::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-08 फेब्रुवारी, 2017)
01. तक्रारकर्ता कंपनी तर्फे व्यवस्थापकाने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी विरुध्द विमाकृत सामानाच्या नुकसानीची भरपाई न दिल्याचे कारणा वरुन मंचा समक्ष दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता मे. नाईस पेपर लिमिटेड नावाची नोंदणीकृत कंपनी असून ती क्रॉफ्ट पेपर्सचे उत्पादन करते आणि ग्राहकानां त्यांचे मागणी नुसार उत्पादन पुरवित असते. तक्रारकर्त्या कंपनीने विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मरीन क्लेम पॉलिसीचा विमा काढलेला असून, त्याव्दारे वाहतुकी दरम्यान झालेल्या मालाच्या नुकसानीची भरपाई देण्याची त्यात तरतुद केलेली आहे. सदर विम्या अंतर्गत रुपये-3,03,834/- रकमेचा क्वॉलिटी पॅकिंगसाठी व रुपये-75,305/- रकमेचा टाईम पॅकेजिंगसाठी विमा काढण्यात आला होता. दिनांक-02/06/2011 ला तक्रारकर्त्या कंपनीने क्वॉलिटी पॅकींग औरंगाबाद आणि टाईम पॅकेजिंग औरंगाबाद यांना क्रॉफ्ट पेपर्स क्रिष्णा रोडलाईन्स, नागपूर यांचे ट्रक व्दारे पाठविलेत. ट्रक मधील संपूर्ण माल हा ताडपत्रीने झाकलेला होता. ट्रक जेंव्हा औरंगाबादचे हद्दीत पोहचला त्यावेळी जोरदार पाऊस पडल्यामुळे पावसाचे पाणी ताडपत्रीचे आतून झिरपले आणि त्यामुळे काही माल क्षतीग्रस्त झाला. क्वॉलिटी पॅकेजिंग, औरंगाबादला पाठविलेल्या मालापैकी रुपये-40,258/- एवढया रकमेचा माल आणि टाईम पॅकेजिंग, औरंगाबादला पाठविलेल्या मालापैकी रुपये-17,550/- एवढया रकमेचा माल क्षतीग्रस्त झाला होता. या प्रमाणे एकूण रुपये-57,808/- एवढया रकमेचे नुकसान झाले. दिनांक-17.10.2011 रोजी तक्रारकर्त्या कंपनी तर्फे विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विमा दावा नुकसान भरपाईसाठी दाखल करण्यात आला परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्यांचे दिनांक-06.01.2012 चे पत्रान्वये तो दावा खराब ताडपत्रीचा वापर केल्याचे कारणा वरुन खारीज केला. या उलट सर्व्हेअरचे अहवाला नुसार
कमी ताडपत्री वापरल्यामुळे नुकसान झाल्याचे नमुद आहे. त्यामुळे तक्रारकर्त्या कंपनी तर्फे विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विमा दावा खारीज निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करण्यात आली होती परंतु त्या अर्जावर विरुध्दपक्ष विमा कंपनीने निर्णय दिला नाही. ज्या कारणास्तव विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दावा फेटाळला ते कारण योग्य व पुरेसे नव्हते आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सेवेत कमतरता ठेवली यावरुन या तक्रारीव्दारे तक्रारकर्ता कंपनी तर्फे रुपये-57,808/- रकमेची नुकसान भरपाई व्याजासह मागितली असून झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मागितला आहे.
03. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी जबाब मंचा समक्ष सादर केला. त्यांनी लेखी जबाबा मध्ये तक्रारकर्ता कंपनीने विमा पॉलिसी काढल्याची बाब मान्य केली आहे परंतु त्या पॉलिसीव्दारे रुपये-3,03,834/- रकमेचा क्वॉलिटी पॅकिंगसाठी व रुपये-75,305/- रकमेचा टाईम पॅकेजिंगसाठी विमा काढण्यात आल्याची बाब नाकबुल करण्यात आली. या उलट विम्या अंतर्गत रुपये-1,00,000/- एवढया रकमेच्या मालाची जोखीम स्विकारण्यात आल्याचे नमुद केले. दिनांक-02/06/2011 ला ट्रक मधून माल पाठविताना तो ताडपत्रीने झाकला होता आणि जोरदार पावसामुळे तो खराब झाला ही बाब नाकारली.
विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे पुढे असे नमुद केले की, ज्यावेळी विमा दावा सादर करण्यात आला होता, त्यावेळी त्यांचे सर्व्हेअरने पाहणी करुन झालेल्या नुकसानीचे रुपये-37,200/- एवढे निर्धारण करुन तसे अहवालात नमुद केले होते. परंतु नंतर पुढे चौकशी अंती असे आढळून आले की, तक्रारकर्त्या कंपनी तर्फे माल पाठविताना आवश्यक ती काळजी घेतलेली नव्हती आणि खराब दर्जाच्या ताडपत्रीने तो माल झाकण्यात आला होता, त्यामुळे पावसाचे पाणी आत शिरुन मालाला नुकसान झाले, जे पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार नुकसान भरपाई म्हणून देय होऊ शकत नाही. विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार चांगल्या दर्जाची ताडपत्री वापरणे आवश्यक होते आणि म्हणून विमा दावा योग्य रितीने नाकारण्यात आला. विरुध्दपक्ष विमा कंपनीच्या सेवेत कमतरता होती हा आरोप नाकबुल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. तक्रारकर्त्या कंपनीची तक्रार तसेच विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तर आणि उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रतीं तसेच उभय पक्षकारांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
05. ज्याअर्थी तक्रारकर्ता कंपनी तर्फे करण्यात आलेला विमा दावा विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झाल्याचे कारणास्तव पूर्णपणे फेटाळण्यात आला, त्यामुळे विमा पॉलिसीच्या इतर मुद्दांवर ज्यावर दोन्ही पक्ष सहमत नाहीत त्याचा विचार करता, जर तक्रारकर्ता कंपनी आपली तक्रार योग्य असल्याची बाब सिध्द करु शकली तर करता येईल. ही विमा पॉलिसी “Inland Transit Cover” पॉलिसी होती, ज्यानुसार रोड आणि रेल्वेव्दारे आंतरदेशीय वाहतूकी दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची जोखीम विरुध्दपक्ष विमा कंपनीने स्विकारलेली होती. पॉलिसीच्या अटी नुसार ज्या वाहनातून माल पाठविल्या जाईल तो पूर्णपणे ताडपत्रीने झाकलेला असावा. या बद्दल वाद नाही की, तक्रारकर्त्या कंपनी तर्फे माल ट्रकव्दारे पाठविला होता आणि पावसाच्या पाण्याने आतील माल खराब झाला कारण पावसाचे पाणी ताडपत्रीचे आत झिरपले होते. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, जी ताडपत्री माल झाकण्यासाठी वापरलेली होती तिचा दर्जा निकृष्ट होता आणि म्हणून पावसाचे पाणी ताडपत्रीच्या आत झिरपले होते. हेच कारण विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दावा खारीज करताना तक्रारकर्त्या कंपनीला पाठविलेल्या पत्रात नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्या कंपनी तर्फे दिनांक-23/06/2012 रोजी विरुध्दपक्ष विमा कंपनीला पत्र पाठवून विमा दावा खारीज करण्याच्या निर्णयाचा फेर विचार करण्याची विनंती करताना असे लिहिलेले होते की, वापरलेली ताडपत्री अपुरी होती, त्यामुळे ही गोष्ट निश्चीत होते की, तक्रारकर्त्या कंपनी तर्फे पाठविलेल्या मालाची सुरक्षा योग्यरितीने कारण्यात आली नव्हती आणि पुरेश्या ताडपत्रीने चांगल्या प्रकारे माल झाकण्यात आलेला नव्हता.
06. विरुध्दपक्ष विमा कंपनीने काही दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, त्यातील पहिला दस्तऐवज हा क्रिष्णा रोडलाईन्से दिलेली कन्साईनीची (Consignee Copy) प्रत आहे, या कन्साईनीच्या प्रतीवर मागील बाजुला असे लिहिलेले आहे की, “माझ्याकडे ताडपत्री चांगली नव्हती म्हणून माल पावसामध्ये ओला झाला व मी ओला माल डिलेव्हरी केला आहे”
ही टिप्पणी तक्रारकर्त्याच्या प्रतीउत्तरा नुसार त्यांच्या कर्मचा-याने (Employee) लिहून दिलेली आहे परंतु तक्रारकर्त्या कंपनी तर्फे असा युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केल्या गेला की, सर्व्हेअरच्या अहवाला नुसार अपुरी ताडपत्री वापरल्यामुळे मालाचे नुकसान झाले परंतु विमा दावा फेटाळताना असे कारण देण्यात आलेले आहे की, वापरलेल्या ताडपत्रीचा दर्जा हा निकृष्ट होता, म्हणून तक्रारकर्त्याच्या म्हणण्या नुसार विमा दावा नाकारल्यासाठी दिलेले कारण एक सारखे नव्हते आणि म्हणून ते योग्य नाही. या युक्तीवादाशी सहमती दाखविणे कठीण आहे कारण विमा दावा खारीज करण्याचे एकच कारण दिले होते आणि ते म्हणजे निकृष्ट दर्जाच्या ताडपत्रीचा वापर हे आहे. त्या शिवाय अपुरी ताडपत्री वापरली असे जे सर्व्हेअरच्या अहवालात नमुद आहे, तो निष्कर्ष सर्व्हेअरचा नव्हता तर ते कारण तक्रारकर्त्या व्दारे त्याला देण्यात आले होते. विमा पॉलिसीतील अटी नुसार विमाधारकावर ही जबाबदारी येते की, आंतरदेशीय माल वाहतुक करताना मालाची योग्य ती काळजी त्याने घेणे जरुरीचे असते. यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्या कंपनी तर्फे स्वतःच ट्रकव्दारे माल पाठविताना योग्य ती काळजी घेतली नसल्याचे दिसून येते. अशाप्रकारे विमा पॉलिसीतील अटीचा भंग तक्रारकर्त्या कंपनी कडून झाल्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीची तक्रारकर्ता कंपनीला नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी येत नाही.
07. वरील कारणास्तव विरुध्दपक्ष विमा कंपनीने ज्या कारणास्तव तक्रारकर्त्या कंपनीचा विमा दावा फेटाळला ते कारण योग्य होते असे दिसून येते, त्यावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(1) तक्रारकर्ता मेसर्स नाइस पेपर लिमिटेड, नागपूर तर्फे व्यवस्थापक श्री सतिश शंकरलाल लाठी यांची, विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक, धंतोली, नागपूर यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध
करुन देण्यात याव्यात.