जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : २७५/२०१९. तक्रार दाखल दिनांक : २६/०८/२०१९.
तक्रार निर्णय दिनांक : २२/०६/२०२१.
कालावधी : ०१ वर्षे ०९ महिने २७ दिवस
छायाबाई ज्योतीराम गायकवाड, वय ५० वर्षे, व्यवसाय : शेती
व घरकाम, रा. मुर्टा, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ती
विरुध्द
(१) दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि., मे. फेवर टॉवर,
पुणे-मुंबई रोड, वाकडेवाडी, शिवाजी नगर, पुणे – ५.
(२) जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लिमिटेड, दुसरा मजला,
जायका बिल्डींग, कमर्शियल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४० ००१.
(३) तालुका कृषि अधिकारी, तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
मा. श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- मल्लिकार्जून तात्याराव आपचे
विरुध्द पक्ष क्र.१ यांचेकरिता विधिज्ञ :- डी.आर. कुलकर्णी (इर्लेकर)
विरुध्द पक्ष क्र.२ यांचेकरिता विधिज्ञ :- दिपक एम. परांजपे
विरुध्द पक्ष क्र.३ स्वत:
आदेश
मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(१) तक्रारकर्ती यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक शेतक-यांचा महाराष्ट्र शासनामार्फत विरुध्द पक्ष यांच्याकडे रु.२,००,०००/- ची विमा पॉलिसी उतरविलेली असून अपघाती मृत्यूकरिता रु.२,००,०००/- देण्याची विरुध्द पक्ष यांनी जोखीम स्वीकारलेली आहे.
(२) तक्रारकर्ती ह्या मयत ज्योतीराम यशवंत गायकवाड (यापुढे ‘मयत ज्योतीराम’) यांच्या पत्नी आहेत. मयत ज्योतीराम हे दि.२९/१०/२०१७ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास शेतामध्ये काम करीत असताना डाव्या पायाच्या घोट्याला सर्पदंश झाल्यामुळे मृत्यू पावले. त्याप्रमाणे पोलीस ठाणे, नळदुर्ग येथे आकस्मित मृत्यू नोंद क्र. ७९/२०१७ नोंदविण्यात आला.
(३) तक्रारकर्ती यांचे पुढे असे वादकथन आहे की, पतीच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती यांना मानसिक धक्का बसला आणि मानसिक संतुलन बिघडून त्या अंथरुणावर पडून होत्या. तसेच त्या अशिक्षीत असल्यामुळे त्यांना कागदपत्रे लवकर मिळाली नाहीत. त्यानंतर दि.५/२/२०१८ रोजी विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. पाठपुरावा करुनही त्यांचा विमा दावा मंजूर करण्यात आला नाही आणि दि.१६/८/२०१९ रोजी विमा रक्कम देण्यास विरुध्द पक्ष यांनी स्पष्ट नकार दिला. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमा रक्कम रु.२,००,०००/- द.सा.द.शे. १२ टक्के व्याज दराने देण्याचा आणि मानसिक व आर्थिक त्रासासह तक्रार खर्चाकरिता रु.५५,०००/- देण्याबाबत विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(४) विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ता यांची तक्रार चुकीच्या व अर्धवट माहितीच्या आधारीत असल्यामुळे नामंजूर करण्याची विनंती केली आहे. त्यांचे कथन आहे की, तक्रारीतील घटनेची तारीख २०/१०/२०१७; तसेच विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे प्रस्ताव दाखल केल्याची तारीख ५/२/२०१८ व तक्रारीची तारीख १७/८/२०१९ लक्षात घेता मुदतबाह्य असल्यामुळे खर्चासह नामंजूर होणे न्यायोचित आहे. विरुध्द पक्ष क्र.१ यांचे पुढे कथन आहे की, विमा करारानुसार तथाकथित घटनेची तात्काळ लेखी माहिती देणे तक्रारकर्ती यांना आवश्यक व बंधनकारक होते आणि विमा कराराचे तक्रारकर्ती यांनी उल्लंघन केले आहे. प्रथम वर्दी, घटनास्थळ पंचनामा, शव पंचनामा व शवविच्छेदन अहवाल इ. कागदपत्रे मागणी करुनही न दिल्यामुळे तक्रारकर्ती यांच्या विमा प्रस्तावाचा विचार करणे कठीण व अशक्य आहे. शेवटी तक्रारकर्ती यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(५) विरुध्द पक्ष क्र.२ यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. सर्वप्रथम त्यांनी अपघात विमा योजनेखाली प्राप्त होणा-या दाव्यासंबंधी होणा-या कार्यपध्दतीचा तपशील नमूद केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे दावा मंजूर-नामंजुरीची बाब विमा कंपनीच्या अखत्यारीत असते आणि जयका इन्शुरन्स हे मध्यस्त आहेत. त्यांचे पुढे कथन आहे की, तक्रारकर्ती यांच्या पतीचे दि.२९/१०/२०१७ रोजी अपघाती निधन झाले. तक्रारकर्ती यांनी योजनेंतर्गत विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे दि.९/२/२०१८ रोजी अर्ज सादर केला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्यामार्फत तो विरुध्द पक्ष क्र.२ यांना दि.३/३/२०१८ रोजी प्राप्त झाला. तो दावा त्यांनी दि.२०/३/२०१८ रोजी विरुध्द पक्ष क्र.१ यांच्याकडे पाठविला. अर्जाची शहानिशा केल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ती यांचा अर्ज दि.२८/२/२०१८ च्या वाढीव मुदतीनंतर आला आहे, असे कारण देऊन दि.१३/६/२०१८ रोजीच्या पत्रान्वये नामंजूर केला. जयका इन्शुरन्सने त्यांची जबाबदारी त्वरीत व व्यवस्थित पार पाडली आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी तक्रारकर्ती यांची तक्रार रद्द करण्यात यावी, अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
(६) विरुध्द पक्ष क्र.३ यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. त्यांचे कथन आहे की, मयत ज्योतीराम हे दि.२९/१०/२०१७ रोजी सर्पदंश होऊन मृत्यू पावले. तक्रारकर्ती यांचा शेतकरी अपघात विमा योजनेखाली दि.५/२/२०१८ रोजी प्रस्ताव प्राप्त झाला. प्रस्तावातील त्रुटीसह तो जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांना सादर केला.
(७) तक्रारकर्ती यांची वादकथने, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन, उभय पक्षांनी दाखल केलेले कागदपत्रे इ. चे अवलोकन करण्यात आले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला असता न्यायनिर्णयासाठी खालीलप्रमाणे उपस्थित होणा-या मुद्यांचे सकारण उत्तरे त्यांच्यापुढे नमूद करुन कारणमीमांसा देत आहोत.
मुद्दे उत्तर
(१) विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ती यांना विमा रक्कम अदा
न करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? होय.
(२) तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
(३) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमीमांसा
(८) मुद्दा क्र. 1 व 2 :- शेतकरी जनता अपघात विमा योजनेनुसार राज्यातील शेतक-यांना विरुध्द पक्ष क्र.१ यांनी अपघाती मृत्यू व अपंगत्व याकरिता विमा संरक्षण दिलेले होते, ही बाब वादास्पद नाही.
(९) अभिलेखावर दाखल मयत खबर जबाब, पोलीस घटनास्थळ पंचनामा, मरनोत्तर पंचनामा व शवचिकित्सा अहवालाचे अवलोकन केले असता मयत ज्योतीराम यांचा सर्पदंर्शामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते.
(१०) मयत ज्योतीराम यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे विमा दावा दाखल केला, असे तक्रारकर्ती यांचे कथन आहे आणि त्यास विरुध्द पक्ष क्र.२ व ३ यांनी लेखी निवेदनाद्वारे पुष्ठी दिलेली आहे. विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ती यांना मयत ज्योतीराम यांच्या अपघाती विम्याची रक्कम अदा न करण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.१ यांनी दोन बाबीचा आधार घेतलेला आहे. त्या म्हणजे तक्रारकर्ती यांनी विमा करारानुसार तथाकथित घटनेची तात्काळ लेखी माहिती दिलेली नाही आणि प्रथम वर्दी, घटनास्थळ पंचनामा, शव पंचनामा व शवविच्छेदन अहवाल इ. कागदपत्रे मागणी करुनही दिलेली नाहीत. वास्तविक विरुध्द पक्ष क्र.१ यांनी आपल्या बचावाप्रीत्यर्थ पुराव्याची कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. ज्यावेळी तक्रारकर्ती ह्या जिल्हा आयोगापुढे पोलीस कागदपत्रे दाखल करतात, त्यावेळी त्यांनी विमा दाव्यासोबत ते कागदपत्रे दाखल केलेली नसावीत, हे मान्य करता येत नाही. निश्चितच विमा दाव्याची विरुध्द पक्ष क्र.२ यांच्याद्वारे छाननी करण्यात येते. अपूर्ण कागदपत्रासह तक्रारकर्ती यांना विमा दावा दाखल केल्याचे विरुध्द पक्ष क्र.२ यांचे कथन केलेले नाही. कदाचित तक्रारकर्ती यांचा विमा दावा आवश्यक पोलीस कागदपत्राशिवाय दाखल केला, असे विरुध्द पक्ष क्र.१ यांची धारणा असल्यास त्यांनी तक्रारकर्ती यांना त्याबाबत काही पत्रव्यवहार केल्याचे निदर्शनास येत नाही; किंबहुना तसे त्यांचे कथन नाही. त्यामुळे विमा दाव्यासोबत आवश्यक पोलीस कागदपत्रे प्राप्त झाली नाहीत, हा विरुध्द पक्ष यांचा बचाव ग्राह्य धरता येत नाही.
(११) विरुध्द पक्ष क्र.१ यांचा पुढे बचाव आहे की, विमा करारानुसार तथाकथित घटनेची तात्काळ लेखी माहिती देणे तक्रारकर्ती यांना आवश्यक व बंधनकारक होते आणि विमा कराराचे तक्रारकर्ती यांनी उल्लंघन केले आहे. विरुध्द पक्ष क्र.१ कथन करतात त्याप्रमाणे तक्रारकर्ती यांनी विमा कराराचे उल्लंघन केले, असे दर्शविणारा आवश्यक व उचित पुरावा अभिलेखावर दाखल नाही. उलटपक्षी तक्रारकर्ती यांनी विमा योजनेसंबंधी दाखल केलेल्या पत्रकामध्ये विमा योजनेची मुदत दि.३० नोव्हेंबर, २०१७ पर्यंत आहे आणि अखेरच्या दिवसात झालेल्या अपघाताचे दावे कालावधी संपल्यापासून ९० दिवसाचे आत म्हणजे २७ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहेत, असा उल्लेख आहे.
(१२) शेती व्यवसाय करताना व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात उदा. रस्त्यावरील अपघात, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश व वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही अपघातामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस अशा प्रकारच्या अपघातांमुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे अशा अपघातग्रस्त शेतक-यांस / त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरु केलेली आहे. शेतक-यांना अपघाती विमा संरक्षण देण्यामागे असणारा परोपकारी हेतू व त्यामागील सामाजिक बांधीलकी निदर्शनास येते.
(१३) असे दिसते की, तक्रारकर्ती यांनी दि.५/२/२०१८ रोजी विरुध्द पक्ष क्र.३ तालुका कृषि अधिकारी, तुळजापूर यांच्याकडे विमा दावा दाखल केलेला होता. विमा योजनेनुसार असणा-या दि. २७ फेब्रुवारी, २०१८ तारखेपर्यंत असणा-या मुदतीमध्ये त्यांनी विमा दावा दाखल केलेला आहे. तसेच तक्रारकर्ती यांनी विमा कराराचे उल्लंघन केल्याचे कागदोपत्री सिध्द होत नाही. विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ती यांना विमा रक्कम अदा न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते. तक्रारकर्ती विमा रक्कम रु.2,00,000/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रार दाखल तारखेपासून विमा रकमेवर द.सा.द.शे. 8 टक्के व्याज मिळण्याकरिता तक्रारकर्ती पात्र ठरतात.
(१४) तक्रारकर्ती यांना योग्यवेळी विमा रक्कम प्राप्त झाली नाही. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागता, हे अमान्य करता येणार नाही. तसेच तक्रारकर्ती यांना जिल्हा आयोगापुढे ग्राहक तक्रार दाखल करणे भाग पडले आणि त्यांना खर्च करावा लागला. त्या सर्वांचा विचार करुन तक्रारकर्ती यांना मानसिक त्रास व तक्रार खर्चाकरिता एकत्रितरित्या रु.10,000/- मंजूर करणे न्याय्य वाटते. मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
(१) तक्रारकर्ती यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(२) विरुध्द पक्ष क्र.१ विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना रु.२,००,०००/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.
तसेच दि.२६/८/२०१९ पासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. ८ टक्के दराने व्याज द्यावे.
(३) विरुध्द पक्ष क्र.१ विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना मानसिक त्रास व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- द्यावेत.
(४) विरुध्द पक्ष क्र.१ विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून ४५ दिवसाच्या आत करावी.
(श्री. मुकुंद भगवान सस्ते) (श्री. किशोर दत्तात्रय वडणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/८४२१ )