तक्रारदार स्वत: हजर.
जाबदेणार गैरहजर (एकतर्फा)
द्वारा मा. श्रीमती. गीता. एस. घाटगे, सदस्य
** निकालपत्र **
(14/02/2014)
तक्रारदारांनी जाबदेणारांविरुद्ध सदरहू तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अंतर्गत केलेली असून त्याबाबतची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे:
1] तक्रारदारांना त्यांच्या घरातील ढेकुण, झुरळे, पाल व अन्य कीटके यांचा बंदोबस्त करण्यासाठी पेस्ट कंट्रोल करुन घेण्याची आवश्यकता होती. ऑगस्ट 2012 मध्ये एका दैनिकातील पेस्ट कंट्रोलबाबतची जाबदेणारांची जाहीरात पाहून, तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेबरोबर संपर्क साधला. जाबदेणारांकडून पेस्ट कोंट्रोल करुन घेण्याचे ठरवून तक्रारदारांनी जाबदेणारांना त्यांच्याच मागणीप्रमाणे पेस्ट कोंट्रोल पोटी रक्कम रु.1,000/- अदा केले. त्याची पावती जाबदेणारांनी तक्रारदार यांना दिली. जाबदेणार यांनी या पेस्ट कोंट्रोलची सहा महिन्यांची तोंडी हमी (गॅरंटी) तक्रारदारांना दिली. तथापी, पेस्ट कोंट्रोलची प्रक्रिया झाल्यानंतर 3-4 दिवसांपासून पुन: झुरळे व ढेकुण दिसायला लागले व त्यानंतर त्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले, असे तक्रारदारांचे कथन आहे. ही बाब तक्रारदारांनी जाबदेणारांना वारंवार कळविली, त्यावर जाबदेणार यांनी त्यांचा कामगार पुन्हा पाठवितो असे सांगूनही व तक्रारदारांनी जाबदेणारांना जवळ-जवळ दोन महिने अनेक वेळा विनंत्या करुनही प्रत्यक्षात त्यांचा कामगार तक्रारदारांकडे पाठविला नाही. तरीदेखील तक्रारदारांनी पुन्हा-पुन्हा जाबदेणारांशी फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता जाबदेणारांकडून तक्रारदारांचा फोनही उचलण्यात आला नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांना योग्य सेवा देण्यात कसुर केली असल्याने तक्रारदारांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले व जाबदेणारांचा कामगार येत असल्याच्या खोट्या आश्वासनामुळे त्याची वाट बघण्यात तक्रारदारांचा वेळ वाया गेला व त्याचा परिणाम त्यांच्या दवाखान्यावरही झाला. त्यामुळे तक्रारदारांना सदरहू तक्रार अर्ज जाबदेणारांचेविरुद्ध दाखल करावा लागला, असे कथन तक्रारदारांनी तक्रार अर्जात केलेले आहे व जाबदेणारांनी तक्रारदारांकडून पेस्ट कोंट्रोलसाठी घेतलेली रक्कम
रु.1,000/- परत मिळावी व जाबदेणारांनी केलेल्या फसवणुकीमुळे त्यांचे जे आर्थिक नुकसान झाले त्याकरीता व मानसिक त्रासाकरिता म्हणून एकुण रक्कम रु.30,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाच्या पुष्ठ्यर्थ तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
2] मंचाची नोटीस बजावणी जाबदेणारांचेवर होवूनही ते प्रस्तुत प्रकरणी हजर न झाल्याने त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश करणेत आला.
3] तक्रारदारांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र दाखल कागदपत्रे यांचे साकल्याने अवलोकन करता मंचास असे दिसून येते की, जाबदेणारांनी झुरळे, ढेकुण, पाली व अन्य कीटकांच्या बंदोबस्तासाठी जाहीरात दिली होती. त्या जाहीरातीची प्रत तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली आहे. त्यानंतर मंचाच्या आणखी एक बाब निदर्शनास आली, ती म्हणजे पेस्ट कोंट्रोलसाठी रक्कम रु.1,000/- दिल्याबाबतची जी पावती दाखल केलेली आहे ती “Promise Pest Control” या नावाची आहे. तर तक्रार अर्ज हा “देशपांडे पेस्ट कोंट्रोल” यांचेविरुद्ध आहे. त्याचप्रमाणे मुळ पावती ही तक्रारदारांकडून गहाळ झाल्याने तिची प्रमाणित प्रत दाखल करत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र तक्रारदारांनी दाखल केलेले आहे. तथापी, जाबदेणारांनी त्यांना संधी असूनही प्रस्तुत प्रकरणी हजर होवून याबाबत कोणताही आक्षेप घेतलेला नाही. याचा विचार करता तक्रारदारांनी जाबदेणारांना पेस्ट कोंट्रोलसाठी रक्कम रु.1,000/- दिले होते, ही बाब शाबीत होते असा मंचाचा निष्कर्ष निघतो.
4] तक्रारदारांनी पुढे अशीही तक्रार केली आहे की, पेस्ट कोंट्रोल केल्यानंतर झुरळ व ढेकणांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढू लागली. याबाबत जाबदेणारांना जवळॅ-जवळ दोन महिने वारंवार कल्पना देऊनही त्यांनी त्याची दाद घेतली नाही. म्हणून तक्रारदारांना मन:स्ताप झाला आणि त्यांचे आर्थिक नुकसान झाले. तक्रारदारांच्या या तक्रारीच्या अनुषंगे तक्रार अर्जाचे व शपथपत्रचे अवलोकन करता, ज्या अर्थी तक्रारदारंच्या घरी पेस्ट कोंट्रोल करण्यात आल्यानंतर झुरळे व ढेकणांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली, त्या अर्थी पेस्ट कोंट्रोलची प्रक्रिया ही यशस्वी झालेली नाही, हे मंचापुढे स्पष्ट होते. आणि त्यानंतरही याबाबतची कल्पना देवूनही जाबदेणारांनी त्याची दखल घेतली नाही, हे मंचास दिसून येते. जाबदेणारांनी तक्रारदारांच्या कोणत्याही तक्रारीचे खंडन प्रस्तुत प्रकरणी हजर होवून केलेले नाही. यावरुन जाबदेणारांनी तक्रारदारांना सदोष, त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे प्रस्तुत प्रकरणी सिद्ध होते, असा मंचाचा निष्कर्ष निघतो आणि म्हणून तक्रारदारांनी जाबदेणारंकडे पेस्ट कोंट्रोलसाठी जमा केलेले रक्कम रु. 1000/- त्यांना परत करण्याचे व तक्रारदारांना झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु. 500/- अदा करण्याचे आदेश जाबदेणारांना देण्यात येतात. सबब, मंचाचा आदेश की,
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी, त्यांनी तक्रारदार यांचेकडून
घेतलेली रक्कम रु.1,000/-(रु. एक हजर फक्त)
व मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.5,00/-
(रु. पाचशे फक्त) तक्रारदारांना या आदेशाची प्रत
मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्य आंत द्यावी.
3. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
4. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी
आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या
आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन
जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 14/फेब्रु./2014