निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार श्री.जीवन सिध्दोजीवराव चव्हाण हे त्यांचे घर क्रमांक 1-11-709,प्लॉट क्र. 4,शिवनेरी,वामन नगर,गुजराथी कॉलनी, पुर्णा रोड, नांदेड तालुका व जिल्हा नांदेड या पत्त्यावर राहतात. सदरील घर दुमजली असून या राहत्या घराचा ‘’ स्टँडर्ड फायर †òन्ड स्पेशल पेरिल्स पॉलिसी'' नावाने विमा काढलेला असून ज्याचा पॉलिसी क्रमांक 272000/11/07/3100001394 असा आहे. सदरचा विमा हा दिनांक 21.01.2008 ते 20.01.2018 पर्यंत कालावधीसाठी आहे. या विम्यापोटी प्रिमियम अर्जदार यांनी रक्कम रु.2275/- गैरअर्जदार यांचेकडे भरलेला असून विमा हा रक्कम रु.15,00,000/- पर्यंतचे नुकसान भरपाई करण्यासाठीचा आहे. या विम्याचे वैशिष्ट्ये असे आहे की, सदरचा विमा हा राहत्या घराच्या सुरक्षेसाठीचा आहे व तसेच विम्यामध्ये भुकंप,आग,विद्युत उपकरणांच्या साधनामुळे झालेल्या अपघात यापासून सुध्दा संरक्षण दिलेले आहे.
दिनांक 11.04.2013 रोजी संध्याकाळी 8.30 वाजता अर्जदार हे त्यांच्या कुटूंबियांसोबत त्यांच्या घरात बसले असता त्यांना खुप जोराचा आणि मोठा आवाज ऐकू आला. सदरचा आवाज हा भुकंप झाल्यासारखा होता. त्यामुळे थोडयावेळातच आवाज थांबल्यानंतर अर्जदार व इतर घरातील लोक आवाजाच्या दिशेने गेले सदरचा आवाज हा त्यांच्या राहता घरातील पहिल्या मजल्यावरुन आला आहे असे अर्जदार यांना कळाले व त्यानंतर लगेच ते वरच्या मजल्याकडे असलेल्या हॉलमध्ये पाहताच त्यांना असे निदर्शनास आले की, सदर हॉलचे ''फॉल सिलींग'' हे पुर्णपणे कोसळले आहे आणि हॉलमध्ये असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसचे पुर्ण नुकसान झाले आहे. तसेच हॉलमध्ये ठेवलेले टी.व्ही.,दोन टेबल, कॉम्प्युटर, टयुबलाईटस, बेड, गादया, खुर्च्या, पुस्तके,फोटो फ्रेम्स, कुलर आणि हॉलमध्ये लटकवलेले झुंबर हया वस्तु पुर्णपणे तुटल्या व खराब झाल्या आहेत. तसेच अर्जदार यांना विद्युत तारे जळण्याचा वास आला आणि सदरचे तारे सुध्दा तुटून जमीनीवरती पडल्या आहेत असे दिसले. त्यानंतर अर्जदार यांनी हॉलमधील विद्युत पुरवठा खंडीत केला.
पुढच्या दिवशी अर्जदार यांनी भाग्यनगर पोलीस स्टेशन आणि विमा कंपनीस लेखी निवेदन दिले. त्यानंतर विमा कंपनीकडून त्यांचा सर्व्हेअर आला व त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली व आपला रिपोर्ट कंपनीकडे दिला. तसेच भाग्यनगर पोलीस स्टेशन यांनी घटनास्थळाची पाहणी करुन जागेचा पंचनामा केला.
अर्जदार यांनी त्यांच्या लेखी पत्राव्दारे दिनांक 12.04.2013 रोजी गैरअर्जदार यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी केली व सदरचे नुकसान हे भुकंप तसेच विद्युत तारांच्या अचानक बिघाडामुळे झाले असल्या कारणाने अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे लेखी म्हणणे मांडले. तसेच गैरअर्जदार यांनी वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे अर्जदार यांनी सगळया बाबींची पुर्तता करुन बिल्डींगचे कंप्लीशन सर्टीफीकेट सुध्दा दिलेले आहे. तरीही गैरअर्जदार यांनी दिनांक 14.02.23014 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदार यांचा नुकसान भरपाईचा अर्ज नामजूर केलेला आहे. अर्जदार यांनी सदरील विमा त्यांचे पुर्ण घरासंबंधीताचा म्हणजेच पुर्ण खालचा व पहिला मजला सुरक्षित करणेसाठी विकत घेतला आहे. तरीपण चुकीच्या व बेकायदेशीररीत्या अर्जदाराचा क्लेम नामंजूर करुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. त्यामुळे अर्जदार यास मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी विम्याची रक्कम रु.15,00,000/- गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व दावा खर्च रु.10,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार नोटीस तामील झाल्यानंतर तक्रारीत हजर झाले व गैरअर्जदार यांनी आपला लेखी जबाब व शपथपत्र तक्रारीत दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदाराचा अर्ज विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीच्या विरुध्द आहे जो नैसर्गीक न्यायाला धरुन नाही म्हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा. अर्जदाराने घेतलेली पॉलिसी गैरअर्जदार यांना मान्य आहे. गैरअर्जदार यांनी विमा पॉलिसीअंतर्गत अर्जदार यांनी सन 2008 मध्ये बांधकाम केलेल्या इमारतीच्या कायमस्वरुपी बांधकाम रचनेची रक्कम रु.15,00,000/- ची हमी घेतलेली आहे. परंतु इमारतीच्या आतील कोणत्याही वस्तुच्या सुरक्षीततेची हमी घेतलेली नाही. तेव्हा नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. अर्जदार यांनी पहिला मजला सन 2010 मध्ये बांधलेला आहे. त्यामुळे पहिल्या मजल्याची इमारत व त्यामध्ये असलेल्या सुविधा याबाबत अर्जदाराने विमा पॉलिसी घेतलेली नाही. त्यामुळे दुस-या मजल्यासंबंधीचा संपूर्ण मजकूर खोटा आहे ते गैरअर्जदार यांना मान्य नाही. सन 2010 मध्ये बांधकाम केलेल्या मजल्यासंबंधी अतिरिक्त विमा हप्ता देऊन सम इंशुअर्ड मध्ये वाढ करुन अर्जदार यांनी विमा पॉलिसी घेतलेली नाही. अर्जदार यांनी पहिला मजला बांधल्यानंतर रुमच्या छताला प्लास्टर ऑफ पॅरीस केलेली आहे, ज्यासाठी कनिष्ठ दर्जाचे मटेरिअल वापरल्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरीस ओझ्याने खाली पडलेले आहे. दुस-या मजल्यातील पडून झालेल्या नुकसानीबद्दल नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी गैरअर्जदार यांची नाही. घटना घडल्यानंतर घटनेची पाहणी करण्याकरीता गैरअर्जदार यांनी सर्व्हेअर मनोहर रामनारायणजी तोतला यांची नेमणुक केली त्यांनी बारकाईने घटनास्थळाची पाहणी करुन आपला अहवाल कंपनीला सादर केला. त्यात त्यांनी विमाधारकाने पहिला मजला सन 2010 मध्ये बांधला असून त्याला प्लास्टर ऑफ पॅरीसचे सिलींग करण्यात आले आहे. विमा पॉलिसी ही सन 2008 पासून ग्राऊंड परतफेड-लोअरसाठी अर्जदार घेतली असून सन 2010 मध्ये बांधकाम केलेल्या मजल्यासंबंधी अतिरिक्त विमा हप्ता देऊन सम इंशुअर्ड मध्ये वाढ करुन अर्जदार यांनी विमा पॉलिसी घेतलेली नाही. तसेच सर्व्हेअर यांनी आपल्या अहवालात पुढे असे नमुद केलेले आहे की, प्लास्टर ऑफ पॅरीसचे हे कृत्रीम छत आहे हा डेकोरेटीव भाग आहे, तो बिल्डींगचा भाग होऊ शकत नाही. सदरील प्लास्टर ऑफ पॅरीससाठी हलक्या प्रतीचे मटेरीअल वापरल्यामुळे खाली पडलेले आहे. त्यावर भुकंपाचा परिणाम झालेला नाही. जे विमा पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही. म्हणून विमा प्रस्ताव नामंजूर करुन फाईल बंद करावी असे निर्देशित केलेले आहे. या संपुर्ण बाबींचा विचार केला असता अर्जदाराचा अर्ज निखालस खोटा,निराधार व बिनबुडाचा आहे. म्हणून अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
7. अर्जदार यांनी तक्रारीच्या पुराव्याकामी गैरअर्जदार यांनी दिलेली पॉलिसी दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनीही सदरील पॉलिसी मान्य असल्याचे लेखी जबाबामध्ये नमुद केलेले आहे. विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या पॉलिसीचा कालावधी हा दिनांक 21.01.2008 ते 20.01.2018 पर्यंत आहे. पॉलिसीमध्ये रिस्क कव्हर या सदराखाली Building stock content risk cover is are as under :-
Description of risk: On residential building असे नमुद केलेले आहे. तसेच त्या खाली’’ बिल्डींग ओन्ली’’ असेही नमुद आहे. अर्जदाराची पॉलिसी ही ‘’ स्टँडर्ड फायर †òन्ड स्पेशल पेरिल्स पॉलिसी'' आहे. गैरअर्जदार यांनी पॉलिसीच्या नियम व अटी दाखला केलेल्या आहेत. सदरील नियम व अटींचे अवलोकन केले असता Earthquake(fire and shock) यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची जोखीम सदरील पॉलिसीव्दारे गैरअर्जदार यांनी स्विकारलेली असल्याचे दिसून येते. अर्जदार यांनी त्यांच्या तक्रारीतील परिच्छेद क्रमांक 8 मध्ये नमुद केलेले आहे की, दिनांक 11.04.2013 रोजी संध्याकाळी अचानक त्यांच्या घरामध्ये आवाज ऐकू आला व आवाजाच्या दिशेने पाहणी केली असता वरच्या मजल्यावरील हॉलचे ''फॉल सिलींग'' हे पुर्णपणे कोसळले व या घटनेसाठी अर्जदाराने सदर पॉलिसीव्दारे नुकसान भरपाईची मागणी गैरअर्जदार यांचेकडे केलेली आहे. पॉलिसीच्या नियम व अटीप्रमाणे अर्जदाराच्या घराचे नुकसान भुकंप,आग किंवा त्यामुळे उदभवलेल्या कारणामुळे हानी/अपघात झाला तरच गैरअर्जदार नुकसान भरपाई देणेस जबाबदार आहे. परंतु अर्जदाराने त्यांच्या घराचे फॉल सिलींग भुकंप किंवा आगीमुळे कोसळले असल्याबद्दलचा कुठलाही पुरावा किंवा आगीबद्दल विद्युत निरिक्षकाचा अहवाल किंवा दिनांक 11.04.2013 रोजी भुकंप झाला असल्याचा पुरावा दिलेला नाही. त्यामुळे अर्जदाराचे घरातील फॉल सिलींग हे भुकंप किंवा आगीमुळे कोसळले ही बाब अर्जदार पुराव्यानिशी सिध्द करु शकलेले नाहीत. त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा दावा पॉलिसीच्या नियम व अटीमध्ये कव्हर होत नाही या कारणासाठी योग्यरीत्या नामंजूर केलेला आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजुर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.