ORDER | Dated the 08 Dec 2015 न्यायनिर्णय (द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्य) - सामनेवाले ही बांधकाम व्यावसायिक खाजगी मर्यादित कंपनी आहे. तक्रारदार दहिसर, मुंबई येथील रहिवासी आहेत. सामनेवाले यांनी नायगांव, जि. ठाणे येथे विकसित केलेल्या रश्मी स्टारसिटी इमारतीमधील बुक केलेल्या सदनिकेबाबत प्रस्तुत वाद निर्माण झाला
- तक्रारदारांच्या कथनानुसार सामनेवाले यांनी नायगांव, जि. ठाणे येथे ‘रश्मी स्टारसिटी’ या नांववाने विकसित केलेल्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील 495 चौ.फू. क्षेत्रफळाची सदनिका रु. 11 लाख किंमतीस विकत घेण्याचे निश्चित करुन दि. 29/06/2010 रोजी, बुकींग रक्कम रु. 3 लाख अदा केले. या रकमेपैकी रु. 75,000/- धनादेश क्र. 2,25,000/- रोखीने सामनेवाले यांना अदा केली. तथापि, सामनेवाले यांनी सदर रकमेची पावती नंतर देण्याचे मान्य केले. यानंतर वारंवार मागणी करुनही सामनेवाले यांनी तक्रारदारांना पावती दिली नाही. शिवाय, सदनिका विक्री करारनामा केला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाले यांना नोटीस देऊनही त्यांनी कोणतीच कार्यववाही केली नसल्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन सामनेवाले यांना एकूण दिलेली रक्कम रु. 3,01,100/ ,18% व्याजासह परत मिळावी, नुकसान भरपाई रु. 2 लाख मिळावी, सदनिका विक्री करारनामा करण्याचे आदेश व्हावेत. तसेच, सदनिका ताबा मिळावा अशा मागण्या केल्या आहेत.
- सामनेवाले यांनी लेखी कैफियत दाखल करुन तक्रारदारांच्या मागण्या फेटाळतांना असे नमूद केले आहे की, तक्रारदारांनी सदनिका बुकींग रक्कम म्हणून रु. 75,000/- धनादेशाद्वारे दिली व उर्वरीत रु. 2,25,000/- तक्रारदारांनी एक आठवडयाचे आंत देण्याचे मान्य केल्याने सदनिका बुक केली. तथापि त्यानंतर तक्रारदारांना अनेकवेळा मागणी करुनही त्यांनी उर्वरीत रक्कम रु. 2,25,000/- दिली नाही व शेवटी मे, 2012 मध्ये तक्रारदारांना तोंडी सूचना देऊन दि. 31/05/2012 पूर्वी उर्वरीत रक्कम अदा करण्याचे सांगण्यात आले. तसे न केल्यास तक्रारदारांनी जमा केलेली रक्कम रु. 75,000/- मधून इतर आकाराची वजावट करुन उर्वरीत रक्कम परत करण्यात येईल असे सांगण्यात आले. यानंतर तक्रारदारांनी दि. 05/06/2012 रोजी नोटीस पाठवून रु. 3,00,000/- रकमेची मागणी केली. तथापि, सदर मागणी चुकीची, खोडसाळ असल्याचे सामनेवाले यांनी नमूद करुन फेटाळण्यात आली. तक्रारदारांनी उर्वरीत बुकींग रक्कम दिली नसल्याने, तक्रारदारांनी जमा केलेली रक्कम रु. 75,000/- परत करण्यास ते अदयापही तयार आहेत, असे नमूद केले आहे.
- तक्रारदार व सामनवेाले यांनी दाखल केलेला वाद प्रतिवाद, लेखी युक्तीवाद व कागदपत्रांचे सूक्ष्म वाचन मंचाने केले. तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन प्रस्तुत प्रकरणामध्ये खालील निष्कर्ष निघतातः
- तक्रारदार यांनी मंचासमोर दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये सामनेवाले यांनी प्रकाशित केलेल्या रश्मी स्टारसिटी या प्रकल्पाचे माहितीपत्रक, दि. 28/06/2010 रोजीचा रु. 75,000/- रकमेचा सामनेवाले यांना दिलेला धनादेश क्र. 549627 ची प्रत व सामनेवाले यांना दि. 05/06/2012 रोजी देण्यात आलेली नोटीस यांचा समावेश आहे. तर, सामनेवाले यांनी दि. 20/04/2013 व दि. 03/07/2014 रोजी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये अनुक्रमे बुकींग फॉर्म नं. 120 व सदनिका विक्रीच्या शर्ती व अटींचा समावेश आहे.
उभय पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे स्पष्टपणे दिसून येते की, सामनेवाले यांनी रश्मीज् स्टारसिटी नांवाने, 152 इमारतीमधील 4560 सदनिकचा समावेश असलेला भव्य प्रकल्प नायगांव, जि. ठाणे येथे विकसित केल्याबाबत, तसेच इच्छुक सदनिका खरेदीदाराने सदनिकेच मुल्य कशाप्रकारे अदा करावयाचे ही माहिती देणारे प्रसिध्दीपत्रक प्रकाशित केले. सदर माहितीपत्रकामध्ये 2 रुम किचन या सदनिकेकरीता रु. 11 लाख किंमतीपैकी इच्छुक सदनिका खरेदीदाराने बुकींग रक्कम रु. 3 लाख देण्याचे नमूद केले असून रु. 10,000/- रकमेचे 500 हप्ते अदा करावयाचे होते व अंतिम उर्वरीत रक्कम रु. 3 लाख सदनिकेचा ताबा घेतेवेळी देण्याचे नमूद केले आहे. म्हणजेच सदनिका बुकींग रक्कम ही रु. 3 लाख इतकी आहे ही बाब सदर माहितीपत्रकावरुन स्वयंस्पष्ट होते. - तक्रारदारांनी दि. 29/06/2010 रोजी रु. 75,000/- धनादेशाद्वारे दिल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरुन दिसून येते. तसेच सदर रक्कम सामनेवाले यांना प्राप्त झाल्याचे सामनेवाले यांनी मान्य केले आहे. तक्रारदारांनी असे नमूद केले आहे की, उर्वरीत रक्कम ही रु. 2,25,000/- ही त्यांनी सामनेवाले यांच्या आदेशानुसार रोखीने दिली आहे. तथापि सामनेवाले यांनी सदर दोन्ही रकमा स्विकारल्याची पावती दिली नाही. तक्रारदारांनी असेही नमूद केले आहे की, धनादेशाद्वारे स्विकारलेल्या रकमेसाठी व रोखीने स्विकारलेल्या रकमेसाठी वेगवेगळे बुकींग फॉर्म सामनेवाले यांनी वापरले आहेत. मात्र मंचापुढे केवळ धनादेशाद्वारे स्विकारलेल्या रकमेचा बुकींग फॉर्म सादर केला आहे.
(क) सामनेवाले यांनी दि. 03/07/2014 रोजी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये रु. 75,000/- धनादेशाद्वारे स्विकारुन सदनिका बुक केल्याचे दर्शविण्यासाठी फॉर्म 00120 सादर केला आहे. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदारांनी सामनेवाले यांना रु. 2,25,000/- ही बुकींग रक्कम रोखीने दिली का हा प्रश्न उपस्थित होतो. यासंदर्भात उपरोक्त परिच्छेद 4(अ) मध्ये नमूद केल्यानुसार सामनेवाले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या माहितीपत्रकानुसार बुकींग रक्कम ही रु. तीन लाख ठरवून दिलेली असतांना तक्रारदाराकडून केवळ रु. 75,000/- दि. 29/06/2010 रोजी स्विकारल्यापासून तक्रारदारांनी दि. 05/06/2012 रोजी नोटीस देईपर्यंतच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून उर्वरीत रक्कम रु. 2,25,000/- ची मागणी केल्याबाबतचा कुठलाही पुरावा सामनेवाले यांनी दाखल केलेला नाही. तसेच बुकींग रक्कम रु. 3 लाख असतांना केवळ रु. 75,000/- स्विकारुन सामनेवाले यांनी सदर सदनिका दि. 05/06/2012 पर्यंत उर्वरीत रकमेची मागणी न करता तक्रारदारांसाठी राखून का ठेवली ही बाब अनाकलनीय आहे. त्याहीपुढे असे नमूद करावेसे वाटते की तक्रारदारांकडून रु. 75,000/- स्विकारल्याची बाब सामनेवाले यांनी मान्य करुनही या रकमेची पावती तक्रारदारांना दिली नाहीच, शिवाय ती पावती मंचापुढेही दाखल न करणे ही बाब, रु. 2,25,000/- इतकी रक्कम रोख स्वरुपात सामनेवाले यांनी स्विकारल्याच्या कथनास पुष्टी देणारी ठरते. (ड) तक्रारदारांनी दि. 03/09/2013 रोजी दाखल केलेल्या पुरावा शपथपत्रामधील परिच्छेद क्र. 2 मध्ये असे नमूद केले आहे की सामनेवाले यांनी चेकद्वारे व रोखीने स्विकारलेल्या रकमांसाठी वेगवेगळे 2 बुकींग फॉर्म वापरले होते. सदर कथनाच्यापुष्ठयर्थ तक्रारदारांनी सदर बुकींग करतेवेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या श्री. दिपक गुलाबचंद्र शुक्ला यांचेही शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाले यांनी लेखी युक्तीवादामध्ये सदर बाब फेटाळली आहे. तथापि, तक्रारदारांचे सदर कथन फेटाळतांना सामनेवाले यांनी त्यांच्या लेखा पुस्तकामध्ये दि. 29/06/2010 रोजी रोखीने स्विकारलेल्या रकमेची नोंद नसल्याबाबत कोणतेही भाष्य केले नाहीच, शिवाय, तक्रारदाराचे कथन फेटाळण्याच्या पुष्ठयर्थ कोणताही लेखा नोंद (Accounting Entries) नसल्याचा पुरावा सादर केला नाही. (इ) सामनेवाले यांनी दि. 03/07/2014 रोजी दाखल केलेल्या शर्ती व अटींमध्ये जरी सर्व व्यवहार धनादेश/धनाकर्षद्वारे करण्याचे नमूद केले असले तरी रोखीने रक्कम अदा केल्यास त्याची जबाबदारी ग्राहकावर राहिल असे नमूद केले आहे. म्हणजेच दोन्हीप्रकारे बुकींग रक्कम अदा करता येत होती. तक्रारदारांनी सामनेवाले यांना रु. 75,000/- अदा करुन ही सामनेवाले यांनी मंचापुढे त्याबाबतची पावती दाखल केली नाही अथवा तक्रार दाखल करेपर्यंत तक्रारदारांना दिली नसल्याने तक्रारदारांकडून रोख स्वरुपात रक्कम स्विकारुनही त्याचीही पावती दिली नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय, तक्रारदारांकडून केवळ रु. 75,000/- स्विकारल्यानंतर उर्वरीत रक्कम रु. 2,25,000/- तक्रारदारांकडून दोन वर्षांमध्ये मागणी केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केला नसल्याने सामनेवाले यांनी माहिती पत्रकामध्ये नमूद केल्यानुसार बुकींगसाठी तक्रारदारांकडून पूर्ण बुकींग रक्कम रु. 3 लाख स्विकारली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. (ई) उपलब्ध कागदपत्रे, प्रकल्प प्रसिध्दीपत्रकामधील सूचना विचारात घेता तसेच तक्रारदारांचे आक्षेप फेटाळणा-या कथनाच्या पृष्ठयर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल करण्यास सामनेवाले यांना आलेले अपयश या बाबी विचारात घेतल्यास, शिवाय उपरोक्त विवेचनाचा तर्कसंगत विचार केल्यास सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून रु. 75,000/- धनादेशाद्वारे व रु. 2,25,000/- रोखीने स्विकारल्याचे सामनेवालेविरुध्द ‘प्रतिकूल अनुमान’ (Adverse inference) काढणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे. सदर प्रतिकूल अनुमानाच्यापुष्ठयर्थ मंच खालील न्यायनिर्णयाचा आधार घेत आहेः 1. एस.आर. शिवप्रकाश आणि इतर विरुध्द वोकार्ट हॉस्पिटल 2006 (2) सीपीजे 123 (NC) 2. श्रीराम बायोसीड जेनेटिक्स इं.लि. विरुध्द व्ही बिक्शापती 2010 (2) सीपीजे 1: 2010 (3) सी एल टी 231 (अेपी). (उ) सामनेवाले यांनी दाखल केलेले न्यायनिवाडे प्रस्तुत प्रकरणात लागू होत नसल्याचे मंचाचे मत आहे. उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः आ दे श - तक्रार क्र. 293/2012 अंशतः मंजूर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून सदनिकेची पूर्ण बुकींग रक्कम स्विकारुनही त्याप्रित्यर्थ पावती न देऊन/सदनिका विक्री करारनामा न करुन सेवा सुविधा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून स्विकारलेली रक्कम रु. 3 लाख दि. 31/01/2016 पूर्वी परत करावी. तसे न केल्यास तक्रार दाखल दि. 06/07/2012 पासून 12% व्याजासह संपूर्ण रक्कम अदा करावी.
- तक्रार व इतर खर्चाबद्दल रु. 25,000/- सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि. 31/01/2016 रोजी अदा करावेत.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब/विनाशुल्क देण्यात याव्यात.
- संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.
| |