जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 123/2019. तक्रार नोंदणी दिनांक : 15/06/2019. तक्रार निर्णय दिनांक : 06/05/2024.
कालावधी : 04 वर्षे 10 महिने 21 दिवस
शाम पिता पांडुरंगराव कांबळे, वय 35 वर्षे, धंदा : व्यापार,
प्रोप्रा. पद्मजा स्क्रॅप मर्चंट, लातूर, रा. भुई गल्ली, लातूर, ता. जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) नितीन सिकरबर, वय सज्ञान, धंदा : नोकरी,
व्यवस्थापकीय संचालक, चैतन्य इन्स्ट्रयुमेंट प्रा. लि., 13/79,
विक्रम विहार, लाजपत नगर-4, नवी दिल्ली, पीन नं. 01140526126.
(2) निरज सहाने, वय सज्ञान, धंदा : नोकरी, विक्री व्यवस्थापक,
चैतन्य इन्स्ट्रयुमेंट प्रा. लि., 13/79, विक्रम विहार,
लाजपत नगर - 4, नवी दिल्ली, पीन नं. 01140526126. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- महेंद्रकुमार एम. चव्हाण
विरुध्द पक्ष :- अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांनी रु.3,70,000/- प्रतिफल अदा करुन विरुध्द पक्ष यांच्याकडून नोकटा गोल्डन किंग डी.पी.आर. प्लस हे धातुशोधक यंत्र (यापुढे "वादकथित यंत्र") खरेदी केले आहे. दि.4/12/2017 रोजी आर.टी.जी.एस. रक्कम प्राप्त झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी दि.5/12/2017 रोजीच्या चलन क्र. 141 ज्याचा अ.क्र. 90003351/04631 अन्वये तक्रारकर्ता यांना वादकथित यंत्र पाठवून दिले. वादकथित यंत्र हे जमिनीखाली 8 मीटर अंतरावरील धातू शोधक असल्याची खात्री दिलेली असताना 0.5 मीटरपर्यंत धातू शोधण्याचे कार्य करीत होती. त्याबद्दल विरुध्द पक्ष यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या सूचनेनुसार नवीन दिल्ली येथे वादकथित यंत्र पाठवून दिले. वादकथित यंत्राचा वापर सुरु केला असता त्यामध्ये कोणतीही दुरुस्ती किंवा तपासणी न करता विरुध्द पक्ष यांनी दि.28/3/2018 रोजी परत पाठवून दिल्याचे निदर्शनास आले. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दखल घेतली नाही. त्यामुळे विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविले असता विरुध्द पक्ष यांनी सूचनापत्रास खोट्या मजकुराचे उत्तर दिले. उक्त वादकथनांच्या अनुषंगाने वादकथित यंत्र बदलून देण्याचे; किंवा वादकथित यंत्राकरिता स्वीकारलेले मुल्य रु.3,70,000/- व्याजासह परत करण्याचे; रु.50,000/- नुकसान भरपाई देण्याचे व रु.10,000/- ग्राहक तक्रार खर्च देण्याचे विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावेत, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष .यांनी जिल्हा आयोगाचे सूचनापत्र स्वीकारण्यास नकार दिला आणि जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व त्यांनी अभिलेखावर दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले.
(4) तक्रारकर्ता यांचा मुख्य वाद असा की, वादकथित यंत्र हे जमिनीखाली 8 मीटर अंतरावरील धातू शोधण्याची विरुध्द पक्ष यांनी खात्री दिलेली असताना 0.5 मीटरपर्यंत धातू शोधण्याचे कार्य करीत होती आणि त्याच्या दुरुस्तीबद्दल विरुध्द पक्ष यांनी दखल घेतलेली नाही.
(5) विरुध्द पक्ष हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित असून तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व दाखल पुराव्यांचे त्यांनी खंडन केले नाही. अशा स्थितीत, ग्राहक तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्रांच्या विरोधी पुरावा नाही.
(6) सकृतदर्शनी, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून वादकथित यंत्र खरेदी केल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांचे वादकथने व अभिलेखावर दाखल कागदपत्रे पाहता वादकथित यंत्राने करावयाचे कार्य व त्या कार्याबद्दल हमीचा उचित पुरावा नाही. वादकथित यंत्र ज्या अयोग्य व त्रुटीयुक्त पध्दतीने कार्य करीत होती, त्याबद्दल पुरावा नाही. सकृतदर्शनी, वादकथित यंत्र हे त्याच्या असणा-या कार्यक्षमतेने कार्य करीत नव्हते, हे सिध्द झालेले नाही. विरुध्द पक्ष यांनी विक्री केलेले वादकथित यंत्र दोषयुक्त असल्याचे किंवा ते योग्य कार्यक्षमतेचे नसल्याचे सिध्द करण्यास तक्रारकर्ता असमर्थ ठरले आहेत. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना दोषयुक्त यंत्र विक्री केल्याचे किंवा त्यामध्ये दोष व त्रुटी असल्याचे सिध्द होत नसल्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-