जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 35/2020. तक्रार नोंदणी दिनांक : 06/02/2020. तक्रार निर्णय दिनांक : 07/03/2024.
कालावधी : 04 वर्षे 01 महिने 01 दिवस
बालाजी पि. पुंडलिकराव किरवले (पाटील), वय 50 वर्षे,
व्यवसाय : नोकरी, रा. कृषिधाम सोसायटी, एकमत चौक,
लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
मे. गजानन सिमेंट एजन्सी, प्रोप्रा. मनिषा धनंजय वराळे
तर्फे व्यवस्थापक, धनंजय सूर्यकांत वराळे, वय : 50 वर्षे,
धंदा : व्यापार, बार्शी रोड, एक नंबर चौक, लातूर, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- रमेश जी. पाडोळे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- एस.एस. औसेकर
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांना प्लॉटमध्ये बांधकाम करावयाचे असल्यामुळे विरुध्द पक्ष यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सिमेंट व स्टीलचे दर वाढणार असल्याचे सांगितल्यामुळे सिमेंट व स्टील खरेदीसाठी दि.30/10/2017 रोजी धनादेश क्र. 743083 अन्वये अनामत रु.4,00,000/- दिले. त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी बांधकाम साहित्य न देता प्रतिस्क्वेअर फुट दराने गुत्ते पध्दतीने बांधकाम करण्याबद्दल त्यांच्यामध्ये व्यवहार झाला नाही आणि त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी साहित्य देण्यास टाळाटाळ केली. शिवाय, बांधकाम मिस्त्रीकरिता रु.50,000/- कपात करणार असल्याचे विरुध्द पक्ष यांनी सांगितले. धनादेशाद्वारे दिलेली रक्कम विरुध्द पक्ष यांच्या ताब्यात असल्यामुळे तक्रारकर्ता यांनी एकूण रु.1,85,550/- चे सिमेंट व स्टील खरेदी केले. त्यानंतर दि.18/4/2029 रोजी तक्रारकर्ता बांधकाम साहित्य आणण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याकडे गेले असता तक्रारकर्ता यांना धक्काबुक्की करुन दुकानाबाहेर हाकलले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शिल्लक रु.2,14,450/- दिलेले नाहीत. उक्त कथनाच्या अनुषंगाने रु.2,14,450/- व्याजासह देण्याबद्दल, मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.20,000/- देण्यासंबंधी विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता व त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते तक्रारकर्ता यांचे घर रु.1,200/- फुट याप्रमाणे बांधून देणार होते आणि त्याबद्दल तक्रारकर्ता यांनी त्यांना धनादेशाद्वारे रु.4,00,000/- दिले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या कामावर मिस्त्री नेमला होता आणि त्यास रु.50,000/- उचल दिलेले होते. विरुध्द पक्ष यांनी बांधकाम साहित्याची जुळवाजुळव केली असता तक्रारकर्ता यांनी कोणतेही कारण न देता बांधकाम सुरु केल्याच्या 6 महिन्यानंतर घराचे बांधकाम स्वत: करणार असल्याचे सांगितले. तक्रारकर्ता यांनी मागणी केल्यानुसार त्यांनी रु.4,00,000/- देऊ केले; परंतु तक्रारकर्ता यांच्या सूचनेनुसार त्यांनी बांधकाम साहित्य खरेदीमधून रक्कम वजा करुन साहित्याची पूर्तता केलेली आहे. दि.20/5/2018 ते 20/9/2019 या कालावधीमध्ये एकूण 13 वेळा तक्रारकर्ता यांना सिमेंट व स्टील दिले असून त्याचे मुल्य रु.3,14,261/-, तसेच मिस्त्रीला दिलेली उचल रक्कम रु.50,000/- व रोख दिलेले रु.50,000/- याप्रमाणे एकूण रु.4,14,261/- मधून जमा रु.4,00,000/- वजावट करता तक्रारकर्ता यांच्याकडून रु.14,261/- शिल्लक येणे आहेत. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष यांनी केलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) जिल्हा आयोगाद्वारे प्रस्तुत ग्राहक तक्रार निर्णयीत होण्यास पात्र ठरते काय ? नाही. (3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 व 2 :- प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना कथित धनादेशाद्वारे रु.4,00,000/- अदा केले, याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार विरुध्द पक्ष यांच्याशी चर्चा केल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी सिमेंट व स्टीलचे दर वाढणार असल्याचे सांगितल्यामुळे सिमेंट व स्टील खरेदीसाठी दि.30/10/2017 रोजी धनादेश क्र. 743083 अन्वये अनामत रु.4,00,000/- दिले. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या कथनानुसार ते तक्रारकर्ता यांचे घर रु.1,200/- फुट याप्रमाणे बांधून देणार होते आणि त्याबद्दल तक्रारकर्ता यांनी रु.4,00,000/- त्यांना धनादेशाद्वारे दिलेले आहेत.
(5) उभय पक्षांचे कथने पाहता तक्रारकर्ता यांच्या घराचे बांधकाम करणे किंवा न करण्यापासून ते रु.4,00,000/- मधून सिमेंट, स्टील, मिस्त्रीकरिता दिलेली रक्कम व अन्य दिलेल्या रकमेबद्दल एकमेकांचे आरोप-प्रत्यारोप आढळतात. उभय पक्षांतर्फे सिमेंट व स्टील खरेदी-विक्रीबद्दल पावत्या दाखल करण्यात आलेल्या आहेत. मात्र एकमेकांनी दाखल केलेल्या पावत्यांबद्दल त्यांचा आक्षेप आहे. तसेच उभयतांमध्ये झालेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने साक्षीदारांचे सरतपासणी प्रतिज्ञापत्र अभिलेखावर दाखल करण्यात आले आहे. उभय पक्षांमध्ये झालेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्न पाहता कागदपत्रांची सत्यता पडताळणी, आवश्यक साक्षीपुरावा व त्या अनुषंगाने सरतपास व उलटतपासणी इ. बाबी महत्वपूर्ण आहेत. त्याबाबत दखल घेतली असता जिल्हा आयोगाची न्यायिक कार्यपध्दती ही संक्षिप्त प्रक्रियेस अनुसरुन असल्यामुळे उभय पक्षांमध्ये निर्माण झालेला विवाद हा जिल्हा आयोगापुढे निर्णयीत करता येणार नाही.
(6) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.2 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/6324)
ग्राहक तक्रार क्र.35/2020
बालाजी पुंडलीकराव किरवले. अर्जदार
विरुध्द
मे.गजानन सिमेंट एजन्सी. गैरअर्जदार.
1) जिल्हा आयोगाचे सदस्य मा. रविंद्र शे. राठोडकर यांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये आदेश / न्यायनिर्णय दिलेले आहे. मुद्दा क्र.1 करिता दिलेल्या कारणमीमांसे करिता सहमत नसल्यामुळे मुद्दा क्र.1 च्या उत्तराकरीता मी स्वतंत्र कारणमीमांसा व आदेश/न्यायनिर्णय देत आहे आणि ते मुळ न्यायनिर्णय / आदेशाचा अविभाज्य व संलग्न भाग राहिल.
2) अर्जदार यांची ग्राहक तक्रार गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे व उभय पक्षांनी दाखल केलेले कागदपत्रे इ. अवलोकन केले असता तसेच उभय विधिज्ञांचा मौखीक युक्तिवाद याचे अवलोकन केले असता पुढील मुददा उपस्थित होतो त्याची कारणमीमांसा खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1) जिल्हा आयोगाव्दारे प्रस्तुत ग्राहक तक्रार निर्णयीत
होण्यास पात्र ठरते काय ? होय.
2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुद्दा क्र.1:-
3) अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात रक्कम रु.4,00,000/- चा धनादेश अदा केल्याबद्दल उभयतांमध्ये वाद नाही. अर्जदाराने तक्रारी अर्जात उभयतांमध्ये चर्चा होऊन सिमेंट व स्टीलचे दर वाढणार आहे माझ्याकडे अॅडव्हान्स बुकींग करा जुन्या दरानेच पुन्हा साहित्य पुरवितो असे म्हणल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदारास दि.30/10/2017 रोजी धनादेश क्र.743083 व्दारे अनामत रु.4,00,000/- दिली. गैरअर्जदाराने लेखी म्हणण्यात अर्जदाराने त्याचे घर रु.1,200/- फुट प्रमाणे बांधून देणार होते त्याबद्दल अर्जदाराने रक्कम रु.4,00,000/- धनादेशाव्दारे दिले.
4) अर्जदाराने तक्रारी अर्जात गैरअर्जदाराकडे बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी गेलो असता तुमचे बांधकाम प्रती स्के.फुट रु.1,300/- ते रु.1,400/- प्रमाणे करुन देतो असे म्हणले परंतु बाजारभाव हा रु.1,000/- ते रु.1,100/- असल्याने अर्जदाराने त्यास गुत्ते दिले नाही. तसेच गैरअर्जदाराने सहा महिन्यापर्यंत सामान दिले नाही अथवा फोन स्विकारला किंवा प्रत्यक्ष भेटले नाही. दरम्यानच्या काळात गैरअर्जदाराने त्यांच्या ओळखीचा मिस्त्री कामासाठी लावले होते असे म्हणून रु.50,000/- रकमेतून वजा करतो असे म्हणू लागला. अर्जदारास नाईलाजाने बांधकाम साहित्य खरेदी करावे लागले बांधकाम साहित्य देत नव्हता तेव्हा आश्रुबा जाधव व एस.डी.कोकाटे यांनी मध्यस्थीचा प्रयन्त केला असे तक्रारी अर्जात म्हणले आहे.
5) गैरअर्जदाराने दिलेल्या पुराव्याचे शपथपत्र, व प्रभाकर नरसिंग मुळे आणि आश्रुबा नामदेव जाधव यांनी दिलेले शपथपत्र अभिलेखावर दाखल आहे त्यात अर्जदाराच्या कामावर मिस्त्री नेमला हेाता व त्यास कामाची उचल म्हणून 50,000/- दिले होते व बांधकामासाठी ला्गणा-या साहित्याची जुळवाजुळव केली होती परंतु अर्जदाराने गैरअर्जदारास कोणतेही कारण न देता घराचे बांधकाम स्वत: करणार आहे असे म्हणून रक्कम रु.4,00,000/- परत मागीतले ते गैरअर्जदाराने देऊ केले होते परंतु, अर्जदार यांनी गैरअर्जदाराच्या व्यवस्थापकास म्हणाले की, सदर रकमेमधून बांधकामास लागणारे साहित्य घेऊन जाईल त्यानुसार रक्कम वजा करा असे अर्जदाराने सुचविले त्यानुसार अर्जदारास लागेल त्या पध्दतीने सामान दिले आहे. यावरुन असे दिसून येते की, अर्जदाराने बांधकामासाठी लागणारे सामानासाठी गैरअर्जदारास रक्कम रु.4,00,000/- चा धनादेश दिल्याचे स्पष्ट होते व सदरचे बांधकाम अर्जदाराने स्वत: करुन घेतल्याचे दिसते.
6) अर्जदाराने दि.10/09/2018 व 21/05/2018 रोजीचे बिल दाखल केले आहे. तसेच सदर बिलावर कच्या नोंदी बांधकाम साहित्य खरेदी केल्याचे दिसून येते. सदरचे बिल कोणी दिले याबाबत स्पष्टता दिसून येत नाही.
7) गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले बांधकाम साहित्याचे टॅक्स इन्हाईस अनुक्रमे अभिलेखावर नि.18/1 ते 18/13 वर दाखल केले आहेत त्यात दि.20/05/2018, 04/09/2018, 20/09/2018 22/10/2018, 05/11/2018, 18/11/2018, 25/11/2018, 19/12/2018 व 01/09/2019, 07/09/2017, 11/09/2019 12/09/2019, 20/09/2019 अनुक्रमे रक्कम रु.26,000/-, 13,000/-, 13,000/-, 12,000/-, 6,000/-, 6,000/-, 13,750/-, 12,000/-, 38,061/-, 32,780/-, 76,659/-, 500/-, 64,511/- असे एकूण रु.3,14,261/- असल्याचे दिसुन येते. यावरुन असे दिसुन येते की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून एकूण रक्कम रु.3,14,261/- चे बांधकाम साहित्य खरेदी केले.
8) वरील सर्व बाबींचे अवलोकन केले असता गैरअर्जदारानेरक्कम रु.400000/- स्विकारुन रु.314261/- चे बांधकाम साहित्य पुरवठा करुन उर्वरित राहिलेली रक्कम रु.85,739/- अर्जदारास न देऊन अकार्यक्षम सेवा देऊन सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्ट होते. अर्जदाराने कागदोपत्री पुरावा देऊन सदरचा तक्रारी अर्ज सिध्द केल्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर होय असे आहे म्हणून अर्जदार हा रक्कम रु.85,739/- तसेच मानसिक शारिरीक त्रासापोटी व तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी अनुतोष मिळण्यास पात्र आहे.
आदेश
1) अर्जदाराच तक्रारी अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
2) गैरअर्जदाराने अर्जदारास उर्वरित राहिलेली रक्कम रु.85,739/- (रुपये पंच्याऐंशी हजार सातशे एकोणचाळीस फक्त) दि.30/10/2017 पासून द.सा.द.शे.9 व्याज दराने अदा करावी.
3) गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) व तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावेत.
4) गैरअर्जदार यांनी आदेशापासून 30 दिवसांच्या आत आदेशाची अंमलबजावणी करावी.
(श्रीमती रेखा जाधव)
सदस्य.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.