जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
किरकोळ अर्ज क्रमांक : 9/2022. अर्ज दाखल दिनांक : 19/12/2022. आदेश दिनांक : 04/01/2023.
कालावधी : 00 वर्षे 00 महिने 16 दिवस
उमादेवी शिवहार गुगळे, वय 42 वर्षे, व्यवसाय : घरकाम व शेती,
रा. शिरुर अनंतपाळ, ता. शिरुर अनंतपाळ, जिल्हा लातूर. अर्जदार
विरुध्द
(1) तालुका कृषि अधिकारी,
कार्यालय : शिरुर अनंतपाळ, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर.
(2) शाखाधिकारी, जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि.,
रजिस्टर्ड ऑफीस, दुसरा मजला, जयका बिल्डींग,
कमर्शियल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर - 440 001.
(3) विभागीय व्यवस्थापक, दी ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि.,
विभागीय कार्यालय : 3, 321/ए/2, ओस्वाल बंधु समाज बिल्डींग,
जे.एन. रोड, हॉटेल सेवन लव्हज् समोर, पुणे - 411 002. उत्तरवादी
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
अर्जदार यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. अनिल क. जवळकर
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) ग्राहक तक्रार दाखल करण्यासाठी झालेला विलंब क्षमापीत होण्याकरिता अर्जदार यांनी प्रस्तुत अर्ज सादर केला आहे.
(2) अर्जदार यांचे कथन असे की, विरुध्द पक्ष क्र.3 यांनी दि.27/10/2019 रोजीच्या पत्राद्वारे विमा दावा नामंजूर केला; परंतु ते पत्र दि.16/3/2020 रोजी पाठविण्यात येऊन दि.22/3/2020 रोजी प्राप्त झाले. मार्च 2020 पासून कोविड-19 (कोरोना) वैश्विक महामारीमुळे लॉकडाऊन होते आणि मा. सर्वोच्च न्यायालयाने दि.15/3/2020 ते 2/10/2021 कालावधीकरिता विलंब माफीच्या अनुषंगाने शिथिलता दिलेली होती. त्या अनुषंगाने ग्राहक तक्रार दाखल करण्यासाठी अर्जदार यांना दि.22/3/2022 पर्यंत मुदत होती; परंतु दि.19/12/2022 रोजी ग्राहक तक्रार दाखल करीत आहेत आणि 8 महिने 27 दिवस विलंब क्षमापित करण्यात यावा, अशी विनंती केलेली आहे.
(3) अर्जदार यांचेकरिता विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले.
(4) असे दिसते की, विरुध्द पक्ष क्र.3 यांनी दि. 27/10/2019 रोजी अर्जदार यांचा विमा दावा नामंजूर केला. अर्जदार यांच्या कथनानुसार ते पत्र दि.22/3/2020 रोजी प्राप्त झाले. विमा दावा नामंजूर करणारे पत्र नोंदणीकृत डाकेद्वारे पाठविल्याचे दिसून येते. तसेच लिफाफ्यावर दि.16/3/2020 तारखेचा शिक्का निदर्शनास येतो. विरुध्द पक्ष क्र.3 यांचे विमा दावा नामंजूर करणारे पत्र दि.27/10/2019 रोजीचे असले तरी ते दि.16/3/2020 रोजी पाठविण्यात येऊन अर्जदार यांना दि.22/3/2020 रोजी प्राप्त झाले. त्या अनुषंगाने, आमच्या मते, दि.22/3/2020 रोजी अर्जदार यांच्या ग्राहक तक्रारीकरिता वादकारण निर्माण झाले.
(5) ग्राहक संरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार वादकारण निर्माण झाल्यानंतर 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ग्राहक तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. अर्जदार यांनी दि.19/12/2022 रोजी ग्राहक तक्रार व विलंब माफीचा प्रस्तुत अर्ज सादर केला आणि अर्जदार यांच्या कथनानुसार त्यांना 8 महिने 27 दिवस विलंब झाल्याचे निवेदन केले.
(6) मा. राष्ट्रीय आयोगाच्या निर्देशानुसार दि.15/3/2020 ते 28/2/2022 कालावधीमध्ये मुदत संपुष्टात येणा-या रिव्हीजन पिटीशन, प्रथम अपील, ग्राहक तक्रार, लेखी निवेदनपत्र, अर्ज इ. करिता मुदतीच्या अनुषंगाने दि.15/3/2020 ते 28/2/2022 कालावधी अपवर्जित केलेला आहे. तसेच त्या कालावधीमध्ये दि.1/3/2022 पासून 29/5/2022 पर्यंत वाढ केलेली आहे. अर्जदार यांच्या ग्राहक तक्रारीकरिता दि.22/3/2020 रोजी वादकारण निर्माण झाले आणि ते वादकारण दि.15/3/2020 ते दि.29/5/2022 28/2/2022 ह्या अपवर्जित कालावधीमध्ये असल्यामुळे अर्जदार यांच्या ग्राहक तक्रारीकरिता दि.30/5/2022 पासून वादकारण सुरु होते. त्यामुळे अर्जदार यांना दि.30/5/2022 पासून 2 वर्षाच्या अवधीमध्ये ग्राहक तक्रार दाखल करण्याची मुदत आहे. परंतु अर्जदार यांनी दि.19/12/2022 रोजी ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे आणि ग्राहक तक्रार दाखल करण्यासाठी त्यांना विलंब झाल्याचे निदर्शनास येत नाही. त्या अनुषंगाने अर्जदार यांचा अर्ज कायदेशीरदृष्टया समर्थनिय नसल्यामुळे निकाली काढणे न्यायोचित आहे.
आदेश
(1) किरकोळ अर्ज निकाली काढण्यात येतो.
(2) ग्राहक तक्रार नोंदविण्यात यावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-