ठाणे जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच,
कोंकण भवन, नवी मुंबई.
ग्राहक तक्रार क्रमांकः- 277/2011
तक्रार दाखल दिनांकः- 31/12/2011
आदेश दिनांक : - 07/12/2013.
श्रीमती. विजयालक्ष्मी कारेकर
रु.नं.101,सी विंग, श्रीजी अपार्टमेंट,
सेक्टर 6, प्लॉट नं.15/16,
कामोटे, नवी मुंबई 410 209. ... तक्रारदार
विरुध्द
1.नेक्सट शोरुम
शॉप नं 1 व 2, सत्रा प्लाझा,
सेक्टर 19, सिटी सेंटर मॅल जवळ,
पाम बीच रोड, वाशी, नवी मुंबई 400703.
2. विडियोकॉन सर्व्हिस सेंटर
बिल्डींग नं. 2, मिलेनियम पार्क,
म्हापे युनिट नं.3, सेक्टर 1, नवी मुंबई.
3. विडियोकॉन इंडस्ट्रीज लि,
14 kms स्टोन, औरंगाबाद पैठणरोड,
चितेगाव, ता. पैठण, जि.औरंगाबाद 431105. ... सामनेवाले
समक्ष :- मा. अध्यक्षा, स्नेहा एस. म्हात्रे
मा. सदस्य, एस.एस. पाटील
उपस्थिती :- तक्रारदार स्वतः हजर
विरुध्द पक्ष 1 गैरहजर,
विरुध्द पक्ष 2 व 3 करीता उमेद सिंग भोरीया हजर.
अंतीम आदेश
(दि.07/12/2013)
द्वारा श्री. एस.एस. पाटील, सदस्य
1. सदर प्रकरण हे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराला नादुरूस्त रेफ्रीजरेटर विकले याबाबतचा ग्राहक वाद असुन यात विरुध्द पक्ष 1 यांच्या कडुन रेफ्रीजरेटर विकत घेतले असुन विरुध्द पक्ष 2 हे सर्व्हिस सेंटर आहे व विरुध्द पक्ष 3 हे रेफ्रीजरेटरचे उत्पादक आहेत. तक्रारदार यांनी जानेवारी 2011 रोजी व्हीडीयोकॉन कंपनीचा रेफ्रीजरेटर 9,680/- रुपयास विकत घेतला. सदरचा रेफ्रीजरेटर हा मे 2011 पर्यंत सुस्थितीत होता पण तक्रारदार यांचे विज बिल जास्त येत होते. परंतु हे वाढलेले बिल रेफिजरेटरमुळे वाढले हे तक्रारदार यांच्या लक्षात आले नाही. तसेच जून 2011 पासुन रेफ्रीजरेटरच्या बाहेरुन ओलावा व पाण्याचे थेंब जमा होऊ लागले त्यामुळे त्यांनी त्याबाबत दि.04/07/2011 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 यांचे कडे तक्रार केली व त्यानंतर वारंवार तक्रार केल्यानंतर व्हीडीयोकॉन सर्व्हिससेंटर कडुन (विरुध्द पक्ष क्र. 2) यांचेकडुन एक श्री. कार्तीक नायडू नावाचा इंजिनिअर आला त्याने दुरूस्ती न करता हा त्रास पावसाळी वातावरणाचा असल्याचे सांगितले, परंतु पावसाळयानंतरही सदर प्रकार कायम होता. त्यामुळे दि.13/09/2011 रोजी पुन्हा तक्रार केली. तेच सर्व्हिस इंजीनीयर श्री. नायडू आले व दुरूस्ती न करता पाहाणी करुन निघुन गेले.
2. याच सुमारास असेही आढळुन आले की, रेफ्रीजरेटरच्या दरवाज्याचे गास्केटवर बुरशी जमा होत आहे. सदर गास्केट दरवाजा उघडतांना सैल होऊन निघुन जात होते व परत बसवतांना फार मेहनत घ्यावी लागत असे. याही वेळी तक्रार केली व श्री. नायडू पुन्हा येऊन पाहुन गेले पण काहीही दुरूस्ती केली नाही. तक्रारदारांनी सदर रेफ्रीजरेटरची तक्रार व्हीडीयोकॉन सर्व्हिस सेंटर म्हापे (विरुध्द पक्ष क्र.2) येथे केली होती व सेंटरचे मॅनेजर श्री. माने यांचेशीही संपर्क साधला होता त्यांनी माणसे पाठवुन रेफ्रीजीरेटरचे फोटो काढुन नेले पण दुरूस्ती केली नाही.
3. डिसेंबर 2011 मध्ये तक्रारदार यांनी औरंगावाद येथील कंपनीच्या मुख्यालयास (विरुध्द पक्ष क्र. 3) संपर्क साधुन वरील बाबी कळवील्या. पहिल्या आठवडयात सर्व्हिस सेंटर म्हापे यांनी एक बदली रेफ्रीजरेटर तक्रारदारयांचेकडे पाठवीला (केल्वीनेटर कंपनीचा) पण हाही रेफ्रीजरेटर फार खराब अवस्थेत असल्याने तो तक्रारदार यांनी नाकारला. दुस-या दिवशी तो रेफ्रीजरेटरची थोडी साफसफाई करुन पाठवीला पण तो तक्रारदार यांनी नाकारला. या सर्व प्रकारावरुन तक्रारदार यांची खात्री झाली की, विरुध्द पक्ष हे त्यांच्या तक्रारीबाबत गंभीर नाहीत म्हणुन त्यांनी मुख्यालयातील बोस यांना कळविले की, त्यांना इतर तडजोड दुरुस्ती मान्य नसुन त्यांनी तक्रारदारांचे पैसे परत करावेत. तथापी विरुध्द पक्षाकडुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणुन तक्रारदार यांनी त्यांना विरुध्द पक्ष यांनी रेफ्रीजरेटरची किंमत रु.9,680/-, नुकसान भ्रपाई रु.10,000/- व केस खर्च रु.10,000/- व्याजासकट द्यावेत अशी मागणी केलेली आहे.
4. तक्रारदार यांनी त्यांच्या प्रतिज्ञालेखासोबत खालील कागदपत्रांच्या नकला तक्रारीसोबत जोडल्या आहेत.
अ) विरुध्द पक्ष 1 चे रेफ्रीजरेटरचे बिल.
ब) तक्रारदार व विरुध्द पक्षामधील जी.मेल करस्पॉन्डन्स.
क) विज बिल 14/11/2011 ते 14/12/2011.
5. तक्रारदार यांची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांना त्यांची कैफियत दाखल करण्यासाठी नोटिस बजावण्यात आली विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 ह्यांना या मंचासमोर हजर होऊन त्यांची कैफियत दाखल केली व तक्रारदार यांच्या सर्व तक्रारी नाकारल्या व पुढे विरुध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या कैफियतीत मान्य केले की तक्रारदार यांनी त्यांकडुन व्हिडियोकॉन कंपनीचा एक रेफ्रीजरेटर दि.01/01/2011 रोजी रू.8,800/-ला खरेदी केलेला होता व त्यास सदर रेफ्रीजरेटरच्या उत्पादक कंपनीने वॉरंटी दिलेली होती व वॉरंटी प्रमाणेच एखादी वस्तु वा त्याचा भाग त्याची किंमत घेऊन बदलण्यात येतो.
6. विरुध्द पक्ष क्र 1 यांनी पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदार यांच्या विरुध्द कोणतेही म्हणणे नमुद केले नसुन संपुर्ण तक्रार विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांचे विरुध्द आहे. ज्या ज्या वेळी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 शी संपर्क केला त्या त्या वेळी विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारदार यांच्या तक्रारी दाखल करुन घेतल्या व विरुध्द पक्ष 2 व 3 यांच्याशी संवाद करुन दिला. विरुध्द पक्ष क्र. 1 यांना चुकुन विरुध्द पक्ष करण्यात आले म्हणुन त्यांना या तक्रारीतुन काढुन टाकण्यात यावे. तसेच तक्रारदार हे कोणताच लाभ देण्यास योग्य नाही विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी असेही नमुद केले आहे की, ते फक्त एक किरकोळ व्यापारी आहेत ते विरुध्द पक्ष क्र 3 चा माल विकतात. खरी सेवा देण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 ची आहे. विक्री केलेल्या मालाचा दर्जा व त्या बाबतच्या सेवेची जबाबदारी विरुध्द पक्ष क्र. 1 ची नाही. सबब सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती विरुध्द पक्ष 1 यांनी केलेली आहे.
7. विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांनी सुध्दा त्यांची कैफीयत दाखल केली असुन त्यांनी सुध्दा तक्रारीतील आरोप फेटाळले. तक्रारदार यांनी जे आरोप केले आहेत की वादातील रेफ्रीजरेटरमुळे तक्रारदार यांना जास्त विजेचे बिल येत आहे ते आरोप नाकारले आहेत. तक्रारदार यांनी हे आरोप पुराव्यानिशी सिध्द करावे म्हणुन विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांनी नमुद केले आहे. तसेच विरुध्द पक्ष यांच्या तज्ञांने तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेऊन तक्रारदार यांचा प्रश्न हाताळला होता व त्याबाबतचे कामाचे पत्र तक्रारदार यांना देऊ केले होते पण तक्रारदारयांनीच पत्रावर सही करण्याचे नाकारले व घेलते नाही.
8. विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांनी पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी पुन्हा रेफ्रीजरेटरबाबत तिच तक्रार केल्यावर विरुध्द पक्षाचे तंत्रज्ञ यांनी तक्रारादाराकडे जाऊन स्पष्ट केले त्याप्रमाणे विरुध्द पक्षाचे लोक सदर रेफ्रीजरेटर नेण्यासाठी तक्रारदाराकडे गेले व वादातील रेफ्रीजरेटर ऐवजी तात्पुरता म्हणुन दुसरा एक रेफ्रीजरेटर तक्रारदार यांना देऊ केला पण तक्रारदार यांनी देय केलेला रेफ्रीजरेटर घेतला नाही व त्यांचा वादातील रेफ्रीजरेटरही दिला नाही म्हणुन विरुध्द पक्ष यांच्या सेवेत कोणतीही न्युनता नाही व त्यामुळे सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
9. तदनंतर तक्रारदार व विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले व विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला. तक्रारदार यांनी त्यांचे रिजॉईंडर व पुराव्याचे शपथपत्र हाच लेखी युक्तिवाद समजावा असे लेखी दिले. मंचाने तक्रारदार व विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांचे वकीलांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. तसेच सर्व पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता आम्ही खालील निष्कर्षाप्रत आलो.
10. यातील तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 कडुन रु.8,800/- रुपयास एक व्हिडीयोकॉन कंपनीचा रेफ्रीजरेटर विकत घेतलेला आहे त्यांची इन्व्हाईस प्रत तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीसोबत लावलेली आहे. विरुध्द पक्ष क्र. 2 हे सदर रेफ्रीजरेटरमध्ये काही खराबी झाल्यास त्याबाबत सेवा देणारे केंद्र आहे व विरुध्द पक्ष क्र. 3 हे सदर रेफ्रीजरेटरचे उत्पादक आहेत. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचे ग्राहक आहेत व दोषमुक्त नवीन रेफ्रीजरेटर मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे सदर रेफ्रीजरेटर मे 2011 पर्यंत सुस्थितीत होता. पण त्याचवेळी तक्रारदार यांचे म्हणणे आहे की, या रेफ्रीजरेटरमुळे त्यांचे विज बिल जास्त येऊ लागले होते परंतु या बाबतीत कोणताही तांत्रीक पुरावा हजर केलेला नाही ज्यामुळे हे सिध्द होईल की, या रेफ्रीजरेटरमुळे त्यांना जास्त विज बिल आले व ते नेमके कितीने जास्त आहे? त्यांनी विकत घेतलेल्या रेफ्रीजरेटरला नेमके किती युनिट विज लागते व प्रत्यक्ष किती जास्त आले याबाबत काहीही खुलासा नाही. केवळ या रेफ्रीजरेटरमुळे त्यांना जास्त बिल येऊ लागले व इतरांना कती येत होत या म्हणण्याने त्यांचा आरोप सिध्द होत नाही.
11. तक्रारदार यांची पुढील तक्रार अशी आहे की, जून 2011 पासुन म्हणजे रेफ्रीजरेटर घेतल्यानंतर 6 महीन्यांनी त्यांच्या लक्षात आले की, सदर रेफ्रीजरेटरच्या बाहेरुन पाण्याचे थेंब जमा होतात व ओलावा असतो. सदर दोषासाठी त्यांनी विरुध्द पक्ष 1 यांचेकडे दि.04/07/2011 रोजी कळविले असाता त्यांचा तंत्रज्ञ येऊन पहाणी करुन गेला पण त्यांने पण कोणतीही दुरूस्ती न करता तो परत गेला. त्यानंतर रेफ्रीजरेटरच्या गास्केटवर बुरशी जमा होते व गास्केट गळुन पडते या तक्रारीसंबंधी तक्रारदार याने केलेले शपथपत्र आणी तक्रारीसोबत जोडलेले इतर मेल सहीत कागदपत्र यावरुन दिसुन येते की, वरील दोष सदर रेफ्रीजरेटरमध्ये होता व विरुध्द पक्ष 1 ते 3 हे या दोषपुर्ण रेफ्रीजरेटरसाठी जबाबदार आहेत. असे जरी असले तरी विरुध्द पक्ष 2 व 3 यांचे म्हणणे आहे की, सदर रेफ्रीजरेटर त्यांचे सेवा केंद्रात विरुध्द पक्ष 2 कडे दुरूस्तीसाठी नेणे आवश्यक असतांना तो तक्रारदार यांनी नेऊ दिला नाही. तथापी इथे एक बाब लक्षात आलेली आहे की, विरुध्द पक्ष 2 व 3 यांच्यातर्फे कैफीयत कोणी दाखल केली त्या इसमाचे नाव नाही फक्त सही आहे. पडताळणी (व्हेरीफीकेशन पॅरा) परीच्छेद नाही. तसेच विरुध्द पक्ष 2 व 3 यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे ते एक श्री. धनंजय गोपाल माने या इसमाचे आहे त्यास पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर एक श्री. उमेदसिंग भुरीया या इसमाने सम्मती दिली आहे. परंतु उमेदसिंगास कोणी पॉवर ऑफ अटॉर्नी दिली व त्याची प्रत हजर केलेली नाही त्यामुळे विरुध्द पक्ष 2 व 3 यांनी केलेल्या कथनास काहीएक समर्थन नाही.
12. विरुध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या कैफियतीत दोषाबाबत काही एक म्हणणे दिलेले नाही किंबहुना त्यांनी मान्य केलेले आहे की, ज्या ज्या वेळी तक्रारदारांनी त्यांच्याकडे रेफ्रीजरेटरबाबत तक्रारी केल्या त्या त्या वेळी सदर तक्रारी विरुध्द पक्ष 2 व 3 यांना कळविण्यात आल्या व त्या तक्रारी निवारल्याचे काम व पुढील सेवा देण्याचे काम विरुध्द पक्ष 2 व 3 यांचे आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष 1 यांची कैफीयत विचारात घेतली तरी विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना दोषमुक्त रेफ्रीजरेटर विकला ही बाब सिध्द होते. सदर दोष म्हणजे रेफ्रीजरेटरच्या बाहेर पाण्याचे थेंब आणी ओलावा येतो, गास्केट सैल होऊन पडतो हे दोष आहेत व ते विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी निवारण केलेले नाहीत म्हणुन तक्रारदार यांनी खरेदी केलेला रेफ्रीजरेटर विरुध्द पक्ष यांनी तो दोषपुर्ण असतांना तक्रारदार यांना विकला. विरुध्द पक्ष 2 यांनी सदर दोषयुक्त रेफ्रीजरेटर दुरूस्त न करता सेवेत न्युनता दाखवली व विरुध्द पक्ष 3 यांनी दोषयुक्त रेफ्रीजरेटर उत्पादित केला हे सिध्द होते म्हणुन वरील तिनही विरुध्द पक्ष हे ग्राहक संरक्षण कायद्याखाली जबाबदार आहेत असे आमचे प्रांजल मत आहे व त्यासाठी तिनही विरुध्द पक्ष हे वैयक्तिक व संयुक्तिकरीत्या जबाबदार आहेत तथापी तक्रारदार यांनी स्वतः नमुद केले आहे की त्यांचा रेफ्रीजरेटर मे 2011 पर्यंत सुस्थितीत होता त्यामुळे रेफ्रीजरेटरची पुर्ण किंमत रु.8,800/- लक्षात घेता विरुध्द पक्ष रेफ्रीजरेटरची पुर्ण किंमत परत करणे न्याय होणार नाही त्यामुळे विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी रक्कम रु.7,000/- तक्रारदार यांना दि.01/06/2011 पासुन 9% दराने द.सा.द.शे व्याजाने तक्रारदारास रक्कम अदा होईपर्यंत परत करणे न्याय्य होईल तसेच दोषपूर्ण रेफ्रीजरेटरमुळे तक्रारदार यांना नक्कीच मानसिक त्रास होऊन त्यांची गैरसोय झालेली आहे म्हणुन त्यासाठी विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना रु.10,000/- नुकसान भरपाई देण्याचे आदेश योग्य व न्याय्य आहेत. तसेच तक्रारदार हे सदर तक्रारीचा खर्च म्हणुन रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब वरील निष्कर्ष विचारात घेता हा मंच पुढील आदेश पारित करत आहे.
आदेश
1. तक्रार क्र.277/2011 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या / संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना दोषयुक्त रेफ्रीजरेटरची रक्कम रु.7,000/- (रु.सात हजार फक्त) द.सा.द.शे 9 % दराने दि.01/06/2011 पासुन रक्कम अदाकरेपर्यंत परत करावी.
3. विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या / संयुक्तिकरित्या तक्रारदारायांना दोषयुक्त रेफ्रीजरेटरमुळे झालेल्या मानसिक त्रासाबाबत व झालेल्या गैरसोयीबाबत रक्कम रु.10,000/-(रु. दहा हजार फक्त) नुकसान भरपाईची रक्कम अदा करावी.
4. तक्रारदार यांनी विकत घेतलेला रेफ्रीजरेटर विरुध्द पक्ष 1 यांना परत करावा.
5. विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या / संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना या तक्रारीच्या खर्चासाठी रक्कम रु.3,000/- (रु. तीन हजार फक्त) द्यावेत.
6. वरील आदेशाची पुर्तता विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या / संयुक्तिकरित्या सदर आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावी.
7. आदेशाची प्रत उभय पक्षांना विना खर्च पाठवावी.
ठिकाण – कोकण भवन नवी मुंबई
दिनांक – 07/12/2013.
(एस.एस.पाटील ) (स्नेहा एस. म्हात्रे)
सदस्य अध्यक्षा
अति. ठाणे ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई