द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 18/6/2014
प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986, कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटी संदर्भात दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
[1] तक्रारदार विमाननगर, पुणे 14 येथील रहिवासी असून जाबदेणार क्र 1 व 2 हे जाबदेणार यांचे मुख्यालय व पुणे येथील शाखा आहे. तक्रारदार यांचा विवाह श्री. विनायक निवृत्ती गोंधळे यांच्याशी दिनांक 5/5/2001 रोजी झाला व त्यांना कु. शिवम विनायक गोंधळे वय वर्षे 9 व कु. श्रेया विनायक गोंधळे वय वर्षे 5 अशी दोन अपत्ये होती. तक्रारदार यांच्या पतीने जाबदेणार यांच्याकडून विमा पॉलिसी सन 2008 मध्ये घेतली होती व त्याचा सहामही हप्ता रुपये 4200/- असा होता. सन 2010 मध्ये तक्रारदार यांच्या पतींना किडनीचा आजार झाल्याचे समजले व किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुबी हॉल, पुणे येथे दिनांक 15/3/2010 रोजी दाखल करण्यात आले. शस्त्रक्रिया करण्यात आली. संबंधित आजाराची कागदपत्रे तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे दिली होती. तक्रारदार यांच्या पतींना दिनांक 28/11/2010 रोजी हॉस्पिटल मधून सोडण्यात आले. शस्त्रक्रियेचा खर्च रुपये 4,00,000/- आला. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे मेडिक्लेमची चौकशी केली असता मेडिक्लेम रुपये 1,45,000/- देत असल्याचे जाबदेणार यांनी सांगितले. घरी आल्यानंतर तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे मेडिक्लेमसाठी अर्ज व त्यासंबंधीची सर्व बिले व कागदपत्रे सादर केली होती. दिनांक 15/3/2011 रोजी तक्रारदार यांच्या पतींना पुन्हा त्रास होत असल्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले व दिनांक 15/4/2011 रोजी त्यांचे निधन झाले. दिनांक 19/4/2011 रोजी जाबदेणार यांच्याकडून तक्रारदार यांना पत्र मिळाले व त्यामध्ये त्यांनी तक्रारदार यांचा मेडिक्लेम नाकारला होता व पॉलिसी रद्य करुन रुपये 15,000/- चा चेक पाठविला होता. सदरचा चेक तक्रारदार यांनी वटविला नाही. तक्रारदार यांच्या कथनानुसार जाबदेणार यांनी तक्रारदार यांना ऑपरेशन खर्चासाठी रुपये 1,45,000/- व मृत्यूपश्चात मिळणारी डेथ क्लेम पॉलिसी देणे आवश्यक होते. परंतू सदरची रक्कम न देऊन जाबदेणार यांनी सेवेतील त्रुटी केली आहे. सबब सदरची रक्कम व्याजासह मिळावी, त्याचप्रमाणे तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- मिळावे म्हणून तक्रारदारांनी प्रस्तूतची तक्रार दाखल केली आहे.
[2] जाबदेणार यांच्यातर्फे हजर राहून तडजोड पत्र दाखल करण्यात आले. जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीतील विधाने नाकारलेली नाही. जाबदेणार यांच्या तडजोड पत्रानुसार तक्रारदार हे पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार केवळ रुपये 1,42,800/- मिळण्यास पात्र आहेत व जाबदेणार सदरची रक्कम देण्यात तयार आहेत. सबब तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणार करतात.
[3] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, लेखी युक्तीवाद व युक्तीवाद यांचा विचार करुन खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरील मुद्ये, निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना वेळेत पॉलिसीची रक्कम न देऊन निकृष्ट दर्जाची सेवा दिली आहे काय | होय |
2 | आदेश काय | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. |
कारणे-
मुद्या क्र 1 व 2-
[4] तक्रारदारांनी दाखल केलेली कागदपत्रे, कथने व युक्तीवाद यांचा विचार केला असता असे स्पष्ट होते की, तक्रारदार हे केवळ रुपये 1,42,800/- मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार यांनी या तक्रारीमध्ये मेडिक्लेम त्याचप्रमाणे डेथ क्लेम या दोन्हीसाठी मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी मुळ पॉलिसी दाखल केलेली नाही परंतू त्यांनी दाखल केलेल्या विमा प्रस्तावावरुन प्रस्तावात नमूद केलेली रक्कम जाबदेणार देण्यास बांधील आहेत असे दिसून येते. तक्रारदार यांनी जाबदेाार हे डेथ क्लेम व मेडिक्लेम असे दोन्ही क्लेम देण्यास बांधील आहेत असा कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रुपये 1,42,800/- देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे तेवढीच रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सदरची रक्कम मुदतीत न दिल्यामुळे तक्रारदारांना जो मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास झाला, त्यासाठी जाबदेणार हे नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 5,000/- देण्यास व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- देण्यास बांधील आहेत.
वर उल्लेख केलेल्या मुद्यांचे निष्कर्ष व कारणांचा विचार करुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना विम्याची रक्कम वेळेत न
देऊन सेवेत त्रुटी निर्माण केलेली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 1,42,800/- [रुपये एक लाख बेचाळीस हजार आठशे फक्त ] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5,000/- [रुपये पाच हजार फक्त] व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- [रुपये दोन हजार फक्त] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
5. उभय पक्षकारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या
दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत. अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.
स्थळ-पुणे
दिनांक-18/6/2014