निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार बापुराव पि. आबाजी संदलवाड यांनी दिनांक 09/01/2014 रोजी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा शिवाजीनगर, नांदेड यांच्याकडून कर्ज घेवून रु.50,000/- ची एक गाय खरेदी केली होती. अर्जदाराने सदर गायीचा विमा गैरअर्जदार यांच्याकडे काढला होता. सदर विमा पॉलिसीचा क्र. 16090047130400000033 असून त्याचा कालावधी दिनांक 10/01/2014 ते दिनांक 09/01/2015 असा होता. दिनांक 28/01/2014 रोजी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास सदर गायीस विषारी सांप चावल्याने ती मरण पावली. दुस-या दिवशी दिनांक 29/01/2014 रोजी अर्जदाराने सदर बाब स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, शाखा बारड व पशुधन विकास अधिकारी, बारड यांना लेखी कळवून पुढील कार्यवाहीची विनंती केली. त्यानुसार संबंधीत बँकेने गैरअर्जदार यांनी दिनांक 29/01/2014 रोजी पत्र पावून अर्जदारास क्लेम फॉम पाठविण्यासाठी कळविले. पशुधन विकास अधिकारी, बारड यांनी गायीचे रितसर शवविच्छेदन करुन शवविच्छेदन अहवाल, मुल्यांकन प्रमाणपत्र निर्गमित केले. त्यानंतर अर्जदाराने सर्व कागदपत्रासह विहीत नमुन्यात दावा गैरअर्जदार यांच्याकडे दाखल केला. परंतू पशुधन विकास अधिकारी, बारड यांनी निर्गमीत केलेल्या शवविच्छेदन अहवालाच्या पहिल्या पानावर दिनांक 28/01/2014 ऐवजी दिनांक 24/01/2014 हया नजरचुकीच्या नोंदीमुळे सदरील दावा पॉलिसीच्या अट क्र. 1 नुसार नामंजूर केल्याचे कळविले. वास्तविक पाहता पशुधन विकास अधिकारी, बारड यांनी दिनांक 19/03/2014 रोजी प्रपत्र सोबत जारी करुन सदर गायीचे शवविच्छेदन अहवालावर नजर चुकीने दिनांक 28/01/2014 ऐवजी दिनांक 24/01/2014 पडल्याचे नमूद केले आहे. तसेच इतर सर्व कागदपत्रावर सदरील गाय दिनांक 28/01/2014 रोजी मृत्यु पावलेली आहे. शवविच्छेदन अहवालाच्या शेवटच्या पानावर देखील दिनांक 28/01/2014 असाच उल्लेख आहे. याच दिनांकानुसार पॉलिसी निर्गमित झाल्यापासून गायीचा मृत्यु हा 19 व्या दिवशी होतो म्हणून पॉलिसीची अट क्र. 1 ही लागू होत नाही व गैरअर्जदार हे अर्जदारास झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास जबाबदार आहेत. अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात यावा व गैरअर्जदाराने विमा पॉलिसीची रक्कम रक्कम रु. 50,000/- अर्जदारास देण्याबाबत आदेश व्हावा. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- देण्याबाबत आदेश व्हावा.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
2. अर्जदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करण्यास काहीही अधिकार नाही. तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जदाराने स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांना दाव्यात पार्टी करणे आवश्यक होते परंतू त्यांनी तसे केलेले नाही. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून Cattle Insurance Policy घेतली होती. सदर पॉलिसीतील महत्वाची अट ही आहे की, विमाधारकास पॉलिसी दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत जर एखादी घटना घडली तर त्याची जबाबदारी गैरअर्जदार यांची नाही. या प्रकरणात अर्जदारची कथीत गाय जिचा टॅग नं. 17206 ही दिनांक 24/01/2014 रोजी Choronic Pneumonia या आजाराने मयत झालेली आहे. सदर जनावरास देण्यात आलेल्या विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक 10/01/2014 ते दिनांक 09/01/2014 असा आहे. म्हणजेच सदर कथीत घटना ही विमा पॉलिसी दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत घडलेली असल्यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास कोणतीही नुकसान भरपाई देणे लागत नाहीत. सोबत Cattle Insurance Policy चे नियम व अटी दाखल केलेल्या आहेत. अर्जदाराने त्याच्या अर्जातील परिच्छेद क्र. 6 मध्ये केलेले कथन हे गैरअर्जदार निक्षुणपणे अमान्य करतात. अर्जदार हा गायीच्या मृत्यु तारखेबद्दल दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा.
3. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
4. अर्जदाराने त्याच्या गाईचा विमा Cattle Insurance Policy गैरअर्जदार यांच्याकडून घेतलेली होती हे अर्जदाराने दाखल केलेल्या सदर पॉलिसीच्या प्रतीवरुन स्पष्ट होते. सदर पॉलिसीचा क्र. 16090047130400000033 असा आहे व तिचा कालावधी दिनांक 10/01/2014 5.36.22 पीएम ते 09/01/2015 11.59.59 पीएम असा आहे व सम इन्सुअर्ड रक्कम रु. 50,000/- एवढी आहे. अर्जदाराच्या सदर गाईचा मृत्यु सर्पदंशाने दिनांक 28/01/2014 रोजी झालेला आहे. हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या सदर गाईच्या शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट आहे. तसेच इतर सर्व कागदपत्रात मृत्यु दिनांक 28/01/2014 नमूद आहे. गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे की, सदर गाईचा मृत्यु दिनांक 24/01/2014 रोजी Chronic Pneumonia या आजाराने झाला व तो आजार सदर गाईस विमा काढल्याच्या 15 दिवसांच्या आत म्हणजे दिनांक 10/01/2014 पासून 15 दिवस म्हणजे दिनांक 25/01/2014 च्या आत होऊन तिचा मृत्यु झाल्याने Cattle Insurance Policy च्या अट क्र. 1 प्रमाणे गैरअर्जदार हे अर्जदारास काही एक देणे लागत नाही. पॉलिसीतील सदर अट पुढील प्रमाणे आहे.
Special conditions
i) Death due to diseases contracted prior to and within 15 days of commencement of risk are not payable for non-Scheme Cattle.
सदर अटी प्रमाणे जर विमा काढलेल्या जनावराचा मृत्यु विम्याची जोखीम सुरु झालेल्या तारखेच्या अगोदर त्याला झालेल्या एखादया रोगामुळे किंवा जोखीम सुरु झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत झालेल्या रोगामुळे झाला असेल तर नुकसान भरपाई मिळणार नाही. परंतू प्रस्तुत प्रकरणात गाईचा मृत्यु हा कोठल्याही आजाराने नव्हे तर सर्पदंशाने झालेला आहे. त्यामुळे सदरची अट ही प्रस्तुत प्रकरणात लागू होत नाही.
गैरअर्जदाराने सदरील गाईचा मृत्यु हा Chronic Pneumonia ने झालेला आहे असे कथन केलेले आहे. परंतू त्याबद्दल कोठलाही पुरावा मंचासमोर आणलेला नाही. उलटपक्षी अर्जदाराने दाखल केलेल्या शवविच्छेदन अहवालात गाईचा मृत्यु हा सर्पदंशाने झालेला आहे, असे स्पष्ट नमूद केलेले आहे, त्यामुळे गाईचा मृत्युच्या तारखेचा वाद देखील निरर्थक आहे, असे मंचाचे मत आहे. मृत्युचे कारण देण्यात पशुधन वैदयकीय अधिकारी हे निष्णात आहेत व त्यांच्या मतानुसार गाईचा मृत्यु हा सर्पदंशाने झालेला आहे. सदर गाईचा मृत्यु हा अपघाती झालेला आहे. म्हणून गैरअर्जदार हे अर्जदारास विमा रक्कम र. 50,000/- देण्यास जबाबदार आहेत. तसेच ती रक्कम अर्जदारास देण्याचे नाकारुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रास दिलेला आहे व सेवेत त्रुटी दिलेली आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा रक्कम रु. 50,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,500/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.