::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य. ) (पारीत दिनांक– 15 एप्रिल, 2014) 01. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 अंतर्गत मंचा समक्ष तक्रार दाखल केली.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे - तक्रारकर्ता हा सच्चीदानंद को-ऑपरेटीव्ह सोसायटी येथे दैनीक बचत व मासिक बचत खात्याचे पैसे संकलनाचे काम करतो. तक्रारकर्त्याची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल ही दि.14.08.2010 रोजी खरेदी केलेली आहे. वाहनाचा नोंदणी क्रं-MH-40/T-5297 असून त्याचा चेसिस क्रं-50779 व इंजिन नं.83330 असा आहे. तक्रारकर्त्याचे वाहनाचा रंग काळा आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी कडे मोटरसायकलचा विमा दि.04.05.2012 ते 03.05.2013 या कालावधी करीता उतरविला होता. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, दि.26.06.2012 रोजी तो भाजी विकत आणावयास बाजारात गेला असता तेथील पार्कींगचे ठिकाणी विमाकृत वाहन उभे ठेवले. भाजी विकत घेतल्यानंतर तक्रारकर्ता पार्कींगचे ठिकाणी वाहन घेण्यास आला असता त्यास सदर विमाकृत वाहन आढळून आले नाही त्यामुळे त्याने जवळपास शोधाशोध घेतली परंतु वाहन दिसून आले नाही. त्या बाबत तक्रारकर्त्याने दि.05.07.2012 रोजी पोलीस स्टेशन उमरेड येथे वाहन चोरीस गेल्या बाबतची तक्रार नोंदविली. परंतु पोलीसांना वाहन आढळून आले नाही. म्हणून पोलीसानीं मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, उमरेड यांचे न्यायालयात वाहना संबधीचा अंतिम अहवाल सादर केला. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, सदर वाहन हे विमाकृत असून त्याचा विमा पॉलिसी क्रं-16010031120100001413 असा आहे. तक्रारकर्त्याने वाहन चोरीस गेल्या नंतर विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे वाहन चोरीस गेल्या बाबतची सुचना दिल्या नंतर विमा कंपनीने प्रथम खबरी अहवालाची प्रत मागितली व रितसर अर्ज आवश्यक दस्तऐवजांसह सादर करण्यास सुचित केले. त्यानुसार तक्रारकर्त्याने प्रथम खबरी अहवालाची प्रत व वाहनाचे मालकी संबधीचे सर्व दस्तऐवज विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे सादर केले तसेच विमा दावा अर्ज भरुन देऊन आवश्यक दस्तऐवजांवर सहया केल्यात. विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दावा निश्चीतीसाठी वेळ लागेल असे सांगितले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्यास विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दि.04 जानेवारी, 2012 रोजीचे पत्र प्राप्त झाले, सदर पत्रामध्ये विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर तक्रारकर्त्याने वारंवार विरुध्दपक्ष विमा कंपनीचे व्यवस्थापकांची प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे देऊन वाहनाची व्यवस्थीत काळजी घेतली नसल्याने वाहन चोरीस गेल्याचे सांगून विमा दावा देण्यास असमर्थता दर्शविली. करीता तक्रारकर्त्याने मंचा समक्ष प्रस्तुत तक्रार दाखल केली. तक्रारकर्त्याची प्रार्थना- 1) विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्यास त्याचे चोरीस गेलेल्या वाहनाची किंमत रुपये-38,000/- परत करण्याचे आदेशित व्हावे. 2) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासा बद्दल व आर्थिक नुकसानी बद्दल विरुध्दपक्ष विमा कंपनीने रुपये-25,000/- देण्याचे आदेशित व्हावे. 3) प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्ष विमा कंपनीने त.क.ला देण्याचे आदेशित व्हावे. 03. विरुध्दपक्ष विमा कंपनीने प्रतिज्ञालेखावरील उत्तर मंचा समक्ष सादर केले. त्यांनी आपले लेखी उत्तरामध्ये नमुद केले की, पोलीस दस्तऐवजांवरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने विमाकृत वाहन ज्या पार्कींगचे ठिकाणी ठेवले होते ती जागा अधिकृत नाही तसेच तक्रारकर्त्याने वाहन पार्कींगचे ठिकाणी ठेवताना त्यास कुलूप लावले नव्हते, त्या ठिकाणी वाहनाची देखरेख करणारे कोणीही नव्हते. त्यामुळे वाहन हे तक्रारकर्त्याचे निष्काळजीपणामुळे चोरीस गेलेले आहे व त्याकरीता तक्रारकर्ता हाच जबाबदार आहे. चोरीस गेलेले वाहन तक्रारकर्त्याचे मालकीचे होते आणि त्याचा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विमा काढलेला होता ही बाब विरुध्दपक्ष विमा कंपनीने मान्य केली. तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग केल्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी विमा दावा देण्यास जबाबदार नाही. वाहन चोरीस गेल्या नंतर तक्रारकर्त्याने त्वरीत विरुध्दपक्ष विमा कंपनीस सुचना दिली होती आणि विमा दावा आवश्यक दस्तऐवजांसह सादर केला होता या बाबी मान्य केल्यात. विमा दावा सादर
केल्या नंतर विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा निश्चीती संबधाने पोलीस दस्तऐवजांचे अवलोकन केले असता चोरीस गेलेल्या वाहना बद्दल तक्रारकर्ता हाच जबाबदार असल्याचे आढळून आले. करीता तक्रारकर्त्याची तक्रार खारीज व्हावी अशी विनंती विरुध्दपक्ष विमा कंपनीने केली. 04. तक्रारकर्त्याने तक्रार प्रतिज्ञालेखावर मंचा समक्ष सादर केली तसेच निशाणी क्रं-03 वरील यादी नुसार दस्तऐवज दाखल केले. ज्यामध्ये प्रामुख्याने तक्रारकर्त्याचे वाहनाचे बिल, आर.सी.बुक, पॉलिसी प्रत, प्रथम खबरी अहवाल, घटनास्थळ पंचनामा, अंतिम अहवाल नमुना, विमा कंपनीचे दावा फेटाळल्याचे पत्र अशा दस्तऐवजांचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवाद सादर केला.
05. विरुध्दपक्ष विमा कंपनीने प्रतिज्ञालेखावरील उत्तर सादर केले. अन्य दस्तऐवज दाखल केले नाहीत. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे पुरसिस सादर करुन त्याव्दारे त्यांचे लेखी उत्तर हाच लेखी युक्तीवाद समजावा असे कळविले. 06. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री अभय व्ही.मुडके यांचा तर विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्री एस.एम. पाळधीकर यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. 07. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तर आणि उपलब्ध दस्तऐवज यावरुन मंचा समक्ष खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्या बाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे
अक्रं मुद्दे निष्कर्ष 1) वि.प.विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा फेटाळून दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?.............................................. ....नाही. 2) अंतीम आदेश काय?...............................................तक्रार खारीज. -कारणे व निष्कर्ष – मुद्दा क्रं -01 व 02 बाबत - 08. तक्रारकर्त्याने त्याचे मालकीचे हिरो हांडा स्प्लेंडर प्लस मोटर सायकल नोंदणी क्रं-MH-40/T-5297 चा विमा विरुध्दपक्ष विमा कंपनी कडे दि.04.05.2012 ते 03.05.2013 या कालावधी करीता उतरविला होता ही बाब विरुध्दपक्ष विमा कंपनीस मान्य आहे. तक्रारकर्त्याचे विमाकृत वाहन हे दि.26.06.2012 रोजी बाजारातील पार्कींगचे ठिकाणाहून चोरीस गेले ही बाब सुध्दा उभय पक्षानां मान्य आहे. त्या बाबत तक्रारकर्त्याने दि.05.07.2012 रोजी पोलीस स्टेशन उमरेड येथे वाहन चोरीस गेल्या बाबतची तक्रार नोंदविली होती परंतु पोलीसांना वाहन आढळून आले नाही, म्हणून मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, उमरेड यांचे न्यायालयात पोलीसांनी वाहना संबधीचा अंतिम अहवाल सादर केला होता या बाबी प्रकरणातील दस्तऐवजांवरुन सिध्द होतात. विरुध्दपक्ष विमा कंपनीने वाहन चोरीस गेल्या नंतर तक्रारकर्त्याने त्वरीत विरुध्दपक्ष विमा कंपनीस सुचना दिली होती आणि विमा दावा आवश्यक दस्तऐवजांसह सादर केला होता या बाबी आपले उत्तरात मान्य केल्यात. 09. विरुध्दपक्ष विमा कंपनीचा संक्षीप्त विवाद असा आहे की, पोलीस दस्तऐवजांवरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने विमाकृत वाहन ज्या पार्कींगचे ठिकाणी ठेवले होते ती जागा अधिकृत नव्हती तसेच तक्रारकर्त्याने वाहन पार्कींगचे ठिकाणी ठेवताना त्यास कुलूप लावले नव्हते, त्या ठिकाणी वाहनाची देखरेख करणारे कोणीही नव्हते. त्यामुळे वाहन हे तक्रारकर्त्याचे निष्काळजीपणामुळे चोरीस गेलेले आहे व त्याकरीता तक्रारकर्ता हाच जबाबदार आहे. तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग केल्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी विमा दावा देण्यास जबाबदार नसल्याचे नमुद केले. विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा दि.04 जानेवारी, 2012 रोजीचे पत्राव्दारे फेटाळला व त्यामध्ये नमुद केले की, विमा पॉलिसीतील अट क्रं 4 चे तक्रारकर्त्याने उल्लंघन केले, ती अट खालील प्रमाणे उदधृत करण्यात येते- “ The insured shall take all reasonable steps to safeguard the vehicle from loss or damage” 10. या संदर्भात मंचा तर्फे प्रकरणातील दाखल संपूर्ण दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. पोलीसांचे एफ.आय.आर.मध्ये तक्रारकर्त्याने घटनेचे
दिवशी विमाकृत वाहन हॅन्डल लॉक न करता ठेवले होते असा उल्लेख आहे. तक्रारकर्त्याने आपले प्रतीउत्तरा दाखल प्रतिज्ञालेखात खालील प्रमाणे नमुद केले की- “अर्जदाराने त्याची गाडी हरविला असता पोलीसां समोर अतिशय प्रामाणिकपणे बयान दिले की, त्याने त्याची गाडी बाजारात असलेल्या पार्कींग स्टॅन्डवर उभी केली होती पुढे त्याने असेही सांगितले की, तो अनावधानाने गाडीला हॅन्डल लॉक करणे विसरला होता. याचाच फायदा गैरअर्जदार घेऊ इच्छीत आहे व आपल्या देयते पासून मुक्त होण्यास पाहत आहे. वास्तविक पाहता कोणत्याही ईसमाने गाडीला हॅन्डल लॉक केले असेल किंवा केले नसेल तरी सुध्दा चोर हा गाडी चोरु शकतो परंतु गैरअर्जदार सदर बाब मानण्यास तयार नाही”. 11. उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे तक्रारकर्त्याचे प्रतीउत्तरा वरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्त्यास घटनेचे दिवशी त्याने वाहन पार्कींगचे ठिकाणी लॉक न करता ठेवले होते ही बाब मान्य आहे. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणण्या नुसार विमा पॉलिसीतील अट क्रं 4 “ The insured shall take all reasonable steps to safeguard the vehicle from loss or damage” चे तक्रारकर्त्याने उल्लंघन केले या म्हणण्यात तथ्य दिसून येते. म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, मंच, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी नागपूर यांचे विरुध्द खारीज करण्यात येते. 2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत. 3) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |