::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्यक्ष ) (पारीत दिनांक– 15 फेब्रुवारी, 2014) 1. प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली तक्रारकर्त्याने त्याचे वडीलांचे मृत्यू संबधाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्दपक्षा कडून विमा रक्कम मिळणेसाठी दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे- तक्रारकर्त्याचे वडील श्री डोमाजी संतोषराव शोभणे यांचे मालकीची मौजा राजनी, तालुका काटोल, जिल्हा नागपूर येथे सर्व्हे नं.139 शेत जमीन आहे. तक्रारकर्त्याचे वडीलांचा शेतीचा व्यवसाय होता आणि शेतातील उत्पन्नावर ते कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्त्यानी पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्दपक्ष क्रं-1 दि न्यु इंडीया एश्युरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीकडे, महाराष्ट्र शासना तर्फे विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, काटोल मार्फतीने शेतक-यांचा अपघाती विमा उतरविलेला आहे. विरुध्दपक्ष क्रं-2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड ही शेतक-यांचे अपघात विमा दाव्यांची छाननी करुन विमा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे सादर करण्यासाठी नियुक्त केलेली सल्लागार कंपनी आहे. तक्रारकर्त्याचे वडील श्री डोमाजी संतोषराव शोभणे हे दि.25.06.2012 रोजी नागपूर येथे लग्नानिमित्य हजर असताना गावातील एका ईसमाने भांडण करुन त्यांना मारहाण करुन जख्मी केले व उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तक्रारकर्त्याने त्यांचे वडील श्री डोमाजी संतोषराव शोभणे यांचे मृत्यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे दि.06.10.2012 रोजी, विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिका-या मार्फत अर्ज सादर केला. तसेच विरुध्दपक्षाचे मागणी नुसार वेळोवेळी आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता केली. अशी स्थिती असताना, विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने दि.05.03.2013 रोजी तक्रारकर्त्याचे वडील 75 वर्षाचे वर असल्याने विमा दावा नियमाप्रमाणे मंजूर करु शकत नाही असे कळवून दावा नामंजूर केला. विरुध्दपक्ष विमा कंपनीस विमा दावा नामंजूर करण्यापूर्वी तक्रारकर्त्याचे वडीलांचे वया संबधाने आवश्यक दस्तऐवज जसे शाळा सोडल्याचा दाखला ईत्यादी वरुन खात्री करता आली असती व त्या संबधाने तक्रारकर्त्या-कडून स्पष्टीकरण मागविता आले असते परंतु विरुध्दपक्षाने निवडणूक ओळखपत्रा वरील दर्शविलेल्या वया वरुन दावा नामंजूर केला. तक्रारकर्त्याचे वडीलांचे शाळा सोडण्याचे दाखल्यावरुन त्यांची जन्मतारीख 02.05.1949 अशी आहे आणि त्यावरुन त्यांचे मृत्यू समयीचे वय-63 वर्षाचे आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास त्याची बाजू मांडण्यासाठी कोणतीही संधी न देता विमा दावा नामंजूर करुन तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली असून त्याव्दारे शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- विरुध्दपक्षाकडे विमा प्रस्ताव दाखल दिनांक- 06.10.2012 पासून द.सा.द.शे.18% दराने व्याजासह मिळावी तसेच आर्थिक, शारिरीक मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-20,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्षा कडून मिळावे अशा मागण्या केल्यात. 03. विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने मंचा समक्ष दि.08.01.2014 रोजी लेखी उत्तर दाखल करुन, तक्रारीस सक्त विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारकर्त्याने आवश्यक दस्तऐवजांसह विमा दावा सादर केल्याची बाब मान्य आहे. तक्रारकर्त्याने विमा दाव्या सोबत त्यांचे मृतक वडीलांचे वया संबधाने निवडणूक ओळखपत्राची प्रत सादर केली, त्यामध्ये त्यांचे जन्माचे वर्ष 1935 नमुद केलेले आहे आणि त्यावरुन मृतकाचे मृत्यू समयीचे वय-77 वर्ष
होते. सदर विमा पॉलिसी नुसार वय-10 ते 75 वर्षातील विमाधारक विमा मिळण्यास पात्र आहेत. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दि.05 मार्च, 2013 रोजीचे पत्रान्वये तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारला. त्यांचेतील त्रिपक्षीय करारा नुसार तक्रारकर्त्याने विम्या दाव्या सोबत आवश्यक असलेले दस्तऐवज दि.14 नोव्हेंबर, 2012 पूर्वी सादर करणे आवश्यक होते परंतु तक्रारकर्त्याने विहित मुदतीत दस्तऐवज सादर केले नाही त्यामुळे त्यांनी विमा दावा नामंजूर केला. त्यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही. तक्रारकर्त्याने विमा दावा नामंजूर केल्या नंतर दि.24.05.2013 रोजी शाळा सोडल्याचा दाखला तयार केल्याचे दिसून येते आणि सदर शाळा सोडल्याचा दाखला विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे सादर न करता सरळ प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष सादर केलेली आहे. तक्रारकर्ता हा विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र नसल्याने तक्रार खारीज व्हावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे करण्यात आली. 04. वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड यांनी त्यांचे लेखी उत्तर मंचा समक्ष सादर केले. त्यांचे असे म्हणणे आहे की, शेतक-यांचा विमा दावा विमा कंपनीकडे छाननी करुन पाठविण्यासाठी ते शासनाला विनामोबदला मदत करतात, यासाठी त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही. त्यामुळे विमा दाव्या संबधाने कोणतीही रक्कम देण्याची त्यांची कोणतीही कायदेशीर जबाबदारी नाही. आपल्या म्हणण्याचे समर्थनार्थ त्यांनी मा.महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग खंडपिठ औरंगाबाद यांनी प्रथम अपिल क्रं-1114/2008 विभाग प्रमूख कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रायव्हेट लिमिटेड –विरुध्द- श्रीमती सुशिला भीमराव सोनटक्के या प्रकरणात दि.16.03.2009 रोजी पारीत केलेल्या आदेशाची प्रत दाखल केली आहे. सदर आदेशा मध्ये वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड यांचे विरुध्द शेतक-यास अपघात विमा दाव्याची रक्कम देण्याची कोणतीही जबाबदारी येत नाही असे नमुद केलेले आहे. म्हणून वि.प.क्रं 2 विरुध्दची तक्रार खारीज करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. वि.प.क्रं-2 यांनी पुढे असे नमुद केले की, मृतक डोमाजी संतोषराव शोभणे गाव टाकळघाट, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर अपघात दि.25.06.2012 रोजी झाला. सदर प्रस्ताव हा जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी मार्फत कबाल नागपूर कार्यालयास दि.01.12.2012 रोजी प्राप्त
झाला, त्यानंतर सदर प्रस्ताव वि.प.क्रं 1 विमा कंपनीस दि.13.12.2012 रोजी पाठविला असता, वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दि.05.03.2013 रोजीचे पत्रान्वये मतदान ओळखपत्रा नुसार मृतक श्री डोमाजी संतोषराव शोभणे यांचे वय-77 वर्ष असून पॉलिसीमधील वयोमर्यादा 10 ते 75 वर्ष असल्याचे कारण नमुद करुन दावा नामंजूर केला व तसे वारसदारास कळविले. 05. विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, काटोल यांना न्यायमंचाचे मार्फतीने रजिस्टर्ड पोस्टाव्दारे पाठविलेली नोटीस दि.20.07.2013 रोजी मिळाल्याचा सिनिअर पोस्टमास्टर जी.पी.ओ. नागपूर यांचा अहवाल अभिलेखावर दाखल आहे. परंतु विरुध्दपक्ष क्रं 3 न्यायमंचा समक्ष उपस्थित न झाल्याने त्यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात दि.12.11.2013 रोजी मंचाने पारीत केला. 06 तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्रं 9 वरील यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात, ज्यामध्ये शेतकरी अपघात विमा योजना शासन निर्णय, वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा फेटाळल्याचे पत्र, विमा दावा प्रस्ताव, तक्रारकर्त्याच्या मृतक वडीलांचे नावाचा शेतीचा 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-8-अ उतारा प्रत, फेरफार पत्रक, तक्रारकर्त्याच्या वडीलांचे मृत्यू संबधाने घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, अंतिम अहवाल, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारकर्त्याचे वडीलांचे संबधाने शाळा सोडल्याचा दाखला व आधारकॉर्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका तसेच तक्रारकर्त्याचे भावाचे व बहिणीचे संमतीपत्रक इत्यादीचा समावेश आहे. तसेच तक्रारकर्त्याने दि.12/12/2013 रोजी प्रकरणात शपथपत्र दाखल केले. 07. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी उत्तरा सोबत अन्य दस्तऐवज सादर केले नाहीत. 08. वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस तर्फे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र, मा.राज्य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांचे निर्णयाची प्रत, वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे दावा फेटाळल्याचे पत्र अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. 09. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्यां तर्फे वकील श्री क्षिरसागर आणि वि.प.क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्री पाळधीकर यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. 11. तक्रारदार आणि विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी यांचे परस्पर विरोधी कथना वरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ घेण्यात आले. मुद्दा उत्तर (1) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने, तक्रारदाराचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?...................होय. (2) काय आदेश ?...................................................तक्रार अंशतः मंजूर. :: कारण मिमांसा व निष्कर्ष :: मुद्दा क्रं-1 व 2- 12. सदर प्रकरणातील दाखल पोलीस स्टेशन, नरखेड, जिल्हा नागपूर यांचे एफ.आय.आर.चे प्रतीवरुन दि.25.06.2012 रोजी मृतक विमाधारक शेतकरी डोमाजी शोभणे हे जगनाडे मंगल कार्यालया समोर सावरगाव येथे हजर असताना आरोपी यांनी काहीतरी कारणा वरुन हातबुक्की व काठीने व कोणत्यातरी वस्तुने तोंडावर डोक्यावर मारपीट करुन जख्मी केले व ते बेहोश आहेत असे नमुद आहे. तसेच गव्हरनमेंट मेडीकल कॉलेज, नागपूर यांचे दि.02.07.2012 रोजीचे शवविच्छेदन अहवाला वरुन मृतक विमाधारक शेतकरी श्री डोमाजी शोभणे यांचे मृत्यूचे कारण “ Complication of Head Injury” असे नमुद आहे. मृतकाचे मृत्यू प्रमाणपत्रा वरुन विमाधारकाचा मृत्यू दि.02.07.2012 रोजी झालेला आहे. प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजां वरुन तक्रारकर्त्याने त्याचे वडीलांचे मृत्यू संबधाने विमा दावा आवश्यक दस्तऐवजांसह तालुका कृषी अधिकारी, काटोल, जिल्हा नागपूर यांचेकडे दि.06.10.2012 रोजी सादर केल्याचे त्यावरील पोच वरुन दिसून येते. 13. या सर्व बाबी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने (“विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनी" म्हणजे दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड तर्फे डिव्हीजनल मॅनेजर, डिव्हीजनल ऑफीस मुंबई असे समजण्यात यावे) नामंजूर केलेल्या नाहीत. 14. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत त्याचे मृतक वडीलांचे नावाचा शेतीचा 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-8-अ उतारा प्रत, फेरफार पत्रक, तक्रारकर्त्याच्या वडीलांचे मृत्यू संबधाने घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, अंतिम अहवाल, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारकर्त्याचे वडीलांचे संबधाने शाळा सोडल्याचा दाखला व आधारकॉर्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका तसेच तक्रारकर्त्याचे भावाचे व बहिणीचे संमतीपत्रक दस्तऐवज सादर केलेले आहेत. 15. मृतक विमाधारक शेतकरी श्री डोमाजी संतोषराव शोभणे यांचा अपघाती मृत्यू, विमा दाव्या संबधी दाखल विमा प्रस्ताव या बाबी संबधाने उभय पक्षांमध्ये विवाद नाही. प्रस्तुत तक्रारीमधील विवाद अत्यंत संक्षीप्त स्वरुपाचा आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्तरा नुसार तक्रारकर्त्याने विमा दाव्या सोबत त्यांचे मृतक वडीलांचे वया संबधाने निवडणूक ओळखपत्राची प्रत सादर केली, त्यामध्ये त्यांचे जन्माचे वर्ष 1935 नमुद केलेले आहे आणि त्यावरुन मृतक विमाधारकाचे मृत्यू समयीचे वय-77 वर्ष होते. सदर शेतकरी अपघात विमा पॉलिसी नुसार वय-10 ते 75 वर्ष वयोगटातील विमाधारक विमा मिळण्यास पात्र आहेत. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दि.05 मार्च, 2013 रोजीचे पत्रान्वये तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारला. त्यांचेतील त्रिपक्षीय करारा नुसार तक्रारकर्त्याने विम्या दाव्या सोबत आवश्यक असलेले दस्तऐवज दि.14 नोव्हेंबर, 2012 पूर्वी सादर करणे आवश्यक होते परंतु तक्रारकर्त्याने विहित मुदतीत दस्तऐवज सादर केले नाही त्यामुळे त्यांनी विमा दावा नामंजूर केला. तक्रारकर्त्याने विमा दावा नामंजूर केल्या नंतर दि.24.05.2013 रोजी शाळा सोडल्याचा दाखला तयार केल्याचे दिसून येते. याउलट, तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने केवळ निवडणूक ओळखपत्रावरील वयाचे आधारा वरुन तक्रारकर्त्याचे वडीलांचा विमा दावा नामंजूर केला. वस्तुतः विरुध्दपक्ष विमा कंपनीस मृतकाचे शाळा सोडल्याचे दाखल्या वरुन मृतकाचे वयाची खात्री करता आली असती, दावा नामंजूर करण्यापूर्वी त्या संबधाने तक्रारकर्त्या कडून आवश्यक ते स्पष्टीकरण विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने मागविले नाही आणि सरळ विमा दावा नामंजूर केला आणि तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिली म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष सादर केली. 16. वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्तरा नुसार तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा दि.05.03.2013 रोजी विमा दावा नाकारल्या नंतर जरी मृतकाचे शाळा सोडल्याचे दाखल्याची प्रत दि.24.05.2013 रोजी जिल्हा परिषिद प्राथमिक शाळा, राजनी, पंचायत समिती, काटोल यांचे कडून प्राप्त केली असली तरी त्याने प्रस्तुत तक्रारीतील गुणवत्तेवर फारसा फरक पडू शकत नाही. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तरा नुसार तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विमा प्रस्ताव सादर करताना त्याच वेळी त्याचे मृतक वडीलांचे वया संबधाने शाळा सोडल्याचे दाखल्याची प्रत सादर करणे आवश्यक होते, तक्रारकर्त्याने विहित मुदतीत आवश्यक दस्तऐवज सादर न केल्यामुळे तक्रारकर्ता विमा दावा मिळण्यास पात्र नाही. या संदर्भात मंचाव्दारे स्पष्ट करण्यात येते की, विमा दावा प्रस्ताव सादर करते वेळी तक्रारकर्त्यास पॉलिसीतील वयाचे अटी संबधीची कल्पना नसावी. यामध्ये विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याचे वडीलांचे मृत्यू संबधाने विमा क्लेम निश्चीत करताना तक्रारकर्त्याकडे त्याच्या वडीलांचे वया संबधाने योग्य त्या पुराव्याची तशी लेखी मागणी करणे आवश्यक होते, परंतु तशी मागणी केल्याचे दिसून येत नाही. अशी मागणी केल्यानंतरही तक्रारकर्त्याने त्याचे मृतक वडील श्री डोमाजी शोभणे यांचे वया संबधीचे दस्तऐवज विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे सादर केले नसते तर त्या परिस्थितीत विमा दावा नामंजूर करणे उचित ठरले असते परंतु तक्रारकर्त्यास कोणतीही संधी न देता केवळ निवडणूक ओळखपत्राचे आधारावरुन व त्यावरील नोंदविलेले वय विचारात घेऊन तक्रारकर्त्याचा विमा दावा सरसकट नामंजूर करण्याची विरुध्दपक्ष विमा कंपनीची कृती निश्चीतच दोषपूर्ण सेवा ठरते असे मंचाचे मत आहे.
17. सन-2011-12 या वर्षासाठी शेतकरी अपघात विमा योजना ही दि.15 ऑगस्ट, 2011 ते 14 ऑगस्ट, 2012 या 01 वर्षाचे कालावधीसाठी होती. सदरच्या प्रकरणात मृतक विमाधारक शेतकरी श्री डोमाजी संतोषराव शोभणे यांचा मृत्यू त्यांचे मृत्यू प्रमाणपत्रावरुन दि.02.07.2012 रोजी विमा कालावधीत झालेला आहे. प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजां वरुन श्री डोमाजी संतोषराव शोभणे हे शेतकरी होते आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बाब
सिध्द होते. मृतक श्री डोमाजी संतोष शोभणे हे शेतकरी अपघात विमा योजना 2011-12 च्या कालावधीत मरण पावल्यामुळे त्यांचे वारसदार असलेले त्यांची मुले- अनुक्रमे-तक्रारदार श्री सतीश डोमाजी शोभणे, त्यांचे लहानभाऊ श्री युवराज डोमाजी शोभणे आणि मृतकाची विवाहित मुलगी सौ.सरोज रविंद्र बोबडे हे विमा दावा रक्कम मिळण्यासाठी पात्र आहेत परंतु श्री युवराज डोमाजी शोभणे आणि सौ.सरोज रविंद्र बोबडे यांनी विमा दाव्याची संपूर्ण रक्कम या प्रकरणातील तक्रारदार श्री सतिश डोमाजी शोभणे यांना देण्यास हरकत नसल्याचे संमतीपत्र लिहून दिलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता श्री सतिश डोमाजी शोभणे हे त्यांचे वडील श्री डोमाजी संतोषराव शोभणे यांचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी अपघात विमा रक्कम रुपये-1,00,000/- नुकसान भरपाई आणि त्यावर विमा प्रस्ताव नाकारल्याचे दिनांका पासून म्हणजे दि.05.03.2013 पासून द.सा.द.शे.9% दराने व्याज यासह वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडून रक्कम मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडून मिळण्यास पात्र आहे. विरुध्दपक्ष क्रं-2 व विरुध्दपक्ष क्रं-3 यांना प्रस्तुत तक्रारीतून मुक्त करण्यात येते. म्हणून मुद्दा क्रं 1 ते 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविलेले असून त्यावरुन प्रकरणात मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. ::आदेश:: तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यातयेते. 1) विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास त्यांचे वडीलांचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त ) दिनांक-05.03.2013 पासून रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्याजासह द्दावी. 2) तक्रारकर्त्यास तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच- हजार फक्त) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्यास द्दावेत. 3) विरुध्दपक्ष क्रं- 2 व क्रं-3 यांना सदर तक्रारीतून मुक्त करण्यात येते. 4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे.. 5) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |