(पारीत व्दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक-04 एप्रिल, 2022)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35 खाली विरुध्दपक्ष पोस्ट मास्तर, मुख्य पोस्ट ऑफीस, भंडारा यांचे विरुध्द तिचे विमाधारक पतीचे मृत्यू संबधात विमा पॉलिसीची रक्कम मिळावी आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्तीचे पती नामे याज्ञीक तुळशीराम देशमुख यांनी ते हयातीत असताना विरुध्दपक्ष पोस्ट विभागाचे कार्यालयातून दिनांक-17.09.2018 रोजी ग्रामीण डाक जीवन विमा- ग्राम संतोष नावाची विमा पॉलिसी जिचा क्रं-0000002355436 काढली होती आणि वार्षिक विमा हप्ता रक्कम रुपये-11,399/- जमा केला होता. सदर विमा पॉलिसीचा हप्ता हा वार्षिक स्वरुपाचा होता आणि दिनांक-05.10.2031 हा शेवटचा वार्षिक हप्ता होता. सदर विमा पॉलिसीची रक्कम रुपये-1,50,000/- होती.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पती हे मोलमजूरीचे काम करीत होते आणि जानेवारी-2019 मध्ये त्यांच्या प्रकृती मध्ये अचानक बिघाड आल्या मुळे त्यांना अगोदर गावा जवळील दवाखान्यात दाखविण्यात आले होते परंतु त्यांची प्रकृती जास्त खराब झाल्यामुळे त्यांना दिनांक-10.01.2019 रोजी नागपूर येथील शुअरटेक दवाखान्यात भरती केले होते तेथे दिनांक-14.01.2019 पर्यंत वैद्दकीय उपचार करण्यात आलेत. दिनांक-14.01.2019 रोजी शुअरटेक हॉस्पीटल मधील डॉक्टरांनी सांगितले की, पुढे वैद्दकीय उपचार होऊ शकत नाही, घरी घेऊन जा म्हणून तक्रारकर्तीने तिचे पती श्री याज्ञीक देशमुख यांना घरी आणले आणि त्याच दिवशी रात्री त्यांचा मृत्यू झाला. पतीचे मृत्यू नंतर विमा रक्कम मिळण्यासाठी तिने विरुध्दपक्ष पोस्ट विभागाकडे दिनांक -16.02.2019 रोजी अर्ज सादर केला व अर्जा सोबत आवश्यक दस्तऐवजाच्या प्रती जसे विमा पॉलिसी मूळ प्रत, मृत्यू प्रमाणपत्र, आपतकालीन प्रमाणपत्र, ट्रिटमेंट फार्म, रहिवाशी दाखला, केस हिस्ट्री सर्टिफीकेट, लेबॉरेटरी रिपोर्ट दाखल केल्यात. त्यानंतर तिने पुन्हा विरुध्दपक्ष पोस्ट विभागा मध्ये दिनांक-13.03.2019 रोजी अर्ज सादर केला परंतु विरुध्दपक्ष पोस्ट विभाग यांनी चुकीचा तपास करुन दिनांक-21.06.2019 रोजी खोटा चौकशी अहवाल तयार केला व विमाधारकास फार पूर्वी पासून “Cirrhosis of Liver” आजार होता व त्या आधारावर विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक-03.10.2019 रोजी नामंजूर केला. तिचे पती श्री याज्ञीक देशमुख हे विमा पॉलिसी घेण्याच्या अगोदर पासून आजारी होते या बाबत कोणताही पुरावा विरुध्दपक्ष पोस्ट विभागा कडे नसताना तिचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. तिने विरुध्दपक्ष यांना अधिवक्ता श्री एस.एस. चव्हाण यांचे मार्फतीने दिनांक-21.07.2020 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून विमा रकमेची मागणी केली परंतु नोटीस मिळाल्या नंतरही विरुध्दपक्ष यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही वा नोटीसला उत्तर सुध्दा दिले नाही म्हणून शेवटी तिने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष विरुध्दपक्ष पोस्ट विभागा विरुध्द दाखल करुन खालील प्रकारच्या मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्षाने तिचे पतीचे मृत्यू पःश्चात ग्रामीण डाक जीवन विमा-ग्राम संतोष पॉलिसी क्रं-0000002355436 अनुसार विमा रक्कम रुपये-1,50,000/- तक्रारकर्तीला देण्याचे आदेशित व्हावे आणि सदर रकमेवर विमाधारकाचा मृत्यू दिनांक-14.01.2019 पासून वार्षिक-18 टक्के दराने व्याज विरुध्दपक्षाने देण्याचे आदेशित व्हावे.
- विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तिला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- विरुध्दपक्षाने तिला देण्याचे आदेशित व्हावे.
- विरुध्दपक्षाने तक्रारीचे खर्चा बद्दल तसेच वकीलांची फी म्हणून रुपये-30,000/- तिला देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष पोस्टमास्तर, मुख्य पोस्ट ऑफीस भंडारा तर्फे लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. तक्रारकर्तीचे पती नामे याज्ञीक तुळशीराम देशमुख यांनी ते हयातीत असताना विरुध्दपक्ष पोस्ट विभागाचे कार्यालयातून दिनांक-17.09.2018 रोजी ग्रामीण डाक जीवन विमा- ग्राम संतोष नावाची विमा पॉलिसी जिचा क्रं-0000002355436 काढली होती आणि वार्षिक विमा हप्ता रक्कम रुपये-11,399/- जमा केला होता या बाबी मान्य केल्यात. सदर विमा पॉलिसी मध्ये तक्रारकर्ती ही नामनिर्देशित व्यक्ती होती. सदर विमा पॉलिसीचा हप्ता हा वार्षिक स्वरुपाचा होता आणि दिनांक-05.10.2031 हा शेवटचा वार्षिक हप्ता भरावयाचा होता. सदर विमा पॉलिसीची रक्कम रुपये-1,50,000/- होती, या बाबी सुध्दा मान्य केल्यात. दिनांक-14.01.2019 रोजी शुअरटेक हॉस्पीटल नागपूर येथील डॉक्टरांनी सांगितले की, तक्रारकर्तीचे पतीवर पुढे वैद्दकीय उपचार होऊ शकत नाही, घरी घेऊन जा म्हणून तक्रारकर्तीने तिचे पती श्री याज्ञीक देशमुख यांना घरी आणले आणि त्याच दिवशी रात्री त्यांचा मृत्यू झाला होता या बाब नामंजूर केल्यात. तक्रारकर्तीने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष काही दसतऐवज दाखल केलेले असून वैद्दकीय दस्तऐवज क्रं 12 वरुन ही बाब सिध्द होते की, विमाधारक श्री याज्ञीक तु. देशमुख हे मागील तीन वर्षा पासून “CIRRHOSIS OF LIVER” या आजाराने ग्रस्त होते व ही बाब विमाधारकाने विमा पॉलिसी काढताना विरुध्दपक्षाशी जाणूनबुजून लपवून ठेवली. तसेच दस्तऐवज क्रं 19 मध्ये सुध्दा असे नमुद केलेले आहे की, “Relatives are not willing for further stay in Hospital, hence D.A.M.A. on their own risk with informed prognosis” यावरुन तक्रारकर्तीचे म्हणणे संपूर्णतः खोटे आहे. दाखल वैद्दकीय दस्तऐवजी पुराव्या वरुन सिध्द होते की, मृतक विमाधारक श्री याज्ञीक देशमुख हे मागील तीन वर्षा पासून “CIRRHOSIS OF LIVER” या आजाराने ग्रस्त होते आणि त्यांनी विमा पॉलिसी काढताना विरुध्दपक्ष पोस्ट विभागाचे पॅनेल वरील डॉक्टरां पासून लपविली होती. जर विमाधारक यांनी पॅनेल वरील डॉक्टरांना विमा पॉलिसी काढताना त्यांचे आजारा विषयी माहिती दिली असती तर विरुध्दपक्ष पोस्ट विभागाने विमा पॉलिसी जारी केली नसती. या कारणां वरुन विरुध्दपक्ष पोस्ट विभागाने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला. विमाधारकाने विमा पॉलिसी काढते वेळी आजार लपविणे
हा एक गुन्हा आहे. तक्रारकर्तीला सुध्दा तिचे पतीचे आजारा विषयी माहिती होती परंतु केवळ विमा रक्कम मिळावी म्हणून आजार लपवून पॉलिसी काढली होती. सबब तक्रारकर्तीची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती पोस्ट विभागा तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये तक्रारकर्तीने विरुध्दपक्षास रजि. पोस्टाने पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, रजि.पोस्टाची पावती, विरुध्दपक्ष यांचे विमा दावा नामंजूरीचे पत्राची प्रत, तक्रारकर्तीचे पतीचे मृत्यू दाव्या संबधीचा विरुध्दपक्षाचा चौकशी अहवाल, विमा दावा प्रपत्र, विमा पॉलिसीची प्रत, मृत्यू प्रमाणपत्र, इमरजन्सी सर्टिफीकेट, शुअरटेक हॉस्पीटल नागपूर येथील वैद्दकीय उपचाराचा दस्तऐवज, शुअरटेक हॉस्पीटल येथील डॉयगोनीस सर्टिफीकेट तसेच लेबारेटरी रिपोर्ट अशा प्रतीचा समावेश आहे. तक्रारकर्तीने स्वतःचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले.
05. विरुध्दपक्ष पोस्ट विभागा तर्फे लेखी उत्तर आणि शपथे वरील पुरावा दाखल केला. तसेच लेखी युक्तीवादा बाबत पुरसिस दाखल केली.
06. तक्रारकर्ती तर्फे वकील श्रीमती एस.पी. अवचट यांचा तर विरुध्दपक्ष पोस्ट विभागा तर्फे वकील श्रीमती पी.डी. पशीने यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्रं | मुद्दा | उत्तर |
01 | विमाधारकास विमा पॉलिसी घेण्यापूर्वी आजार असल्याची बाब आणि त्याने ही बाब विमा प्रस्ताव भरताना लपवून ठेवल्याची बाब विरुध्दपक्ष पोस्ट विभागाने वैद्दकीय पुराव्यानिशी सिध्द केली आहे काय? | -नाही- |
02 | विरुध्दपक्ष पोस्ट विभागाने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
03 | काय आदेश | अंतिम आदेशा नुसार |
::कारणे व मिमांसा::
मुद्दा क्रं 1 व क्रं 2
07. या प्रकरणा मध्ये निर्णय देताना हे तपासून पाहणे आवश्यक आहे की, विमाधारकास विमा पॉलिसी घेण्याचे अगोदर पासूनच आजार होता काय? आणि ही बाब त्याने विमा पॉलिसी प्रस्ताव फार्म भरुन देताना त्याचे आरोग्य विषयक विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना लपवून ठेवली होती काय?. विरुध्दपक्ष पोस्ट विभागाचे असे म्हणणे आहे की, विमाधारकास विमा पॉलिसी काढण्यापूर्वी मागील तीन वर्षा पासून “CIRRHOSIS OF LIVER” आजार होता आणि विरुध्दपक्ष पोस्ट विभागाचे पॅनेल वरील डॉक्टरां पासून त्याने लपवून ठेवली होती. विमाधारकास पॉलिसी काढण्यापूर्वी पासूनच आजार होता ही बाब सिध्द करण्यासाठी विरुध्दपक्ष यांनी विमाधारकाचे वैद्दकीय उपचाराचे पुढील दस्तऐवजावर आपली भिस्त ठेवली- विरुध्दपक्षाचे म्हणण्या प्रमाणे वैद्दकीय दस्तऐवज क्रं 12 वरुन ही बाब सिध्द होते की, विमाधारक श्री याज्ञीक तु. देशमुख हे पॉलिसी घेण्याचे अगोदर मागील तीन वर्षा पासून “CIRRHOSIS OF LIVER” या आजाराने ग्रस्त होते. तसेच दस्तऐवज क्रं 19 मध्ये सुध्दा असे नमुद आहे की, “Relatives are not willing for further stay in Hospital, hence D.A.M.A. on their own risk with informed prognosis”
08. जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे शुअरटेक हॉस्पीटल नागपूर येथील D.A.M.A. या दस्तऐवजाचे निरिक्षण करण्यात आले. सदर दस्तऐवजा मध्ये अॅडमीशन डेट 10 जानेवारी, 2019 नमुद असून डिसचॉर्ज डेट 14 जानेवारी, 2019 नमुद केलेली आहे. सदर दस्तऐवजा मध्ये DIAGNOSIS Hepato renal syndrome with hepatic coma with coagulopathy in a case of Cirrhosis of liver with esophageal varices with portal hypertension
ICD CODE
(K 76.7) Hepatorenal Syndrome
(B19.0) Unspecified viral hepatitis with hepatic coma
(K74.6) Other and unspecified Cirrhosis of Liver
(K76.6) Portal hypertension
HISTORY & COURSE IN THE HOSPITAL
A 42 years male patient got admitted in Surethech Hospital with C/o yellowish discolouration of skin, severe abdominal distension, altered sensorium since 9 pm 9/1/19, irritable since 1 month. Initially showed to Dr. Sawalakhe where he diagnosed large esophageal varices end EVL ( Endoscopic variceal ligation).done with view of Cirrhosis of Liver with portal hypertension and hepatitis E positive. Now relatives brought her for further treatment and management.
H/o-EVL on 07/01/19 was done.
On admission examination :- GC-Moderate, Afebrile, CNS-Conscious, oriented Pulse-70 /min, BP-100/70 mm of Hg, RR-18/min, Pallor-+++, Icterus-+, SPOZ-95% on RA, CVS-S1S2 (N), RS-AE=BL crepetations, P/A-Distended tenderness.
With above history and clinical findings patient was hospitalized in ICU for close observation where blood investigation was done along with ECG, X-ray Chest. Patient had hypotension so infusion norad was started. Patient had hyponatremia so 3% NS infusion was started. Patient INR level deranged so FFP transfusion give (6 point FFP) but GI bleed & oral bleed same and patient now drowsy. Ryles tube inserted. During stay in hospital he received the medication and care which is given in treatment column. Nature of illness and prognosis is well explained in detail to his relatives. Due to personal reason, relatives are not willing for further stay in hospital, hence DAMA on their own risk with informed prognosis.
INVESTIGATION
10/01/2019 : hb-12.1, PCV-29.6, WBC-13200, Platelet -170000, Na-122, K-3.9. Blood Group B Positive, PT-35.4, INR-2.72, Ammonia-72, Bill (T)-23.5, D-15.1, I-8.40, SGPTS-109, Urea-51 . Uric Acid-5.1, HIV/HCV/Abs-Ag-Negative.
10/01/2019 X-ray Chest Ap- Rotation, NG tube noted, Mild cardiomegaly noted,.
09. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे स्पष्ट मत आहे की, शुअरटेक हॉस्पीटल येथील डॉक्टरांना रुग्णास Cirrhosis of Liver असल्याची शंका आल्याने त्यांनी EVL ही चाचणी केली होती, केवळ चाचणी केल्याने रुग्णास Cirrhosis of Liver होता असे निदान काढणे योग्य नाही, रुग्णास Cirrhosis of Liver हा आजार होता असे कुठेही मत व्यक्त केलेले नाही. EVL ही एक वैद्दकीय परिक्षण चाचणी असून त्याचा अर्थ Endoscopic variceal ligation, or endoscopic band ligation, is a procedure that uses elastic bands to treat enlarged veins, or varices, in your esophagus.
These abnormal veins develop in the esophagus and have thin walls with high blood pressure running through them असा होतो.
शुअरटेक हॉस्पीटल, नागपूर येथील सदरचे वैद्दकीय दस्तऐवजा वरुन असे दिसून येते की, त्यामध्ये DIAGNOISIS स्तंभात Unspecified Cirrhosis of Liver नमुद असून “Unspecified” शब्दाचा वापर केलेला आहे. तसेच INVESTIGATION मध्ये सुध्दा कुठेही नमुद नाही की, रुग्ण हा Cirrhosis of Liver याने आजारी आहे, जेंव्हा की, सदर हॉस्पीटल मध्ये रुग्णाच्या सर्व शारिरीक वैद्दकीय चाचण्या झालेल्या होत्या. मृतकाची दिनांक-17.09.2018 रोजी ग्रामीण डाक जीवन विमा- ग्राम संतोष नावाची विमा पॉलिसी काढली होती आणि दिनांक-14.01.2019 रोजी विमाधारकाचा मृत्यू झाला होता. म्हणजेच पॉलिसी काढल्या पासून केवळ चार महिन्यात मृत्यू झाला होता. विरुध्दपक्ष पोस्ट विभागाने त्यांचे पॅनेल वरील डॉक्टरां कडून पॉलिसी देण्यापूर्वी सखोल वैद्दकीय परिक्षण करणे आवश्यक आहे. विमाधारकाचा मृत्यू हा Cirrhosis of Liver या आजारानेच झाला होता आणि सदर आजार हा विमा पॉलिसी काढण्यापूर्वी तीन वर्षा अगोदर पासूनच झाला होता या बाबी कुठेही सिध्द होत नाही वा तसा कोणताही वैद्दकीय दस्तऐवजी आणि वैद्दकीय तज्ञांचा पुरावा विरुदपक्ष पोस्ट विभागाने दाखल केलेला नाही.
10. या संदर्भात जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे खालील मा. सर्वोच्च न्यायालयाचे निवाडयावर भिस्त ठेवण्यात येते-
IN THE SUPREME COURT OF INDIA-CIVIL APPEAL NO.-8386/2015- MANMOHAN NANDA-VERSUS- UNITED INDIA ASSURANCE CO. LTD & ANR. Order Dated- 6th DECEMBER, 2021.
The object of seeking a mediclaim policy is to seek indemnification in respect of a sudden illness or sickness which is not expected or imminent and which may occur overseas. If the insured suffers a sudden sickness or ailment which is not expressly excluded under the policy, a duty is cast on the insurer to indemnify the appellant for the expenses incurred there under. Hence in the instant case, the repudiation of the policy by the respondent insurance company was illegal and not in accordance with law.
11. हातातील प्रकरणात मृतकास विमा पॉलिसी घेण्याचे दिनांकाचे तीन वर्षा अगोदर पासून Cirrhosis of Liver हा आजार होता आणि तो सदर आजारावर तीन वर्षा पासून वैद्दकीय उपचार घेत होता असे दर्शविणारा कोणताही वैद्दकीय दस्तऐवजी पुरावा विरुध्दपक्ष पोस्ट विभागाने दाखल केलेला नाही. यावरुन ही बाब सिध्द होते की, विरुघ्दपक्ष पोस्ट विभागाने केवळ शुअरटेक हॉस्पीटल नागपूर यांचे वैद्दकीय दस्तऐवजाचे आधारावर विमाधारकास पॉलिसी घेण्या अगोदर पासून Cirrhosis of Liver हा आजार होता आणि त्या आजारावर पॉलिसी घेण्याचे तीन वर्षा अगोदर पासून तो वैद्दकीय उपचार घेत होता असा चुकीचा अर्थ लावून तक्रारकर्तीस तिचे पतीचे मृत्यू पःश्चात मिळणारी विमा रक्कम नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते आणि त्यामुळे तक्रारकर्तीला विमा रक्कम रुपये-1,50,000/- आणि सदर रकमेवर विमा दावा नाकारल्याचा दिनांक-03.10.2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचीत होईल. तसेच विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/- अशा नुकसान भरपाईच्या रकमा विरुध्दपक्षा कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचीत होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्ती श्रीमती पुष्पा उर्फ लक्ष्मी बे. याज्ञीक देशमुख यांची तक्रार विरुध्दपक्ष मुख्य पोस्ट ऑफीस भंडारा, तालुका जिल्हा भंडारा तर्फे पोस्टमास्तर (H.S.G.-1) यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष मुख्य पोस्ट ऑफीस भंडारा, तालुका जिल्हा भंडारा तर्फे पोस्टमास्तर (H.S.G.-1) यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीस तिचे पतीचे मृत्यू पःश्चात मिळणारी विमा पॉलिसीपोटी देय रक्कम रुपये-1,50,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष पन्नास हजार फक्त) दयावी आणि सदर विम्याचे रकमेवर विमा दावा नाकारल्याचा दिनांक-03.10.2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्के दराने व्याज तक्रारकर्तीला दयावे.
- विरुध्दपक्ष मुख्य पोस्ट ऑफीस भंडारा, तालुका जिल्हा भंडारा तर्फे पोस्टमास्तर (H.S.G.-1) यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अशा नुकसान भरपाईच्या रकमा तक्रारकर्तीला दयाव्यात.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष मुख्य पोस्ट ऑफीस भंडारा, तालुका जिल्हा भंडारा तर्फे पोस्टमास्तर (H.S.G.-1) यांनी सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जाव्यात.