

(5)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 ते 4 यांच्यामार्फत विमान प्रवासाचे तिकीट घेतल्यानंतर दि.19/10/2018 रोजी तक्रारकर्ता व अन्य 12 व्यक्तींना पवित्र उमरा / हज यात्रेकरिता पाठविले. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 यांनी आश्वासन दिल्यानुसार ते मार्गदर्शक नात्याने यात्रेकरुसोबत गेले नाहीत आणि उर्वरीत 14 यात्रेकरुंच्या यादीमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आले.

(6)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, मक्का शहरामध्ये पोहोचल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 ते 5 यांनी 13 यात्रेकरुसाठी फक्त 2 दिवसाकरिता हॉटेल व्यवस्था केली; परंतु त्यापुढील 5 दिवसाकरिता विरुध्द पक्ष क्र.1 ते 5 यांनी हॉटेल मालकास देय रककम अदा न केल्यामुळे त्यांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे तक्रारकर्ता यांना फुटपाथवर रहावे लागले आणि भिक्षा मागून उपजीविका भागवावी लागली. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 मीर इरशाद अली यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांचे बंधू तेथे येऊन व्यवस्था करतील, असे आश्वासन दिले; परंतु त्यांच्या मदतीला कोणी आले नाही. तसेच तक्रारकर्ता व अन्य 12 यात्रेकरुंचे परतीचे विमान प्रवास तिकीट रद्द केल्यामुळे मदत घेऊन व भिक मागून आर्थिक तरतूद करावी लागली आणि विमान प्रवासासाठी अवाजवी व अतिरिक्त दराने तिकीट खरेदी करुन दि.6/11/2018 रोजी भारतामध्ये परतावे लागले. ज्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासासह आर्थिक खर्च व नुकसान झाले.

 

(7)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, त्यांच्या नातेवाईकांनी विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांच्या मुंबई व औरंगाबाद येथील कार्यालयामध्ये चौकशी केली असता दि.28/10/2018 रोजी कार्यालय बंद केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र. 4 व 5 यांना चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारकर्ता परत आल्यानंतर जानेवारी 2019 मध्ये विरुध्द पक्ष क्र.2 व 3 मीर इरशाद अली यांची भेट घेतली असता त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारकर्ता व अन्य यात्रेकरुच्या तक्रारीनंतर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी विरुध्द पक्ष क्र.2 ते 4 यांच्या विरुध्द शिवाजी नगर पोलीस ठाणे, लातूर यांच्याकडे फिर्याद दिली आणि दि. 17/5/2019 रोजी विरुध्द पक्ष क्र. 2 ते 4 यांच्याविरुध्द गुन्हा क्र. 206/2019 नोंद करण्यात आला.

 

(8)       अशाप्रकारे विरुध्द पक्ष क्र.1 ते 5 यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे नमूद करुन त्यांच्याकडून स्वीकारलेली रक्कम रु.40,000/-; मक्का - मदिना येथे झालेला खर्च रु.50,000/-, हज / उमरा यात्रा पूर्ण न झाल्यामुळे नुकसान भरपाई रु.1,00,000/-; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.10,000/- याप्रमाणे एकूण रु.2,50,000/- व्याजासह देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 ते 5 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.

 

(9)       विरुध्द पक्ष क्र.1 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य केला. त्यांचे कथन असे की, ते कासिम टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स यांचे प्रोप्रायटर आहेत आणि हज यात्रेसाठी जाणा-या इच्छुक भाविकांना विरुध्द पक्ष क्र.2 ते 5 यांच्या पॅकेजनुसार प्रवाशांकडून रक्कम स्वीकारुन विरुध्द पक्ष क्र.2 ते 5 यांना सुपूर्त करण्यासाठी एजंटचे काम करतात. त्यानुसार त्यांनी तक्रारकर्ता यांच्याकडून रु.35,000/- स्वीकारले आणि विरुध्द पक्ष क्र.2 ते 5 यांना वेळोवेळी रक्कम दिलेली आहे.

 

(10)     विरुध्द पक्ष क्र.1 यांचे पुढे कथन असे की, त्यांनी सेवेमध्ये त्रुटी केलेली नाही. त्यांनी स्वत:चे कर्तव्य पार पाडलेले आहे. यात्रेकरुंना सौदी अरेबिया येथे पाठविणे व तेथे सेवा देण्याची सर्वस्वी जबाबदारी विरुध्द पक्ष क्र.2 ते 5 यांच्यावर होती. विरुध्द पक्ष क्र.2 ते 5 यांनी यात्रेकरुंना हज यात्रेसाठी पॅकेज दिले आणि सेवा पुरविण्यामध्ये विरुध्द पक्ष क्र.2 ते 5 यांनी त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. त्यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांच्याविरुध्द पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिलेली आहे. अंतिमत: ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.

 

(11)     विरुध्द पक्ष क्र. 5 यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले. त्यांचे कथन असे की, ग्राहक संरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार तक्रारकर्ता त्यांचे ग्राहक नाहीत. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश मजकूर त्यांनी अमान्य केला. त्यांचे कथन असे की, विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या टुर पॅकेजबद्दल त्यांना माहिती नाही. नियमानुसार व्हिसा काढून देण्याचे ते काम करतात. विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून प्राप्त प्रस्तावानुसार त्यांनी तक्रारकर्ता यांचा व्हिसा काढून दिलेला आहे. त्यांच्याकडून व्हिसा घेऊन परदेशामध्ये गेलेल्या यात्रेकरुंना सर्व सोई-सुविधा पुरविण्याचा ते व्यवसाय करतात आणि विरुध्द पक्ष क्र.1 ते 5 यांची साखळी असल्यासंबंधी तक्रारकर्ता यांचे कथन अमान्य केले आहे. मक्का मदिना टुर पॅकेजशी त्यांचा थेट संबंध नाही. तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडून सेवा घेतलेली नाही. तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी किंवा अनुचित प्रथेचा अवलंब केलेला नाही आणि नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नसल्याचे नमूद करुन ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.5 यांनी केलेली आहे.

 

(12)     तक्रारकर्ता यांच्या लेखी विनंतीवरुन विरुध्द पक्ष क्र.2 यांना ग्राहक तक्रारीमधून वगळण्यात आले.

 

(13)     विरुध्द पक्ष क्र. 3 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.

 

(14)     विरुध्द पक्ष क्र.4 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले.

 

(15)     तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 व 5 यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच मौखिक युक्तिवाद ऐकल्‍यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

                       

मुद्दे                                                                                           उत्तर

 

(1) तक्रारकर्ता विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत काय ?                                           होय

(2) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्‍ये त्रुटी                               होय

      केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                                  (वि.प. क्र. 3 व 4 यांनी)

(3) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय  ?           होय (अंशत:)

      असल्‍यास किती ?                                                                                 अंतिम आदेशाप्रमाणे

(4) काय आदेश  ?                                                                                     अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमीमांसा

 

(16)     मुद्दा क्र. 1  :- सर्वप्रथम, ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीनुसार तक्रारकर्ता 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत, अशी हरकत विरुध्द पक्ष क्र.5 यांनी नोंदविलेली आहे.  त्या अनुषंगाने दखल घेतली असता विरुध्द पक्ष क्र.5 यांनी तक्रारकर्ता यांचा व्हिसा काढून दिला, ही मान्यस्थिती आहे. निर्विवादपणे, विरुध्द पक्ष क्र.5 यांनी व्हिसा काढण्याचे काम नि:शुल्क केलेले नाही. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.5 यांच्याकडे प्रत्यक्ष व थेट संपर्क साधलेला नसला तरी विरुध्द पक्ष क्र. 2 यांच्या प्रस्तावानुसार त्यांनी तक्रारकर्ता यांचा व्हिसा काढण्याचे काम केले आहे. अशाप्रकारे तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.5 यांच्याकडून व्हिसा काढण्यासंबंधी सेवा घेतलेली असल्यामुळे ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 चे कलम 2 (1)(डी) अन्वये तक्रारकर्ता 'ग्राहक' संज्ञेत येतात आणि विरुध्द पक्ष यांचे 'ग्राहक' आहेत, या निष्कर्षाप्रत येऊन मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.

 

(17)     मुद्दा क्र. 2 ते 4 :- मुद्दा क्र. 2 ते 4 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. तक्रारकर्ता यांनी मक्का मदिना (सौदी अरेबिया) हज / उमरा यात्रेस जाण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याशी संपर्क साधला, ही मान्यस्थिती आहे. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार यात्रेचे शुल्क रु.40,000/- विरुध्द पक्ष क्र. 1 यांना दिले आहे. उलटपक्षी, तक्रारकर्ता यांच्याकडून रु.35,000/- प्राप्त झाले, असे विरुध्द पक्ष क्र.1 यांचे कथन आहे. काहीही असले तरी, मक्का मदिना (सौदी अरेबिया) हज / उमरा यात्रेस जाण्याकरिता तक्रारकर्ता यांनी आवश्यक शुल्क विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे जमा केले, ही मान्यस्थिती आहे. 

 

(18)     मुख्य विवादाच्या अनुषंगाने वाद-तथ्ये व पुराव्यांची दखल घेतली असता विरुध्द पक्ष क्र. 3 यांच्या नियंत्रणाखाली विरुध्द पक्ष क्र.1 हे मक्का मदिना (सौदी अरेबिया) हज / उमरा यात्रेस जाण्यास इच्छूक यात्रेकरुंना तेथे पाठविण्याचे कार्य करतात. असेही दिसते की, विरुध्द पक्ष क्र.4 हे विमान प्रवास तिकीट काढून देण्याचे कार्य करतात. तसेच परदेश प्रवासाकरिता आवश्यक व्हिसा काढण्याचे काम विरुध्द पक्ष क्र. 5 यांनी केले, ही मान्यस्थिती आहे.

(19)     विरुध्द पक्ष क्र.4 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.3 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित आहेत. विरुध्द पक्ष क्र.3 व 4 यांनी तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व दाखल पुरावे यांचे खंडन करण्यात प्रयत्न केलेला नाही. अशा स्थितीत, तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, शपथपत्र व पुराव्यांच्या कागदपत्रांना त्यांच्याद्वारे विरोधी पुरावा नाही. 

 

(20)     वाद-तथ्ये व कागदोपत्री पुरावे पाहता विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता व अन्य यात्रेकरुंकडून स्वीकारलेली शुल्क रक्कम विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडे पाठविली, असे दिसते. विरुध्द पक्ष क्र.1 हे मक्का मदिना हज उमरा येथे यात्रेकरुंना पाठविण्याकरिता विरुध्द पक्ष क्र. 3 यांचे मध्यस्त म्हणून कार्य करतात; विरुध्द पक्ष क्र.4 हे विमान प्रवासाचे तिकीट काढण्याचे व विरुध्द पक्ष क्र.5 हे व्हिसा काढण्याचे कार्य करीत असले तरी यात्रेकरुंना मक्का मदिना (सौदी अरेबिया) हज / उमरा यात्रेस पाठविण्याची मुख्य जबाबदारी विरुध्द पक्ष क्र.3 यांची होती, हे ग्राह्य धरावे लागेल.

 

(21)     वादविषयानुसार पवित्र उमरा / हज 15 दिवसाच्या यात्रेसाठी मक्का व मदिना येथे अनुक्रमे 7 दिवस निवास व्यवस्था, भोजन, नाष्टा, चहा-पाणी इ. व्यवस्थेसह स्थानिक दर्शनाकरिता वाहन व्यवस्था सेवेचा समावेश होता. परंतु मक्का शहरामध्ये पोहोचल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 ते 5 यांनी 13 यात्रेकरुसाठी फक्त 2 दिवसाकरिता हॉटेल व्यवस्था केली आणि त्यापुढील 5 दिवसाकरिता विरुध्द पक्ष क्र.1 ते 5 यांनी हॉटेल मालकास देयक अदा न केल्यामुळे त्यांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आले; ज्यामुळे त्यांना फुटपाथवर रहावे लागून भिक्षेद्वारे उपजीविका भागवावी लागली. तसेच तक्रारकर्ता व अन्य 12 यात्रेकरुंचे परतीचे विमान प्रवास तिकीट रद्द केल्यामुळे मदत घेऊन व भिक मागून आर्थिक तरतूद करुन दि.6/11/2018 रोजी भारतामध्ये परत यावे लागले.

 

(22)     वास्तविक पाहता, कथित यात्रेदरम्यान द्यावयाच्या सेवा-सुविधेसंबंधी उचित कागदपत्रे अभिलेखावर दाखल नाहीत. असे असले तरी, विरुध्द पक्ष क्र.3 व 4 यांच्याद्वारे तक्रारकर्ता यांच्या वादकथनांचे खंडन करण्यात आलेले नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 यांचे लेखी निवेदन विचारात घेतले असता कथित सेवा-सुविधा विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याद्वारे पुरविण्याच्या होत्या, हे ग्राह्य धरावे लागेल. असेही दिसते की, तक्रारकर्ता यांचे जाण्या-येण्याचे विमान प्रवास तिकीट काढण्यात आलेले होते. मात्र, परतीचे तिकीट रद्द केल्यामुळे त्यांना अन्य मदत घेऊन भारतामध्ये परत यावे लागले, असे तक्रारकर्ता यांचे कथन आहे. कथनापृष्ठयर्थ परतीचे तिकीट अभिलेखावर दाखल केलेले आहे. कागदपत्रे पाहता विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तक्रारकर्ता यांच्या जाण्या-येण्याचे विमान प्रवास तिकीट काढलेले दिसते.

 

(23)     विरुध्द पक्ष क्र.3 हे असिल टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स् यांचे प्रोप्रायटर आहेत. मुख्यत: वादकथित यात्रेचे नियोजन विरुध्द पक्ष क्र.3 यांनी केलेले होते. विरुध्द पक्ष क्र.1, 4 व 5 हे यात्रेकरुंना इच्छित यात्रेस पाठविण्याच्या प्रक्रियेतील अन्य पुरक यंत्रणा आहेत. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार मक्का शहरामध्ये पोहोचल्यानंतर त्यांना 2 दिवस हॉटेलमध्ये वास्तव्याची सेवा उपलब्ध करुन दिली; मात्र त्यानंतर त्यांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आले आणि फुटपाथवर रहावे लागून भिक्षा मागावी लागली. वादकथनांनुसार यात्रा कालावधीमध्ये निवास व भोजन व्यवस्था करण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष क्र.3 यांच्यावर होती. वास्तविक पाहता, विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्ता यांच्या वादकथनाचे खंडन करण्याचा प्रयत्न केलेला नाही. वाद-तथ्ये पाहता परतीचे विमान प्रवास तिकीट रद्द केल्यामुळे तक्रारकर्ता यांना आर्थिक नुकसान व अन्य त्रास सहन करावा लागला, हे ग्राह्य धरावे लागेल. अशा स्थितीत, विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. असे दिसते की, तक्रारकर्ता यांचे विमान तिकीट काढण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष क्र.4 यांच्यावर होती आणि तक्रारकर्ता हे विमान सेवेकरिता मुख्य लाभार्थी होते. तक्रारकर्ता यांचे परतीचे तिकीट का रद्द केले किंवा तिकीट रद्द करण्यासंबंधी तक्रारकर्ता किंवा विरुध्द पक्ष क्र. 2 किंवा 3  यांचे निर्देश होते काय, यासंबंधी उचित स्पष्टीकरण देण्याचा विरुध्द पक्ष क्र.4 यांच्याकडून प्रयत्न झालेला नाही. आमच्या मते, तक्रारकर्ता यांचे परतीचे विमान प्रवास तिकीट एकतर्फी मार्गाने रद्द करता येणार नाही. मात्र, तिकीट रद्द करण्याच्या कृतीमुळे तक्रारकर्ता यांच्यासमोर उद्भवणा-या अडचणी, होणारे आर्थिक नुकसान व अन्य त्रासदायक परिणाम ज्ञात असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तिकीट रद्द केलेले आहे. जेव्हा एखादा करार तृतीय पक्षाला अभिप्रेत लाभार्थीचा दर्जा प्रदान करतो तेव्हा त्याचे पालन केवळ तृतीय पक्षाकरिता किंवा त्याच्या लाभासाठी प्रदान होत नसून कराराच्या वचनबध्दतेसाठी लाभार्थ्याला एक स्वतंत्र वादकारण निर्माण करतो. वचनाची अंमलबजावणी करण्‍याची कृती म्हणजे लाभार्थीचे अधिकार निश्‍चित झाल्यावर कराराचे मूळ पक्ष दोघेही करार पूर्ण करण्यास बांधील असतात. अशा वेळी वचन देणार्‍याने किंवा वचनकर्त्याने करार रद्द करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा केलेला कोणताही प्रयत्न निरर्थक ठरतो. जर वचन देणाऱ्याने आपला विचार बदलला आणि वचन देणाऱ्याला काम न करण्यासाठी निर्देश दिले तर तृतीय पक्ष तृतीय पक्षास कायदेशीर कार्यवाहीचे अधिकार प्राप्त होतात. निश्चितच, प्रस्तुत प्रकरणामध्ये विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तक्रारकर्ता यांचे परतीचे विमान प्रवास तिकीट रद्द करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उक्त विवेचनाअंती तक्रारकर्ता यांना झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्याचे दायित्व विरुध्द पक्ष क्र.3 व 4 यांच्यावर येते, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.

 

(24)     तक्रारकर्ता यांनी यात्रेचे शुल्क रु.40,000/-; मक्का - मदिना येथे झालेला खर्च रु.50,000/-, हज / उमरा यात्रा पूर्ण न झाल्यामुळे नुकसान भरपाई रु.1,00,000/-; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.10,000/- याप्रमाणे एकूण रु.2,50,000/- व्याजासह मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्‍कम निश्चित करताना त्या–त्‍या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. वाद-तथ्यानुसार मक्का शहरामध्ये पोहोचल्यानंतर तक्रारकर्ता यांची 7 पैकी 2 दिवसापर्यंत सोय झाली; परंतु उर्वरीत दिवसाकरिता त्यांची गैरसोय होऊन मनस्ताप व शारीरिक त्रास सहन करावा लागला. विरुध्द पक्ष क्र.3 यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी दखल घेतली नाही. परतीचे तिकीट रद्द केल्यामुळे आर्थिक मदत घेऊन त्यांना भारतामध्ये परत यावे लागले. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, त्यांना मदत घेऊन व भिक्षा मागून आर्थिक तरतूद करावी लागली आणि भारतामध्ये परतावे लागले.  यावरुन तक्रारकर्ता यांना भारतामध्ये परत येण्यासाठी आर्थिक भार सहन करावा लागलेला आहे. संबंधितास तक्रारकर्ता यांनी रक्कम परत केली किंवा कसे, यासंबंधी स्पष्टीकरण नसले तरी कदाचित त्यांच्या जवळ असणा-या रक्कम व आर्थिक मदत घेऊन परतीचा प्रवास केल्यामुळे निश्चितच त्यांना आर्थिक भार सहन करावा लागल्याचे मान्य करावे लागेल. योग्य विचाराअंती, परतीच्या प्रवासाचे शुल्क व अन्य खर्चाकरिता तक्रारकर्ता रु.50,000/- नुकसान भरपाई मिळण्याकरिता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत येत आहोत.

 

(25)     असे दिसते की, तक्रारकर्ता ज्या पवित्र धार्मिक यात्रेसाठी मक्का मदिना येथे गेले होते, ती यात्रा पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यांना तेथे गंभीर गैरसोईस सामोरे जावे लागले; मक्का येथे फुटपाथवर वास्तव्य करावे लागले; त्यांना भिक्षा व आर्थिक मदत मागणे भाग पडले आहे. तक्रारकर्ता यांना वेळोवेळी विरुध्द पक्ष यांच्याकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच जिल्‍हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्‍ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्‍या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्‍यायप्रविष्‍ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्‍यय होतो. अशा बाबीमुळे तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्‍वाभाविक आहे. योग्‍य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.30,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे. 

 

(26)     तक्रारकर्ता यांच्या अन्य अनुतोष मागण्या न्याय्य नसल्यामुळे अमान्य करणे संयुक्तिक ठरते.

 

(27)     उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.4 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

आदेश

 

(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.     

(2) विरुध्‍द पक्ष क्र.3 व 4 यांनी तक्रारकर्ता यांना रु.50,000/- नुकसान भरपाई द्यावी.

ग्राहक तक्रार क्र. 355/2019.

 

(3) विरुध्द पक्ष क्र.3 व 4 यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.30,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- द्यावेत.

(4) विरुध्द पक्ष क्र.3 व 4 यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी विहीत मुदतीमध्ये न केल्यास उक्त देय रकमेवर आदेश तारखेपासून रक्‍कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज देय राहील.

(5) विरुध्द पक्ष क्र.3 व 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.

 

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)                                                                (श्रीमती रेखा  जाधव)                

            सदस्‍य                                                                                  अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)             

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 

 
 
[HON'BLE MRS. REKHA R. JADHAV]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.