निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार ही मयत भुजंग धनजे यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती दिनांक 10.01.2012 रोजी त्यांचे गावातील सार्वजनिक विहिरीवरील मोटार जळाल्याने ती दुरुस्त करणेसाठी ऑटोमध्ये टाकून गोदम गांव येथून नांदेडकडे प्रवास करीत असतांना सदरील ऑटो चालकाने त्याचे ताब्यातील वाहन निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडाला धडक देऊन वाहन पलटी झाले त्यामध्ये अर्जदाराचे पतीच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यु झाला. अर्जदाराचे मयत भुजंग धनजे हा व्यवसायाने शेतकरी होता,त्याचे नावाने मौजे कोलंबी, तालुका नायगांव, जिल्हा नांदेड येथे गट क्रमांक 347 मध्ये 0 हेक्टर 31 आर एवढी शेतजमीन होती. शेतकरी या नात्याने तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता. अर्जदाराने दिनांक 15.05.2012 रोजी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी,नायगांव यांचेकडे क्लेम फॉर्म दाखल केला होता. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराचा विमा प्रस्तावास दावा क्रमांक 153401/47/12/239/0000214 असा दिला. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे विमा रक्कम मिळणेसाठी वारंवार विनंती केली. परंतु गैरअर्जदार यांनी फक्त आश्वासन दिले. परंतु विमा रक्कम दिलेली नाही. अर्जदार यांनी विमा प्रस्तावासोबत संपुर्ण कागदपत्राची पुर्तता केलेली असतांनाही गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास पुन्हा एकदा त्रुटीची पुर्तता करणे संदर्भात दि14.05.2013 रोजी पत्र दिले. त्यानुसार गैरअर्जदार क्र. 4 यांचेकडे दिनांक 17.06.2013 रोजी त्रुटींची पुर्तता केली. परंतु गैरअर्जदार यांनी अद्यापपर्यंत अर्जदाराचा विमा प्रस्तावावर निर्णय घेतलेला नाही. अर्जदाराचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार यांनी प्रलंबित ठेवलेला असल्याने अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यात येऊन विम्याची रक्कम रु.1,00,000/- प्रस्ताव मिळाल्यापासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह दिनांक 15.05.2012 पासून रक्कम वसूल होईपर्यंत गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस तालमील होऊनही ते तक्रारीत हजर झालेले नाहीत व त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला नाही. गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदाराचा प्रस्तुत तक्रार अर्ज चुकीचा व निराधार आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही व निष्काळजीपणा केलेला नाही. त्यामुळे अर्जदाराला तक्रारीस कुठलेही कारण घडलेले नाही. अर्जदाराचा नुकसान भरपाईचा दावा हा अपरिपक्व आहे. अर्जदाराचा दावा गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेकडे प्रलंबित असल्याने तो अपरिक्व आहे. त्यामुळे अर्जदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे असे म्हणणेचा प्रश्नच उदभवत नाही. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेविरुध्द खोटी व चुकीची तक्रार दाखल केलेली असल्याने अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती लेखी जबाबाव्दारे गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
गैरअर्जदार क्र. 4 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
5. अर्जदाराने दाखल केलेल्या विमा प्रस्तावावर गैरअर्जदार क्र. 4 यांनी कार्यवाही करुन विमा कंपनीला प्रस्ताव पाठविला. विमा कंपनीने दिनांक 16.07.2012 व दिनांक 13.08.2012 रोजीच्या पत्राव्दारे दावेदाराकडे गाव नमुना 6ड या कागदपत्राची मागणी केलेली होती. अर्जदाराने कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर दिनांक 12.12.2012 रोजीच्या पत्राव्दारे गाव नमुना 6ड व 7/12 या कागदपत्राची पुर्तता विमा कंपनीकडे केली. विमा कंपनीने दावेदाराकडे मुळ तलाठयाचे प्रमाणपत्र या कागदपत्राची मागणी केली, विमा कंपनीने दावेदाराकडे मागणी केलेले सदर कागदपत्राची पुर्तता अर्जदाराने केलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 4 यांनी अर्जदारास कुठलीही सेवेत त्रुटी दिलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 4 यांनी या दाव्यातुन त्यांना मुक्त करण्यात यावे अशी विनंती लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
7. अर्जदार यांचे पती मयत भुजंग धनजे हा शेतकरी होता हे अर्जदाराने दाखल सातबारा उता-यावरुन स्पष्ट होते. अर्जदाराने तक्रारीसोबत अर्जदाराचे पती यांनी सदरील जमीन दिनांक 05.01.1989 रोजी खरेदी केलेले असल्याबाबतचे नोंदणीकृत खरेदीखत दाखल केलेले आहे. यावरुन अर्जदाराचे पती हा दिनांक 05.01.1989 पासून सदर जमीनीचा मालक व ताबेदार असल्याचे स्पष्ट होते. अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस पेपर्सवरुन अर्जदाराचे मयत पतीचा मृत्यु हा अपघाताने झालेला आहे. अर्जदाराचे मयत पती हा शेतकरी या नात्याने महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता. अर्जदाराचे पतीचे मृत्यु पश्चात गैरअर्जदार यांचेकडे विमा रक्कम मिळणेसाठी विमा प्रस्ताव दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी वेळोवेळी मागीतलेली कागदपत्रांची पुर्तता अर्जदार यांनी केलेली आहे हे गैरअर्जदार क्र. 4 यांचे लेखी जबाबावरुन ही बाब सिध्द होते. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी आपल्या लेखी जबाबामध्ये अर्जदाराचा विमा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असल्याचे मान्य केलेले आहे. आय.आर.डी.ऐ.च्या नियामानुसार व महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकातील नियमानुसार अर्जदाराचा विमा दावा प्रलंबित ठेवणे ही गैरअर्जदार क्र. 2 व 3 ची सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. अर्जदार यांचे पतीचा मृत्यु अपघाताने झालेला असून अर्जदाराचे मयत पती हे व्यवसायाने शेतकरी होता.या दोन्ही गोष्टीवरुन अर्जदार ही पतीचे मृत्यु पश्चात विमा रक्कम मिळणेस पात्र असल्याचे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास रक्कम रु.1,00,000/- तक्रार दाखल दिनांक 24.09.2014 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावी.
3. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2000/-आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.