जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 267/2022. तक्रार दाखल दिनांक : 23/09/2022. तक्रार निर्णय दिनांक : 24/04/2023.
कालावधी : 00 वर्षे 07 महिने 01 दिवस
आसिफ पि. महेबुबखान पटेल, वय 45 वर्षे, व्यवसाय : वकिली,
रा. आयेशा अपार्टमेंट, रियाज कॉलनी, अंबाजोगाई रोड,
लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) प्रोप्रा. / व्यवस्थापक, बेंगलोर अय्यंगार्स बेकरी,
पडिले कॉम्प्लेक्स, अंबाजोगाई रोड, लातूर.
(2) सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य,
मध्यवर्ती इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,
शिवाजी चौक, लातूर . विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम. काझी
विरुध्द पक्ष :- अनुपस्थित / एकतर्फा चौकशी
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा वाढदिवस असल्यामुळे दि.26/8/2020 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून केक, आईस्क्रीम, फरसाण, चिप्स, आईसपेस्ट्री इ. खाद्यपदार्थ खरेदी केले. त्याकरिता रु.580/- शुल्क देऊन पावती घेतली. ते खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर अर्धा ते 1 तासामध्ये तक्रारकर्ता यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना उलट्या, मळमळ, पोटामध्ये वेदना इ. त्रास सुरु झाला. तक्रारकर्ता व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मध्यरात्री अलसफा हॉस्पिटल, लातूर येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीमध्ये त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी फ्रिजमध्ये ठेवलेल्या शिल्लक खाद्यपदार्थाची शहानिशा केली असता आंबट दुर्गंध येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे तक्रार केली; मात्र त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याविरुध्द कार्यवाही केली नाही. तक्रारकर्ता यांनी वैद्यकीय उपचार घेतल्यानंतरही पुन्हा त्रास होत असल्यामुळे अंत:रुग्ण स्वरुपात उपचार घ्यावे लागले. त्याकरिता रु.1,50,000/- खर्च आला. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना सूचनापत्र पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली; परंतु दखल घेण्यात आली नाही. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने रु.1,50,000/- नुकसान भरपाई देण्याचा; शारीरिक, मानसिक त्रास व आरोग्याच्या हाणीकरिता रु.3,00,000/-; आर्थिक दंड रु.25,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याविरुध्द आदेश करावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना जिल्हा आयोगाचे सूचनापत्र प्राप्त झाले. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन सुनावणी पूर्ण केली.
(3) तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर खाद्य पदार्थ खरेदी केल्याची पावती, वैद्यकीय उपचार घेतल्यासंबंधी कागदपत्रे, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना पाठविलेले सूचनापत्र इ. कागदपत्रे दाखल केले.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, शपथपत्र व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांना विरोधी पुरावा नाही.
(5) वाद-तथ्यांच्या अनुषंगाने अभिलेखावर दाखल कागदपत्रांत्राचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून दि.26/8/2020 रोजी केक, आईसक्रीम, फरसाण, चिप्स, आईस पेस्ट्री इ. खाद्य पदार्थ खरेदी केल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार खाद्य पदार्थांचे सेवन केल्यानंतर त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना उलट्या, मळमळ व पोटामध्ये वेदना सुरु झाल्या. त्यामुळे तक्रारकर्ता व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अलसफा हॉस्पिटल, लातूर येथे दाखल करण्यात आले. तक्रारकर्ता यांनी अल-सफा हॉस्पिटल, लातूर येथे उपचार घेतल्याचे दिसून येते. वैद्यकीय अधिका-यांनी दि.27/8/2020 रोजी तक्रारकर्ता यांना acute gastroenteritis निदान केल्याचे निदर्शनास येते. मात्र पुढील दि.3/9/2020 रोजी वैद्यकीय तपासणी व औषधी निर्देशनपत्रामध्ये आजारासंबंधी निदान केल्याचा उल्लेख नाही. दि.14/9/2020 रोजीच्या तपासणीमध्ये खोकला व श्वसनास त्रास अशाप्रकारचे निदान आढळते. त्यानंतर तिरुपती हॉस्पिटल, लातूर येथे दि.26/9/2020 ते 1/10/2020 कालावधीमध्ये तक्रारकर्ता यांना Viral Pneumonia निदान करण्यात येऊन वैद्यकीय उपचार केल्याचे निदर्शनास येते.
(6) वादकथित खाद्य पदार्थाची खरेदी पावती पाहता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून वादकथित खाद्य पदार्थ खरेदी केले, हे ग्राह्य धरावे लागेल. वैद्यकीय तपासणी व औषधी निर्देशनपत्राचे अवलोकन केले असता दि.27/8/2020 रोजी तक्रारकर्ता यांना acute gastroenteritis निदान केल्याचे आढळते. मात्र उर्वरीत वैद्यकीय कागदपत्रामध्ये अन्य आजाराचा उल्लेख व त्याबद्दलच्या औषधीचे निर्देश दिल्याचे दिसते. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, वादकथित खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर अर्धा ते 1 तासामध्ये तक्रारकर्ता यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना उलट्या, मळमळ, पोटामध्ये वेदना अशाप्रकारे त्रास सुरु झाला आणि त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना अलसफा हॉस्पिटल, लातूर येथे दाखल करण्यात आले. त्यावेळी प्राथमिक तपासणीमध्ये त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र तक्रारकर्ता यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना विषबाधा झाली, हे सिध्द होण्याकरिता वैद्यकीय उपचारासंबंधी किंवा अन्य स्वतंत्र पुरावा अभिलेखावर दाखल नाही. वादकथने पाहता वादकथित खाद्य पदार्थाव्यतिरिक्त तक्रारकर्ता यांनी अन्य पदार्थांचे सेवन केले होते, असे त्यांचे कथन नाही. अशा स्थितीत, तक्रारकर्ता यांचे शपथेवरील कथने व पुराव्यांचे विरुध्द पक्ष यांच्याद्वारे खंडन झालेले नसल्यामुळे व पुरावे पाहता विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याद्वारे विक्री केलेल्या वादकथित खाद्य पदार्थांमुळे तक्रारकर्ता यांना विषबाधा होऊन उलट्या, मळमळ, पोटामध्ये वेदना अशा त्रासास सामोरे जावे लागले, हे मान्य करावे लागेल. त्या अनुषंगाने दोषयुक्त खाद्य पदार्थ विक्री केल्यामुळे तक्रारकर्ता यांना झालेल्या त्रासाकरिता नुकसान भरपाई देण्याचे दायित्व विरुध्द पक्ष क्र.1 यांच्यावर येते.
(7) तक्रारकर्ता यांनी वैद्यकीय उपचाराकरिता झालेल्या खर्चाच्या अनुषंगाने रु.1,50,000/- नुकसान भरपाई; शारीरिक, मानसिक त्रास व आरोग्याच्या हाणीकरिता रु.3,00,000/-; आर्थिक दंड रु.25,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- इ. मागणी केलेली आहे. वादकथित खाद्य पदार्थाच्या सेवनामुळे तक्रारकर्ता यांना वैद्यकीय उपचारासाठी रु.1,50,000/- खर्च झाला, हे सिध्द होण्याकरिता उचित पुरावा नाही. तसेच अन्य वैद्यकीय उपचारास्तव केलेल्या खर्चाची तक्रारकर्ता यांची मागणी अनुचित ठरते. मात्र तक्रारकर्ता यांना acute gastroenteritis निदान झालेले असल्यामुळे निश्चितच वैद्यकीय उपचार घ्यावे लागले आणि त्यामुळे आर्थिक खर्च झाला असावा, हे मान्य करावे लागेल. निश्चितच, तक्रारकर्ता यांनी acute gastroenteritis करिता अंत:रुग्ण उपचार घेतलेले नाहीत. बाह्यरुग्ण अवस्थेत त्यांनी वैद्यकीय उपचार खर्चासंबंधी पुरावा दाखल केला नसला तरी तर्क व अनुमानाप्रमाणे रु.5,000/- खर्च ग्राह्य धरणे न्यायोचित आहे. तक्रारकर्ता यांच्या मानसिक व शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाईसंदर्भात दखल घेतली असता अशा नुकसान भरपाई त्या–त्या परिस्थितीजन्य गृहीतकावर अवलंबून असते. नुकसान भरपाई मिळविण्याकरिता तक्रारकर्ता यांना पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कायदेशीर कार्यवाही खर्चाची बाब ठरते. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(8) विरुध्द पक्ष क्र.2 हे शासकीय यंत्रणेचे अधिकारी आहेत. वादविषयाच्या अनुषंगाने त्यांचे कार्य व कर्तव्ये ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे तरतुदीनुसार "सेवा" संज्ञेत येत नाहीत आणि तक्रारकर्ता त्यांचे 'ग्राहक' नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द आदेश नाहीत.
(9) उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना रु.5,000/- नुकसान भरपाई द्यावी.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी उक्त रु.5,000/- आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत न दिल्यास ग्राहक तक्रार दाखल तारखेपासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देय राहील.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-