जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 13/2023. तक्रार नोंदणी दिनांक : 16/01/2023.
तक्रार दाखल दिनांक : 24/01/2023. तक्रार निर्णय दिनांक : 22/11/2024.
कालावधी : 01 वर्षे 10 महिने 06 दिवस
शिवकांता भ्र. संजय बेलुरे, वय 45 वर्षे,
व्यवसाय : गृहिणी व शेती, रा. देवणी, ता. देवणी, जि. लातूर.
ह. मु. जुना औसा रोड, गणेश नगर, लातूर. :- तक्रारकर्ती
विरुध्द
(1) तालुका कृषि अधिकारी, कार्यालय देवणी, ता. देवणी, जि. लातूर.
(2) शाखाधिकारी, जयका इन्शुरेन्स ब्रोकरेज प्रा. लि.,
रजिस्टर्ड ऑफीस, दुसरा मजला, जयका बिल्डींग,
कमर्शियल रोड, सिव्हील लाईन्स्, नागपूर - 440 001.
(3) विभागीय व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.,
विभागीय कार्यालय : ऑफीस नं. 201, दुसरा मजला, विनर्स कोर्ट,
झेड. के. वरती, लुल्ला नगर, सहाने सुजान पार्क, पुणे - 411 040. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती वैशाली म. बोराडे, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. अनिल क. जवळकर
विरुध्द पक्ष क्र.1 :- स्वत: / प्रतिनिधी
विरुध्द पक्ष क्र. 2 :- डाकेद्वारे लेखी निवेदनपत्र दाखल
विरुध्द पक्ष क्र. 3 यांचेतर्फे विधिज्ञ :- श्री. एस. व्ही. शास्त्री
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व खातेदार शेतकरी व शेतक-याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार नोंद नसलेल्या एका सदस्याचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे दि.10/12/2019 ते 9/12/2020 कालावधीमध्ये विमा उतरविलेला होता. त्यानुसार विमा कालावधीमध्ये शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना रु.2,00,000/- भरपाई देण्याची जोखीम विमा कंपनीने स्वीकारलेली आहे.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, त्यांचे पती संजय उमाकांत बेलुरे (यापुढे "मयत संजय") यांचे वडील उमाकांत गुरपदप्पा बेलुरे यांचे नांवे मौजे देवणी (बु.), ता. देवणी, जि. लातूर येथे गट क्र. 247/259/2 मध्ये 03 हे. 47 आर. शेतजमीन क्षेत्र होते आणि फेरफार क्र. 580, दि.11/6/1976 अन्वये ते शेतजमीन क्षेत्र त्यांच्या नांवे झालेले होते. मयत संजय हे उमाकांत बेलुरे यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार शेतकरी होते.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "तालुका कृषि अधिकारी") यांचे देवणी, ता. देवणी येथे कार्यालय आहे आणि विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "जयका इन्शुरन्स") हे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्याकरिता विमा कंपनीचे सल्लागार आहेत.
(4) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दि.7/7/2020 रोजी मयत संजय हे सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्र. एम.एच.24 ए.एच.8948 वरुन लातूर शहरातील बसवेश्वर चौकातून घरी परतत असताना त्यांची दुचाकी घसरुन पडली आणि झालेल्या घटनेमध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली. त्यांना वैद्यकीय उपचाराकरिता रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान दि.16/7/2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिका-यांच्या एम.एल.सी. पत्रान्वये विवेकानंद पोलीस ठाणे, लातूर येथे आकस्मित मृत्यू क्र. 18/2020 अन्वये नोंद करण्यात आली. त्यानंतर मरणोत्तर पंचनामा व घटनास्थळ पचंनामा करण्यात येऊन मयत संजय यांची शवचिकित्सा करण्यात आली. शवचिकित्सा अहवालामध्ये मयत संजय यांच्या डोक्यास मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.
(5) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर कागदपत्रांची जुळवाजुळव करुन तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे संचिका सादर केली आणि तालुका कृषि अधिका-यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्यामार्फत जयका इन्शुरन्स यांच्याकडे संचिका दाखल केली. तसेच त्यांनी कागदपत्रांच्या त्रुटीची पूर्तता केलेली आहे. त्यानंतर विमा दाव्याबद्दल चौकशी केली असता विमाधारकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याच्या कारणास्तव विमा दावा नामंजूर करण्यात आल्याचे कळविण्यात आले.
(6) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, मयत संजय यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना होता; परंतु घटनेच्या वेळी तो गहाळ झाल्यामुळे त्यांना मिळू शकला नाही आणि विमा कंपनीकडे दाखल करता आला नाही. अंतिमत: विमा कंपनीने चुकीच्या कारणास्तव विमा दावा नामंजूर करुन सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केल्याचे नमूद करुन रु.2,00,000/- विमा रक्कम व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रसाकरिता रु.20,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.20,000/- देण्याचा तालुका कृषि अधिकारी, जयका इन्शुरन्स व विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती केलेली आहे.
(7) तालुका कृषि अधिकारी यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश कथने सिध्द करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ती यांनी त्यांच्याकडे दाखल केलेली विमा संचिका त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्याकडे पाठविली. त्यानंतर जयका इन्शुरन्स यांच्यामार्फत विमा कंपनीकडे संचिका दाखल करण्यात आली. विमा कंपनीने दि.2/12/2021 रोजी विमा संचिका नामंजूर केली. विमा मंजूर किंवा नामंजूर करण्याचे अधिकार विमा कंपनीस आहेत. विमा योजनेची माहिती व कागदपत्रांबद्दल त्यांनी मयत संजय यांच्या वारसांना मदत केलेली असून योजनेनुसार आवश्यक कार्य केलेले आहे. त्यांना अनावश्यक पक्षकार करण्यात आलेले आहे आणि तक्रारकर्ती त्यांच्या ग्राहक नाहीत. अंतिमत: त्यांच्याविरुध्द ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(8) जयका इन्शुरन्स यांनी डाकेद्वारे लेखी निवेदनपत्र दाखल केले. सर्वप्रथम त्यांनी अपघात विमा योजनेखाली प्राप्त होणा-या दाव्यासंबंधी होणा-या कार्यपध्दतीचा तपशील नमूद केला. त्यांच्या कथनाप्रमाणे दावा मंजूर-नामंजुरीची बाब विमा कंपनीच्या अखत्यारीत असते आणि जयका इन्शुरन्स हे केवळ मध्यस्त आहेत. त्यांचे पुढे कथन आहे की, दि.24/3/2021 रोजी मयत संजय यांचा दावा प्रस्ताव त्यांना प्राप्त झाला. दाव्याची छाननी करुन दि.14/9/2021 रोजी पुढील निर्णयाकरिता विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. परंतु विमा कंपनीने दि.2/11/2021 रोजी विमाधारकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याच्या कारणासतव विमा दावा नामंजूर केला. जयका इन्शुरन्सने त्यांची जबाबदारी त्वरीत व व्यवस्थित पार पाडली आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. अंतिमत: न्यायालयीन प्रक्रियेतून त्यांना वगळण्यात यावे, अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
(9) विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने अमान्य केले आहेत. विमा कंपनीचे कथन असे की, गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेनुसार आवश्यक कागदपत्रे दाखल करण्यास तक्रारकर्ती असमर्थ असल्यामुळे योजनेचे लाभ मिळण्यास पात्र नाहीत. महाराष्ट्र शासनाच्या दि.19/9/2019 रोजीच्या शासन परिपत्रकाच्या "प्रपत्र-क" च्या अ.क्र. 1 नुसार अपघाताचे स्वरुप रस्ता अपघात असल्यास विमा संरक्षीत व्यक्ती वाहन चालविताना अपघात झालेला असेल तर मोटार वाहन परवाना दाखल करणे आवश्यक आहे. तसेच अ.क्र.20 नुसार शेतक-याचा मृत्यू वाहन अपघातामध्ये झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वत: वाहन चालवत असेल तरी अशा प्रकरणामध्ये वाहन चालविण्याचा परवाना सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये मयत संजय हे अपघातसमयी स्वत: दुचाकी चालवत होते आणि त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना दाव्यासोबत दाखल केलेला नाही. शासन परिपत्रक, विमा करार व दाखल कागदपत्रांच्या अनुषंगाने तक्रारकर्ती यांचा विमा प्रस्ताव दि.2/12/2021 रोजीच्या अंतीम अस्वीकार पत्रानुसार नामंजूर केला आहे. तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे आणि कायद्याचे उल्लंघन करुन घडलेल्या अपघातामध्ये विमा रक्कम देय नाही. मयत संजय यांनी हयगय व निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे अपघातास स्वत: कारणीभूत व दोष ठरले आहेत. दि.19/9/2019 च्या परिपत्राकातील कलम 8 अन्वये अपघातग्रस्त चालकाच्या चुकीमुळे शेतक-याचा मृत्यू झाल्यास त्याचे वारसदार विमा रक्कम मिळण्यास पात्र नाहीत. अंतिमत: तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.
(10) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनी, जयका इन्शुरन्स व तालुका कृषि अधिकारी यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञाचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे मुद्दे निश्चित करण्यात येऊन त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यापुढील उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ती यांना विमा सेवा
देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(11) मुद्दा क्र. 1 ते 3 :- प्रामुख्याने, विमा कंपनीतर्फे महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांना अपघाती विमा संरक्षण दिलेले होते, याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. तक्रारकर्ती यांच्यातर्फे अभिलेखावर महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचा दि.19/9/2019 चा शासन निर्णय अभिलेखावर दाखल करण्यात आलेला आहे. मयत संजय यांचे वडील उमाकांत गुरपदप्पा बेलुरे यांचे नांवे मौजे देवणी (बु.), ता. देवणी, जि. लातूर येथे भुमापन क्रमांक व उपविभाग : 247/259/2 मध्ये 03 हे. 47 आर. शेतजमीन क्षेत्र असल्याचे दर्शविणारा 7/12 उतारा अभिलेखावर दाखल आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व त्या शेतक-याच्या कुटुंबातील कोणताही 1 वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या 2 व्यक्तीस विमाछत्र प्रदान केलेले आहे. त्या अनुषंगाने मयत संजय हे गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेनुसार विमाक्षत्राकरिता लाभार्थी ठरतात.
(12) अभिलेखावर दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयाचे मेडिको लिगल केसचे सूचनापत्र, पोलीस घटनास्थळ पंचनामा, मरनोत्तर पंचनामा व शवचिकित्सा अहवाल इ. कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत संजय यांचा दुचाकी घसरुन पडल्यामुळे अपघात झाल्याचे व त्या अपघातामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. मयत संजय यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती यांनी विमा रक्कम मिळण्यासाठी विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला. परंतु विमा कंपनीने दि.2/12/2021 रोजीच्या पत्राद्वारे मयत संजय यांचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल न केल्याच्या कारणास्तव दावा नामंजूर केल्याचे दिसून येते.
(13) तक्रारकर्ती यांच्यातर्फे निवेदन असे की, मयत संजय यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना होता; परंतु घटनेच्या वेळी तो गहाळ झाल्यामुळे त्यांना मिळू न शकल्यामुळे विमा कंपनीकडे दाखल करता आला नाही. त्यामुळे विमा कंपनीने चुकीच्या कारणास्तव विमा दावा नामंजूर करुन सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उलटपक्षी, विमा कंपनीचे निवेदन असे की, विमा संरक्षीत व्यक्ती वाहन चालविताना अपघात झालेला असेल तर मोटार वाहन परवाना दाखल करणे आवश्यक आहे. मयत संजय हे अपघातसमयी स्वत: दुचाकी चालवत होते आणि त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना दाव्यासोबत दाखल केलेला नसल्यामुळे तक्रारकर्ती यांचा विमा प्रस्ताव दि.2/12/2021 रोजीच्या अंतीम अस्वीकार पत्रानुसार नामंजूर केला आहे.
(14) युक्तिवादाच्या वेळी तक्रारकर्ती यांच्या विधिज्ञांनी दि.19/9/2019 रोजीच्या शासन निर्णयाकडे जिल्हा आयोगाने लक्ष वेधले. त्यांनी कलम 19 चा आधार घेतला आणि ज्यामध्ये 'अपघाती मृत्यू संदर्भात दूर्घटना घडल्याचे सिध्द झाल्यास अनावश्यक धोका पत्करला या कारणास्तव एकही प्रकरण नाकारता येणार नाही', असा मजकूर निदर्शनास येतो. विधिज्ञांनी असाही युक्तिवाद केला की, अपघातामध्ये मयत संजय यांचा कोणताही निष्काळजीपणा नव्हता आणि अपघातासाठी मयत संजय दोषी नसल्यामुळे दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना नसणे, ही बाब गौण ठरते.
(15) महाराष्ट्र शासनाच्या दि.19/9/2019 च्या शासन निर्णयामध्ये कलम 18 मध्ये "अपघातग्रस्त वाहन चालकाचे चुकीमुळे शेतक-यांचा मृत्यू झाल्यास / अपंगत्व आल्यास दोषी वाहन चालक वगळता, सर्व अपघातग्रस्त शेतक-यांचे केवळ अपघात झाला या कारणास्तव विम्याचे दावे मंजूर करावेत." व कलम 20 मध्ये "जर शेतक-याचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वत: वाहन चालवत असेल तर अशा प्रकरणी वाहन चालवण्याचा परवाना सादर करणे आवश्यक राहील" अशा तरतुदी निदर्शनास येतात. शासन तरतुदीनुसार वाहन चालविणा-या शेतक-याचा अपघात झाल्यास त्याचा वाहन चालविण्याचा परवाना सादर करणे आवश्यक असले तरी विमा दावा निर्णयीत करताना ते कलम अपवर्जन असल्याचे दिसत नाही. निर्विवादपणे, कलम 18 अन्वये दोषी वाहन चालक वगळता सर्व अपघातग्रस्त शेतक-याचे विमा दावे मंजूर करण्याचे निर्देश दिसतात. या ठिकाणी मुद्दा उपस्थित होतो की, मयत संजय हे दुचाकी वाहन चालवत असताना त्यांची चूक किंवा दोष आढळतो काय ? हे सत्य आहे की, मयत संजय हे दुचाकी चालवत असताना दुचाकी घसरुन पडल्यामुळे अपघातामध्ये मृत्यू पावले. अभिलेखावर पोलीस घटनास्थळ पंचनामा आहे. त्यानुसार घटनास्थळाच्या 3 फुटाच्या अंतरावर 8 फुट उंचीची कच्च्या माती व बारीक दगड असलेले फुटपाथ असल्याचे नमूद आहे. अशा स्थितीत, घटनास्थळावर माती व बारीक दगड होते आणि माती व बारीक दगडामुळे मयत संजय यांची दुचाकी घसरली, असे अनुमान काढणे उचित आहे. आमच्या मते, अपघाती घटनेमध्ये मयत संजय यांचा दोष आढळून येत नसल्यामुळे मयत संजय यांचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल करण्याचा विमा कंपनीचा आग्रह अनुचित ठरेल.
(16) तक्रारकर्ती यांच्यातर्फे विधिज्ञांनी मा. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाच्या ‘लताबाई रावसाहेब देशमुख /विरुध्द/ महाराष्ट्र शासन व इतर-2’, 2019 (2) ALL MR 859 या निवाड्याचा संदर्भ सादर करुन वाहन चालविण्याचा परवाना दाखल केला नसल्यास विमा दावा नामंजूर करता येणार नाही, असे निवेदन केले.
(17) आमच्या मते, मयत संजय यांचा वाहन चालविण्याचा परवाना विमा कंपनीकडे दाखल केला नसला तरी उक्त विवेचनाअंती विमा कंपनीने तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे सिध्द होते आणि तक्रारकर्ती ह्या रु.2,00,000/- विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरतात. तक्रारकर्ती यांनी विमा रकमेची अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने मागणी केलेली आहे. प्रचलित दरानुसार व्याज दर निश्चित होणे आवश्यक असल्यामुळे प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.2/12/2021 पासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देण्याचे विमा कंपनीस निर्देश करणे न्यायोचित आहे.
(18) तक्रारकर्ती यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.20,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.20,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. असे दिसते की, विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना विमा रक्कम न दिल्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. तसेच तक्रारकर्ती यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहोत.
(19) जयका इन्शुरन्स हे विमा सल्लागार असून तालुका कृषि अधिकारी हे शासकीय यंत्रणेचा भाग आहेत. तक्रारकर्ते यांना द्यावयाच्या विमा रकमेसंबंधी त्यांनी सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ती यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम आणि त्या रु.2,00,000/- रकमेवर दि.2/12/2021 पासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीने प्रस्तुत आदेशांची अंमलबजावणी प्रस्तुत आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत करावी.
(श्रीमती वैशाली म. बोराडे) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-