जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : १९७/२०१९. तक्रार दाखल दिनांक : १३/०६/२०१९. तक्रार निर्णय दिनांक : १८/०६/२०२१.
कालावधी : ०२ वर्षे ०० महिने ०५ दिवस
राहूल विठ्ठल दिवसे, वय २९ वर्षे,
व्यवसाय : वकिली, रा. पिंपरी, ता. जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
प्रोप्रायटर, न्यू लव्हली मोबाईल कॉर्नर,
ताजमहल टॉकीजच्या समोर, तुळजापूर रोड, उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
मा. श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एस. चव्हाण
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- शरद के. भोरे
आदेश
मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(१) तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांचा LENOVO कंपनीच्या मॉडेल क्र. Lenovo K3 Note (K5oA4o), IMEI No. 869737021294811 / 869737021294829 मोबाईलच्या टच-पॅडला चिरा पडल्यामुळे तो बदलण्यासाठी दि.२०/५/२०१९ रोजी विरुध्द पक्ष यांच्याकडे दिला होता. त्याकरिता रु.९००/- आकारणी केले; परंतु त्याची पावती देण्यात आलेली नाही. विरुध्द पक्ष यांनी दि.२१/५/२०१९ रोजी नवीन टच-पॅड बसवून मोबाईल परत करण्यात आला. मोबाईलची तपासणी केल्यानंतर मोबाईलमधील रिंगर (मोबाईल साऊंड) चालू नसल्याचे व सेन्सर नसल्याचे दिसून आले. त्याबाबत सूचना केल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी मोबाईल दुरुस्तीसाठी ठेवून घेतला. दि.२५/५/२०१९ रोजी तक्रारकर्ता यांनी मोबाईलची मागणी केली असता विरुध्द पक्ष यांनी दुरुस्त झाला नसल्याचे व दुरुस्त झाल्यानंतर कॉल करुन परत देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारकर्ता यांना मोबाईलअभावी अडचणी येत असल्यामुळे मोबाईल दुरुस्त करुन देण्याचा तगादा लावला असता दि.२/६/२०१९ रोजी रिंगर (साऊंड) दुरुस्त न करता व सेन्सर न बसवता मोबाईल परत दिला. त्याबाबत विचारणा केली असता विरुध्द पक्ष यांनी मोबाईलच्या दुरुस्तीस नकार दिला. विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे आणि अनुचित प्रथेचा अवलंब केला आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांनी पाठविलेल्या नोटीसची दखल घेतलेली नाही. प्रस्तुत तक्रारीद्वारे वादकथित मोबाईलचे सेन्सर बसवून देण्याचा व रिंगर (साऊंड) दुरुस्त करुन देण्याचा; शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाकरिता रु.१,५०,०००/- देण्याचा व रु.२५,०००/- तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(२) ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांना जिल्हा आयोगाच्या सूचनापत्राची बजावणी झाल्यानंतर विधिज्ञांतर्फे विरुध्द पक्ष जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले. उचित संधी देऊनही त्यांनी लेखी निवेदन दाखल केले नाही. त्यामुळे विना लेखी निवेदनाशिवाय चौकशीचे आदेश पारीत करण्यात आले.
(३) तक्रारकर्ता यांची वादकथने व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालीलप्रमाणे उपस्थित होणा-या मुद्यांचे सकारण उत्तरे त्यांच्यापुढे नमूद करुन कारणमीमांसा देत आहोत.
मुद्दे उत्तर
(१) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण
केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(२) तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
(३) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमीमांसा
(४) मुद्दा क्र. १ व २ :- तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, त्यांच्या वादकथित LENOVO कंपनीचा मॉडेल क्र. Lenovo K3 Note (K5oA4o) मोबाईलचे नवीन टच-पॅड बसविण्याकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडे मोबाईल दिला असता मोबाईलमधील रिंगर (मोबाईल साऊंड) चालू नसल्याचे व सेन्सर नसल्याचे दिसून आले. विरुध्द पक्ष यांनी पुन्हा दुरुस्तीकरिता मोबाईल परत स्वीकारुनही दि.२/६/२०१९ रोजी रिंगर (साऊंड) दुरुस्त न करता व सेन्सर न बसवता मोबाईल परत केला आणि मोबाईलच्या दुरुस्तीस नकार दिला. टच-पॅड बसविण्याकरिता विरुध्द पक्ष यांनी रु.९००/- आकारणी केले. तसेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या पाठविलेल्या नोटीसची दखल घेतलेली नाही.
(५) तक्रारकर्ता यांनी मोबाईल दुरुस्तीसाठी दिल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी दुरुस्तीबाबत पावती दिलेली नाही, असे तक्रारकर्ता यांचे कथन आहे. तक्रारकर्ता यांनी पुराव्याची शपथपत्र अभिलेखावर दाखल केले आहे. तसेच जिल्हा आयोगापुढे ग्राहक तक्रार दाखल करण्यापूर्वी तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत नोटीस पाठविलेली दिसून येते. त्या नोटीसला विरुध्द पक्ष यांनी उत्तर दिलेले नाही. अशा स्थितीत विरुध्द पक्ष हे जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले; परंतु त्यांनी लेखी निवेदन सादर केले नाही. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद वादकथनांचे विरुध्द पक्ष यांनी खंडण केलेले नाही. अशा स्थितीत तक्रारकर्ता यांच्या वादकथनांस व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांस आव्हानात्मक लेखी निवेदन व विरोधी पुरावा नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीतील वादकथने व तक्रारीपृष्ठयर्थ दाखल केलेली कागदपत्रे विरुध्द पक्ष यांना मान्य आहेत, असे अनुमान काढणे न्यायोचित वाटते.
(६) तक्रारकर्ता यांच्या वादकथित मोबाईलच्या अनुषंगाने तज्ञ अहवाल घेण्याबाबत तक्रारकर्ता यांनी विनंती केल्यानुसार लिनोवा कंपनीचे अधिकृत सेवा केंद्राकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला. लिनोवा अधिकृत सेवा केंद्राचे श्री. नितीन राधाकृष्ण भन्साळी यांनी शपथपत्रासह आपला अहवाल जिल्हा आयोगापुढे दाखल केला. त्यांचा तपासणीतील निष्कर्ष खालीलप्रमाणे आहे.
“सदर मोबाईलमधील Proximatory Sensor, Vibrator आणि Ringer (Sound), On/Off Strip या वस्तु सदर मोबाईलमध्ये नसल्याचे तपासणीचेवेळी निदर्शनास आले.”
(७) तक्रारकर्ता यांच्या मोबाईलचा टच-पॅडला चिरा पडल्यामुळे तो बदलण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिला असताना टच-पॅड नवीन बसवून दिला आणि त्याकरिता रु.९००/- शुल्क स्वीकारले; परंतु मोबाईलमधील Proximatory Sensor, Vibrator आणि Ringer (Sound), On/Off Strip या वस्तु विरुध्द पक्ष यांनी काढून घेतल्या, हे अभिलेखावर दाखल कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे व अनुचित प्रथेचा अवलंब केल्याचे दिसून येते. त्यामुळे वादकथित मोबाईलची योग्य दुरुस्ती होऊन मिळण्याकरिता तक्रारकर्ता पात्र ठरतात.
(८) मोबाईलअभावी त्यांना पक्षकार व नातेवाईकांना संपर्क साधता आला नाही आणि मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, असे तक्रारकर्ता यांचे कथन आहे. तक्रारीच्या वस्तुस्थितीनुसार त्यांची मानसिक व शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाईची मागणी अमान्य करता येणार नाही. तसेच विरुध्द पक्ष यांच्या सेवा दोषामुळे तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे प्रस्तुत तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. त्याचा विचार करुन तक्रार खर्च व नुकसान भरपाई मंजूर करणे न्याय्य आहे. वरील विवेचनाअंती आम्ही मुद्दा क्र.१ व २ चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या LENOVO कंपनीचा मॉडेल Lenovo K3 Note (K5oA4o) मध्ये Proximatory Sensor, Vibrator आणि Ringer (Sound), On/Off Strip बसवून मोबाईल दुरुस्त करुन द्यावा.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.५,०००/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.३,०००/- द्यावेत.
(३) उपरोक्त आदेशांची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी यांनी आदेश प्राप्तीपासून ४५ दिवसाचे आत करावी.
(श्री. मुकुंद भगवान सस्ते) (श्री. किशोर दत्तात्रय वडणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद (महाराष्ट्र)
-००-
(संविक/स्व/४५२१)