(पारीत व्दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्या )
(पारीत दिनांक- 22 एप्रिल, 2022)
01. तक्रारीकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा -2019 च्या कलम-35 खाली विरुध्दपक्ष ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी आणि इतर यांचे विरुध्द मृतक शेतक-याचे अपघाती मृत्यू संबधात शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे तिचा मुलगा प्रबुध्द सुर्यभान रामटेके, वय-28 वर्ष हा उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत होता आणि तो व्यवसायाने शेतकरी होता. तो अविवाहीत असल्याने त्याचे मृत्यू नंतर कायदेशीर वारसदार म्हणून आई या नात्याने तक्रारकर्ती ही वारसदार आहे. दिनांक-24.06.2017 रोजी श्रीमती रंजिता पुरुषोत्तम खोब्रागडे, राहणार नेरला हिचे राहते घरा समोरील अंगणात रात्री 09.30 वाजताचे दरम्यान साप निघाल्याने तिने आरडाओरड केली. तक्रारकर्तीचा मुलगा प्रबुध्द सुर्यभान रामटेके हा घटनास्थळावर आला आणि त्याने काठीने साप मारला. साप मृत पावला असे समजून तो साप काठीने उचलून फेकत असताना सापाने प्रबुध्द याचे डाव्या हाताचे आंगठयाला चावा घेतला त्यामुळे प्रबुध्द यास ग्रामीण रुग्णालय अडयाळ येथे वैद्दकीय उपचारा करीता नेले आणि तेथून सामान्य रुग्णालय, भंडारा येथे उपचारार्थ भरती केले असता त्याचा वैद्दकीय उपचाराचे दरम्यान दिनांक-25.06.2017 रोजी सकाळी 11.30 वाजता मृत्यू झाला. पोलीस स्टेशन, अडयाळ यांनी अकस्मात मृत्यू सूचना म्हणून नोंद घेतली तसेच घटनास्थळावर पोलीसांनी पंचनामा तयार करुन त्यामध्ये साप चावून उपचारा दरम्यान मृत्यू असे कारण नमुद केले. डॉक्टरांनी केलेल्या शवविच्छेदन अहवाला मध्ये मृत्यूचे कारण “The Post Mortem findings are consistent with that of death due to Snake Bite” असे नमुद केलेले आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी असून त्यांचे कडे विमा दावा दाखल केल्या जातो व पुढे विरुध्दपक्ष क्रं 2 जिल्हा कृषी अधिकारी यांचे मार्फतीने सदर विमा दावा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं 4 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज यांचे कडे पाठविल्या जातो. विरुध्दपक्ष क्रं 4 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज कंपनी विमा दाव्याची छाननी करुन अटी व शर्तीची पुर्तता संबधितां कडून करवून घेऊन पुढे विमा दावा प्रस्ताव विमा निश्चीतीसाठी विमा कंपनीकडे पाठवितात. तिचे मुलाचे अपघाती मृत्यू नंतर तिने विमा दावा आवश्यक सर्व दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी, पवनी जिल्हा भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-20.09.20017 रोजी दाखल केला तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांनी वेळोवेळी मागितलेल्या दस्तऐवजाची पुर्तता केली. परंतु तिचे विमा दाव्या संबधात काहीही कळविले नाही. विरुध्दपक्ष क्रं 2 जिल्हा कृषी अधिकारी, भंडारा यांचे कडे माहिती अधिकारा अंतर्गत विम्याचे दाव्याची माहिती मागितली असता विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कपंनीने दिनांक-19 जून, 2019 रोजी तिचा विमा दावा खारीज केल्याचे समजले. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने तिचा विमा दावा फेटाळून दोषपूर्ण सेवा दिली म्हणून तिने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा रक्कम मिळण्यासाठी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल करुन त्याव्दारे पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
- तक्रारकर्तीचे मुलाचे अपघाती मृत्यू मुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- आणि सदर रकमेवर मृतकाचे मृत्यू दिनांका पासून ते रकमेच्या अदायगी पावेतो द.सा.द.शे.12 टक्के दराने व्याज विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांचे कडून वैयक्तिक किंवा संयुक्तिकरित्या देण्याचे आदेशित व्हावे.
- सदर तक्रारीचा खर्च विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांचे कडून देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद तीचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी, पवनी, जिल्हा भंडारा यांनी लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले, त्यांनी लेखी उत्तरात मृतक प्रबुध्द सूर्यभान रामटेके हा अविवाहित होता आणि तक्रारकर्ती त्याची आई या नात्याने कायदेशीर वारसदार असल्याची बाब तसेच मृतक हा 7/12 उतारा व गावनमुना 8 अ नुसार व्यवसायाने शेतकरी होता आणि त्याचा मृत्यू दिनांक-25.06.2017 रोजी झाला होता या बाबी मान्य केल्यात. पोलीस घटनास्थळ पंचनाम्या प्रमाणे मृतकाचा मृत्यू हा सर्पदंशामुळे झालेला असल्याचे नमुद केले. तक्रारकर्तीने त्यांचे कार्यालयात दिनाक-20.09.2017 रोजी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्या करीता विमा दावा दाखल केला होता आणि त्यांनी कोणताही विलंब न लावता सदर विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 2 जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात पत्र क्रं-1622, दिनांक-25.09.2017 रोजी सादर केला होता. परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीने तिचा विमा दावा व्हीसेरा रिपोर्ट वरुन नामंजूर केला, विमा दावा मंजूर अथवा नामंजूर करण्याचे अधिकार विमा कंपनीला आहेत असे नमुद केले.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांनी आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले, त्यांनी आपले लेखी उत्तरा मध्ये तक्रारीतील परिच्छेद क्रं 4 ते 9 मधील मजकूर मान्य केला. मात्र परिच्छेद क्रं 1 ते 3 आणि परिच्छेद क्रं 10 ते 12 मधील बाबी त्यांचेशी संबधित नसल्याचे नमुद केले. विरुध्दपक्ष क्रं 1 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालया कडून त्यांना तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्ताव दिनांक-26.09.2017 रोजी प्राप्त झाला आणि त्यांनी कोणताही विलंब न करता सदर विमा दावा प्रस्ताव जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. नागपूर यांचे कडे दिनांक-24.10.2017 रोजी सादर केला. विमा दावा मंजूर करणे अथवा नामंजूर करणे ही सर्वस्वी विमा कंपनीचे अधिकारातील बाब असल्याचे नमुद केले.
05. विरुध्दपक्ष क्रं 3 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी तर्फे लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करण्यात आले. विमा कंपनीचे लेखी उत्तरा प्रमाणे मृतक प्रबुध्द सुर्यभान रामटेके हा ज्या दिवशी मरण पावला त्या कालाधीत त्याचे नावाची नोंद जमीनीचे अभिलेख 7/12 मध्ये नव्हती. ज्या शेतक-यांचे शेतीचे मालकी हक्काची नोंद 7/12 मध्ये असते अशाच शेतक-यांचा विमा शासना मार्फत काढल्या जातो आणि त्यांचे विम्या संबधीचा हप्ता हा विरुध्दपक्ष विमा कंपनीला प्राप्त होतो. प्रस्तुत 593/3 या गट नंबरच्या जमीनीची फेरफार क्रं 598, दिनांक-04.04.2008 असे दर्शविते की, सदर जमीनीच्या 7/12 उता-यामध्ये सरकारचे नाव दर्ज झालेले होते व ते आज पर्यंत कायम आहे याचाच अर्थ मृतकाचा विमा काढलेला नव्हता आणि म्हणून तक्रारकर्ती ही विमा योजने प्रमाणे रक्कम मिळण्यास पात्र नाही. मृतकाचा मृत्यू हा दिनांक-25.06.2017 रोजी झाला होता परंतु त्याचा मृत्यू हा सर्प दंशामुळेच झाला होता ही बाब निर्विवाद पणे सिध्द झालेली नाही. मृतकाचे व्हीसेरा परिक्षण अहवालाचे वाचन केले असता मृतकाची त्वचा व रक्ताचे नमुने परिक्षणा करीता नागपूरच्या शासकीय प्रयोगशाळे मध्ये पाठविण्यात आले होते परंतु त्यात सर्पाचे विष आढळून आले नाही यामुळे मृतकाचा मृत्यू हा सर्पदंशामुळे झाला होता ही बाब निर्विवादपणे सिध्द झालेली नाही. केवळ पोलीस दस्तऐवज हे मृतकाचे मृत्यूचे कारण निर्विवादपणे सिध्द करण्यास उपयुक्त दस्तऐवज नाहीत. ग्रामपंचायतीला वारसान प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नाहीत, त्यामुळे वारसान दाखला नाकारण्यात येतो. तक्रारकर्तीने विमा दावा सन-2017 मध्ये दाखल केला होता व दावा नाकारल्याचे तक्रारकर्तीला कळविण्यात आले होते त्यानंतर एक वर्षाचे कालावधीत तक्रारकर्तीने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल करणे आवश्यक होते परंतु तक्रारकर्तीने एक वर्षाचा कालावधी गेल्या नंतर तक्रार दाखल केलेली असल्याने ती मुदतबाहय आहे. ज्या शेतक-यांची नावे सन-2016-2017 मध्ये 7/12 उता-यामध्ये असतील अशा प्रत्येक शेतक-यासाठी रुपये-12/- प्रमाणे विमा हप्ता विमा कंपनीला मिळतो परंतु मृतकाचे नावाची नोंद 2016-2017 मध्ये जमीन अभिलेखा मध्ये होती असे कोणतेही दस्तऐवज तक्रारकर्तीने दाखल केलेले नाही. मृतकाचे जमीन मालकीची नोंद अभिलेखा मध्ये नसल्यामुळे तक्रारकर्ती विमा दावा मिळण्यास पात्र नाही. तक्रारकर्ती ही विमा कंपनीची ग्राहक होत नाही, सबब तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष ओरिएन्टल एश्योरन्स कंपनी लिमिटेड, नागपूर तर्फे श्री विनोद इंगळे, उपविभागीय प्रबंधक यांनी केली.
06. विरुध्दपक्ष क्रं 4 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर यांनी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष लेखी उत्तर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरात नमुद केले की, मृतक शेतक-याचा विमा दावा प्रस्ताव दस्तऐवजासह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कडून त्यांना दिनांक-25.11.2017 रोजी प्राप्त झाला होता आणि त्यांनी सदर विमा दाव्याची छाननी करुन पुढे तो विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडे दिनांक-14.12.2017 रोजी
पाठविला होता. विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने मृतकाचे व्हीसेरा मध्ये विष नसल्याने दिनांक-19.06.2019 च्या ई मेल व्दारे नामंजूर केला. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 4 यांनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
07. तक्रारकर्तीची तक्रार व दाखल दस्तऐवज, विरुध्दपक्षांची लेखी उत्तरे, तसेच तक्रारकर्तीचा शपथे वरील पुरावा आणि तक्रारकर्ती व विमा कंपनीचा लेखी व मौखीक युक्तीवाद यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे न्यायनिवारणार्थ उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | सदर तक्रार मुदतीमध्ये आहे काय? | -होय- |
2 | मृतकाचा मृत्यू हा सर्पदंशामुळे झाल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
3 | विमा योजनेच्या कालावधीत मृतकाचे नाव विमा योजने मध्ये समाविष्ट होते ही बाब त.क. यांनी पुराव्यानिशी सिध्द केलेली आहे काय? | -नाही- |
4 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
मुद्दा क्रं 1 ते क्रं 4 बाबत-
08. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा यांनी माहिती अधिकारा अंतर्गत दिलेल्या माहिती वरुन विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने मृतक प्रबुध्द रामटेके याचा विमा दावा व्हीसेरा अहवाला मध्ये विष आढळून आले नसल्याचे कारण दर्शवून दिनांक-19 जून, 2019 रोजी नाकारला असल्याचे नमुद आहे. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दिनांक-09.09.2020 रोजी दाखल केलेली आहे. या प्रकरणा मध्ये तक्रारीचे कारण हे विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारल्याचे दिनांकास म्हणजे दिनांक-19 जून, 2019 रोजी घडलेले आहे आणि ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे तक्रारीचे कारण घडल्या पासून दोन वर्षाचे आत जिल्हा ग्राहक आयोगा समोर तक्रार दाखल करता येते आणि तक्रारकर्तीने दिनांक-09.09.2020 रोजी मुदतीचे आत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीचे तक्रार मुदतीत नसल्याचे आक्षेपा मध्ये कोणतेही तथ्य दिसून येत नाही. तक्रार मुदतीत असल्याने आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
09. पोलीसस्टेशन अडयाळ, उपविभाग पवनी यांचे अकस्मात मृत्यू सूचने प्रमाणे आणि घटनास्थळ पंचनाम्या मध्ये मृतमाचे मृत्यूचे कारण हे सर्प दंशामुळे उपचारा दरम्यान मृत्यू असे नमुद केलेले आहे. मृतकाचे शवविच्छेदन अहवाला मध्ये Skin from Lt. Thumb containing Bite Mark असे नमुद केलेले आहे. शासकीय रासायनिक प्रयोग शाळा, नागपूर यांचे दिनांक 03 ऑक्टोंबर, 2018 चे अहवाला नुसार Result of Analysis- Result for the presence of Snake Venom using polyvalent and sake venom serum is negative for exhibits (1) (2) and(3) असे नमुद आहे आणि
रासायनिक प्रयोग शाळेच्या अहवाला प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारलेला आहे परंतु केवळ रासायनिक प्रयोग शाळेच्या अहवाला वर विसंबून राहून विमा दावा विमा कंपनीला नाकारता येणार नाही अशा आशयाचे अनेक निकाल यापूर्वी मा. वरिष्ठ न्यायालयांनी दिलेले आहेत. सर्पदंशाचे प्रकरणात पोलीसांनी नोंदविलेले जाब जबाब, पंचनामा तसेच शवविच्छेदन अहवालाचा विचार व्हावा असे मा..वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयां मध्ये नमुद आहे. शव विच्छेदन अहवाला मध्ये मृतकाचे डाव्या अंगठयास सर्प दंशाचे चिन्ह असल्याचे नमुद आहे त्यामुळे मृतकाचा मृत्यू हा सर्पदंशामुळे झाल्याची बाब सिध्द होते. विरुध्दपक्ष विमा कंपनीने केवळ व्हीसेरा अहवालाचे आधारे मृतकाचा मृत्यू सर्पदंशामुळे झालेला नाही असा जो निष्कर्ष काढला तोच मूळात चुकीचा आहे. मृतकाचा मृत्यू हा सर्पदंशामुळे झालेला होता ही बाब पुराव्यानिशी सिध्द झालेली असल्याने आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
10. विरुध्दपक्ष क्रं 3 ओरिएन्टल अॅश्योरन्स कंपनीने लेखी उत्तरात असा आक्षेप घेतला की, मृतक श्री प्रबुध्द सूर्यभान रामटेके याचा दिनांक-25.06.2017 रोजी मृत्यू झाला होता आणि सन-2016-2017 या वर्षात त्याचे नावाची जमीन अभिलेखा मध्ये शेतकरी म्हणून नोंद नसून त्याऐवजी सदर जमीनीवर शासनाचे नावाची नोंद आहे. प्रकरणातील दाखल गाव नमुना-7/12 चे उता-यावरुन असे दिसून येते की, मौजा नेरला, तलाठी साझा क्रं 1, तालुका पवनी, जिल्हा भंडारा येथील भूमापन क्रं 591/3 मध्ये फेरफार क्रं-261, दिनांक-31.1.1995 नुसार शुक्रकुमार सूर्यभान, तथागत सूर्यभान, प्रबुध्द सूर्यभान-अ व तेजस सूर्यभान-अ.पा.क. भाऊ शुक्रकुमार यांची नावे नमुद आहेत परंतु सदर नावे खोडलेली असून त्याऐवजी फेरफार क्रं 598, दिनांक-04.04.2008 अनुसार सदर शेती विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर गोसेखुर्द प्रकल्प यांनी संपादित केल्याची नोंद आहे. थोडक्यात विरुध्दपक्ष विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, सन 2008 मध्येच मृतकाची जमीन ही विदर्भ पाटबंधारे विभागाने संपादित केलेली होती आणि सन-2017 मध्ये मृतकाचा मृत्यू झालेला आहे. ज्या शेतक-यांचे नावाची नोंद 7/12 उता-या मध्ये असते अशाच शेतक-यांचा विमा हप्ता रक्कम विमा कंपनीला मिळते. सन-2016-2017 मध्ये मृतकाचे नावाची शेतकरी म्हणून नोंद नसल्यामुळे शासना कडून मृतकाचे विम्याचा हप्ताची रक्कम विरुध्दपक्ष विमा कंपनीला मिळालेली नव्हती, मृतकाचा विमा नसल्यामुळे विमा रक्कम तक्रारकर्तीला देय नाही असा विरुध्दपक्ष विमा कंपनीचा बचाव आहे.
या उलट तक्रारकर्तीचे वकीलांचा युक्तीवाद असा आहे की, तक्रारकर्तीचा मुलगा हा व्यवसायाने शेतकरी होता ही बाब तालुका कृषी अधिकारी यांनी लेखी उत्तरा मध्ये मान्य केलेली आहे तसेच श्री श्याम भास्करराव आस्वले, मुक्काम पोस्ट खोकरला, तालुका जिल्हा भंडारा यांनी माहिती अधिकारा अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालया मध्ये दिनांक- 14.10.2021 रोजी माहिती अधिकारा अंतर्गत जो अर्ज केला होता त्यामध्ये मृतक प्रबुध्द सूर्यभान रामटेके राहणार नेरला तालुका पवनी हा शेतकरी दिनांक-25.06.2017 रोजी सर्पदंशामुळे उपचारा दरम्यान मरण पावला तो शेतकरी असल्याची बाब आपले पत्र क्रं 1622, दिनांक-25.09.2017 रोजी मान्य करण्यात आली आहे. मृतक प्रबुध्द सूर्यभान रामटेके याचा विमा काढण्यात आला त्या विम्याची यादी देण्याची कृपा करावी असे नमुद केले. सदर माहिती अधिकारा खालील अर्जास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांनी दिनांक-14.11.2021 रोजी उत्तर देऊन शेतकरी अपघात विमा येजना 2016-2017 मधील माहिती नुसार प्रबुध्द सूर्यभान रामटेके याचा विमा दावा हा व्हीसेरा रिपोर्ट मध्ये सर्प दंशाचे विष सापडले नसल्याचे कारणा वरुन दिनांक-19 जून, 2019 रोजी विमा कपंनीने नामंजूर केल्याचे नमुद केले. यावरुन तक्रारकर्तीचे वकीलांचा असा युक्तीवाद आहे की, मृतक हा शेतकरी असल्यामुळेच त्याचा विमा दावा प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर करण्यात आला होता आणि विमा कंपनीने सुध्दा केवळ व्हीसेरा रिपोर्ट मध्ये सर्प दंशाचे विष सापडले नसल्याचे कारणा वरुन विमा दावा प्रस्ताव नाकारला होता, विमा दावा प्रस्ताव नाकारलेल्या शेतक-यांचे यादी मध्ये मृतक प्रबुध्द सूर्यभान रामटेके याचे नावाचा सुध्दा समावेश असून जर त्याची विम्याचे हप्त्याचे रक्कम विमा कंपनीला मिळाली नसती तर त्यांनी त्याच वेळी असा उजर घेतला असता.
11. जिल्हा ग्राहक आयोगास तक्रारकर्तीचे वकीलांचे युक्तीवादा मध्ये तथ्य दिसून येत नाही. मृतकाची शेती शासनाने 2008 मध्ये संपादित केले असल्याचे 7/12 उता-या वरुन सिध्द होते. तक्रारकर्तीचा मृतक मुलगा प्रबुध्द याचे विमा हप्त्याची रक्कम शासनाचे मार्फतीने विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिली होती या बाबत लाभार्थ्यांची यादी तालुका कृषी अधिकारी यांनी या प्रकरणात सादर करणे आवश्यक होते परंतु तसे त्यांनी केलेले नाही. शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे मृतकाचे नावाचा समावेश विमा योजनेच्या लाभार्थी मध्ये होता किंवा नाही ही बाब पुराव्यानिशी सिध्द झालेली नाही. शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे सदर शेतक-याचे नाव जमीन मालक म्हणून शासकीय भूमी अभिलेखा मध्ये नोंद असणे आवश्यक आहे. मृतकाचे नावावर अपघाती घटनेच्या वेळी जमीन मालकाची नोंद होती ही बाब पुराव्यानिशी तक्रारकर्तीचे वकीलांनी सिध्द केलेली नाही त्यामुळे जरी मुद्दा क्रं 1 व 2 यांचे उत्तर होकारार्थी नोंदविले असले तरी मुद्दा क्रं 3 अनुसार मृतक हा अपघाती घटनेच्या वेळी शेतकरी होता ही बाब सिध्द झालेली नसल्याने मुद्दा क्रं 4 अनुसार तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
12. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्ती श्रीमती जयवंता सुर्यभान रामटेके यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांचे विरुध्दची खारीज करण्यात येते.
- खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- सर्व पक्षकारांनी अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.