(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर पी. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 10 जून 2016)
1. ही तक्रार तक्रारकर्त्याचे दोषपूर्ण वाहना ऐवजी नवीन वाहन ऑटो डिलरने बदलवून न दिल्यामुळे केली आहे.
2. तक्रार थोडक्यात अशाप्रकारे आहे की, विरुध्दपक्ष क्र.1 हे हिरो होंडा मोटार-सायकलचे अधिकृत विक्रेते असून, विरुध्दपक्ष क्र.2 हे त्या वाहन कंपनीचे कस्टमर सर्विसेस हेड आहेत. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 कडून दिनांक 26.12.2011 ला हिरो होंडा CBZ- Xtreme ही मोटारसायकल विकत घेतली, तिचा रजिस्ट्रेशन नं.MH 31 DY 2536 असा आहे. काही दिवस गाडी चालविल्यानंतर त्याचे इंजीनमध्ये आवाज येऊ लागला, ही बाब विरुध्दपक्ष क्र.1 च्या निदर्शनास आणून देण्यात आली, परंतु, गाडीतील दोष दूर झाला नाही. तसेच त्या गाडीचे स्पेअर पार्टस् उपलब्ध नसल्याने दोष दूर करण्याची असमर्थता विरुध्दपक्ष क्र.1 ने दाखविली. त्यानंतरही 3-4 वेळा तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 कडे गाडीतील दोष दूर करण्यासाठी म्हटले, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी ही गाडी विरुध्दपक्ष क्र.1 ने स्वतःच्या ताब्यात घेतली व 15 दिवसानंतर तक्रारकर्त्याचे स्वाधीन केले व त्याला सांगितले की, गाडीतील दोष काढण्यात आला आहे. परंतु, एक आठवडयानंतर पुन्हा इंजीनमधून आवाज येणे सुरु झाले. दिनांक 30.11.2012 ला ती गाडी तिस-या सर्विसींगसाठी विरुध्दपक्ष क्र.1 कडे देण्यात आली, त्यावेळी इंजीनामधील आवाज मोठ्या प्रमाणावर येत होता. तक्रारकर्त्याला सांगण्यात आले की, सायकांळ पर्यंत सर्विसींग व दुरुस्ती पूर्ण होईल, परंतु जेंव्हा तक्रारकर्ता गाडी घेण्यास गेला त्यावेळी लक्षात आले की, गाडीतील दोष दूर झालेला नव्हता, म्हणून त्याने गाडीचा ताबा घेतला नाही. त्यानंतर, दिनांक 5.12.2012 ला तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 च्या शोरुम मध्ये जावून येथील अधिकृत व्यक्तीला गाडीमध्ये असलेला दोष सांगितला व विनंती केली की, त्या ऐवजी नवीन गाडी बदलवून देण्यात यावी. परंतु, ती त्याची विनंती अमान्य करण्यात आली व त्याला त्याची गाडी घेवून जाण्यास सांगण्यात आले. दिनांक 10.12.2012 ला हिरो होंडा कंपनपीचे सर्विसींग इंजिनीअरने तक्रारकर्त्याची गाडी त्याचे घरी आणली व त्याला सांगण्यात आले की, त्याची गाडी पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे. परंतु, इंजीनमधील आवाज कमी झालेला नव्हता, म्हणून सर्विस इंजिनियरने गाडी पुन्हा आपल्या सोबत नेली. ज्यावेळी असे लक्षात आले की, पूर्वीपासून गाडीमध्ये निर्मीती दोष होता व तो दूर होण्याचे पलिकडे होता अशावेळी विरुध्दपक्षाने त्याऐवजी नवीन गाडी बदलवून द्यावयास हवी होती, तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षाकडे ब-याचदा पञव्यवहार करुन दोषपूर्ण गाडी बदलवून नवीन गाडीची मागणी केली, परंतु ती मान्य न झाल्यामुळे या तक्रारीव्दारे त्याने दोषपूर्ण गाडी ऐवजी नवीन गाडी देण्यासाठी, तसेच झालेल्या ञासाबद्दल रुपये 25,000/- व खर्च विरुध्दपक्षाने द्यावा अशी विनंती केली आहे.
3. मंचाची नोटीस मिळून दोन्ही पक्ष हजर झाले व त्यांनी निशाणी क्र.7 खाली संयुक्त लेखी जबाब दाखल केला. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून वरील वर्णणाची मोटारसायकल विकत घेतली हे कबूल करुन पुढे असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने ही गाडी पहिल्या सर्विसींगसाठी विरुध्दपक्ष क्र.1 कडे दिली नव्हती, त्याने दिनांक 26.12.2012 पर्यंत ही गाडी 5351 कि.मी. चालविली होती. तसेच इंजिनातून येणा-या आवाजामुळे जर गाडीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नसेल तर अशावेळी वॉरंटीचा लाभ मिळत नाही. ज्याअर्थी तक्रारकर्त्याने 5000 कि.मी. च्या वर गाडी चालविली, त्याअर्थी गाडीच्या कार्यक्षमतेमध्ये काही दोष नव्हता. गाडीचा वॉरंटीकाळ संपेपर्यंत तक्रारकर्त्याने त्या गाडीचा ताबा घेतला नाही, ती गाडी चांगल्या स्थितीत होती त्यामध्ये कोणताही निर्मीती दोष नव्हता, ती दुस-या सर्विसींगसाठी विरुध्दपक्ष क्र.1 कडे देण्यात आली होती त्यावेळी गाडीतील कुठलाही दोष होता असा तक्रारकर्त्याने सांगितले नव्हते. दिनांक 26.12.2012 पर्यंत गाडीतील येणा-या इंजिनातील आवाजाबद्दल तक्रार विरुध्दपक्षाकडे करण्यात आली नाही. विरुध्दपक्षाने हे मान्य केले आहे की, दिनांक 5.12.2012 ला तक्रारकर्त्याने ही गाडी बदलवून नवीन गाडीची मागणी केली होती, परंतु ती मागणी बेकायदेशिर होती. तसेच त्या गाडीवर वाहन कर्ज काढण्यात आले होते व ही गाडी कर्ज देणा-या कंपनीकडे Hypothecated होती. त्या गाडीचे कर्जाचे हप्ते नियमीत फेडण्यात आलेले आहे किंवा नाही याची माहिती दिलेली नाही. तसेच गाडीतील एखाद्या भागात काही दोष असेल तेंव्हा त्या कारणावरुन नवीन गाडी मागता येत नाही. सबब, ही तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
4. दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
5. पहिला मुद्दा असा उपस्थित होतो की, तक्रारकर्त्याने त्याचे गाडीत निर्मीती दोष होता हे सिध्द केले आहे काय ? या मुद्यावर त्याची तक्रार व शपथपञ याशिवाय इतर पुरावा आलेला नाही. त्याने ही गाडी व्हेईकल एक्सपर्ट कडून तपासून घेतलेली नाही. असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने केवळ तोंडी तक्रार विरुध्दपक्षाला केली होती. परंतु सर्वात प्रथम लेखी तक्रार दिनांक 11.12.2012 ला केली म्हणजेच गाडी विकत घेतल्यापासून जवळपास एक वर्षानंतर त्याने विरुध्दपक्षाकडे गाडीतील दोषा विषयी लिखीत स्वरुपात पहिल्यांदा तक्रार केली. विरुध्दपक्षानी हे पूर्णपणे नाकबूल केले आहे की, त्यापूर्वी तक्रारकर्त्याने वारंवार गाडीतील दोषा विषयी तोंडी सांगितले. तक्रारकर्त्याने ती गाडी पहिल्या सर्विसींगसाठी विरुध्दपक्षाकडे दिली होती हे दाखविण्यास कुठलाही दसताऐवज समोर आलेला नाही. कारण ती गाडी दिली असती तर गाडीतील दोषाबद्दल जॉबकार्ड मध्ये उल्लेख आला असता.
6. जरी असे गृहीत धरले की, तक्रारकर्त्याने दिनांक 11.12.2012 पूर्वी गाडीतील दोषाबद्दल विरुध्दपक्षाला सांगितले होते, परंतु विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला वेळोवेळी दिलेल्या पञावरुन असे दिसते की, गाडीतील दोष दूर करण्यात आला होता आणि तक्रारकर्त्याला ती गाडी घेवून जाण्यास विनंती करण्यात आली होती. परंतु त्याने गाडीचा ताबा घेतला नाही. यासंबंधी विरुध्दपक्ष क्र.1 चे दिनांक 18.12..2012, 25.12.2012, 31.12.2012, 3.1.2013, 7.1.2013 च्या पञाच्या प्रती तक्रारकर्त्याने स्वतः दाखल केलेल्या आहेत, परंतु एकाही पञाचे उत्तर तक्रारकर्त्याने दिलेला नाही. यावरुन असे म्हणता येईल की, विरुध्दपक्ष म्हणतात त्याप्रमाणे गाडीत दोष नव्हता, परंतु काही कारणास्तव तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 कडून ती परत आणली नाही. तक्रारकर्त्याकडून कमीत-कमी ऐवढे अपेक्षित होते की, त्याने गाडी आणून त्याची ट्रायल घेवून त्यातील दोषाचे निवारण झाले आहे किंवा नाही याची खाञी करुन घ्यावयाची होती. परंतु, तसे न करता गाडीत अजूनही दोष आहे असे तो कोणत्या आधारे म्हणतो हे समजून येत नाही.
7. विरुध्दपक्षाच्या वकीलांनी आपल्या युक्तीवादात असे सांगितले आहे की, एखाद्या वाहनाचा कुठलाही भाग दोषपूर्ण असेल तर तेवढयासाठी संपूर्ण वाहन बदलवून नवीन वाहन मागता येत नाही, जास्तीत-जास्त दोषपूर्ण भाग बदलवून देता येऊ शकतो. परंतु, त्यासाठी प्रथम हे सिध्द करणे जरुरी असते की, वाहनामध्ये कुठला निर्मीती दोष आहे. असे दिसते की, तक्रारकर्त्याने स्वतःहून असे ठरवले की, त्याचे गाडीमध्ये पूर्वीपासून निर्मीती दोष होता. परंतु, त्यासाठी पुरक असा पुरावा त्यान दाखल केला नाही. ज्यावेळी विरुध्दपक्षाने त्याला लिहून कळविले होते की, त्याची गाडी व्यवस्थित केली गेली असून त्याने ती घेवून जावी, तेंव्हा तक्रारकर्त्याने ती गाडी घेवून चालवून त्यात असलेला दोष दूर केला गेला आहे किंवा नाही याची चाचणी करणे अपेक्षित होते, परंतु त्याने तसे काहीही न करता विरुध्दपक्षावर सेवेतील कमतरता आहे म्हणून ठपका ठेवला. परंतु, खरे पाहता विरुध्दपक्षाच्या सेवेत कुठलिही कमतरता दिसून येत नाही. तक्रारकर्त्याचे वकीलांनी ‘’अभयकुमार पांडा –वि.- मे.बजाज ऑटो लि., I (1992) CPJ 88 (NC)’’ या न्यायनिवाड्याचा आधार घेतला. परंतु त्याप्रकरणात विरुध्दपक्षाने हे कबूल केले होते की, गाडीची चेसीस दोषपूर्ण असून ती बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे ती गाडी बदलवून नवीन गाडी देण्याचा आदेश देण्यात आला होता. ‘’जयदेव प्रसाद सिंग –वि.- ऑटो ट्रॅक्टर लि., I (1991)CPJ-34 (NC)’’ या प्रकरणात मुद्दा वेगळा व असा होता की, तक्रारकर्त्याने जरी त्याला निश्चित किंती नुकसान झाले याबद्दल पुरावा दाखल केलेला नसला तरी त्याला नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार आहे किंवा नाही, त्याकरीता वस्तुस्थिती व पुराव्यावरुन असे ठरविण्यात आले की, त्याला दिलेल्या दोषपूर्ण ट्रॅक्टरमुळे काही नुकसान निश्चित झाले असावे आणि जर विरुध्दपक्ष गाडीतील दोष दूर करण्यास अपयशी ठरला तर तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई निश्चितच मिळावयास हवी. वरील दोन्ही न्यायनिवाडे तक्रारकर्त्याच्या युक्तीवादाला आधार देत नाही कारण त्यातील वस्तुस्थिती वेगळी होती.
8. तक्रारकर्त्याने केलेले विरुध्दपक्षावरील आरोप निराधार असल्याचे दिसून येते. त्यामुळे ही तक्रार मंजूर होण्या लायक नाही. सबब, खालील प्रमाणे आदेश देण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षकारांनी आप-आपला तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- .10/06/2016