निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार गौतम ग्यानोबा बनसोडे हा शंभरगांव,तालुका लोहा,जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून शेळी पालन व्यवसाय करुन त्याचा व त्याचे कुटूंबाची उपजिविका करतो. अर्जदाराने बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मारताळा यांचेकडून नाबार्ड योजनेंतर्गत शेळया गटसाठी कर्ज घेतले होते. त्या शेळयांचा नॅशनल इंशुरन्स कंपनी कडे विमा काढलेला आहे. दिनांक 23.07.2013 रोजी अर्जदार शेळया चरविणेसाठी शेतात गेला असता ठिक 12 ते 12.15 वाजता जोरात पाऊस पडला. त्यामुळे अर्जदार शेळया घेऊन घरी येत असतांना ठिक 12.30 मिनीटांनी ओढा ओलांडत असतांना ओढयात 5 शेळया व एक बोकड वाहून गेले. अर्जदाराने दिनांक 24.07.2013 रोजी पोलीस स्टेशन उस्माननगर येथे सदर घटनेची माहिती दिली. पोलीसांनी येऊन घटनास्थळ पंचनामा केला. दिनांक 25.07.2013 रोजी सदर घटनेबद्दल तहसिलदार लोहा यांना सदर घटनेबाबत कळविले. तहसिलदार यांनी मंडल अधिकारी,कलंबर यांना सदर घटनेची सविस्तर चौकशी करुन पंचनामा अहवाल द्यावा, कार्यवाही करावी असे पत्र दिले. सदर घटनेचा पंचनामा देणेचा तहसिलदार हे टाळाटाळ करीत आहे. दिनांक 25.07.2013 रोजी नॅशनल इंशुरन्स कंपनीला सदर घटना घडल्याचे कळविले तेव्हा त्यांनी दिनांक 12.03.2014 रोजी रजिस्टर पोस्टाव्दारे कारण दाखवून विमा रक्कम मिळत नसल्याचे कळविले. अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, 5 शेळयांची अंदाजे किंमत रक्कम रु.23,000/- व एका बोकडाची किंमत रक्कम रु.8,000/- अशी एकूण रु.31,000/- नुकसान अर्जदाराचे झालेले आहे. नॅशनल इंशुरन्स कंपनीकडे अर्जदाराने रक्कम रु.50,000/- मिळणेसाठी दावा दाखल केलेला आहे. मंडल अधिकारी हे अर्जदारास पंचनामा देत नाहीत व मदतीपासून वंचीत ठेवीत आहे. अर्जदाराने मंचास अशी विनंती केलेली आहे की, त्याला त्याच्या 5 शेळयांची व एक बोकड यांची विमा रक्कम रु.50,000/- गैरअर्जदार विमा कंपनीकडून देण्याचा आदेश व्हावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.15,000/- व दावा खर्च रक्कम रु.दावा खर्च रक्कम रु.05,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराच्या शेळयांचा विमा काढलेला आहे. प्रत्यक्षात अर्जदार यांचेकडे एकही शेळी जिवंत नाही किंवा शिल्लक नाही. कारण त्यांनी फक्त कागदपत्रावरच शेळया दाखविलेल्या आहेत. गैरअर्जदार क्र. 1 ने घटनेची चौकशी करणेसाठी †ò›ü. संगमेश्वर देलमाडे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले. चौकशी अधिकारी यांनी पाहणी करणेसाठी शंभरगांव या गांवी दिनांक 26.07.2013 रोजी गेले असता त्यांना महती या गावी राहणारे श्री चांदू मरीबा जाधव यांचे शेडमधील असलेल्या 5 शेळयांना दाखविले. त्यांचे कानातील बिल्ला क्रमांक एनआयसी 7714,7716,7712,7717 व 7719 असा आहे. परंतु अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडून 25 शेळयांचा कागदावर विमा काढलेला आहे ही गोष्ट स्पष्ट दर्शविते. अर्जदार मंचाची दिशाभूल करुन गैरअर्जदार क्र. 1 कडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत आहे. दिनांक 23.07.2013 रोजी ठिक 12 ते 12.15 वाजता जोराचा पाऊस पडला नाही व 5 शेळया व एक बोकड सदर नाल्यात/ओंढयात वाहून गेले नाही. असे असतांना सुध्दा उस्माननगर पोलीस स्टेशनच्या संबंधीत पोलीस अधिका-यांनी तसा खोटा पंचनामा दिनांक 24.07.2013 व दिनांक 25.07.2013 रोजी तयार करुन विमा कंपनीचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत आहे जेकी, कायद्याला अभिप्रेत नाही. सदर घटनेबाबत मंडल अधिकारी किंवा तहसिलदार यांनी कोणताही पंचनामा आजपर्यंत केलेला नाही. कारण तशी घटना घडलेली नाही. दिनांक 28.02.2014 रोजी चौकशी अधिकारी श्री देलमाडे यांना नायब तहसिलदार लोहा यांनी लेखी माहिती दिली की मौजे शंभरगांव व मारताळा परिसरामध्ये दिनांक 23.07.2013 रोजी पुर आलेला नाही, त्या पुरामध्ये जिवितहानी झालेली नाही. तसेच दिनांक 21.07.2013 व दिनांक 25.07.2013 रोजी वरील ठिकाणी पुर आलेला नाही. यावरुन अर्जदाराने सत्य परिस्थिती लपवून खोटा विमा दावा दाखल केलेला आहे हे दिसून येते. गैरअर्जदार क्र. 2 यांनी मंचापुढे लेखी जबाब दाखल केलेला आहे व सोबत मंडल निहाय पावसाची नोंद मिलिमिटरमध्ये तालुका लोहा जिल्हा नांदेड सन 2013-2014 रजिस्टरचा उतारा सुध्दा दाखल केलेला आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, दिनांक 21.07.2013 ते दिनांक 25.07.2013 या कालावधीत सदर महसूल मंडळामध्ये म्हणजेच शंभरगांव व मारताळा परिसरात पुर आलेला नाही. त्यामुळे शेळया वाहून जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही. गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिनांक 12.03.2014 रोजी अर्जदारास विमा दावा नाकारलेला आहे. जेकी, खरा आहे. अर्जदाराने खोटी तक्रार करुन गैरअर्जदार क्र. 1 चा अमुल्य वेळ व पैसा यांचा नाश करीत आहे करीता मंचास अशी विनंती केली आहे की, गैरअर्जदार क्र. 1 विरुध्द अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा.
गैरअर्जदार क्र.2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
5. गैरअर्जदार क्र. 2 यांनी मंडल अधिकारी कलंबर यांना सदर घटनेची चौकशीकरणेसाठी दिनांक 06.08.2013 रोजी पत्र दिले, त्याचा अहवाल अप्राप्त आहे. पोलीस पंचनामा व शवविच्छेदन अहवाल देखील गैरअर्जदार क्र. 2 कडे अप्राप्त असल्याने पुढील कार्यवाही करता आली नाही.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
7. अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 1 यांचा ग्राहक होता हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पॉलिसीच्या झेरॉक्स प्रतीवरुन स्पष्ट होते. अर्जदाराचे कथन आहे की, दिनांक 23.07.2013 रोजी 12 ते 12.15 वाजता जोराचा पाऊस पडला व त्यामुळे ओढयाला पुर आला व ठिक 12.30 मिनीटांनी ओढा ओलांडतांना 5 शेळया व एक बोकड सदर ओढयात वाहून गेले. अर्जदाराने त्याच्या सदर म्हणणेच्या पृष्टयर्थ कुठलाही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. या उलट गैरअर्जदार क्र. 1 यांचे म्हणणे आहे की, सदर दिवशी ओढयाला पुर आलाच नाही व पुरात शेळया वाहून जाण्याचा प्रश्नच येत नाही. गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्याबद्यल गैरअर्जदार क्र. 2 यांनी पावसाच्या नोंदीबद्दल दाखल केलेल्या अहवालाचा संदर्भ दिलेला आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी मंडल अधिकारी यांना सदर प्रकरणात अहवाल देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे मंडल अधिकारी कलंबर यांनी मंचात म्हणणे दाखल केलेले आहे त्यात मंडल निहाय पावसाची नोंद रजिस्टर अहवालानुसार दिनांक 21.07.2013 ते दिनांक 25.07.2013 या कालावधीत सदर महसूल मंडळामध्ये म्हणजेच शंभरगांव व मारताळा परिसरात पुर आलेला नाही. त्यामुळे शेळया वाहून जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही असे नमूद आहे. नायब तहसिलदार लोहा यांनी चौकशी अधिकारी †ò›ü. संगमेश्वर देलमाडे यांना माहिती अधिकारात माहिती देतांना दिनांक 21.07.2013 ते दिनांक 25.07.2013 रोजी शंभरगांव व मारताळा परिसरात पुर आलेला नाही अशी माहिती दिलेली आहे. गैरअर्जदारने सदर माहितीची झेरॉक्स प्रत मंचासमोर दाखल केलेली आहे.
यावरुन हे स्पष्ट होते की, शंभरगांव परिसरात दिनांक 23.07.2013 रोजी पुर आला नव्हता. त्यामुळे अर्जदाराची तक्रार मान्य करता येत नाही असे मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी त्यांचे कथनाचे पृष्टयर्थ पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदार आपली तक्रार सिध्द करणेस असमर्थ ठरलेले आहेत. वरील विवेचनावरुन मंच पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.