जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 64/2023. तक्रार नोंदणी दिनांक : 06/03/2023.
तक्रार दाखल दिनांक : 24/03/2023. तक्रार निर्णय दिनांक : 19/09/2024.
कालावधी : 01 वर्षे 06 महिने 13 दिवस
सौ. स्वाती संजय गबाळे, वय 33 वर्षे, व्यवसाय : नोकरी,
रा. शासकीय कॉलनी, इमारत क्र. 2, खोली क्र. 19,
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे, लातूर. :- तक्रारकर्ती
विरुध्द
(1) प्रोप्रायटर, अमेय इलेक्ट्रॉनिक्स्, मधुमिरा कॉम्प्लेक्स,
उड्डान पुलाजवळ, मेन रोड, शिवाजी नगर, लातूर.
(2) व्यवस्थापक, व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज् लिमिटेड,
कार्पोरेट ऑफीस, प्लॉट नं. 296, उद्योग विहार,
इंडस्ट्रीयल एरिया, फेज 2, गुरगाव - 122 015.
(3) व्यवस्थापक, व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड,
औरंगाबाद-पैठण रोड, चित्तेगाव, औरंगाबाद - 431 105. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती वैशाली म. बोराडे, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. अनिल के. जवळकर
विरुध्द पक्ष :- अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) प्रस्तुत ग्राहक तक्रारपत्रामध्ये तक्रारकर्ती यांच्या तक्रारीचा आशय असा की, दि.9/11/2015 रोजी त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "अमेय इलेक्ट्रॉनिक्स्") यांच्याकडून विरुध्द पक्ष क्र.2 व 3 (यापुढे "व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज्") यांनी उत्पादीत केलेला दूरदर्शन संच VKU 40 HH रु.30,500/- मुल्य देऊन खरेदी केला. अमेय इलेक्ट्रॉनिक्स् यांनी त्याबद्दल देयक क्र. 2843 देऊन दूरदर्शन संचाकरिता 5 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दूरदर्शन संचाच्या 4 वर्षे 6 महिने वापरानंतर स्क्रीनवर अडीच ते तीन इंचाचे उभे पट्टे येऊ लागले आणि त्यामुळे चित्र दिसेनासे झाले. तक्रारकर्ती यांनी व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजच्या ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रार केली असता अभियंत्याने दूरदर्शन संच खोलून खराब झालेला सुटा भाग मागवून घेण्यासाठी व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजकडे मेल केला. दूरदर्शन संचाचा सुटा भाग आणून संच सुरु करण्याबद्दल तक्रारकर्ती यांनी पाठपुरावा केला असता केवळ आश्वासने देऊन टाळाटाळ सुरु करण्यात आली. तसेच, तक्रारकर्ती यांनी पाठविलेल्या सूचनापत्राची दखल घेण्यात आलेली नाही. अशाप्रकारे, सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केल्याचे नमूद करुन नादुरुस्त दूरदर्शन संच दुरुस्त करुन देण्याचा; किंवा दुरुस्त होत नसल्यास त्याच बनावटीचा नवीन दूरदर्शन संच देण्याचा; किंवा ते शक्य नसल्यास दूरदर्शन संचाचे मुल्य रु.30,500/- खरेदी तारखेपासून व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रु.15,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.7,000/- देण्याचा अमेय इलेक्ट्रॉनिक्स् व व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज् यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(3) जिल्हा आयोगाच्या सूचनापत्राची बजावणी झाल्यानंतर अमेय इलेक्ट्रॉनिक्स् व व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज् हे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
(4) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला.
(5) वाद-तथ्ये व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ती यांनी अमेय इलेक्ट्रॉनिक्स् यांच्याकडून दि.9/11/2015 रोजी वादकथित दूरदर्शन संच खरेदी केला; वादकथित दूरदर्शन संच व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज् यांनी उत्पादीत केलेला आहे; वादकथित दूरदर्शन संचाकरिता 5 वर्षाकरिता वॉरंटी देण्यात आलेली होती; तक्रारकर्ती यांच्या तक्रारीनंतर सेवा केंद्राने दखल घेऊन दूरदर्शन संचाची पाहणी केली इ. बाबी निदर्शनास येतात.
(6) जिल्हा आयोगापुढे अमेय इलेक्ट्रॉनिक्स व व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज अनुपस्थित आहेत. अशा स्थितीत, तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार व त्यांच्याद्वारे दाखल कागदपत्रांकरिता खंडन, प्रतिकथन व प्रतिपुरावा नाही.
(7) तक्रारकर्ती यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद असा की, वादकथित दूरदर्शन संचालकरिता 5 वर्षे वॉरंटी होती आणि वॉरंटी कालावधीमध्ये दूरदर्शन संच नादुरुस्त झाल्यानंतर पाठपुरावा करुनही अमेय इलेक्ट्रॉनिक्स् व व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज् यांनी दखल घेतलेली नाही.
(8) Blackmelkon Advance Technology Co. Pvt. Ltd. यांनी दिलेले 247AROUND SERVICE JOB CARD तक्रारकर्ती यांनी अभिलेखावर दाखल केलेले आहे. ज्यामध्ये Service Date : 24 Oct. 2020; Brand/Model No. : Videocon/ LEDTVVKU40FH11CAH; Service Selected : Extended Warranty; Remarks : Lines issues; Symptom : Intermittent Line / Bar असा उल्लेख आढळतो. वाद-तथ्ये, विधिज्ञांचा युक्तिवाद व अभिलेखावर कागदपत्रांची दखल घेतली असता तक्रारकर्ती यांनी अमेय इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून खरेदी केलेला वादकथित दूरदर्शन संच वॉरंटी कालावधीमध्ये नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास येते. हेही सिध्द होते की, तक्रारकर्ती यांचा वादकथित दूरदर्शन संच बंद पडल्यानंतर व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज् यांनी तक्रारकर्ती यांच्या दूरदर्शन संचाच्या दोष निराकरणासाठी प्रतिनिधीची नियुक्ती केलेली होती. हे सत्य आहे की, अमेय इलेक्ट्रॉनिक्स् व व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज् यांनी दूरदर्शन संचातील दोषाचे निराकरण केलेले नाही. अशा स्थितीत, अमेय इलेक्ट्रॉनिक्स व व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज् यांनी दूरदर्शन संचाच्या विक्रीपश्चात उचित सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केली, या अनुमानास आम्ही येत आहोत.
(9) ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (10) (11) च्या अनुषंगाने वादकथित दूरदर्शन संचामध्ये निर्माण झालेल्या दोषाच्या व त्यानंतर द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटीबद्दल कलम 39 अंतर्गत अनुतोष मिळण्यास तक्रारकर्ती पात्र ठरतात. तक्रारकर्ती यांच्या अनुतोष मागणीनुसार वादकथित दूरदर्शन संचातील दोषाचे निराकरण करणे किंवा नवीन दूरदर्शन संच देणे किंवा त्याचे मुल्य परत करणे, अशाप्रकारचा आदेश करणे न्यायोचित राहील, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(10) तक्रारकर्ती यांनी शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.15,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.7,000/- रकमेची मागणी केलेली आहे. अशाप्रकारची नुकसान भरपाई निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित झाले पाहिजेत. वॉरंटी कालावधीमध्ये दूरदर्शन संच नादुरुस्त झाल्यानंतर त्याचे निराकरण न झाल्यामुळे तक्रारकर्ती यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडलेले आहे. तसेच दूरदर्शन संच बंद पडल्यामुळे तक्रारकर्ती यांना मनोरंजनापासून वंचित रहावे लागले. दूरदर्शन संच दुरुस्त होऊन मिळण्याकरिता तक्रारकर्ती यांना आवश्यक पाठपुरावा करावा लागलेला आहे. शिवाय, कायदेशीर कार्यवाहीकरिता सूचनापत्र पाठविणे, विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. उक्त स्थिती पाहता, तक्रारकर्ती यांना शारीरिक व मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.7,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मंजूर करणे न्यायोचित राहील, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे. उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) (अ) विरुध्द पक्ष क्र.1 अमेय इलेक्ट्रॉनिक्स व विरुध्द पक्ष क्र.2 व 3 व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज यांनी तक्रारकर्ती यांच्या वादकथित दूरदर्शन संचातील दोषाचे संपूर्ण निराकरण करुन तो सुस्थितीत दुरुस्त करुन द्यावा.
अथवा
(ब) विरुध्द पक्ष क्र.1 अमेय इलेक्ट्रॉनिक्स व विरुध्द पक्ष क्र.2 व 3 व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज यांनी तक्रारकर्ती यांच्या वादकथित दूरदर्शन संचातील दोषाचे संपूर्ण निराकरण करुन दुरुस्त करणे शक्य नसल्यास त्याच बनावटीचा नवीन दूरदर्शन संच द्यावा.
अथवा
(क) विरुध्द पक्ष क्र.1 अमेय इलेक्ट्रॉनिक्स व विरुध्द पक्ष क्र.2 व 3 व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज यांनी तक्रारकर्ती यांच्या वादकथित दूरदर्शन संचाच्या अनुषंगाने उक्त आदेशांचे अनुपालन करणे शक्य नसल्यास दूरदर्शन संचाचे मुल्य रु.30,500/- परत करावे.
ग्राहक तक्रार क्र. 64/2023.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 अमेय इलेक्ट्रॉनिक्स व विरुध्द पक्ष क्र.2 व 3 व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज यांनी उक्त आदेश क्र.2 ची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत न केल्यास त्यापैकी आदेश क्र. 2 (क) प्रमाणे तक्रारकर्ती यांना रक्कम अदा करावी.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 अमेय इलेक्ट्रॉनिक्स व विरुध्द पक्ष क्र.2 व 3 व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज यांनी तक्रारकर्ती यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.7,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- द्यावेत.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 अमेय इलेक्ट्रॉनिक्स व विरुध्द पक्ष क्र.2 व 3 व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्रीमती वैशाली म. बोराडे) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-