जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 31/2022. तक्रार दाखल दिनांक : 02/02/2022. तक्रार निर्णय दिनांक : 30/01/2023.
कालावधी : 00 वर्षे 11 महिने 28 दिवस
(1) श्वेता पि. सतिश गावकरे, वय 7 वर्षे, व्यवसाय : शिक्षण.
(2) श्रेयश पि. सतिश गावकरे, वय 5 वर्षे, व्यवसाय : शिक्षण,
तक्रारकर्ते क्र.1 व 2 अज्ञान तर्फे त्यांचे पानलकर्ता आजोबा
(आईचे वडील) मोहन पि. निवृत्ती पाटील, वय 55 वर्षे,
व्यवसाय : शेती, सर्व रा. नणंद, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ते
विरुध्द
(1) डॉ. विक्रम विलासराव सूर्यवंशी, वय 30 वर्षे, धंदा : वैद्यकीय व्यवसाय,
रा. आशिर्वाद हॉस्पिटल, जुना रेणापूर नाका, लातूर, ता. जि. लातूर.
(2) डॉ. श्वेता विक्रम सूर्यवंशी, वय 28 वर्षे, धंदा : वैद्यकीय व्यवसाय,
रा. आशिर्वाद हॉस्पिटल, जुना रेणापूर नाका, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- अभय बी. पाटील
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- विनोद एम. गोमसाळे
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, तक्रारकर्ते क्र.1 व 2 हे अज्ञान आहेत. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 (यापुढे अनुक्रमे "डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी") यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारकर्ते यांच्या आई रेवती (यापुढे "मयत रेवती") यांचा मृत्यू झाला. तक्रारकर्ते क्र.1 व 2 यांच्याकरिता त्यांचे आजोबा (यापुढे "मोहन पाटील") यांनी प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे.
(2) तक्रारकर्ते यांचे कथन असे की, दि.4/10/2020 रोजी दुपारी 2.00 वाजण्याच्या दरम्यान मयत रेवती घरकाम करीत असताना पाय घसरुन उजव्या खुब्यावर पडल्या. त्यावेळी त्यांच्या उजव्या पायास मार लागला. तक्रारकर्ते यांचे पिता सतिश गावकरे यांनी मयत रेवती यांना किल्लारी येथील डॉ. पवार यांच्याकडे उपचारास्तव नेले. तपासणीअंती मयत रेवती यांना लातूर येथील रुग्णालयामध्ये नेण्यास सांगण्यात आले. दि.4/10/2020 रोजी मयत रेवती यांना डॉ. चलवदे यांच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आले असता त्यांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. उपचाराकरिता जास्त खर्च येत असल्यामुळे मयत रेवती यांना परत नणंद गावी नेण्यात आले.
(3) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, दि.5/10/2020 रोजी मोहन पाटील यांनी डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यावेळी साधारण स्वरुपाची शस्त्रक्रिया करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. तसेच शस्त्रक्रिया लवकर करण्याचा सूचना केली. त्यानंतर रेवती यांच्या रक्त-लघवी तपासण्या करण्यात आल्या. शस्त्रक्रियेसाठी मयत रेवती यांना रुग्णालयामध्ये दाखल करुन घेतले.
(4) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, दि.6/10/2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता मयत रेवती यांची शस्त्रक्रिया सुरु करण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी मयत रेवती यांचे प्रयोगशाळा अहवाल व तब्येत चांगली होती आणि त्या शस्त्रक्रिया कक्षामध्ये चालत गेल्या. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मयत रेवती शुध्दीवर येईपर्यंत शस्त्रक्रिया कक्षामध्ये राहतील, असे सांगण्यात आले. सकाळी 6 वाजेपर्यंत मयत रेवती शस्त्रक्रिया कक्षामध्ये होत्या आणि त्या शुध्दीवर आलेल्या नव्हत्या.
(5) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, त्यांच्या संमती व परवानगीशिवाय मयत रेवती यांना अन्य रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला. मयत रेवती शुध्दीवर का येत नाहीत, याबाबत विचारणा केली असता डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर मयत रेवती यांना रुग्णवाहिकेतून सह्याद्री हॉस्पिटल येथे पाठविले. मयत रेवती यांचा मृत्यू झाल्याचे माहीत असताना तसे दिसून येऊ नये यासाठी सह्याद्री हॉस्पिटल येथे स्वखर्चाने पाठविले.
(6) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, सह्याद्री हॉस्पिटल येथे मयत रेवती यांना दाखल करण्यापूर्वी तपासणी केली; परंतु तेथे पाठविण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मयत रेवती यांना आर्शिवाद हॉस्पिटल येथे नेण्यात आले असता डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी हे उपस्थित नव्हते.
(7) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस सह्याद्री हॉस्पिटल, लातूर येथे उपस्थित होते. पोलिसांनी रेवतीचे प्रेत पाहिले आणि दि.7/10/2020 रोजी जबाब नोंदविला. मयत रेवती यांची शवचिकित्सा करण्यात आली. रासायनिक विश्लेषण अहवालानुसार डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांच्या निष्काळजीपणामुळे मयत रेवती यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
(8) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, मयत रेवती यांच्या मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय शिक्षण संस्था, लातूर यांच्याकडे अहवाल पाठविण्यात आला. समिती सदस्य डॉ. सी.आर. दोडे, डॉ. निलिमा देशपांडे, डॉ. रणजीत हाके-पाटील, डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. गिरीश महिंद्रपूरकर, डॉ. संतोष डोपे यांनी शवविच्छेदनाच्या अहवालानुसार Cerebropulmonary ocedene with lobair pneumonia असे मृत्यूचे कारण नमूद केले. त्यामध्ये डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी दिलेल्या भुलीचा प्रभाव कमी करण्यासाठी मयत रेवती यांना अन्य औषधे दिल्याचे; शस्त्रक्रिया संपत आल्यानंतर रुग्णाचा श्वास अनियमीत झाला व झटके आले; संबंधीत डॉक्टरांनी औषध दिल्याचे दिसून येत असल्याचे नमूद केले. रुग्णाच्या तब्येतीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे कृत्रिम श्वासोश्वास सुरु ठेवला आणि दरम्यान रुग्णाची तब्येत अतिगंभीर होत असल्यानंतर दि.7/10/2020 रोजी सकाळी 10.00 वाजता रुग्णास सह्याद्री हॉस्पिटल, लातूर येथे संदर्भीत केले, असे नमूद आहे. त्यानंतर दि.3/3/2021 रोजी चौकशी समितीने चुक अहवाल सादर करुन त्यामध्ये मयत रेवती यांच्या उपचारादरम्यान डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांचा हलगर्जीपणामुळे मृत्यू दिसून येत नाही, असे नमूद केले.
(9) तक्रारकर्ते यांचे कथन असे की, मयत रेवती यांचा मृत्यू नैसर्गिक नाही आणि डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे. डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी वैद्यकीय निष्काळजीपणा करुन सेवेमध्ये त्रुटी व अनुचित प्रथेचा अवलंब केला आहे.
(10) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, लातूर यांचे न्यायालयामध्ये फौजदारी किरकोळ अर्ज क्र. 1147/2021 दाखल केला आणि न्यायालयाच्या निर्देशानंतर डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांच्याविरुध्द गुन्हा क्र. 780/2021 दाखल करण्यात आला.
(11) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, मयत रेवती ह्या श्रीकांत एजन्सीज, किल्लारी येथे दुकानाचे हिशोब व बँकींग व्यवहाराचे कामकाज करीत होत्या आणि त्यांना रु.9,000/- वेतन मिळत होते. मयत रेवती यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ते क्र.1 व 2 यांच्यावरील छत्र हरवले आणि त्यांची उपासमार होत आहे.
(12) उक्त वादकथनांच्या अनुषंगाने तक्रारकर्ते क्र.1 व 2 यांना प्रत्येकी रु.20,00,000/- याप्रमाणे रु.40,00,000/- नुकसान भरपाई देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.5,00,000/- देण्याचा व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- अशी रक्कम व्याजासह देण्यासंबंधी डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केलेली आहे.
(13) तक्रारकर्ते यांच्यातर्फे कागदपत्राच्या यादीसह अ.क्र. 1 ते 22 प्रमाणे कागदपत्रे व शपथपत्र सादर करण्यात आले.
(14) डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार खोटी व काल्पनिक तथ्यावर आधारीत असल्याचे नमूद करुन ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, मयत रेवती दि.5/10/2020 रोजी त्यांच्या रुग्णालयामध्ये आल्या होत्या. मयत रेवतीच्या उजव्या खुब्याजवळ गंभीर जखम होऊन तेथील हाडे पूर्णपणे सांधाळले (चुरा झाले) होते. जबर मार लागल्यामुळे त्या ठिकाणी काळेनिळे रक्त होऊन सुजले होते. विद्युत शॉक लागल्यामुळे जमिनीवर जोरात पडल्यामुळे मयत रेवती यांना ती जखम झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले होते. तत्पूर्वी मयत रेवती यांच्यावर केलेल्या उपचाराची कागदपत्रे नातेवाईकांनी सोबत आणलेली होती. दि.4/10/2020 रोजी किल्लारी येथील डॉ. पवार यांच्याकडे प्राथमिक उपचार केला होता.
(15) डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांचे पुढे कथन असे की, मयत रेवती यांना तपासल्यानंतर व पूर्वी केलेले उपचार व तपासणीचे कागदपत्रे पाहून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल आणि शस्त्रक्रियेमुळे मयत रेवतीच्या जीवितास धोका होऊ शकतो, याची संपूर्ण कल्पना मयत रेवती व त्यांच्या नातेवाईकास दिलेली होती. शस्त्रक्रियेकरिता संमती दर्शविल्यानंतर शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक तपासण्या करुन मयत रेवती शस्त्रक्रियेसाठी योग्य असल्यामुळे नातेवाईकांची संमती घेतली. मयत रेवती यांची तब्येत अतिशय चिंताजनक असल्याची लेखी कल्पना मोहन पाटील यांना देण्यात आली. त्याप्रमाणे मोहन पाटील यांनी मयत रेवती यांच्या पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिली आणि High Risk Consent पत्रावर स्वाक्षरी केली.
(16) डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांचे पुढे कथन असे की, मयत रेवती यांच्या उपचारासाठी भुल देण्याची आवश्यकता असते आणि उपचारासाठी दिलेली भुल रुग्णास धोकादायक ठरु शकते, याची पूर्ण कल्पना दिलेली होती. भुल दिल्यामुळे Aspiration pneuemonia, Sevre Anaphylactic Reactions, Collapse इतर धोके उदभवू शकतात, असे सांगितले. तसेच भुलेमुळे नसा (नर्व्हस्) ब्लॉक होऊ शकतात; ज्यामुळे रुग्णाला Infection, Swelling, Persistent numbness, Fits, Residual Pain, Injury to blood vesels, Lung injury अशा प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात, यासंबंधी त्यांनी जाणीव करुन दिलेली होती. मोहन पाटील यांनी या सर्व गोष्टी समजून घेऊन भुल देण्यासाठी संमती दर्शविली आणि परवानगी दिलेली होती. मोहन पाटील यांनी Consent for Anesthesia प्रपत्रावर स्वाक्षरी केली.
(17) डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांचे पुढे कथन असे की, दि.6/10/2020 रोजी शस्त्रक्रियेची तयारी पूर्ण झाल्यानंतर सायं. 7 वाजता डॉ. विक्रम सूर्यवंशी व श्वेता सूर्यवंशी यांनी मयत रेवती यांची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेसाठी भुल देण्याकरिता वापरात येणारे मान्यताप्राप्त इंजेक्शन मयत रेवती यांना देण्यात आले होते. मयत रेवती यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. कोणत्याही रुग्णास शस्त्रक्रिया झाल्यानंतर दिलेल्या भुलेचा प्रभाव कमी करण्यासाठी देण्यात येणारा उपचार मयत रेवती यांना सुरु केला. भुल कमी करण्यासाठी मयत रेवती यांना औषध दिले; परंतु दरम्यान मयत रेवती यांचा श्वास अचानक अनियमीत झाला आणि तिला झटके येऊ लागले. मयत रेवती यांचे ह्दय - फुफ्फुसाची तपासणी केली असता मयत रेवतीमध्ये Pulmonary Oedema विकसीत होत असल्यामुळे नियमीत श्वास घेता येण्याकरिता कृत्रिम श्वासोश्वास देण्यास सुरुवात केली. कृत्रिम श्वासोश्वास हा रुग्णामधील Pulmonary Edema काढण्यासाठी वापरला जातो आणि तो करण्यात आला. कृत्रिम श्वासोश्वास व Diuretics औषधे Oedema कमी करण्यासाठी वापर केला. शिवाय, झटके कमी करण्यासाठी औषधे देण्यात आले आणि शरिरातील Co2 आणि O2 चे प्रमाण पाहण्यासाठी VBG तपासणी केली. तसेच Oedema थांबविण्यासाठी लागणारे औषधोपचार मयत रेवती यांच्यावर करण्यात आले. या सर्व उपचाराच्या नोंदी त्या-त्यावेळी मयत रेवती यांच्या केस पेपरमध्ये नमूद केल्या.
(18) डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांचे पुढे कथन असे की, मयत रेवती यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहाटे 1.30 वाजता त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली. परंतु पुन्हा मयत रेवती यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यासाठी लागणारे योग्य ते औषधोपचार करण्यात आले. त्या दरम्यान मयत रेवती यांचा कृत्रिम श्वासोश्वास सुरुच होता. सह्याद्री हॉस्पिटल, लातूर येथे व्हेंटीलेटर उपलब्ध असल्यामुळे कृत्रिम श्वासोश्वास उपलब्ध होण्याकरिता Cardiac Ambulance द्वारे मयत रेवती यांना पाठविण्यात आले. परंतु त्या ठिकाणी मयत रेवती यांची तपासणी करीत असताना मृत्यू पावल्या.
(19) ग्राहक तक्रारीच्या परिच्छेद क्र.10 मधील मजकूर की, मयत रेवती यांच्या मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय शिक्षण संस्था, लातूर यांच्याकडे अहवाल पाठविण्यात आला. समिती सदस्य डॉ. सी.आर. दोडे, डॉ. निलिमा देशपांडे, डॉ. रणजीत हाके-पाटील, डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. गिरीश महिंद्रपूरकर, डॉ. संतोष डोपे यांनी शवविच्छेदनाच्या अहवालानुसार Cerebropulmonary ocedene with lobair pneumonia असे मृत्यूचे कारण नमूद केले. त्यामध्ये डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी दिलेल्या भुलीचा प्रभाव कमी करण्यासाठी मयत रेवती यांना अन्य औषधे दिल्याचे; शस्त्रक्रिया संपत आल्यानंतर रुग्णाचा श्वास अनियमीत झाला व झटके आले; संबंधीत डॉक्टरांनी औषध दिल्याचे दिसून येत असल्याचे नमूद केले. रुग्णाच्या तब्येतीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे कृत्रिम श्वासोश्वास सुरु ठेवला आणि दरम्यान रुग्णाची तब्येत अतिगंभीर होत असल्यानंतर दि.7/10/2020 रोजी सकाळी 10.00 वाजता रुग्णास सह्याद्री हॉस्पिटल, लातूर येथे संदर्भीत करण्यात आले. मृत्यूच्या कारणासंबंधी अहवाल मागविण्यासंबंधी तपास अधिकारी श्री. कदम यांनी वैद्यकीय अधिष्ठाता यांना दि.8/1/2021 रोजी पत्र पाठविले आणि गठीत समितीने ऑक्सिजन पुरवठा कमी झाला आणि त्यामुळे रुग्ण दगावला असल्याची शक्यता आहे, असा दि.22/2/2021 रोजी अहवाल दिला इ. डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी मान्य केला आहे.
(20) डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांचे पुढे कथन असे की, मयत रेवती यांच्यावर केलेले उपचार वैद्यकीय शास्त्रानुसार योग्य व बरोबर आहेत. मयत रेवती यांच्याकरिता वापरण्यात आलेली औषधी वैद्यकीय शास्त्रानुसार मान्यताप्राप्त आहे. त्यामुळे मयत रेवती यांच्या उपचारामध्ये त्यांनी दोष व निष्काळजीपणा केलेला नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी केलेली आहे.
(21) डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी लेखी निवेदनपत्रापृष्ठयर्थ कागदपत्रांच्या यादीसह एकूण 14 कागदपत्रे दाखल केले.
(22) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार, डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांच्या विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी मयत रेवती यांचा
वैद्यकीय उपचार करताना निष्काळजीपणा केल्याचे आणि
त्या अनुषंगाने डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी
सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ते अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(23) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्या सर्वांचे एकत्र विवेचन करण्यात येत आहे. प्रामुख्याने, दि.5/10/2020 रोजी मयत रेवती यांना डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांच्या आर्शिवाद ऑर्थोपेडीक्स व प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, ही मान्यस्थिती आहे. मयत रेवती यांच्या उजव्या खुब्याजवळ गंभीर जखम झाल्यामुळे तेथील हाडे पूर्णपणे सांधाळले (चुरा झाले) होते, याबद्दल उभय पक्षांमध्ये विशेष वाद नाही. आर्शिवाद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी मयत रेवती यांच्यावर दि.4/10/2020 रोजी किल्लारी येथील डॉ. पवार यांच्याकडे प्राथमिक उपचार केला, ही मान्यस्थिती आहे.
(24) मयत रेवती यांना तपासल्यानंतर पूर्वी केलेले उपचार व तपासणीचे कागदपत्रे पाहून मयत रेवती यांची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होती, असे डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांचे कथन आहे. मयत रेवती यांच्या शस्त्रक्रियेपूर्वी मोहन पाटील यांनी आवश्यक संमती दिलेली दिसून येते. मयत रेवती यांच्या खुब्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दि.6/10/2020 रोजी सायं. 7 वाजता डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी मयत रेवती यांची शस्त्रक्रिया केली, ही मान्यस्थिती आहे. त्यानंतर दि.7/10/2020 रोजी मयत रेवती यांचा मृत्यू झाला, ही मान्यस्थिती आहे.
(25) वाद-तथ्ये पाहता मयत रेवती यांची शस्त्रक्रिया करताना डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी निष्काळजीपणा केला काय ? आणि त्यामुळे मयत रेवती यांचा मृत्यू झाला काय ? किंवा कसे ? हे वाद-प्रश्न उपस्थित होतात. असे दिसते की, मयत रेवती यांच्या शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक तपासण्या करण्यात आलेल्या होत्या आणि त्याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. दि.4/10/2020 रोजी मयत रेवती यांचा एक्स-रे काढण्यात आलेला असून त्यामध्ये खालीलप्रमाणे Findings व Impression नमूद दिसते.
Findings :
Comminuted fracture of head of right humerus with posterior shoulder
dislocation is seen.
Bone density is normal.
No erosion / destruction seen.
Acromio-clavicular joint appears normal.
Visualized shaft of humerus, scapula, clavicle and coracoid process appear
normal.
No evidence of lytic or sclerotic lesions are seen.
Soft tissues appear normal.
IMPRESSION :
Comminuted fracture of head of right humerus with posterior shoulder dislocation is seen.
दि.4/10/2020 रोजी मयत रेवती यांचा 3D C.T. RIGHT SHOULDER JOINT काढण्यात आलेला असून त्यामध्ये खालीलप्रमाणे Findings व CONCLUSION नमूद दिसते.
Findings :
There is comminuted displaced fracture of right humeral head / neck with accociated haemarthosis of right shoulder joint and soft tissue swelling.
There is subluxation of gleno-humeral joint space.
Right clavicle appears normal.
Acromion appears normal. Acromioclavicular joint appears normal.
Coracoid process appears normal.
Visualized right scapula appears normal.
Visualized right upper ribs appear normal.
Visualized right lung parenchyma appears normal. No pneumothorax.
CONCLUSION :
Comminuted displaced fracture of right humeral head / neck with accociated haemarthosis of right shoulder joint and soft tissue swelling with subluxation of ight gleno-humeral joint space.
मयत रेवती यांच्या शस्त्रक्रियेपूर्वी दि.5/10/20220 रोजी रक्त तपासण्या करण्यात आलेल्या असून त्यांचे अहवाल अभिलेखावर दाखल आहेत.
(26) मयत रेवती यांच्या मृत्यूनंतर शवचिकित्सा करण्यात आलेली असून शरिरातील अवयव रासायनिक विश्लेषणाकरिता राखून ठेवल्याचे दिसून येते. प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, नांदेड यांचा अहवाल अभिलेखावर दाखल आहे आणि त्यामध्ये RESULT OF ANALYSIS : Results of the tests for detection of narcotic drugs or any psychotropic substance in exhebit no. 1 are negative. असे नमूद आहे.
(27) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर यांच्या Department of Pathology चा परीक्षण अहवाल अभिलेखावर दाखल असून त्यामध्ये Impression : Early changes of lobor pneumonia of lungs. असे नमूद आहे.
(28) मयत रेवती यांच्या मृत्यूनंतर पोलीस यंत्रणेच्या कार्यवाहीस अनुसरुन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर यांनी पोलीस यंत्रणेस अहवाल सादर केलेले आहेत. त्यानुसार दि.22/1/2021 रोजीच्या अहवालामध्ये खालीलप्रमाणे मजकूर दिसून येतो.
मयतावर उपचार करताना हलगर्जीपणा झाला किंवा कसे, याबाबत अभिप्राय देण्यासाठी समितीची बैठक दिनांक 22.01.2021 शुक्रवार रोजी वैद्यकीय अधीक्षक, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था (रुग्णालय), लातूर यांच्या कार्यालयात सकाळी ठीक 11.30 वाजता आयोजीत करण्यात आली होती. सदर बैठकीस डॉ. संतोषकुमार डोपे (अध्यक्ष, चौकशी समिती), डॉ. सी.आर. दोडे (प्रा. व विभाग प्रमुख, न्याय वैद्यकस शास्त्र), डॉ. निलिमा देशपांडे (प्रा. व विभाग प्रमुख, औषध वैद्यक शास्त्र), डॉ. रणजीत हाके पाटील (प्रा. व विभाग प्रमुख, अस्थिव्यंकोपचार शास्त्र विभाग), डॉ. शैलेंद्र चौहान (प्रा. व विभाग प्रमुख, बधिरीकरण शास्त्र विभाग) विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर व डॉ. गिरीष मैंदरकर, सदस्य, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई हे सदस्य उपस्थित होते.
सदरील कागदपत्रांची पडताळणी केली असता चौकशी समितीच्या निदर्शनास असे आले आहे की, सदरील रुग्ण दिनांक 05/10/2020 रोजी आशिर्वाद ऑर्थोपेडिक्स व प्लास्टीक सर्जरी हॉस्पिटल, जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, लातूर येथे सायंकाळी 04.10 वाजता ॲडमीट झाली व त्या दिवशी तिच्या रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या व तपासण्याचे सर्व अहवाल Normal आलेले दिसून येत आहेत. दिनांक 06/10/2020 रोजी सायंकाळी 07.00 वाजता रुग्णास ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशन दरम्यान Inj. Propofol and Inj. Atracurium व इतर औषधे General Anaesthesia साठी दिली गेली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर दिलेल्या भुलेचा प्रभाव कमी करण्यासाठी इतर औषधे दिलेली दिसून येत आहेत. ऑपरेशन संपत आल्यानंतर रुग्णाचा श्वास अनियमीत झाला व रुग्णास झटके (Seizures) आले. संबंधीत डॉक्टराने (Seizures) साठी औषधे दिलेले दिसून येत आहेत, परंतु रुग्णाच्या तब्येतीमध्ये सुधारणा दिसून आली नाही. म्हणून कृत्रिम श्वासोश्वास (Artificial breathing) चालूच ठेवला व त्या दरम्यान रुग्णांची तब्येत अतिगंभीर होत असल्याचे दिसून येताच दिनांक 07/10/2020 रोजी सकाळी 06.00 वाजता रुग्णला सह्याद्री हॉस्पिटल, लातूर मध्ये संदर्भीत करण्यात आले व तेथे रुग्णास सकाळी 06.30 वाजता मृत घोषीत करण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार Cerebropulomonary oedema with Lobar Pneumonia असे मयताच्या मृत्यूचे कारण देण्यात आले आहे.
चौकशी समिती अशा निष्कर्षास येत आहे की, वरील औषधाच्या परिणामामुळे फुफ्फुसावर ताण पडून मेंदुला ऑक्सीजन पुरवठा कमी झाला व त्यामुळे रुग्ण दगावला असल्याची शक्यता आहे.
(29) त्यानंतर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर यांनी दि.3/3/2021 रोजी पोलीस यंत्रणेस दिलेल्या पत्रामध्ये "मयत रेवती सतिश गावकरे, वय 27 वर्षे, रा. किल्लारी, ता. औसा, जि. लातूर या प्रकरणामध्ये उपचारादरम्यान डॉक्टराचा हलगर्जीपणा दिसून येत नाही.", असे कळविलेले दिसून येते.
(30) डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांचे कथन की, शस्त्रक्रियेसाठी भुल देण्याकरिता वापरात येणारे मान्यताप्राप्त इंजेक्शन मयत रेवती यांना देण्यात आलेले होते. मयत रेवती यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. कोणत्याही रुग्णास शस्त्रक्रिया झाल्यानंतर दिलेल्या भुलेचा प्रभाव कमी करण्यासाठी देण्यात येणारा उपचार मयत रेवती यांना सुरु केला. भुल कमी करण्यासाठी मयत रेवती यांना औषध दिले; परंतु दरम्यान मयत रेवती यांचा श्वास अचानक अनियमीत झाला आणि तिला झटके येऊ लागले. मयत रेवती यांचे ह्दय - फुफ्फुसाची तपासणी केली असता मयत रेवतीमध्ये Pulmonary Oedema विकसीत होत असल्यामुळे नियमीत श्वास घेता यावा याकरिता कृत्रिम श्वासोश्वास देण्यास सुरुवात केली. कृत्रिम श्वासोश्वास हा रुग्णामधील Pulmonary Edema काढण्यासाठी वापरला जातो आणि तो करण्यात आला. कृत्रिम श्वासोश्वास व Diuretics औषधे Oedema कमी करण्यासाठी वापर केला. शिवाय, झटके कमी करण्यासाठी औषधे देण्यात आले आणि शरिरातील Co2 आणि O2 चे प्रमाण पाहण्यासाठी VBG तपासणी केली. तसेच Oedema थांबविण्यासाठी लागणारे औषधोपचार मयत रेवत यांच्यावर करण्यात आले. या सर्व उपचाराच्या नोंदी त्या-त्यावेळी मयत रेवती यांच्या केस पेपरमध्ये नमूद केल्या आहेत.
(31) हे सत्य आहे की, मयत रेवती यांची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मोहन पाटील यांनी आवश्यक लेखी अनुमती दिलेली होती. मयत रेवती यांचे नोंदलेले Pre Anaesthesia Record पाहता त्यामध्ये नमूद नोंदी खालीलप्रमाणे दिसतात.
त्यामध्ये मयत रेवती यांचे वजन नमूद केलेले दिसत नाही.
Admitted with C/O : H/o Fall with injury to Rt Shoulder.
Past H/O :
G/E - PR - 127/M S/E - RS - Clear
BP - 120/70 CVS - S, SL
Pallor - - P/A - Soft
SPO2 - 99% CNS - Conscious, Obeying
Plan of Anaesthesia - General + Regional Anaesthesia
त्यामध्ये काही नोंदी अस्पष्ट व वाचण्यायोग्य नाहीत. पुढे खालीलप्रमाणे नोंद आढळते.
Patient could not wake up from Anaesthesia / was not obeying commands, started spontaneous breathing.
Inj. Myo - P given
Was taking short tachypnoeic breaths.
RR - 35/M SPO2 - 94%
Had seizure episode.
Inj. Midor 1 mg
Inj. Eptoin
Inj. Levera given
ET. Tube was having
On auscultation was having B/L crepts/Rhouehc developed frank pulmonary oedema. Assisted ventilation given shifted to critical care for further management.
(32) उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मृत्यूसमयी मयत रेवती यांचे वय 27 वर्षे होते आणि वयानुरुप त्या सदृढ असल्याचे मान्य करावे लागेल. शस्त्रक्रियेपूर्वी मयत रेवती यांच्या केलेल्या रक्त तपासण्या व अन्य अहवाल शस्त्रक्रियेसाठी पोषक होते. हे स्पष्ट आहे की, मयत रेवती यांच्या उजव्या खुब्याजवळ गंभीर जखम झाल्यामुळे तेथील हाडे पूर्णपणे सांधाळले (चुरा झाले), या निष्कर्षास येऊन डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी मयत रेवती यांच्या खुब्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. हे स्पष्ट आहे की, कथित शस्त्रक्रिया करताना भुल देणे आवश्यक होते आणि त्याप्रमाणे डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी मयत रेवती यांना शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने भुल दिलेली होती. मयत रेवती यांची शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भुलेचा प्रभाव कमी करण्यासाठी मयत रेवती यांच्यावर उपचार सुरु केला; परंतु दरम्यान मयत रेवती यांचा श्वास अचानक अनियमीत झाला आणि तिला झटके येऊ लागले. डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी अभिलेखावर मयत रेवती यांच्या उपचारासंबंधी कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केल्या. त्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता बहुतांश कागदपत्रे अस्पष्ट असून वाचण्यायोग्य नाहीत. डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी मयत रेवती यांच्या शस्त्रक्रियेसाठी भुल देण्याकरिता व भुल कमी करण्यासाठी कोणत्या औषधांचा वापर केला, याचे लेखी निवेदनपत्रामध्ये स्पष्टीकरण दिसत नाही. चौकशी समितीच्या अहवालानुसार शस्त्रक्रियेदरम्यान Inj. Propofol and Inj. Atracurium व इतर औषधे General Anaesthesia साठी दिली गेली आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर दिलेल्या भुलेचा प्रभाव कमी करण्यासाठी इतर औषधे दिलेली दिसून येत आहेत, असे नमूद आहे.
(33) डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत कोणतेही भाष्य दिसत नाही. वैद्यकीय कागदपत्रांचे अवलोकन केले असता डॉ. विक्रम सूर्यवंशी हे MBBS, MS. Ortho, DNB Ortho, Joint Replacement, Arthoscopy & Sports Medicine अर्हताधारक दिसतात. परंतु डॉ. श्वेता सूर्यवंशी यांची शैक्षणिक अर्हता काय होती, याबद्दल आवश्यक पुरावा नाही. परंतु डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी मयत रेवती यांची शस्त्रक्रिया केली, ही मान्यस्थिती आहे.
(34) मयत रेवती यांच्या मृत्यबाबत नियुक्त चौकशी समितीने दि.22/1/2021 रोजी 'वरील औषधाच्या परिणामामुळे फुफ्फुसावर ताण पडून मेंदुला ऑक्सिजन पुरवठा कमी झाला व त्यामुळे रुग्ण दगावला असल्याची शक्यता आहे', असा निष्कर्ष काढलेला आहे. हे सत्य आहे की, त्याच चौकशी समितीने दि.3/3/2021 रोजी "उपचारादरम्यान डॉक्टराचा हलगर्जीपणा दिसून येत नाही', असा अभिप्राय दिला. असे दिसते की, दि.3/3/2021 रोजीचा अभिप्राय नमूद करताना चौकशी समितीने त्यांच्याच पूर्वीच्या अहवाल / निष्कर्षासंबंधी कोणतेही भाष्य केलेले नाही किंवा अन्य स्वतंत्र निष्कर्ष नोंदविलेला नाही. त्यामुळे दि.3/3/2021 रोजी दिलेला समितीचा अभिप्राय उचित निष्कर्ष व पुराव्याअभावी ग्राह्य धरणे नैसर्गिक न्यायतत्वाविरुध्द ठरेल.
(35) Department of Pathology यांचे परीक्षण पाहता Impression : Early changes of lobar pneumonia of lungs. नमूद आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांच्या दिलेल्या औषधांच्या परिणामामुळे फुफ्फुसावर ताण पडून मेंदुला ऑक्सिजन पुरवठा कमी झाला व त्यामुळे रुग्ण दगावला असण्याची स्पष्टपणे शक्यता वर्तवली आहे. शस्त्रक्रियेमध्ये मयत रेवती यांचा मृत्यू होण्याइतपत काय परिस्थिती निर्माण झाली, याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण नाही.
(36) Consent for Anesthesia पाहता त्यावर मोहन पाटील यांच्यासह डॉ. विक्रम सूर्यवंशी व Signature of Anesthesiologist येथे स्वाक्षरी करण्यात आलेली असून Name of Anesthesiologist येथे डॉ. श्वेता व्ही. सूर्यवंशी नांव नमूद आहे. यावरुन मयत रेवती यांची शस्त्रक्रिया करताना भूल देण्याचे कर्तव्य डॉ. श्वेता व्ही. सूर्यवंशी यांनी पूर्ण केले, हे ग्राह्य धरावे लागेल. निश्चितच, वैद्यकीय शास्त्रामध्ये भुलशास्त्र हे महत्वपूर्ण आहे आणि भुलतज्ञ अर्हतेसाठी विशेष पदवी किंवा पदविका आवश्यक असते. आता निर्माण होणारा प्रश्न असा की, डॉ. श्वेता व्ही. सूर्यवंशी ह्या भुल देण्याकरिता निपूण व कौशल्यप्राप्त होत्या काय ? परंतु प्रकर्षाने नमूद करणे भाग आहे की, डॉ. श्वेता सूर्यवंशी ह्या वैद्यक शास्त्रामध्ये निश्चित कोणत्या अर्हताधारक होत्या, हे स्पष्ट केलेले नाही.
(37) प्रस्तुत प्रकरणामध्ये मयत रेवती यांची शस्त्रक्रिया करताना भुल देण्यात आलेली होती, हे स्पष्ट आहे. मयत रेवती यांना भुल देण्याकरिता दिलेल्या औषधांचा स्पष्ट उल्लेख लेखी निवेदनपत्रामध्ये नाही. तसेच भुल कमी करण्यासाठी दिलेल्या औषधांचा उल्लेख दिसून येत नाही. झटके कमी करण्यासाठी कोणती औषधे व किती प्रमाणात दिली, याचे स्पष्टीकरण नाही. मयत रेवती यांचा श्वास अचानक अनियमीत होण्याचे कारण किंवा झटके येण्याचे कारण स्पष्ट केलेले नाही.
(38) आमच्या मते, वैद्यकीय व्यवसायिकास निष्काळजीपणाकरिता जबाबदार धरण्याकरिता महत्वपूर्ण बाब अशी की, एकतर त्यांच्याकडे आवश्यक कौशल्य नव्हते जे त्यांच्याकडे असल्याचा दावा केला होता किंवा त्यांनी उपचारादरम्यान आवश्यक व वाजवी क्षमता व कौशल्याचा वापर केला नाही जो त्यांच्याकडे उपलब्ध होता. प्रस्तुत प्रकरणामध्ये मयत रेवती यांना भुल देण्यामध्ये किंवा भुल कमी करण्यामध्ये कोणते औषधे वापरले गेले, औषधांची मात्रा किती दिली, भुल देण्याचे कर्तव्य कोणी पार पाडले, भुल देण्याकरिता कौशल्य व अर्हता होती काय इ. बाबी सिध्द करण्यामध्ये डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी असमर्थ ठरले आहेत. डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांचे कथन असे की, मयत रेवती यांची जखम गंभीर स्वरुपाची व जोखीमभरी होती. मोहन पाटील यांनी Consent of Anesthesia प्रपत्रावर स्वाक्षरी केली असली तरी मयत रेवती यांच्यावर शस्त्रक्रिया करताना स्वतंत्र व कौशल्यपूर्ण भुलतज्ञाची आवश्यकता का भासली नाही ? हे सिध्द करण्याचा प्रयत्न झालेला नाही. आमच्या मते, मयत रेवती यांची शस्त्रक्रिया करताना डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांच्याकडे भुल देण्याचे व कमी करण्याचे आवश्यक कौशल्य दिसून आलेले नाही.
(39) न्यायाच्या दृष्टीने आम्ही मा. सर्वोच्च न्यायालयाच्या "मे. स्प्रींग मेडाज हॉस्पिटल /विरुध्द/ हरजोल अहलुवालिया", सिव्हील अपील नं. 7858/1997, निर्णय दि. 25/3/1998 न्यायनिर्णयाचा संदर्भ घेऊ इच्छितो. प्रस्तुत न्यायनिर्णयामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदविलेले आहे.
In the case in hand we are dealing with a problem which centres round the medical ethics and as such it may be appropriate to notice the broad responsibilities of such organisations who in the garb of doing service to the humanity have continued commercial activities and have been mercilessly extracting money from helpless patients and their family members and yet do not provide the necessary services. The influence exhorted by a doctor is unique. The relationship between the doctor and the patient is not always equally balanced. The attitude of a patient is poised between trust in the learning of another and the general distress of one who is in a state of uncertainty and such ambivalence naturally leads t a sense of inferiority and it is, therefore, the function medical ethics to ensure that the superiority of the doctor is not abused in any manner. It is a great mistake to think that doctors and hospitals are easy targets for the dissatisfied patient. It is indeed very difficult to raise an action of negligence. Not only there are practical difficulties in linking the injury sustained with the medical treatment but also it is still more difficult to establish the standard of care in medical negligence of which a complaint can be made. All these factors together with the sheer expense of bringing a legal action and the denial of legal aid to all but the poorest operate to limit medical litigation in this country. With the emergence of the Consumer Protection Act no doubt in some cases patients have been able to establish the negligence of the doctors rendering service an din taking compensation thereof but the same is very few in number. In recent days there has been increasing pressure on hospital facilities, falling standard of professional competence and in addition to all, the ever increasing complexity of therapeutic and diagnostic methods and all this together are responsible for the medical negligence. That apart there has been a growing awareness in the public mind to bring the negligence of such professional doctors to light. Very often in a claim for compensation arising out of medical negligence a plea is taken that it is a case of bona fide mistake which under certain circumstances may be excusable, but a mistake which would tantamount to negligence cannot be pardoned. In the former case a court can accept that ordinary human fallibility precludes the liability while in the latter the conduct of the defendant is considered to have gone beyond the bounds of what is expected of the reasonably skill of a competent doctor. In the case of Whitehouse v Jordan and another, [1981] 1 ALL ER 267, an obstetrician had pulled too hard in a trial of forceps delivery and had thereby caused the plaintiff’s head to become wedged with consequent asphyxia and brain damage. The trial judge had held the action of the defendant to be negligent but this judgment had been reversed by Lord Denning, in the Court of Appeal, emphasising that an error of judgment would not tantamount to negligence. When the said matter came before the House of Lords, the views of Lord Denning on the error of judgment was rejected and it was held that an error of judgment could be negligence if it is an error which would not have been made by a reasonably competent professional man acting with ordinary care. Lord Fraser pointed out thus;
"The true position is that an error of judgment may, or may not, be negligent; it depends on the nature of the error. If it is one that would not have been made by a reasonably competent professional man profession to have the standard and type of skill that the defendant holds himself out as having, and acting with ordinary care, then it is negligence. If, on the other hand, it is an error that such a man, acting with ordinary care, might have made, then it is not negligence."
Gross medical mistake will always result in a finding of negligence. Use of wrong drug or wrong gas during the course of anaesthetic will frequently lead to the imposition of liability and in some situations even the principle of Res ipsa loquitur can be applied. Even delegation of responsibility to another may amount to negligence in certain circumstances. A consultant could be negligent where he delegates the responsibility to his junior with the knowledge that the junior was incapable of performing of his duties properly.
(40) असे दिसते की, मयत रेवती यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी मयत रेवती यांना सह्याद्री हॉस्पिटल, लातूर येथे पाठविले. मयत रेवती यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तपासणी केली असता त्या मयत असल्याचे सांगण्यात आले. डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी मयत रेवती यांची शस्त्रक्रिया करताना भुल देण्यामध्ये किंवा कमी करण्यामध्ये त्रुटी व निष्काळजीपणा केला आणि त्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊन मयत रेवती यांची प्रकृती गंभीर व चिंताजनक होऊन त्यांचा मृत्यू झाला, हाच एकमेव निष्कर्ष निघतो.
(41) डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांचे कथन की, मयत रेवती यांना विद्युत धक्का बसल्यामुळे त्या जमिनीवर पडल्या होत्या. वास्तविक पाहता, तसे दर्शविणारे किंवा नमूद करणारे उचित कागदपत्रे दाखल नसल्यामुळे त्या कथनावर विश्वास ठेवता येणार नाही.
(42) उक्त विवेचनाअंती मयत रेवती यांना वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया करताना डॉ. विक्रम सूर्यवंशी व डॉ. श्वेता सूर्यवंशी यांनी निष्काळजीपणा केला आणि ते कृत्य त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत .
(43) तक्रारकर्ते क्र.1 व 2 अज्ञान आहेत. मयत रेवती ह्या श्रीकांत एजन्सीज, किल्लारी येथे हिशोब सांभाळण्याचे व बँकेचे व्यवहार पाहत असल्याचे व त्याकरिता मासिक रु.9,000/- वेतन देण्यात येत असल्याचे प्रमाणपत्र अभिलेखावर दाखल आहे. वास्तविक पाहता, श्रीकांत एजन्सीज, किल्लारी यांचे मालक व चालक यांचे शपथपत्र, वेतनाचे अभिलेख, मयत रेवती यांचे शैक्षणिक कागदपत्रे इ. अभिलेखावर दाखल नाहीत. आमच्या मते, नुकसान भरपाईचे प्रमाण व्यक्तिनिष्ठ असते. विशेषत: वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांमध्ये नुकसानभरपाईचे प्रमाण निश्चित करणे कठीण बनते. सर्वसाधारणपणे, नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. अनेकदा, प्रकरणानुरुप अवलंबित्वाच्या नुकसानीसह संभाव्य किंवा भविष्यातील नुकसानीसाठी भरपाई दिली जाते. हे सत्य आहे की, मयत रेवती यांचे वय केवळ 27 वर्षे होते आणि त्यांच्यामागे दोन अल्पवयीन मुले आहेत. मयत रेवती यांचा मृत्युनंतर 7 व 5 वर्षे वय असणारी मुले मातृप्रेमापासून कायम वंचित झाली आणि आईचे प्रेमळ मायेचे छत्र कायमस्वरुपी हिरावले गेले. निश्चितच ते कायमस्वरुपी व कदापि न भरुन येणारे मानसिक, भावनिक, शारीरिक नुकसान आहे.
(44) तक्रारकर्ते क्र.1 व 2 अज्ञान असून त्यांच्याकरिता मागणी केलेली प्रत्येकी रु.20,00,000/- रकमेचे मागणी अनुचित किंवा अवास्तव नाही, असे जिल्हा आयोगाचे स्पष्ट मत आहे.
त्या अनुषंगाने तक्रारकर्ते क्र.1 व 2 यांना प्रत्येकी रु.20,00,000/- नुकसान भरपाई मंजूर करणे न्यायोचित आहे.
(45) तक्रारकर्ते यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,00,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, तक्रारकर्ते यांना नुकसान भरपाई मिळविण्याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्याययप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ते यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मिळण्यास तक्रारकर्ते पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(46) तक्रारकर्ते क्र.1 व 2 हे अज्ञान व अल्पवयीन आहेत. त्यांचेकरिता त्यांचे आईचे वडील मोहन पाटील हे पालक दिसतात. आमच्या मते, नुकसान भरपाईची रक्कम तक्रारकर्ते क्र.1 व 2 हे सज्ञान होईपर्यंत राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मुदत ठेवीद्वारे गुंतवणूक केली जावी आणि तोपर्यंत प्रतिमहा व्याज त्यांचे शिक्षण व दैनंदीन गरजा भागविण्याकरिता वापरले जावे, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(47) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ते क्र.1 व 2 यांना प्रत्येकी रु.20,00,000/- याप्रमाणे एकूण रु.40,00,000/- (रुपये चाळीस लक्ष फक्त) नुकसान भरपाई द्यावी.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी उक्त नुकसान भरपाई रक्कम आदेश तारखेपासून 45 दिवसाच्या आत न दिल्यास त्यापुढे उक्त रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज देय राहील.
ग्राहक तक्रार क्र. 31/2022.
(4) उक्त आदेश क्र.2 प्रमाणे देय असणारी रक्कम तक्रारकर्ते क्र.1 व 2 सज्ञान होईपर्यंत प्रत्येकी रु.20,00,000/- प्रमाणे दोन स्वतंत्र मुदत ठेव पावतीद्वारे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये गुंतवणूक करण्यात यावी. ठेवीकरिता मासिक व्याज योजना स्वीकारुन तक्रारकर्ते क्र.1 व 2 सज्ञान होईपर्यंत त्यांचे शिक्षण व दैनंदीन गरजा पूर्ण करण्यासाठी पालक मोहन पाटील यांच्या बँक खात्यामध्ये प्रतिमहा देय व्याज वर्ग करण्याच्या सूचना संबंधीत बँकेस कराव्यात.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ते यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- द्यावेत.
(6) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-