तक्रारदार स्वत:
जाबदेणार एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- *-*-*-*-
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 21/नोव्हेंबर/2013
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने जाबदेणार संस्थेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986, कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
1. तक्रारदार यांची कन्या कु. चैत्राली दिपक भाटे हिने जाबदेणार संस्थेमध्ये सन 2011-12 या कालावधीसाठी प्रवेश घेतला होता. त्यानंतर द्वितीय वर्षासाठी तिने एम.आय.टी कॉलेज, पुणे येथे प्रवेश घेतला. त्यासाठी जाबदेणार यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यापूर्वी तक्रारदार यांनी जाबदेणर यांच्याकडे द्वितीय वर्षासाठी संपूर्ण फी रुपये 1,02,975/- भरली होती. त्याचप्रमाणे प्रथम वषामध्ये प्रवेश घेतला असतांना तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे रुपये 5000/- अनामत ठेवली होती. ती संपूर्ण रक्कम जाबदेणार यांच्याकडून देय होती. जाबदेणार यांनी ना हरकत प्रमाणपत्र देतांना फी परत मिळण्यासाठी अर्ज करा, आठ दिवसात फी परत मिळेल असे आश्वासन दिले होते. डिसेंबर 2012 मध्ये मुलीचे बँकेत खाते सुरु करुन बँक डिटेल्स कळवा, बँकेत पैसे परस्पर जमा करु असे कळविले होते. अनेक वेळा मागणी करुनही जाबदेणार यांनी रक्कम परत केली नाही. सदरची बाब ही सेवेतील त्रुटी आहे म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल करुन जाबदेणार यांच्याकडे भरलेली रक्कम रुपये 1,07,975/-, मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई म्हणून रुपये 20,000/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये 5000/- मिळावा, अशी विनंती केली आहे.
2. या प्रकरणाची नोटीस जाबदेणार यांना बजावून देखील जाबदेणार मंचासमोर उपस्थित झाले नाही व त्यांनी तक्रारीतील मजकूर कोणत्याही प्रकारे नाकारलेला नाही. सबब प्रस्तुतची तक्रार जाबदेणार यांच्याविरुध्द एकतर्फा चालविण्यात आली.
3. तक्रारदार यांनी तक्रारी सोबत शपथपत्र, त्याचप्रमाणे जाबदेणार यांच्याकडे जमा केलेल्या रकमेच्या पावत्या, ना हरकत प्रमाणपत्र, तक्रारदार यांनी जाबदेणार यांना प्रत्यक्षात दिलेले पत्र व पोस्टाने पाठविलेल्या पत्राच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. तक्रारीतील कथने, शपथपत्र व कागदपत्रांवरुन असे स्पष्ट होते की, जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या रकमा परत न करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. त्यामुळे सदरची रक्कम परत करण्यास जाबदेणार जबाबदार ठरतात. तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्यास जबाबदार ठरतात.
वर नमूद केलेले विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण
केली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार यांना
रक्कम रुपये 1,07,975/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत परत करावी.
4. जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार यांना
नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
5. वर नमूद मुदतीत जाबदेणार यांनी आदेशाची पूर्तता केली नाही तर त्यावर तक्रार दाखल दिनांक 4/4/2013 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यन्त द.सा.द.शे 9 टक्के व्याज दयावे लागेल.
6. तक्रारदारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक-21/11/2013