Dated the 12 Jun 2015
न्यायनिर्णय
(द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्य)
- सामनेवाले ही सहकारी पतपेढी असून तक्रारदार हे डोंबिवली येथील सेवानिवृत्त रहिवाशी आहेत. सेवानिवृत्ती पश्चात तक्रारदारांनी मिळालेली रक्कम सामनेवाले संस्थेमध्ये मुदतठेवी स्वरुपात गुंतविली. परंतु सामनेवाले यांनी सदर मुदतठेवीच्या पक्वतेनंतर रक्कम परत केली नसल्याने प्रस्तुत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- तक्रारदारांच्या तक्रारीमधील कथनानुसार, रेल्वेमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर सामनेवाले यांनी त्यांच्या पतपेढीमध्ये नव्याने सुरु केलेल्या आकर्षक मुदतठेवी योजनेच्या प्रलोभनावर विश्वास ठेवून दि. 01/03/2008 रोजी रु. 40,000/- इतकी रक्कम 6 महिन्यांच्या मुदतठेवीमध्ये द.सा.द.शे. 10.50% व्याज दराने गुंतविली. सदर ठेव योजनेअंतर्गत ठेवीवरील व्याज प्रत्येक महिना संपल्यानंतर मिळण्याची सुविधा असल्याने तक्रारदार दि. 05/05/2008 रोजी व्याजाची रक्कम 347/- काढण्यासाठी सामनेवाले संस्थेकडे गेले असता सामनेवाले यांनी त्यांच्या संस्थेमध्ये आपतकालीन स्थिती असल्याने व्याजाची रक्कम देण्यास नकार दिला व सदर नकाराची बाब विथड्रॉवल स्लीपच्या मागील बाजूस नमूद केली. यानंतर सदरील ठेव दि. 09/09/2008 रोजी परिपक्व झाल्यानंतर सदरील रक्कम व्याजासह परत मागितली असता सामनेवाले 1 यांनी आमच्या संस्थेमध्ये फंड नाही व आपत्कालीन परिस्थिती असल्याने आम्ही तुमचे पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितले. यानंतर सदर रक्कम मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न करुनही तक्रार दाखल करेपर्यंत सामनेवाले यांनी सदरील रक्कम परत केली नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या बचतखात्यामधील रक्कम रु. 11,017/- व मुदतठेवीची रक्कम रु. 40,000/- व्याजासह परत मिळावी, फिर्यादीचा खर्च रु. 5,000/- व नुकसान भरपाई रु. 50,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
- सामनेवाले यांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये आपले म्हणणे दाखल न केल्याने दि. 25/04/2011 रोजी त्यांच्याविरुध्द कैफियतीशिवाय तक्रार पुढे चालविण्याचे आदेश करण्यात आले. तथापि त्यानंतर थोडयाचवेळात सामनेवाले उपस्थित होऊन कैफियतीशिवाय तक्रार पुढे चालविण्याचे आदेश रद्द करण्यासाठी अर्ज दिला. मा. मंचाने सदर अर्जावर दि. 08/05/2011 रोजी आदेश पारीत करुन, सामनेवाले यांनी रु. 3,000/- कॉस्ट देण्यासापेक्ष, ‘नो डब्ल्यू एस ऑर्डर’ रद्द करण्याचे आदेश पारीत केले. तथापि सामनेवाले यांनी मंचाच्या आदेशाची पूर्तता न केल्याने प्रकरण सामनेवाले यांच्या कैफियतीशिवाय पुढे चालविण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. दि. 15/06/2012 पासून तक्रारदार सातत्याने गैरहजर आहेत. तथापि, सामनेवाले यांचे प्रतिनिधी अनेकवेळा हजर राहून प्रकरणामध्ये आपसी तडजोड झाली असून त्याबाबतचे शपथपत्र दाखल करण्यास बराचसा कालावधी घेतला व त्यानंतर अदयाप तडजोडीचे शपथपत्र दाखल केले नसल्याने व विशेषतः तक्रारदारांची प्लिडींगस् पूर्ण झाली असल्याने, प्रकरण न्यायनिर्णयासाठी राखून ठेवण्यात आले.
- प्रस्तुत प्रकरणामध्ये सामनेवाले हजर होऊनही शेवटपर्यंत आपले म्हणणे दाखल न करता प्रकरणामध्ये तडजोड झाल्याचे मोघम विधान वारंवार केले आहे. तडजोडीबाबत कोणताही शपथपत्रावर पुरावा, अभिलेखावर नसल्याने, मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे सूक्ष्म अवलोकन केले. त्यावरुन सदरील प्रकरणामध्ये खालीलप्रमाणे निष्कर्ष निघतातः
- तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 यांजकडे बचतखाते क्र. 2491237 वर्ष 2003 मध्ये उघडले. यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांजकडे दि. 01/03/2008 रोजी रु. 40,000/- या रकमेची वार्षिक 10.50% व्याजदाराने सहा महिन्यांसाठी मुदतठेव उघडली. सदर मुदत ठेवीवरील व्याज दरमहा मिळण्याची सुविधा असल्याने तक्रारदार दि. 05/05/2008 रोजी व्याज रक्कम मागण्यास सामनेवाले क्र. 1 यांचे शाखेमध्ये गेले असता सामनेवाले क्र. 1 यांनी व्याजाची रक्कम देण्यास नकार दिला व सदर बाब सामनेवाले यांनी विथड्रॉवल स्लीपच्या मागील भागावर लिहूनही दिली. यानंतर मुदतपूर्ती दि. 01/09/2008 रोजी झाल्यानंतर, तक्रारदार अनेकवेळा सामनेवाले यांजकडे मुदतपूर्तीअंती देय असलेल्या रकमेची मागणी करण्यासाठी गेले असता सामनेवाले यांनी सदरील रक्कम तक्रारदारांना दिली नसल्याची बाब सामेनवाले यांनी तक्रारदारांना दि. 14/08/2010 रोजी पाठविलेल्या पत्रावरुन स्पष्ट होते.
ब. दि. 14/08/2010 रोजीच्या पत्रान्वये सामनेवाले यांनी तक्रारदारांची
रक्कम अदा करण्यास असमर्थता व्यक्त केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत
तक्रार दाखल करुन मुदतठेवीची रक्कम व बचत खात्यामधील
रक्कम व्याजासह परत मिळावी अशी मागणी केली आहे. सामनेवाले
यांनी यासंदर्भात हजर होऊनही तक्रारीस लेखी म्हणणे दाखल केले
नाही. शिवाय प्रकरणात तडजोड झाल्याची बाब मंचासमोर तोंडी नमूद
केली. परंतु त्याबाबतचे शपथपत्र व इतर कोणताही लिखित पुरावा
मंचासमोरदाखल केला नाही. तसेच सामनेवाले यांनी प्रकरणामध्ये
लेखी कैफियत दाखल न केल्याने तक्रारदारांची तक्रारीमधील सर्व
कथने अबाधित राहतात.
क. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदाराने पुरावा शपथपत्र दि. 07/05/2011
रोजी दाखल केले व लेखी युक्तीवाद दि. 13/02/2012 रोजी दाखल
केला. यानंतर दि. 15/06/2012 पासून तक्रारदार हे गेल्या 3
वर्षांमध्येएकाही तारखेस उपस्थित असल्याचे दिसून येत नाही.
सामनेवाले यांनी प्रकरणामध्ये तडजोड झाल्याचे नमूद केले असले
तरी केवळ मोघम विधान विचारात घेणे अनुचित होईल
असे वाटते.
तक्रारदारांचे शपथपत्र, त्यांनी शपथपत्राद्वारे सादर केलेला कागदोपत्री पुरावा व लेखी युक्तवाद विचारता घेता, वरील चर्चेनुरुप व निकषानुसार खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
यापूर्वी ही तक्रार निकालासाठी ठेवली असता मंचाचा कार्यभार बघता व इतर प्रशासकीय कारणांमुळे निकाली काढता आली नाही.
आ दे श
- तक्रार क्र. 327/2010 अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांची ठेव रक्कम मुदतपूर्तीनंतर व्याजासह अदा न करुन सेवासुविधा पुरविण्यामध्ये कसूर केल्याचे जाहिर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदाराची मुदतठेव रक्कम रु. 40,000/- दि. 01/03/2008 पासून आदेशाच्या तारखेपर्यंत म्हणजे दि. 12/06/2015 पर्यंत 10.50% व्याजासह दि. 31/7/2015 रोजी किंवा तत्पूर्वी अदा करावी. आदेशाची पूर्तता नमूद कालावधीमध्ये न केल्यास दि. 01/08/2015 पासून आदेशपूर्ती होईपर्यंत 12% व्याजासह संपूर्ण रक्कम तक्रारदारांना दयावी.
- तक्रारदारांच्या बचतखात्यामध्ये दि. 08/04/2008 रोजी शिल्लक असलेली रक्कम रु. 10,183/- दि. 08/04/2008 पासून दि. 14/06/2015 पर्यंत 6% व्याजासह दि. 31/07/2015 रोजी किंवा तत्पूर्वी परत करावी. आदेशाची पूर्तता नमूद कालावधीमध्ये न केल्यास दि. 01/08/2015 पासून आदेश पूर्ती होईपर्यंत 9% व्याजासह संपूर्ण रक्कम तक्रारदारांना दयावी.
- तक्रार व इतर खर्चाबद्दल रु. 20,000/- सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि. 31/07/2015 पूर्वी दयावेत. न दिल्यास दि. 01/08/2015 पासून 6% व्याजासह संपूर्ण रक्कम दयावी.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य विनाविलंब पाठविण्यात याव्यात.