::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्यक्ष ) (पारीत दिनांक– 22 जानेवारी, 2014) 1. तक्रारकर्ता क्रं-1 यांची पत्नी आणि तक्रारकर्ता क्रं-2 व 3 यांची आई हिचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्दपक्षा कडून विमा रक्कम मिळणेसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तुत तक्रार तक्रारदारानीं दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्यांचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे- तक्रारकर्ता क्रं-1 श्रीराम नथ्थुजी भोयर यांची पत्नी आणि तक्रारकर्ता क्रं-2 निखील श्रीराम भोयर आणि क्रं-3 आशिष श्रीराम भोयर यांची आई श्रीमती सुशिला श्रीराम भोयर यांचे मालकीचे मौजे एकलापार, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर येथे सर्व्हे नं.14 ही शेत जमीन आहे. श्रीमती सुशिला श्रीराम भोयर ही व्यवसायाने शेतकरी होती व सदर शेतीतील उत्पन्नावर तिचे कुटूंबाचे पालनपोषण करीत होती.
तक्रारकर्त्यांनी पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्दपक्ष क्रं-1 दि न्यु इंडीया एश्युरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीकडे, महाराष्ट्र शासना तर्फे विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, कळमेश्वर मार्फतीने शेतक-यांचा अपघाती विमा उतरविलेला आहे. विरुध्दपक्ष क्रं-2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड ही शेतक-यांचे अपघात विमा दाव्यांची छाननी करुन विमा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे सादर करण्यासाठी नियुक्त केलेली सल्लागार कंपनी आहे. तक्रारदार क्रं-1 ची पत्नी आणि तक्रारदार क्रं 2 व क्रं 3 ची आई श्रीमती सुशिला श्रीराम भोयर ही दि.27.02.2012 रोजी मुलाचे मोटरसायकलवर मागे बसून केळवद वरुन सुसुंद्री येथे येत असता कुत्रा मागे धावल्याने घाबरुन जाऊन मोटरसायकल वरुन खाली पडली व सदर अपघातात झालेल्या जबर दुखापतीमुळे मरण पावली. तक्रारकर्ता क्रं-1 ने श्रीमती सुशिला श्रीराम भोयर हिच्या अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे दि.19.06.2012 रोजी, विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिका-या मार्फत अर्ज सादर केला. सदर अर्जा सोबत आवश्यक सर्व दस्तऐवज जोडले असताना देखील विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दि.29.05.2013 रोजीचे पत्राव्दारे तक्रारकर्त्याने गाव नमुना-6 क, एफ.आय.आर. व इन्क्वेस्ट पंचनामा सादर केला नसल्याचे कारण दर्शवून विमा दावा फेटाळला. म्हणून तक्रारकर्ता क्रं-1 ते 3 यांनी प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली असून त्याव्दारे शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- विरुध्दपक्षाकडे विमा प्रस्ताव दाखल दिनांक-19.06.2012 पासून द.सा.द.शे.18% दराने व्याजासह मिळावी तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-20,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्षा कडून मिळावे अशा मागण्या केल्यात. 03. विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने मंचा समक्ष दि.25.11.2013 रोजी लेखी उत्तर दाखल करुन, तक्रारीस सक्त विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांचेकडे विमा दावा प्रस्ताव दि.12.12.2012 रोजी प्राप्त झाल्या नंतर त्याची छाननी केली असता विमा दाव्या सोबत तक्रारकर्त्याने आवश्यक
दस्तऐवज दाखल केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस यांनी, विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिका-यांकडे वारंवार पत्रव्यवहार करुन गाव नमुना-6-क, एफ.आय.आर. आणि इन्क्वेस्ट पंचनामा या दस्तऐवजांची पुर्तता करावी असे कळविले. तसेच या संदर्भात वि.प.क्रं-1 विमा कंपनीने, वि.प.क्रं-2 यांचेकडे दि.13.08.2012, 25.09.2012, 23.10.2012 आणि 05.11.2012 रोजी स्मरणपत्रे पाठवून वरील दस्तऐवजांची मागणी केली. शेवटी दि.26.12.2012 रोजी वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारदारास पत्र पाठवून कळविले की, वारंवार मागणी करुनही दस्तऐवजांची पुर्तता केलेली नाही म्हणून दि.29 मे, 2013 रोजी तक्रारकर्त्याचां विमा दावा नामंजूर केला. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, त्रिपक्षीय करारा प्रमाणे तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे आवश्यक सर्व दस्तऐवजांसह विमा दावा दि.14 नोव्हेंबर 2012 पूर्वी सादर करावयास हवा होता. परंतु तक्रारकर्त्याने विहित मुदतीत दस्तऐवजांची पुर्तता केली नाही, त्यामुळे सदरचा विमा दावा मुदतबाहय असल्याने चालू शकत नाही. म्हणून वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केला ही त्यांची कृती कायदेशीर आहे. विमा कंपनीकडून सेवेत कोणताही न्युनतापूर्ण व्यवहार घडला नसल्याने तक्रार खारीज करावी, अशी विनंती वि.प.क्रं 1 विमा कंपनीने केली. 04. वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड यांनी त्यांचे लेखी उत्तर निशाणी क्रं-8 प्रमाणे दाखल केले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, शेतक-यांचा विमा दावा विमा कंपनीकडे छाननी करुन पाठविण्यासाठी ते शासनाला विनामोबदला मदत करतात, यासाठी त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही. त्यामुळे विमा दाव्या संबधाने कोणतीही रक्कम देण्याची त्यांची कोणतीही कायदेशीर जबाबदारी नाही. आपल्या म्हणण्याचे समर्थनार्थ त्यांनी मा.महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग खंडपिठ औरंगाबाद यांनी प्रथम अपिल क्रं-1114/2008 विभाग प्रमूख कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रायव्हेट लिमिटेड –विरुध्द- श्रीमती सुशिला भीमराव सोनटक्के या प्रकरणात दि.16.03.2009 रोजी पारीत केलेल्या आदेशाची प्रत दाखल केली आहे. सदर आदेशा मध्ये वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड यांचे विरुध्द शेतक-यास अपघात विमा दाव्याची रक्कम देण्याची कोणतीही जबाबदारी येत नाही असे नमुद केलेले आहे. म्हणून वि.प.क्रं 2 विरुध्दची तक्रार खारीज करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. 05. विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, कळमेश्वर यांनी निशाणी क्रं 10 प्रमाणे निवेदन दाखल केले असून त्यात शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारदार श्री नथ्थूजी श्रीराम भोयर यांनी त्यांचे पत्नीचे अपघाती निधना संबधाने विमा दावा दि.19.06.2012 रोजी त्यांचे कार्यालयात सादर केला व सदर विमा दावा संपूर्ण दस्तऐवजांची पुर्तता करुन, अधिक्षक, कृषी अधिकारी, नागपूर यांना जावक क्रं-1173, दि.06.07.2013 प्रमाणे सादर केला असल्याचे नमुद केले असून विमा दावा प्रस्तावाची झेरॉक्स प्रत निवेदना सोबत जोडली आहे. 06 तक्रारकर्त्यांनी निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात, ज्यामध्ये शेतकरी अपघात विमा योजना शासन निर्णय, वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा फेटाळल्याचे पत्र, विमा दावा प्रस्ताव, तक्रारकर्तीचे मृतक पत्नीचे नावाचा शेतीचा 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-8-अ उतारा प्रत, फेरफार पत्रक, गाव नमुना-6-क, तक्रारकर्तीचे पत्नीचे अपघाती मृत्यू संबधाने आकस्मीक मृत्यू खबर, मरणान्वेषण इतिवृत्त, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र इत्यादीचा समावेश आहे. तसेच तक्रारकर्तीने दि.12/12/2013 रोजी प्रकरणात शपथपत्र दाखल केले. 07. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा फेटाळल्याचे पत्र, तक्रारकर्त्यास पाठविलेले दि.26.12.2012 चे पत्र, विमा दावा त्रृटी पुर्तते संबधाने विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी वि.प.क्रं-3 यांचेकडे दि.31.07.2012, दि.13.08.2012,दि.25.09.2012, दि.23.10.2012, दि.05.11.2012 रोजी केलेला पत्रव्यवहाराच्या प्रती दाखल केल्यात. वि.प.क्रं 1 ने त्यांचा लेखी जबाब हाच लेखी युक्तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली. 08. वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस तर्फे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र, मा.राज्य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांचे निर्णयाची प्रत, वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे दावा फेटाळल्याचे पत्र अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. 09. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी तक्रारकर्त्याचा विमा प्रस्ताव व त्या सोबतचे दस्तावेज अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. 10. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्यां तर्फे वकील श्री क्षिरसागर आणि वि.प.क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्री पाळधीकर यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. 11. तक्रारदार आणि विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी यांचे परस्पर विरोधी कथना वरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ घेण्यात आले. मुद्दा उत्तर (1) तक्रारदाराने वि.प.क्रं 1 विमा कंपनी कडे दाखल केलेला विमा दावा मुदतबाहय आहे काय? ...............................नाही. (2) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने, तक्रारदाराचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?................... होय. (3) तक्रारदार मागणी प्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय?.................................अंशतः (4) काय आदेश?......................................................तक्रार अंशतः मंजूर. :: कारण मिमांसा व निष्कर्ष :: मुद्दा क्रं-1 ते 4- 12. सदर प्रकरणात तक्रारदार क्रं-1 ची पत्नी आणि तक्रारदार क्रं-2 व क्रं-3 ची आई श्रीमती सुशिला श्रीराम भोयर ही दि.27.02.2012 रोजी मुलाचे मोटरसायकलवर बसून जात असताना कुत्रा मागे धावल्याने घाबरुन जाऊन खाली पडून झालेल्या दुखापतीत मरण पावली, ही बाब विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने (“विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनी" म्हणजे दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड तर्फे डिव्हीजनल मॅनेजर, डिव्हीजनल ऑफीस मुंबई असे समजण्यात यावे) नामंजूर केलेली नाही. याशिवाय तक्रारदारांनी आकस्मीक मृत्यूची खबर पान क्रं 30 वर दाखल केली आहे. त्यात नमुद केले आहे की, मृतक नामे श्रीमती सुशिला श्रीराम भोयर, रा.सुसुंद्री ही दि.27.02.2012 रोजी सकाळी 08.00 वाजताचे सुमारास मुलगा आशिष याचे मोटरसायकलवर बसून
केळवद वरुन सुसुंद्री येथे जात असताना मोहपा जवळ अचानक कुत्रा मोटर-सायकलचे मागे धावल्याने घाबरुन जाऊन गाडी वरुन पडल्याने जबर मार
लागल्याने तिला उपचारासाठी प्रथम मोहपा येथे व नंतर नागपूर मेडीकल कॉलेज मध्ये नेले असता सी.एम.ओ. डॉ.चौधरी यांनी तिला मृत घोषीत केले. तसेच शवविच्छेदन अहवाल पान क्रं 36 वर असून त्यात श्रीमती सुशिला श्रीराम भोयर हिचा मृत्यू “ Head injury associated with injury to spine and spinal cord” यामुळे झाल्याचे मत नोंदविलेले आहे. यावरुन श्रीमती सुशिला श्रीराम भोयर हिचा मृत्यू अपघातामुळे झाल्याची बाब सिध्द होते.
13. सन-2011-12 या वर्षासाठी शेतकरी अपघात विमा योजना ही दि.15 ऑगस्ट, 2011 ते 14 ऑगस्ट, 2012 या 01 वर्षाचे कालावधीसाठी होती. सदरच्या प्रकरणात दि.27.02.2012 रोजी झालेल्या अपघाती मृत्यू बाबतचा विमादावा तक्रारकत्याने कृषी अधिकारी यांचेकडे दि.19.06.2012 रोजी आवश्यक कागदपत्रांसह दाखल केल्याचे वि.प.क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांचे निशाणी क्रं 10 वरील निवेदना मध्ये नमुद केले आहे. म्हणजेच सदरचा विमा दावा हा सन-2011-12 वर्षाच्या विमा कालावधीत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे दाखल झालेला आहे, असे महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णय क्रं-शेअवि-2011/प्र.क्रं 94/11-ए, मंत्रालय, मुंबई दि.08 ऑगस्ट, 2011 च्या परिच्छेद क्रं-7 प्रमाणे समजावयाचे आहे. सदरचा विमा दावा हा महाराष्ट्र शासनाचे परिपत्रका नुसार मुदतीत दाखल केला असल्याने तो मुदतबाहय आहे, हा विरुध्दपक्ष विमा कंपनीचा आक्षेप गैरलागू आहे.
14. विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीचे असेही म्हणणे आहे की, तक्रारदाराने विहित मुदतीत म्हणजे दि.14 नोव्हेंबर, 2012 पर्यंत विम्या दाव्या सोबत आवश्यक असेलेले दस्तऐवज दाखल केले नाहीत. सदरचे प्रकरणातील अपघात हा कुत्रा मोटर-सायकलचे मागे धावल्याने झालेला आहे म्हणून त्या बाबत गुन्हयाची प्रथम खबरी (F.I.R.) नोंदविण्यात आलेली नाही. सदर प्रकरणात शवविच्छेदन अहवाल तसेच आकस्मीक मृत्यू खबरी आणि घटनास्थळ पंचनामा हे महत्वाचे व आवश्यक दस्तऐवज दाखल
केलेले आहेत आणि त्यावरुन श्रीमती सुशिला श्रीराम भोयर यांचा अपघाताने मृत्यू झाल्याची बाब निर्विवाद सिध्द होते. विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी यांनी दाखल केलेल्या विमा प्रस्तावाचे सत्यप्रतीवरुन तक्रारकर्त्याने विमा प्रस्तावा सोबत- 7/12 चा उतारा, गाव नमुना-6-ड, गाव नमुना-6-क, तलाठी प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, वयाचा पुरावा, मृत्यू दाखला, घटनास्थळ पंचनामा, शिधापत्रिकेची प्रत आणि बँकेचे खाते पुस्तकाची प्रत असे दस्तऐवज सादर केले होते, हे दिसून येते. अशी स्थिती असताना, विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने, तक्रारदाराने गाव नमुना-6-क, एफ.आय.आर. आणि इन्क्वेस्ट पंचनामा दाखल केला नाही म्हणून तक्रारदाराचा विमा दावा नाकारण्याची कृती ही विमा ग्राहका प्रती सेवेतील न्युनतापूर्ण व्यवहार आहे.
15. सदर प्रकरणात मृतक श्रीमती सुशिला श्रीराम भोयर ही शेतकरी असल्या बाबत फेरफाराची नोंदवही नक्कल पान क्रं 27 वर दाखल केली आहे. त्यात तिने नथ्थू पुंडलीक वाकडे यांचे कडून मौजा एकलपार येथील शेत सर्व्हे नं.14, आराजी-1.00 हेक्टर ही शेत जमीन विकत घेतल्याने दि.16.04.2004 रोजी फेरफार क्रं 116 घेण्यात आला व तो दि.06.05.2004 रोजी प्रमाणित करण्यात आल्याचे दिसून येते. तसेच गाव नमुना-8-अ पान क्रं-26 प्रमाणे श्रीमती सुशिला श्रीराम भोयर हिचे नावाने सदर शेतजमीन नोंदली असून सदर शेत जमीनीचा 7/12 पान क्रं 25 वर दाखल केला आहे.
16. वरील सर्व दस्तऐवजां वरुन श्रीमती सुशिला श्रीराम भोयर ही शेतकरी होती हे सिध्द होते. ती शेतकरी अपघात विमा योजना 2011-12 च्या कालावधीत मरण पावल्यामुळे तिचे वारसदार असलेले तक्रारदार क्रं 1 ते 3 हे वि.प.क्रं-1 विमा कंपनी कडून शेतकरी अपघत विमा योजने अंतर्गत रुपये-1,00,000/- नुकसान भरपाई आणि त्यावर विमा प्रस्ताव नाकारल्याचे दिनांका पासून म्हणजे दि.29.05.2013 पासून द.सा.द.शे.12% दराने व्याज यासह मिळण्यास पात्र आहेत. या शिवाय विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा चुकीचे कारण दर्शवून नाकारल्यामुळे तक्रारदार यांना
झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रुपये-5000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-3000/- मिळण्यास पात्र आहेत. म्हणून मुद्दा क्रं 1 ते 4 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविलेले असून प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. ::आदेश:: तक्रारदार क्रं-1 ते 3 यांची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते. 1) विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार क्रं-1 ते 3 यांना अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त ) दिनांक-29.05.2013 पासून रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह द्दावी. 2) तक्रारदार क्रं-1 ते 3 यांना झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारदारानां द्दावेत. 3) विरुध्दपक्ष क्रं- 2 व क्रं-3 यांना सदर तक्रारीतून मुक्त करण्यात येते. 4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे.. 5) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |