जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 191/2017. तक्रार दाखल दिनांक : 08/08/2017. तक्रार आदेश दिनांक : 21/06/2021. कालावधी: 03 वर्षे 10 महिने 13 दिवस
सय्यद कौसर जहागिरदार मजहर, वय : सज्ञान,
धंदा : व्यवसाय, रा. जामा मस्जिद, जहागिरदार पॅलेस,
नळदूर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) विभागीय व्यवस्थापक, दी न्यू इंडिया एश्योरन्स कं.लि.,
हुतात्मा स्मृती मंदिर कॉम्प्लेक्स, पार्क चौक, सोलापूर.
(2) प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता, दी न्यू इंडिया एश्योरन्स कं.लि.,
मेन रोड, नळदूर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (1) श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
(2) श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
तक्रारकर्ती यांचेतर्फे विधिज्ञ :- देविदास वडगांवकर
विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेतर्फे विधिज्ञ :- श्रीकृष्ण पी. दानवे
आदेश
श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारे :-
1. तक्रारकर्ती यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांच्या वाहन क्र.एम.एच.25/आर.2997 चा विरुध्द पक्ष क्र.1 यांचे नांवे विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ‘विमा कंपनी’ संबोधण्यात येते.) यांच्याकडून पॉलिसी क्र.15131031160100 000057 अन्वये विमा घेतला आहे. विमा कालावधी दि.17/6/2016 ते 16/6/2017 आहे आणि पॉलिसीचा हप्ता रु.17,356/- धनादेशाद्वारे भरणा केला.
2. तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, त्यांच्या विमा संरक्षीत वाहनास दि.8/8/2016 रोजी मोहोळ येथे अपघात झाला आणि अपघातामध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती विमा कंपनीस दिल्यानंतर विमा कंपनीचे कर्मचारी व अधिका-यांनी वाहनाची पाहणी केली आणि वाहन दुरुस्तीसाठी ह्युंदाई गांधी शोरुम, सोलापूर येथे नेण्यास सांगितले. वाहन दुरुस्तीकरिता रु.2,27,218/- खर्च अपेक्षीत असल्याचे विमा कंपनीस सांगितले असता त्यांनी दुरुस्ती करुन घ्या; विमा कंपनी पैसे देईल, अशी हमी दिली. त्याप्रमाणे तक्रारकर्ती यांनी वाहनाची दुरुस्ती करुन घेतली. परंतु त्यानंतर विमा कंपनीने ह्युंदाई गांधी शोरुम यांना दुरुस्ती खर्चाची रक्कम दिली नाही.
3. तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, संबंधीत कागदपत्रांसह विमा दावा प्रपत्र भरण्यासाठी तक्रारकर्ती विमा कंपनीकडे गेल्या असता विमा दावा प्रपत्र देण्यास विमा कंपनीने नकार दिला. त्याबाबत चौकशी केली असता विमा पॉलिसी काढण्याकरिता दिलेला धनादेश अनादरीत झाल्याचे सांगण्यात आले आणि तसे पत्र दि.30/8/2016 रोजी त्यांना देण्यात आले. विमा पॉलिसी घेण्याकरिता दिलेला अॅक्सीस बँक, शाखा तुळजापूर यांचा धनादेश अनादरीत झाल्यामुळे तक्रारकर्ता यांनी घेतलेली नमूद पॉलिसी रद्द केल्याचे पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. दि.16/6/2016 रोजी पॉलिसी घेण्याकरिता दिलेल्या रकमेचा धनादेश वटण्याइतकी आवश्यक रक्कम तक्रारकर्ता यांच्या बँक खात्यामध्ये ठेवलेली होती. त्यामुळे त्यांनी दिलेला धनादेश अनादरीत होऊ शकत नाही. विमा नुकसान भरपाई देण्याचे टाळण्याकरिता विमा कंपनीने पॉलिसी एकतर्फी रद्द केलेली आहे.
4. तक्रारकर्ती यांचे कथन आहे की, त्यांनी विधिज्ञांमार्फत दि.20/1/2017 रोजी विमा कंपनीस नोटीस पाठवून वाहन दुरुस्ती खर्चाची मागणी केली विमा कंपनीने नोटीस उत्तरामध्ये चुकीची माहिती दिली. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमा संरक्षीत वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च रु.2,27,218/-; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व खर्चाकरिता रु.10,000/- अशी रक्कम व्याजासह देण्याचा विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केली आहे.
5. विमा कंपनीने दि.11/12/2017 रोजी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. त्यांच्या कथनानुसार दी न्यू इंडिया एश्योरन्स कं.लि. ही भारतीय शासन अंगीकृत व्यवसाय व निगम निकाय असून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे. तक्रारकर्ती यांनी कंपनीस पक्षकार न करता कंपनीच्या सोलापूर व नळदुर्ग येथील अधिका-यांना पक्षकार केले असून जे चुकीचे व अयोग्य आहे. विमा कंपनीचे पुढे कथन आहे की, कायदा व विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती पाहता तक्रारकर्ती यांची तक्रार नामंजूर होण्यास योग्य आहे. तक्रारकर्ती यांनी विमा पॉलिसी घेण्याकरिता दि.16/6/2016 रोजी दिलेला धनादेश विमा कंपनीचे बँकर स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, शाखा नळदूर्ग (आताचे नांव : स्टेट बॅक ऑफ इंडिया, शाखा नळदुर्ग) यांच्यामार्फत अॅक्सीस बँक, शाखा तुळजापूर यांच्याकडे वटविण्याकरिता पाठविला असता दि.24 जुन, 2016 रोजी तक्रारकर्ती यांच्या अॅक्सीस बँकेच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याच्या कारणास्तव तो वटलेला नाही. अॅक्सीस बँक व स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, शाखा नळदूर्ग (आताचे नांव : स्टेट बॅक ऑफ इंडिया, शाखा नळदुर्ग) यांनी तो धनादेश परत करण्याचे कर्तव्य पूर्ण केले नाही. त्यामुळे त्या दोन्ही बँकाना पक्षकार करणे आवश्यक आहे.
6. विमा कंपनीने पुढे कथन आहे की, तक्रारकर्ती यांनी धनादेश न वटल्याची वस्तुस्थिती हेतुत: लपवून ठेवली. तक्रारकर्ती यांच्या वाहनास झालेल्या अपघातासंबंधी पोलीस ठाण्यामध्ये नोंदीचा अभिलेख, वाहन चालक व त्याचा परवाना, अपघातामुळे झालेली इजा इ. माहिती नमूद केलेली नाही. विमा कंपनीने तक्रारकर्ती यांच्या तक्रारीमध्ये नमूद मजकूर अमान्य केला आहे. तक्रारकर्ती यांना विमा दावा प्रपत्र देण्याचा अधिकार नव्हता व नाही. दि.30/8/2016 रोजीच्या पत्रान्वये तक्रारकर्ती यांना धनादेश न वटल्यामुळे पॉलिसी रद्द केल्याचे कळविले आहे. हप्त्याचा धनादेश न वटल्यास पॉलिसी आपोआप व सुरुवातीपासून रद्द होईल, अशी अट पॉलिसीमध्ये असून त्याची माहिती तक्रारकर्ती यांना होती.
7. विमा कंपनीचे पुढे कथन आहे की, अपघातानंतर आवश्यक विमा सेवेसंबंधी कर्तव्ये त्यांनी पूर्ण केली आहेत. त्यांनी मे. संदीप शिंदे, सर्व्हेअर व लॉस असेसर यांची इन्व्हेस्टीगेटर म्हणून नियुक्ती केली आणि फायनल सर्व्हे व पुन:तपासणी अहवाल घेतला आहे. तथापि धनादेश अनादरीत झाल्यामुळे पॉलिसी रद्द झाल्यामुळे तक्रारकर्ती यांना रक्कम देण्याचा प्रश्न नव्हता व नाही. विमा कंपनीने लेखी उत्तरामध्ये ‘एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कार्पो. ऑफ इंडिया /विरुध्द/ गर्ग सन्स इंटरनेशन’, 2 (2013) सी.पी.जे. 1 (एस.सी.) या निवाडयाचा संदर्भ देऊन विमा करार हा व्यापारी करार असल्याचे व त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्याचे नमूद केले आहे. अंतिमत: तक्रारकर्ती यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती विमा कंपनीने केलेली आहे.
8. तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन व उभय पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विद्वान विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होत असून त्यांची सकारण उत्तरे त्यापुढे दिलेल्या कारणमीमांसेकरिता देत आहोत.
मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ती ह्या विमा कंपनीचे ‘ग्राहक’ आहेत काय ? नाही.
2. तक्रारकर्ती ह्या अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
9. मुद्दा क्र.1 व 2 :- तक्रारकर्ती यांनी त्यांच्या वाहन क्र. एम.एच.25/आर.2997 चा विमा उतरविण्यासाठी विमा हप्त्याकरिता रु.17,356/- रकमेचा अॅक्सीस बँक, शाखा तुळजापूर या बँकेचा धनादेश क्र.009912 विमा कंपनीकडे दिलेला होता, याबद्दल उभय पक्षांमध्ये विवाद नाही. त्यानंतर विमा कंपनीने तक्रारकर्ती यांच्या वाहन क्र.एम.एच.25/आर.2997 साठी विमा संरक्षण देण्याकरिता पॉलिसी क्र.15131031160100000057 निर्गमीत केली आणि विमा कालावधी दि.17/6/2016 ते 16/6/2017 होता, ही बाब उभयतांना मान्य आहे.
10. तक्रारकर्ती यांच्या कथनानुसार त्यांच्या दि.8/8/2016 रोजी त्यांच्या वाहनास अपघात होऊन वाहनाचे नुकसान झाले. संबंधीत कागदपत्रांसह विमा दावा प्रपत्र भरण्यासाठी तक्रारकर्ती विमा कंपनीकडे गेल्या असता विमा दावा प्रपत्र देण्यास विमा कंपनीने नकार दिला आणि दि.30/8/2016 रोजीच्या पत्राद्वारे धनादेश अनादरीत झाल्याचे कारणास्तव पॉलिसी रद्द केल्याचे कळविले. तक्रारकर्ती यांचे कथन आहे की, त्यांनी धनादेश वटण्याइतकी आवश्यक रक्कम बँक खात्यामध्ये ठेवलेली होती आणि त्यांनी दिलेला धनादेश अनादरीत होऊ शकत नाही. उलटपक्षी, विमा कंपनीचे कथन आहे की, तक्रारकर्ती यांच्या अॅक्सीस बँकेच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याच्या कारणास्तव धनादेश वटलेला नाही. तक्रारकर्ती यांना विमा दावा प्रपत्र देण्याचा अधिकार नव्हता व नाही आणि दि.30/8/2016 रोजीच्या पत्रान्वये तक्रारकर्ती यांना धनादेश न वटल्यामुळे पॉलिसी रद्द केल्याचे कळविले आहे.
11. विमा हा विषय कराराशी निगडीत आहे. करारामध्ये प्रस्ताव, स्वीकार व प्रतिफल आवश्यक बाबी आहेत. विमा कराराचा विचार केला असता विमाकर्त्याने प्रतिफल अदा केल्यानंतर विमा कंपनी विमा सरंक्षीत व्यक्ती, वाहन, वस्तु, इमारत इ. करिता विमा जोखीम स्वीकारते.
12. भारतीय संविदा अधिनियम, 1872 चे कलम 25 स्पष्ट करते की, विनाप्रतिफल करार हा शुन्यवत असतो. विमा करार व पॉलिसीच्या अनुषंगाने प्रतिफल असणा-या विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीस मिळालेली नाही. ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे कलम 2(7) मध्ये ‘ग्राहक’ शब्दाची संज्ञा पाहता प्रतिफल अत्यावश्यक बाब आहे. आमच्या मते, तक्रारकर्ती ह्या विमा कंपनीच्या ग्राहक असल्याचे सिध्द होत नाही आणि त्या अनुषंगाने त्या अनुतोषास पात्र नाहीत. आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देत आहोत आणि खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ती यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. मुकुंद भगवान सस्ते) (श्री. किशोर दत्तात्रय वडणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-
(संविक/स्व/3321)