जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : १२५/२०१८. तक्रार दाखल दिनांक : ०६/०४/२०१८.
तक्रार निर्णय दिनांक : २८/०६/२०२१.
कालावधी : ०३ वर्षे ०२ महिने २२ दिवस
(१) श्रीमती सुरेखा भागवत उर्फ भगवान सूर्यवंशी, वय ५२ वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. धानुरी, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद.
(२) लक्ष्मण भागवत उर्फ भगवान सूर्यवंशी, वय २६ वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. धानुरी, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ते
विरुध्द
(१) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., चौथा मजला, १७४, द. कसबा, शुभरॉय
टॉवर, दत्त चौक, शालीमार टॉकीजसमोर, सोलापूर, महाराष्ट्र.
(२) बजाज कॅपिटल इन्शुरन्स ब्रोकर लि., ऑफीस नं.४, अपोलो हाऊस,
तळमजला, ८२/८४, समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१.
(३) तालुका कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय,
लोहारा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
मा. श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
मा. श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- अजय डी. भिसे
विरुध्द पक्ष क्र.१ यांचेकरिता विधिज्ञ :- डी.आर. कुलकर्णी (इर्लेकर)
विरुध्द पक्ष क्र.२ यांचेकरिता विधिज्ञ :- आर. एच. भिंगारे
आदेश
मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(१) तक्रारकर्ते यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, तक्रारकर्ती क्र.१ ह्या मयत भागवत उर्फ भगवान दौला सूर्यवंशी (यापुढे “मयत भागवत”) यांच्या पत्नी आहेत आणि तक्रारकर्ता क्र.२ हे मुलगा आहेत. मयत भागवत यांचे नांवे मौजे धानुरी, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद येथे गट क्र.५८६, क्षेत्र २ हेक्टर ३१ आर. शेतजमीन आहे. दि.२९/१/२०१६ रोजी २३.०० वाजता मयत भागवत हे धानुरी येथून माकणी गावाकडे मोटार सायकलवरुन जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्यांच्या डोक्यास मार लागला. वैद्यकीय उपचारादरम्यान दि.२९/१/२०१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. गुन्ह्याबाबत सदर बझार पोलीस स्टेशन, सोलापूर शहर अंकीत सिव्हील चौकी येथे स्टेशन डायरी नं.२९/२०१६, अ.म.नं. ०/२०१६ अन्वये नोंद झाली.
(२) तक्रारकर्ता यांचे पुढे असे वादकथन आहे की, मयत भागवत हे शेतकरी असल्यामुळे व त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विमा रक्कम रु.२,००,०००/- मिळण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे दि.१४/६/२०१६ रोजी विहीत नमुन्यात पुराव्याच्या संपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल केला. परंतु विरुध्द पक्ष क्र.३ यांनी दि.११/८/२०१६ रोजीच्या पत्रानुसार मृताकडे मोटार सायकल चालविण्याचा वैध परवाना नाही, या कारणास्तव विमा प्रस्ताव नाकारला.
(३) विरुध्द पक्ष क्र.१ ते ३ यांच्याकडे पाठपुरावा करुनही विमा रक्कम दिली नाही. तसेच चुकीच्या कारणास्तव विमा प्रस्ताव नाकारल्यामुळे व विरुध्द पक्ष क्र.१ ते ३ यांच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्ते यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमा रक्कम रु.२,००,०००/- द.सा.द.शे. ९ टक्के व्याज दराने देण्याचा आणि मानसिक व शारीरिक त्रासासह तक्रार खर्चाकरिता रु.१५,०००/- देण्याबाबत विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(४) विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ता यांची तक्रार चुकीच्या व अर्धवट माहितीच्या आधारीत असल्यामुळे नामंजूर करण्याची विनंती केली आहे. त्यांचे कथन आहे की, तथाकथित घटनेची तारीख २९/१/२०१६, विमा प्रस्ताव दाखल केल्याची तारीख ११/६/२०१६ व तक्रार दाखल केल्याची तारीख २३/३/२०१८ लक्षात घेता विमा करारातील अटीचे अनुपालन न करता तक्रारकर्ता यांनी उल्लंघन केले असल्यामुळे तक्रार मुदतबाह्य व बेकायदेशीर आहे. विरुध्द पक्ष क्र.१ यांचे पुढे कथन आहे की, मयत भागवत हे सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवत असताना अपघात होऊन मृत्यू पावले. तथापि मयतास वाहन चालविण्यसाचा अधिकृत परवाना असल्याबद्दल लेखी पुरावा दाखल केलेला नाही. उर्वरीत तक्रारीमध्ये नमूद मजकूर पुराव्याअभावी अमान्य करण्यात आला आहे. सेवेमध्ये त्रुटी केलेली नसल्यामुळे तक्रारकर्ता यांची तक्रार तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.१ यांनी केलेली आहे.
(५) विरुध्द पक्ष क्र.२ यांच्याविरुध्द विना लेखी निवेदन व विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत झाले आहेत.
(६) तक्रारकर्ता यांची वादकथने, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन, उभय पक्षांनी दाखल केलेले कागदपत्रे इ. चे अवलोकन करण्यात आले असता न्यायनिर्णयासाठी खालीलप्रमाणे उपस्थित होणा-या मुद्यांचे सकारण उत्तरे त्यांच्यापुढे नमूद करुन कारणमीमांसा देत आहोत.
मुद्दे उत्तर
(१) विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या
सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे सिध्द होते काय ? नाही
(२) तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही
(३) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमीमांसा
(७) मुद्दा क्र. 1 व 2 :- गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेनुसार राज्यातील शेतक-यांना विरुध्द पक्ष क्र.१ यांनी अपघाती विमा संरक्षण दिलेले होते, ही बाब वादास्पद नाही.
(८) गाव : धानुरी, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद येथे मयत भगवान (मयत भागवत) यांचे नांवे शेतजमीन होती, असे दर्शविणारा 7/12 व गाव नमुना 8-अ उतारा अभिलेखावर दाखल आहे. यावरुन मयत भागवत हे शेतकरी होते, ही बाब स्पष्ट होते.
(९) अभिलेखावर दाखल करण्यात आलेल्या पोलीस मरनोत्तर पंचनामा व शवचिकित्सा अहवालाचे अवलोकन केले असता मयत भागवत यांचा वाहन अपघातामध्ये डोक्यास मार लागून मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. त्या अन्वये त्यांचा मृत्यू वाहन अपघातामध्ये झाला, हे स्पष्ट होते.
(१०) मयत भागवत यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ता यांनी दि.१४/६/२०१६ रोजी विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे विमा दावा दाखल केला असता दि.११/८/२०१६ रोजीच्या पत्रान्वये विमा प्रस्ताव नाकारण्यात आला, असे तक्रारकर्ते यांचे कथन आहे. अभिलेखावर दाखल दि.११/८/२०१६ रोजीच्या पत्राचे अवलोकन केले असता मयत भागवत यांचा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने निर्गमीत केलेला वाहन चालविण्याचा परवाना दाखल करावा; अन्यथा विमा संचिका बंद करण्यात येईल, असे कळविलेले दिसते.
(११) तक्रारकर्ता यांनी त्या पत्रानुसार मयत भागवत यांचा वाहन चालविण्याचा परवाना विरुध्द पक्ष क्र.१ यांच्याकडे दाखल केल्याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. उलटपक्षी विरुध्द पक्ष क्र.१ यांच्या पत्राच्या अनुषंगाने विमा दावा नाकारण्यात आला, असा त्यांनी अर्थान्वय काढलेला दिसतो. तक्रारकर्ता यांनी शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या प्रस्तावासोबत सहपत्रित कागदपत्रांची यादी दाखल केली आहे. त्यामध्ये वाहन चालविण्याचा परवाना दाखल केलेला नाही. तसेच मयत भागवत यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना होता, असेही तक्रारकर्ते यांचे कथन नाही.
(१२) तक्रारकर्ते यांचेतर्फे युक्तिवाद आहे की, विरुध्द पक्ष क्र.१ यांनी चुकीचे कारण देऊन विमा दावा नामंजूर केला. आमच्या मते, मयत भागवत यांचा मृत्यू वाहन अपघातामध्ये झालेला आहे. अपघातसमयी मयत भागवत हे दुचाकी वाहन चालवत होते. विमा करारपत्रानुसार वाहन चालविणा-या शेतकरी व्यक्तीचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ते यांना मयत भागवत यांचा वाहन चालविण्याचा परवाना मागणी केलेला दिसतो. अशा स्थितीमध्ये वाहन चालविण्याचा परवाना मागणी करणारे विरुध्द पक्ष क्र.१ यांचे कृत्य चूक व अयोग्य ठरते, हा तक्रारकर्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरता येणार नाही.
(१३) शेतक-यांना अपघाती विमा संरक्षण देण्याबद्दल शासन व विमा कंपनी यांच्यामध्ये यांच्यामध्ये झालेल्या विमा करारपत्राची न्यायिक दखल घेतली असता करारपत्रातील अट क्र.६ प्रमाणे जर मयत स्वत: वाहन चालवत असेल तर त्याचा वैध वाहन चालविण्याचा परवाना दाखल करणे आवश्यक आहे. त्या तरतुदीनुसार वाहन चालविण्याचा परवाना नसताना अपघात घडल्यास वाहन चालविणा-या चालक (Driver) शेतक-याव्यतिरिक्त इतर शेतकरी दाव्याकरिता पात्र असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
(१४) आम्हाला हे सुध्दा नमूद करावेसे वाटते की, मोटार वाहन कायद्याचे कलम ३ प्रमाणे कोणत्याही व्यक्तीस तिला मोटार वाहन चालविण्यास प्राधिकार देणारे खुद्द तिला देण्यात आलेले परिणामक चालन लायसन धारण करीत असल्याशिवाय, तिला कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ते वाहन चालविता येणार नाही. याचाच अर्थ सार्वजनिक स्थळी वाहन चालविण्याकरिता कार्यक्षम (Effective) ड्रायव्हींग लायसेन्सची आवश्यकता वाहनचालकाकडे असणे गरजेचे आहे. तसेच वाहन अपघाताविषयी दावे निकाली काढण्याकरिता अट (VI) तरतूद विमा करारपत्रामध्ये समाविष्ट केलेली आहे.
(१५) विरुध्द पक्ष क्र.१ यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ झहारुलनिशा’, २००८ ए.सी.जे. १९२८ व ‘नॅशनल इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ कुसुम राय’, २००६ ए.सी.जे. १३३६ या न्यायनिर्णयाचा संदर्भ दाखल केला आहे. त्यांचे अवलोकन केले असता ते मोटार अपघात दावा अर्जामध्ये झालेल्या निवाडयाच्या अनुषंगाने निर्णीत झाले आहेत आणि हातातील प्रकरणे ग्राहक संरक्षण अधिनियमांतर्गत दाखल असल्यामुळे त्या न्यायनिर्णयातील न्यायिक प्रमाण लागू पडणार नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.१ यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘न्यू इंडिया अश्युरन्स कं.लि. /विरुध्द/ प्रभु लाल’, २००८ ए.सी.जे. ६२७ चा आधार घेतला आहे. त्यामध्ये वाहन नुकसान भरपाईचा प्रश्न निर्णीत झालेला आहे. त्या संदर्भात मा. न्यायालयाने व्यक्त केलेले न्यायिक तत्व लागू पडणार नाही, असे आम्हाला वाटते.
(१६) वरील विवेचनाच्या अनुषंगाने मयत भागवत यांच्याकडे अपघातसमयी मोटार सायकल चालविण्याचा वैध व कार्यक्षम वाहन परवाना नव्हता आणि त्या कारणास्तव विमा रक्कम देण्याचे दायित्व अमान्य करणारे विरुध्द पक्ष क्र.१ यांचे कृत्य सेवेतील त्रुटी ठरणार नाही, असे जिल्हा आयोगाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ते हे विमा नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र नाहीत, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. अंतिमत: मुद्दा क्र.१ व २ चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(१) तक्रारकर्ते यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
(२) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. किशोर दत्तात्रय वडणे)
(श्री. मुकुंद भगवान सस्ते) अध्यक्ष (श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-