निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार राजू शिवलिंग पिल्लेवार हा मयत राजुबाई शिवलिंग पिल्लेवार हीचा मुलगा आहे. दिनांक 28.08.2013 रोजी राजुबाई शिवलिंग पिल्लेवार हीचा अपघाती मृत्यु झाला. मयत राजुबाई शिवलिंग पिल्लेवार हीने गैरअर्जदार यांचे कार्यालयातून बचत पॉलिसी घेतलेली होती. मयत राजुबाई शिवलिंग पिल्लेवार ही गैरअर्जदार यांचेकडे 6 वर्षासाठी बचत करीत होती. तीने दिनांक 31.01.2009 पासून प्रतीवर्षी रु.2500/- भरलेले आहेत. सदर प्लॅनचा क्र.12 असून कालावधी 6 वर्षासाठीचा आहे. सदर प्लॅनप्रमाणे अर्जदाराच्या आईस 6 वर्षानंतर रक्कम रु.23,100/- मिळणार होते. अर्जदाराचे आईने सन 2013 पर्यंतचे हप्ते भरलेले आहेत.
अर्जदाराने त्याच्या आईच्या मृत्यु नंतर आवश्यक त्या कागदपत्रांसह क्लेम फॉर्म गैरअर्जदार यांचेकडे दाखल केला व अर्जदारास मिळणारी रक्कम रु.23,100/- ची मागणी केली. अर्जदाराने वेळोवेळी विनंती करुन देखील गैरअर्जदार यांनी टाळाटाळ केली. शेवटी अर्जदाराने दिनांक 27.08.2014 रोजी विनंती केली असता गैरअर्जदाराने त्याची दखल घेतली नाही. म्हणुन अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी पॉलिसी बॉंडमधील रक्कम रु.23,100/- दिनांक 28.08.2013 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना नोटीस प्राप्त होऊन ते तक्रारीत हजर झाले व त्यांनी आपला लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. गैरअर्जदार क्र. 1 यांचे रजिस्टर्ड ऑफीस नांदेड येथे असून गैरअर्जदार क्र. 2 हे कॉर्पोरेट ऑफीस असून त्यांचे कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. गैरअर्जदार यांचा रिअल इस्टेटचा उद्योग असून त्यांचे वेगवेगळे प्लॅन्स आहेत. विमाधारक व गैरअर्जदार यांच्यात झालेल्या करारानुसार अर्जदार हा पैसे मिळणेस पात्र आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे रक्कम मिळणेसाठी लागणा-या सर्व कागदपत्रांसह दावा दाखल केलेला नाही व गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा दावा नाकारलेला नाही. पॉलिसीच्या नियम व अटीप्रमाणे अर्जदारास मिळणारी रक्कम गैरअर्जदार यांनी नाकारलेली नाही. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह दावा दाखल केलेला नाही. पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसीधारकाने फक्त 3 हप्ते भरलेले आहेत. पॉलिसीच्या क्लॉज 19 मध्ये ब्रीच ऑफ एग्रीमेंटची व्याख्या दिलेली आहे व क्लॉज 20 मध्ये दावा मिळणेसाठीची प्रोसिजर/पध्दती दिलेली आहे. अर्जदाराने सदर पध्दतीचा अवलंब न करता मंचात तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदारास त्रास देणेसाठी मंचात तक्रार दाखल केलेली असल्यामुळे सदरची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे गैरअर्जदार यांना मान्य आहे. विमाधारक राजुबाई शिवलिंग पिल्लेवार यांनी गैरअर्जदार यांचेकडे रक्कम रु.2500/-चे तीन हप्ते भरले आहेत हे गैरअर्जदार यास मान्य आहे व गैरअर्जदार यांनी त्याबाबत विमाधारक -अर्जदाराचे मयत आईस पावत्या दिलेल्या आहेत. त्याच्या प्रती अर्जदाराने मंचात दाखल केल्या आहेत. सदर पॉलिसीची मुदत 6 वर्षाची होती. तसेच सुरुवातीचा हप्ता भरण्याची तारीख 31.01.2009 व शेवटचा हप्ता भरण्याची तारीख 31.01.2015 अशी होती व पॉलिसीधारकास मुदतीनंतर रक्कम रु.23,100/- मिळणार होते. हे गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या पॉलिसीच्या प्रतीवरुन स्पष्ट आहे. गैरअर्जदार यांनी सदर पॉलिसीच्या नियम व अटी मंचासमोर दाखल केलेल्या नाहीत. गैरअर्जदार यांनी त्यांचे म्हणणेच्या परिच्छेद क्रमांक 2 मध्ये हे मान्य केलेले आहे की, अर्जदाराचे आईने गैरअर्जदार यांचेकडे पॉलिसी काढली होती,त्याचा रजिस्ट्रेशन क्र. यु 188242730 असा असून त्याचा कालावधी हा 6 वर्ष दिनांक 31.01.2009 ते दिनांक 31.01.2015 असा आहे व त्याची रिअलायझेशन व्हॅल्यु रक्कम रु.23,100/- आहे.
अर्जदाराच्या मयत आईने 3 हप्ते म्हणजेच रक्कम रु.7500/- भरणा केलेला आहे. त्यानंतर त्यांनी हप्ते भरलेले नाहीत व दिनांक 28.08.2013 रोजी त्यांचा मृत्यु झालेला आहे. पॉलिसीच्या अटी व शर्ती मंचासमोर दाखल नसल्याने अर्जदार अशा परिस्थितीत किती रक्कम मिळणेस पात्र आहे हे स्पष्ट नाही. परंतु पॉलिसीवरुन हे स्पष्ट आहे की, विमाधारकाने रु.2500 x 6= 15000 भरावयाचे होते व त्यास 6 वर्षानंतर रक्कम रु.23,100/- मिळणार होते. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी जबाबात ते अर्जदारास पॉलिसीच्या नियम व अटीनुसार रक्कम देण्यास तयार आहे असे म्हटले आहे. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदारास मंचात तक्रार दाखल करुनही रक्कम दिलेली नाही व असे करुन अर्जदारास मानसिक त्रास दिलेला आहे असे मंचाचे मत आहे. पॉलिसी कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यु झालेला असल्याने अर्जदार हा पॉलिसी कालावधी पुर्ण झाल्यानंतर मिळणारी रक्कम रु.23,100/- मिळणेस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम रु.23,100/- दिनांक 28.08.2013 पासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह आदेश तारखेपासून तीस दिवसाच्या आत द्यावी.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1500/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.