::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री मनोहर गोपाळराव चिलबुले , मा.अध्यक्ष ) (पारीत दिनांक – 18 नोव्हेंबर, 2013 ) 1. तक्रारकर्तीने, तिचा मुलगा शफीक मुक्तार अन्सारी याचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्दपक्षा कडून विमा रक्कम मिळणेसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्तीचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे-
तक्रारकर्तीचा मुलगा शफीक मुक्तार अन्सारी याचे मालकीची मौजा झिंझेरीया, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर येथे शेती असून तिचा सर्व्हे क्रमांक-224 असा आहे आणि शेतीचे उत्पन्नावर संपूर्ण कुटूंबियाचा उदरनिर्वाह आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा विमा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून उतरविला होता. महाराष्ट्र शासन विरुध्दपक्ष क्रं-3 तहसिलदार, रामटेक यांचे कार्यालया तर्फे संबधित शेतक-याचा विमा क्लेम हा, विरुध्दपक्ष क्रं-2 यांचे कार्यालयात पाठविल्या जातो व वि.प.क्रं 2 चे मार्फतीने प्रस्तावाची छाननी करुन पुढे तो विमा प्रस्ताव, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे सादर करण्यात येतो. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचा मुलगा शफीक मुक्तार अन्सारी हा दि.21.04.2007 रोजी नागपूर-जबलपूर रोडवर मोटरसायकलवर डबलसिट मागे बसून जात असताना एका ट्रकने धडक दिल्याने जखमी होऊन मृत्यू झाला. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे मुलाचा महाराष्ट्र शासना तर्फे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत सदरचे कालावधीत विमा उतरविलेला असल्याने, मुलाचे अपघाती मृत्यूनंतर कायदेशीर वारसदार म्हणून विमा रक्कम रुपये-1,00,000/- मिळावी म्हणून तक्रारकर्तीने, विरुध्दपक्ष क्रं 3 तहसिलदार, रामटेक यांचे कार्यालयात आवश्यक दस्तऐवजांसह विमा प्रस्ताव दि.20.06.2007 रोजी सादर केला. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 3 तहसिलदार रामटेक यांचे कार्यालया मार्फतीने पुढे सदर विमा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचेकडे पाठविण्यात आला व वि.प.क्रं 2 यांनी विमा प्रस्तावाची छाननी करुन सदर विमा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे सादर केला तसेच विरुध्दपक्षाने वेळोवेळी मागीतलेल्या दस्तऐवजांची तक्रारकर्तीने पुर्तता केली. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, विमा प्रस्ताव दि.20.06.2007 रोजी सादर केल्या नंतर, सदर दावा मंजूर अथवा नामंजूर झाला या संबधी तक्रारकर्तीस विरुध्दपक्षाने काहीही कळविले नाही म्हणून तक्रारकर्तीने विमा दाव्या संबधाने दि.08.02.2013 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. त्यामुळे तक्रारीचे कारण हे सदोदीत घडत आहे. म्हणून तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा कडून विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- विमा दावा प्रस्ताव सादर केल्याचा दिनांक-20/06/2007 पासून द.सा.द.शे.18% दराने व्याजासह मिळावी, तसेच मानसिक, शारिरीक त्रास व आर्थिक नुकसानी पोटी रुपये-20,000/- आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-10,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे कडून मिळावे इत्यादी मागण्या केल्यात. 3. प्रस्तुत न्यायमंचा तर्फे यातील विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांना स्वतंत्ररित्या नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. सदर न्यायमंचाची नोटीस संबधित वि.प.क्रं 1 ते 3 यांना प्राप्त झाल्या बद्दल रजिस्टर पोच अभिलेखावर दाखल आहेत. 4. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले प्रतिज्ञालेखावरील उत्तर निशाणी क्रं 13 अनुसार पान क्रं 72 ते 75 वर न्यायमंचा समक्ष सादर केले. त्यांनी आपले लेखी उत्तरामध्ये कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे, विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस आणि वि.प.क्रं 1 विमा कंपनी मध्ये झालेल्या त्रिपक्षीय करारा नुसार शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना महाराष्ट्र राज्यातील 04 विभागातील 68,000 शेतक-यां करीता
दि.15.07.2006 ते 14.07.2007 या कालावधी करीता विमा पॉलिसीचे अटी व शर्तीस अधिन राहून राबविण्यात आली होती. वि.प.क्रं 3 संबधित तहसिलदार यांचे मार्फतीने, वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीस लिमिटेड यांचेकडे विमा प्रस्ताव पाठविण्यात येईल व त्यानंतर वि.प.क्रं 2 यांनी विमा प्रस्तावाची योग्य ती छाननी करुन व आवश्यक दस्तऐवजी त्रृटीचीं संबधितां कडून पुर्तता करुन पुढे तो विमा प्रस्ताव वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे विहित मुदतीत 90 दिवसांचे आत दाखल करणे बंधनकारक आहे. वि.प.क्रं 1 विमा कंपनीस विहित कालावधीत दावा सुचना व दावा संबधाने संपूर्ण दस्तऐवज प्राप्त झाले हे तक्रारकर्तीचे म्हणणे खोटे असल्याचे नमुद केले. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने आजतागायत विमा दाव्या संबधीचा निर्णय कळविला नाही हे त.क.चे म्हणणे खोटे असल्याचे नमुद केले. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. वि.प.क्रं 1 विमा कंपनीस दाव्याची सुचना अत्यंत उशिरा 06 वर्षा नंतर दि.09.01.2013 रोजी, वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस मार्फत आवश्यक पुराव्या शिवाय देण्यात आली, त्यामुळे कार्यालयीन प्रक्रिये नुसार विमा दावा अटी व शर्तीचा भंग झाल्याने निरस्त करण्यात आला. प्रस्तुत तक्रार ग्रा.सं. कायदयातील तरतुदी नुसार चालविण्यास अपात्र असल्याचे नमुद केले. प्रस्तुत तक्रार खोटी, कालबाहय, बनावटी स्वरुपाची व अप्रस्तुत असल्याने वि.प.क्रं 1 विरुध्द खर्चासह खारीज करावी. मृतक हा शेती करीत होता हे तक्रारकर्तीचे विधान खोटे असल्याचे तक्रारी सोबत दाखल दस्तऐवजां वरुन सिध्द होत असल्याचे नमुद केले. तक्रारकर्तीची तक्रार मुदतबाहय, खोटी असल्याने ती खारीज व्हावी, अशी विनंती वि.प.क्रं 1 विमा कंपनी तर्फे करण्यात आली. 5. विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स कंपनी तर्फे प्रतिज्ञालेखावरील उत्तर निशाणी क्रं 9 अनुसार पान क्रं 61 व 62 वर न्यायमंचा समक्ष सादर केले. त्यांनी लेखी उत्तरामध्ये ते केवळ मध्यस्थ सल्लागार म्हणून शासन आणि विमा कंपनी यांचे मध्ये कार्य करतात व शासनास विना मोबदला सहाय्य करीत असल्याने तक्रारकर्ती या त्यांच्या ग्राहक होऊ शकत नाहीत. संबधित तहसिलदार यांचे कडून प्राप्त विमा प्रस्तावाची, योग्य ती छाननी करुन, तसेच आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता संबधितां कडून करवून घेऊन, विमा प्रस्ताव संबधित विमा कंपनीकडे मंजूरीसाठी ते पाठवितात. मृतक शफीक मुक्तार अन्सारी याचा अपघाती मृत्यू दि.21.04.2007 संबधाने विमा प्रस्ताव तहसिल कार्यालय, रामटेक यांचे मार्फतीने, विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे कार्यालयास प्राप्त झाल्या नंतर, त्यांनी सदर विमा प्रस्ताव, वि.प.क्रं 1 विमा कंपनीस पाठविला.
पुढे वि.प.क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्या बाबत पत्रान्वये तसे वारसदारास कळविले असल्याचे नमुद केले. वि.प.क्रं 2 यांनी तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने त्यांना मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली. 6. विरुध्दपक्ष क्रं 3 तहसिलदार, रामटेक यांना या न्यायमंचाची नोटीस मिळाल्या बाबत नोंदणीकृत डाकेची पोच निशाणी क्रं-6 नुसार अभिलेखावर दाखल आहे परंतु वि.प.क्रं 3 नोटीस मिळूनही न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा आपले लेखी उत्तरही दाखल केले नाही म्हणून वि.प.क्रं 3 यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दि.08.10.2013 रोजी प्रकरणात पारीत केला 7. तक्रारकर्तीने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार एकूण 10 दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात, ज्यामध्ये शेतकरी अपघात विमा योजना शासन निर्णय, विमा दावा अर्ज प्रत, तक्रारकर्तीचे मुलाचे नावाचा शेतीचा 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-8-अ व 6 क उतारा प्रत, तक्रारकर्तीचे मुलाचे अपघाती मृत्यू संबधाने एफ.आय.आर. प्रत, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस, पोस्टाच्या पावत्या इत्यादीचा समावेश आहे. तसेच तक्रारकर्तीने निशाणी क्रं 14 वर व नि.क्रं 19 वर आपले शपथपत्र दाखल केले. तसेच नि.क्रं 15 अनुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. 8. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने नि.क्रं 17 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. 9. वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस तर्फे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र, मा.राज्य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांचे निर्णयाची प्रत, वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे दावा नाकारल्याचे पत्र अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. 10. प्रस्तुत प्रकरणात त.क. आणि वि.प.क्रं 1 विमा कंपनी यांचे तर्फे त्यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. 11. तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आणि वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचे लेखी उत्तर आणि प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज व त.क. व वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे अधिवक्ता यांचा युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे- :: निष्कर्ष :: 12. प्रकरणातील उपलब्ध पोलीस दस्तऐवज एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा, आणि डॉक्टरांचे शवविच्छेदन अहवाल यावरुन मृतक मो.शफीक व.मो.मुख्तार यांचा अपघाताने मृत्यू दि.20.04.2007 रोजी झाल्याचे दिसून येते.
13. महाराष्ट्र शासन निर्णय दि.07 जुलै, 2006 अन्वये सन-2006-2007 या कालावधीमध्ये शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वीत असून विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे (“विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी” म्हणजे नॅशनल इन्शुरन्स कंपनी असे समजण्यात यावे) नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या कार्यक्षेत्रातील शेतक-यांचा विमा सदर कालावधीत उतरविल्याचे दिसून येते. थोडक्यात मृतकाचा विमा सदरचे कालावधीत काढलेला होता ही बाब स्वयंस्पष्ट होते. 14. विमाधारकाचा झालेला अपघाती मृत्यू तसेच विमा पॉलिसी या बद्दल उभय पक्षांमध्ये विवाद नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी उत्तरा सोबत खालील प्राथमिक आक्षेप घेतलेले आहेत- (1) अपघाताचे वेळी, मृतक विमाधारकाचे नावे शेती नव्हती. (2) प्रस्तुत तक्रारीत मंचास अधिकार क्षेत्र येत नाही. (3) प्रस्तुत तक्रार मुदतबाहय असल्याचे कारणा वरुन खारीज व्हावी (4) मृतकाचे सर्व वारसदारानां प्रस्तुत तक्रारीत सामील न केल्या बाबत- आक्षेप क्रं-1- अपघाताचे वेळी मृतक विमाधारकाचे नावे शेती नव्हती- 14(1) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी उत्तरात अपघाताचे वेळी मृतक विमा धारकाचे नावे शेती नव्हती असे शेतीचे दस्तऐवजा वरुन दिसून येते असे आक्षेपित केलेले आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स
प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड यांनी आपले लेखी उत्तरा सोबत, विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनीने, तक्रारकर्ती हिचा विमा दावा नाकारल्याचे दि.10 मार्च, 2008 रोजीचे पत्र अभिलेखातील पान क्रं 67 वर दाखल केले आहे. सदर पत्रामध्ये तक्रारकर्तीचा विमा दावा हा, अपघाताचे वेळी मृतक विमाधारकाचे नावे शेती नव्हती असे नमुद करुन फेटाळलेला आहे. त्यामुळे प्रथम या आक्षेपाचा विचार होणे आवश्यक आहे. प्रकरणातील उपलब्ध तलाठी देवलापार वर्ष 2010-11 च्या गाव नमुना 7, 7-अ व 12 मध्ये मृतक शफीक मुख्तार भूमापन क्रं 224, क्षेत्र 1.86 हेक्टर आर, मौजा झिंझेरीया, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर या शेतजमीनीचा त्याचे वडील शेख मुख्तार यांच्या मृत्यूमुळे वारसा हक्काने इतर वारसां बरोबर मालक असल्याची नोंद आहे. तसेच सदर नोंद फेरफार क्रं 116, दि.28.06.2007 प्रमाणे घेतली आहे. सन-2011-12 च्या 7/12 उता-या मध्ये देखील मृतक शफीक मुख्तार याची मालकी 7/12 उता-यामध्ये दर्शविलेली आहे. गाव नमुना-सहा-क वारसा प्रकरणाची नोंदवही यामध्ये मृत भोगवटदाराचे किंवा इतर अधिकार धारकाचे नाव या रकान्यात 1) मो.मुख्तार अहमद खाजा मोहोयोद्दीन मृत्यू दिनांक-04.02.2007 (मृतक विमाधारकाचे वडील) 2) शफीक मुख्तार मृत्यू दिनांक-20.04.2007 (मृतक विमाधारक) कायदेशीर वारसांची नावे या रकान्यात शफीक मुख्तार मयत मुली- 3) फौजीया 4) आरिफा साबीर कादरी 5) फजिला मुख्तार 6) फरहा मुख्तार 7) अर्शिया मुख्तार पत्नी 8) हबिबुन्नीसा वि.मुख्तार रा.झिंझेरीया अशी नोंद आहे.
फेरफाराची नोंदवही मधील फेरफार क्रं 116 तक्रारकर्तीने दाखल केली आहे. त्यात मौजा झिंझेरीया, तालुका रामटेक येथील सर्व्हे नं.224, आराजी-1.86 हेक्टर जमीनी संबधी खालील प्रमाणे फेरफार घेण्यात आला आहे- वारसान प्रकरणी मैयताचे नाव- 1) मो.मुख्तार अहमद व.खाजा मोहायोद्दीन (विमाधारकाचे वडील) 2) शफीक मुख्तार (विमाधारक) मैयताचे दिनांक-04.02.2007 व 20.04.2007 खुलासा- वरील खातेदार व त्यांचा मुलगा मय्यत झाल्यामुळे वारसान खालील प्रमाणे- मुले- 1) आरीफ मुख्तार 2) शफीक मुख्तार (मयत) मुली- 3) फौजीया 4) आरिफा साबीर कादरी 5) फजिला मुख्तार 6) फरहा मुख्तार 7) अर्शिया मुख्तार पत्नी 8) हबिबुन्नीसा वि.मुख्तार रा.झिंझेरीया
वरील नोंदी प्रमाणे मयत विमाधारकाचे वडील मो.मुख्तार अहमद दि.04.02.2007 रोजी मरण पावल्याने मयत विमाधारक शफीक मुख्तार वारस हक्काने सदर शेतजमीनीचा मालक दि.04.02.2007 रोजी झाला म्हणून त्याच्या मृत्यूचे दिवशी दि.20.04.2007 रोजी तो शेतकरी होता. त्याच्या वडीलाच्या मृत्यूमुळे वारसा हक्काचा फेरफार जरी त्याच्या मृत्यू दिनांक-20.04.2007 नंतर म्हणजे दि.28.06.2007 रोजी घेण्यात आला तरी त्याचे वारसा हक्कास कोणतीही बाधा पोहचत नाही व म्हणून मयत शफीक मुख्तार याची वारस असलेली आई तक्रारकर्ती हबीबुन्नीसा शेतकरी अपघात विमा योजनाचा लाभ मिळण्यास पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. या संदर्भात तक्रारकर्तीने आदरणीय राष्ट्रीय ग्राहक आयोग, न्यु दिल्ली यांनी IV (2012) CPJ 51 (NC) “Reliance General Insurance Co. Ltd.-V/s-Sakorba Hetubha Jadeja & Ors.” पुर्नयाचीका क्रं 1664/2011 आदेश पारीत दि.27.08.2012 या न्यायनिवाडयावर आपली भिस्त ठेवली. सदर आदरणीय राष्ट्रीय ग्राहक आयोग, न्यु दिल्ली यांनी पारीत केलेल्या आदेशाचे वाचन केले असता, त्यामधील वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे- गुजरात शासना तर्फे राज्यातील शेतक-यांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविण्यात आला होता. विम्याचा कालावधी हा दि.26.01.2002 ते 25.01.2003 असा होता. मृतक विमाधारक शेतक-याचे नाव हेतुभा भारमलजी जडेजा असे होते. मृतक विमाधारक हेतूभा भारमल जडेजा यांचा अपघाती मृत्यू ईलेक्ट्रिक शॉक बसून दि.13.05.2002 रोजी झाला. मृतक शेतक-याचे अपघाती मृत्यू नंतर, वारसदारानीं जिल्हा ग्राहक न्यायमंचात तक्रार दाखल केली असता, तक्रार मंजूर होऊन मृतकाचे वारसदारास विम्याची रक्कम रुपये-1,00,000/- देण्याचा आदेश पारीत करण्यात आला. मंचाचे आदेशा विरुध्द राज्य ग्राहक आयोग यांचेकडे अपिल करण्यात आले असता, ते खारीज करण्यात आले. म्हणून संबधित विमा कंपनीने आदरणीय राष्ट्रीय ग्राहक आयोगा मध्ये पुर्नयाचीका दाखल केली. आ.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने आदेशामध्ये नमुद केले की, हेतुभा जडेजा, नागुभा, मखूभा आणि विरुभा हे सर्व मृतक भारमलजी यांचे पुत्र आहेत आणि सहशेतकरी व वडीलांचे शेतीचे कायदेशीर वारसदार आहेत. संबधित विमा कंपनीने विमा योजना सुरु झाल्याचा दिनांक-26.01.2002 रोजी मृतक हेतूभा भारमल जडेजा हा रजिस्टर्ड शेतकरी नव्हता, तर तो विमा योजना सुरु झाल्या नंतर दि.12.04.2002 रोजी रजिस्टर्ड शेतकरी बनला या कारणा वरुन विमा दावा नामंजूर केला होता. संबधित शेतीचे दस्तऐवज गाव नमुना 6 आणि 7/12 उता-या वरुन मृतक हा 12.04.2002 रोजी रजिस्टर्ड शेतकरी होता. मृतक हेतुभा जडेजा यांचा मृत्यू दि.13.05.2002 रोजी झाला, त्यामुळे मृत्यूचे दिवशी मृतक हेतुभा जडेजा हे रजिस्टर्ड शेतकरी होते, असे नमुद करुन पुर्नयाचीका खारीज केली. आमचे समोरील प्रकरणात सदर आ.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा आदेश तंतोतंत लागू पडतो, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. आक्षेप क्रं-2- मंचास अधिकार क्षेत्र नसल्या बाबत- 14(2) यातील मृतक शफीक मुख्तार अन्सारी याची शेती ही तहसिल रामटेक, जिल्हा नागपूर येथे असल्यामुळे व तो सदर शेतीमध्ये कायेदशीर वारसदार असल्याने ,ग्राहक संरक्षण कायदया नुसार नागपूर ग्रामीण अंतर्गत प्रस्तुत न्यायमंचास तक्रार चालविण्याचे पूर्ण अधिकारक्षेत्र येते. त्यामुळे वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे अधिकारक्षेत्र येत नसल्याचे आक्षेपात काहीही तथ्य दिसून येत नाही.
आक्षेप क्रं-3- तक्रार मुदतबाहय असल्या बाबत- 14(3) विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी उत्तरात नमुद केले की, त्यांना दाव्याची सुचना अत्यंत उशिरा 06 वर्षा नंतर दि.09.01.2013 रोजी, वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस मार्फत आवश्यक पुराव्या शिवाय देण्यात आली, त्यामुळे कार्यालयीन प्रक्रिये नुसार विमा दावा अटी व शर्तीचा भंग झाल्याने निरस्त करण्यात आला. या संदर्भात विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड यांनी आपले लेखी उत्तरा सोबत, विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनीने, तक्रारकर्ती हिचा विमा दावा नाकारल्याचे दि.10 मार्च, 2008 रोजीचे पत्र अभिलेखावर पान क्रं 67 वर दाखल केले आहे. सदर पत्रामध्ये तक्रारकर्तीचा विमा दावा हा, अपघाताचे वेळी मृतक विमाधारकाचे नावे शेती नव्हती असे नमुद करुन फेटाळलेला आहे. याचाच अर्थ असा होतो की, तक्रारकर्तीचे प्रतिज्ञालेखावरील तक्रारी नुसार तिने सदर विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 3 तहसिलदार यांचे कार्यालयात 20/06/2007 रोजी केला होता, या तक्रारकर्तीचे विधानास बळकटी प्राप्त होते त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी उत्तरात नमुद केल्या प्रमाणे त्यांना दाव्याची सुचना अत्यंत उशिरा 06 वर्षा नंतर दि.09.01.2013 रोजी, वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस मार्फत आवश्यक पुराव्या शिवाय देण्यात आली, या म्हणण्यात काहीही तथ्य मंचास आढळून येत नाही. तक्रारकर्तीने, वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे दावा मंजूर केला किंवा नामंजूर केला या बद्दल काहीही कळविले नसल्याचे आपले प्रतिज्ञालेखावरील तक्रारीत नमुद केले. तक्रारकर्तीने निशाणी क्रं 14 वरील शपथपत्रात सुध्दा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे दि.10 मार्च, 2008 रोजीचे दावा नाकारल्याचे पत्र तिला मिळाले नसल्याचे नमुद केले आहे, त्यामुळे तक्रारीचे कारण हे सदोदीत घडत असल्याचे नमुद केले आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दि.10 मार्च, 2008 रोजीचे दावा नाकारल्याचे पत्र तक्रारकर्तीस पाठविल्या बाबत पोच, जावक रजिस्टरचा उतारा असा काहीही पुरावा प्रस्तुत तक्रारीत मंचा समक्ष दाखल केलेला नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार ही मुदतीत आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. आक्षेप क्रं-4- मृतकाचे सर्व वारसदारानां प्रस्तुत तक्रारीत सामील न केल्या बाबत- 14(4) नि.क्रं 19 अनुसार शपथपत्रामध्ये तक्रारकर्तीने असे नमुद केले आहे की, दि.20.04.2007 रोजी मृतक शफीक मुक्तार अन्सारी हा अपघातातील मृत्यू समयी अविवाहित असल्याने तक्रारकर्ती ही आई या नात्याने मृतक विमाधारकाची कायदेशीर वारसदार असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे उपरोक्त आक्षेपात तथ्य दिसून येत नाही. 15. उपरोक्त नमुद परिस्थितीत तक्रारकर्ती शेतकरी अपघात विमा योजने संबधाने विमा क्लेमची रक्कम रुपये-1,00,000/- वि.प.क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनीने विमा क्लेम नाकारल्याचा दिनांक-10.03.2008 पासून द.सा.द.शे.12% दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/-आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-2000/- तक्रारकर्ती,विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 आणि विरुध्दपक्ष क्रं-3 यांना सदर प्रकरणातून मुक्त करण्यात येते. 16. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत- ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस निर्देशित करण्यात येते की, तक्रारकर्तीस तिचे अविवाहीत मुलाचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी व्यक्तीगतअपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त ) विमा दावा नाकारल्याचा दिनांक- 10.03.2008 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह द्दावी.
3) तक्रारकर्तीस झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीस द्दावेत. 3) विरुध्दपक्ष क्रं- 2 व क्रं-3 यांना सदर तक्रारीतून मुक्त करण्यात येते. 4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे.. 5) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |