Dated the 10 Jun 2015
न्यायनिर्णय
(द्वारा श्री. म.य. मानकर - मा.अध्यक्ष )
1. तक्रारदार हया त्यांच्या पहिल्या प्रसुतीकरीता सामनेवाले यांच्या नेरळ येथील नर्सिंग होममध्ये भरती झाल्या. सामनेवाले क्र. 1 यांनी विविध उपचार व पिडादायक पध्दती वापरली, तरीसुध्दा प्रसुती होऊ शकली नाही. सामनेवाले क्र. 1 यांनी त्यांचे पती सामनेवाले क्र. 2 यांनासुध्दा बोलावले होते. तरीसुध्दा प्रसुती न झाल्यामुळे तक्रारदार यांना बदलापूर येथील डॉ. भूगांवकर यांचे नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. परंतु तोपर्यंत खूप उशिर झाल्याने अर्भक मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. अर्भक मृत होण्यास सामनेवालेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याने त्यांचेविरुध्द ही तक्रार दाखल करण्यात आली.
2. नोटीस प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले हजर झाले व लेखी कैफियत दाखल केली. त्यांनी निष्काळजीपणाचा पूर्णपणे इन्कार केला.
3. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः
तक्रारदार या मार्च 2003 मध्ये गर्भवती राहिल्या व त्यांचे पहिले बाळंतपण असल्याने त्या आपल्या आईकडे नेरळ येथे प्रसुतीकरीता गेल्या. सामनेवाले हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचे नेरळ पश्चिम येथे हॉस्पिटल आहे. तक्रारदार त्यांच्या आईसोबतदि. 24/11/2003 रोजी सामनेवाले यांचे हॉस्पिटलमध्ये गेल्या व सामनेवालेशी प्रसुतीबाबत चर्चा केली. त्या वेळचेवेळी सामनेवाले यांचे हॉस्पिटमध्ये तपासणीसाठी जात होत्या. तक्रारदारांनी सामनेवाले यांना वेळोवेळी त्यांची फी दिली. तक्रारदार त्यांच्या पतीसोबत दि. 29/11/2003 ला सामनेवालेचे हॉस्पिटलमध्ये गेल्या. सामनेवाले यांनी तक्रारदारांना आश्वासन दिले की त्यांची प्रसुती विनाअडथळयाची होईल व त्याबाबत काळजी करण्यासारखे काही नाही व गुंतागुंत होण्याची काही शक्यता नाही.
4. तक्रारदार दि. 04/12/2003 रोजी सकाळी 10.00 वाजता तपासणीसाठी सामनेवाले यांच्या हॉस्पिटलला गेले असतांना त्यांना कन्सल्टींग रुममध्ये नेण्यात आले. तिथे सामनेवाले क्र. 1 यांनी त्रासदायकरित्या त्यांची तपासणी केली व त्यामुळे तक्रारदार यांना इजा झाली व रक्तत्राव झाला. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांची प्रसुती त्याच सायंकाळी किंवा रात्री होऊ शकते असे सांगितले. तक्रारदार त्यांच्या आईकडे परत आल्यानंतर रात्री 9.00 वाजेपासून पांढरास्त्राव जाऊ लागला. त्यामुळे तक्रारदारांना लगेचच त्यांच्या आईने व भावाने व भावाच्या पत्नीने सामनेवालेचे हॉस्पिटलला नेले. तक्रारदार यांची परिस्थिती गंभिर असतांनासुध्दा व वारंवार विनंती केल्यावरसुध्दा सामनेवाले क्र. 1 एका तासाने त्यांचेकडे आल्या व तपासणी केल्यानंतर अंदाजे 3 तासांमध्ये सामान्य डिलीव्हरी होईल असे सांगितले.
5. रात्री अंदाजे 1.00 वाजता अर्भकाचे डोके दिसत असतांना सामनेवाले क्र. 1 यांनी जबरदस्तीने स्टिलच्या चिमटयाने डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्भक परत आंत गेले. त्यानंतर सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांना इंजेक्शन दिले व तक्रारदारांचे शरिरामध्ये गुप्तांगाद्वारे हात टाकून अर्भकाला बाहेर काढण्याचा वारंवार प्रयत्न केला. त्यामुळे तक्रारदारांना असहय वेदना होऊ लागल्या. तक्रारदारांनी त्यांची परिस्थिती बघता सामनेवाले क्र. 1 यांना विनंती केली की त्यांचे सिझेरियन करुन मुलाला वाचविण्यात यावे. परंतु सामनेवाले क्र. 1 त्यांचेवर ओरडले व चूप बसण्यास सांगितले. त्यानंतर सामनेवाले क्र. 1 यांनी अजून एक पिडादायक प्रकार केला व सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांचे गुप्तांगावर डाव्या बाजून ब्लेडने चिरा दिला व त्यामुळे खूप रक्तत्राव होऊ लागला व तक्रारदाराची स्थिती अजूनच गंभिर झाली. सामनेवाले क्र. 1 यांनी मदतीसाठी सामनेवाले क्र. 2 यांना रात्री 1.30 वाजता बोलावले व तक्रारदार यांचे हातपाय नर्सेसनी पकडून ठेवले व सामनेवाले क्र. 1 व 2 तक्रारदारांचे पोटावर हाताने जोर लावून सामनेवाले क्र. 1 हे हाताने अर्भक बाहेर काढण्याचा प्रयत्न करु लागले. अतिवेदनेमुळे तक्रारदार या जोराने रडू लागल्या. तेव्हा त्यांचे नातेवाईकांनी तक्रारदारांना दुस-या हॉस्पिटलमध्ये नेण्याची विनंती केली. परंतु सामनेवाले यांनी त्यांना चूप बसण्यास सांगितले. सामनेवाले यांनी पिडादायक प्रकार सुरु ठेवला. जेव्हा प्रसुती होण्याची शक्यता दिसून आली नाही तेव्हा त्यांनी बदलापूर येथील डॉ. भूगांवकर यांच्या अक्षय नर्सिंग होममध्ये पाठविण्यासाठी फोनवर चर्चा केली व तक्रारदारांचे आई व भावाला तक्रारदारांना बदलापूर येथे नेण्यास सांगितले. त्यानंतर सामनेवाले हे थोडयावेळाने तक्रारदारांसोबत बदलापूर येथे आले. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांच्या आईंना तक्रारादारांचे पतीला काही न सांगण्याबाबत ताकीद दिली. तक्रारदार या अक्षय नर्सिंग होमला दि. 05/12/2003 रोजी सकाळी 6.40 ला पोहोचले तेव्हा डॉ. भूगांवकर यांनी लगेच सोनोग्राफी केली व तक्रारदारांच्या आईला सांगितले की अर्भक गुदमरुन मरण पावले आहे व लगेचच सिझेरियन करुन तक्रारदारांचे प्राण वाचविणे आवश्यक आहे. तक्रारदारांच्या आईने संमती दिल्यानंतर डॉ. भूगांवकर यांनी रिझेरियनद्वारे अर्भक, जो मुलगा होता व वजन 3 किली होते, आवश्यक तपासणी केल्यानंतर मृत झाल्याचे घोषित केले व प्रसुतीचा कालावधी लांबल्यामुळे मूल मृत झाल्याचे सांगितले.
6. तक्रारदारांनी त्यानंतर डॉ. लेसी जॅकब यांचेकडून उपचार करुन घेतले व वकीलाद्वारे सामनेवाले यांना नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. तसेच तक्रारदारांनी सामनेवाले यांचेविरुध्द प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी, उल्हासनगर यांचे न्यायालयात भा.दं.वि. चे कलम 304 (अ) प्रमाणे केस दाखल केली. त्यामध्ये
तपास होऊन व डॉ. भूगांवकर, डॉ. जॅकब यांचे बयाण नोंदविण्यात आले. पोलिसांच्या अहवालाप्रमाणे सामनेवाले यांचा निष्काळजीपणा अर्भकाचे मृत्यूस कारणीभूत होता. सबब तक्रारदारांनी ही सामनेवालेविरुध्द निष्काळजीपणाची तक्रार दाखल केली व नुकसानीकरीता रु. 19,00,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु. 10,000/- ची मागणी केली.
7. दोन्ही सामनेवाले यांनी त्यांची कैफियत स्वतंत्रपणे दाखल केली आहे. परंतु दोघांचा बचाव एकसारखाच आहे. त्यामुळे त्या दोघांची लेखी कैफियत एकत्रितपणे नमूद करण्यात येते.
8. सामनेवालेप्रमाणे त्यांचे नांव त्या परिसरामध्ये प्रसिध्द आहे व त्यांचे नांवाची बदनामी करण्याकरीता व त्यांचेकडून पैसे उकळण्याकरीता ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी सेवा देण्यात कोणतीही कसूर केलेली नाही. सामनेवाले यांचेप्रमाणे तक्रारदारांची प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी, उल्हासनगर यांचेकडे याच स्वरुपाची तक्रार प्रलंबित असल्याने ही तक्रार खारीज करण्यात यावी. त्याचप्रमाणे डॉ. भूगांवकर यांना या तक्रारीमध्ये आवश्यक पक्ष म्हणून संमेलित करणे आवश्यक होते व त्यांनी गर्भात मृत झालेल्या अर्भकास सिझेरियनने काढण्यापेक्षा Craniotomy द्वारे काढणे जास्त उपयुक्त ठरले असते. अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत संदेह आहे. कारण त्याचे पोष्टमार्टेम झालेले नाही. या मृत्यूबाबत डॉ. भूगांवकर यांनी पोलिसांना माहिती दिली नव्हती. डॉ. भूगांवकर यांचे फाईंडीगस् हे विरोधाभासी आहेत.
या तक्रारीमध्ये विभिन्न मुद्दे उपस्थित आहेत व त्याकरीता भरपूर पुरावा देणे आवश्यक आहे, त्यामध्ये उलट तपासणीची आवश्यकता आहे. तसेच गुंतागुंतीचे प्रकरण असल्याने ते मंचाने समरी पध्दतीने चालवू नये. तक्रारदारांनी ब-याचशा बाबी मुद्दाम लपवून ठेवल्या. तसेच तक्रारदारांनी काही बाबी मुद्दाम खोडसाळपणे नमूद केलेल्या आहेत. व्ही.आर. नर्सिंग होम हे सामनेवाले क्र. 2 यांचे स्वामित्वाचे आहे. सामनेवाले क्र. 2 यांचेप्रमाणे जर एका डॉक्टरचे मत दुस-या डॉक्टरपेक्षा वेगळे असले अथवा दोघांचे निदानामध्ये फरक असला तर तो निष्काळजीपणा म्हणता येत नाही. दोन्ही सामनेवाले यांनी निष्काळजपणाची बाब अमान्य केली आहे व तक्रार ही खोटी असून ती दंडासहीत खारीज करण्यात यावी.
9. दोन्ही पक्षांनी त्यांचे पुरावा शपथपत्र, लेखी युकतीवाद दाखल केला. सामनेवाले यांचेवतीने तक्रारदार यांचे साक्षीदार डॉ. भूगांवकर यांना Interrogatory द्वारे प्रश्न विचारण्यात आले. सामनेवाले यांनी त्यांचे निवेदनास पृष्टी देण्याकरीता तज्ञाचा अभिप्राय दाखल केला तसे दोन्ही पक्षांनी विविध कागदपत्रे तसेच वैदयकीय पुस्तकांचा आधार घेतला.
10. दोन्ही पक्षांचे प्लिडींगस् विचारात घेता खालील बाबी या मान्य बाबी आहेत असे म्हणता येईल.
(i) तक्रारदार यांची ही पहिली प्रसुती होती. त्यांनी सामनेवाले यांचेकडून प्रसुतीचे तारखेपूर्वी तपासण्या व उपचार करुन घेतले होते. दि. 04/03/2005 ला तक्रारदार हया सामनेवाले यांचे दवाखान्यात भरती झाल्या. तक्रारदार या प्रसुत होऊ शकल्या नाही. सामनेवाले क्र. 2 हे सामनेवाले 1 यांना सहाय्य करण्याकरीता आल्यावर सुध्दा प्रसुती झाली नाही. दि. 05/05/2003 रोजी तक्रारदार यांना डॉ. भूगांवकर यांचे बदलापूर येथील नर्सिंग होममध्ये स्थानांतरीत करण्यात आले. सिझेरियन पध्दतीने अर्भकास काढण्यात आले, ते मृत होते. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी तक्रारदार यांचे तक्रारीवर समानेवाले यांचेविरुध्द भा.दं.वि. च्या कलम 304(अ) करीता समन्स बजावला. सामनेवाले यांनी त्यास सत्र न्यायालय कल्याण व नंतर मा.बॉम्बे उच्च न्यायालयात आव्हान दिले. मा.बॉम्बे उच्च न्यायालयानी दोन्ही आरोपींना/सामनेवाले यांना फौजदारी प्रकरणातून डिसचार्ज केले.
(ii) हे प्रकरण मागील अंदाजे दोन वर्षांपासून अंतीम सुनावणीसाठी नेमण्यात आले होते. परंतु तक्रारदार हे सतत गैरहजर आहेत. त्यांना मंचाचेवतीने दि. 07/04/2012 रोजी नोटीस काढण्यात आली होती. तसेच तक्रार दि. 21/11/2014, दि. 23/12/2014, दि. 16/02/2015 व दि. 22/04/2015 रोजी तोंडी युक्तीवादासाठी नेमण्यात आली होती. परंतु दोन्ही पक्ष सातत्याने गैरहजर राहत असल्यामुळे शेवटी दोन्ही पक्षांचा लेखी युक्तीवाद विचारात घेऊन अंतिम निर्णय देण्यात येत आहे.
11. या प्रकरणात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे प्रसुतीचेवेळी निष्काळजीपणा केला काय? जो अर्भकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला.
सर्व साधारणपण फौजदारी व दिवाणी प्रकरणात पुराव्याचे मुल्यमापन करण्यासाठी लावले जाणारे मापदंड वेगवेगळे असतात. फौजदारी प्रकरणात “Beyond Reasonable Doubt” चा तर दिवाणी प्रकरणात “Preponderance of Probabilities” चा मापदंड लावण्यात येतो. न्यायालयाने एखादया साक्षीदार किंवा पुराव्याबाबत नोंदविलेल्या मताला महत्त्व प्राप्त होते. या प्रकरणात सामनेवाले हे वैदयकीय व्यावसायिक आहेत आणि त्यांनी वैदयकीय निष्काळजीपणा केला असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. वैदयकीय निष्काळजीपणा झाला आहे किंवा नाही हे एक वैदयकीय व्यावसायिक खात्रीपूर्वक व समाधानकारकपणे सांगू शकतो किंवा त्याबाबत तो आपले मत मांडू शकतो.
(ब) तक्रारदार यांनी वैदयकीय निष्काळजीपणा झाला आहे हे दाखविणेकरीता डॉ. भूगांवकर यांचे पुराव्यावर भिस्त ठेवली आहे व तो वैदयकीय व्यावसायिकाचा एकमेव पुरावा आहे. मा. बॉम्बे उच्च न्यायालयाने उभय पक्षांमध्ये फौजदारी प्रकरणातील निकाल देतांना डॉ. भूगांवकर यांचा पुरावा Ambivalent (अनिश्चित) असल्याचे नमूद करीत ग्राहय न धरता आरोपींना/सामनेवाले यांना डिसचार्ज केले व फौजदारी प्रकरण खारीज केले. आमच्यामते मा. बॉम्बे उच्च न्यायालयाने डॉ. भूगांवकर यांचे पुराव्याबाबत स्पष्ट निवाडा दिला असतांना व त्याला finality प्राप्त झाल्यामुळे त्याबाबत अजून काही म्हणायची आवश्यकता नाही व तो या प्रकरणात लागू पडतो व बंधनकारक आहे. सामनेवाले यांनी वैदयकीय निष्काळजीपणा केला आहे हे दाखविण्यासाठी अभिलेखावर अजून काही शिल्लक रहात नाही. अंततः सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे प्रसुतीसमयी निष्काळजपणा दाखविला व त्याचा परिणाम अर्भकाचे मृत्यूस कारणीभूत ठरला असे म्हणता येणार नाही. तक्रारदारांसोबत जी घटना घटीत झाली ती निश्चितपणे दुःखदायी व क्लेशदायक होती. परंतु त्याकरीता सामनेवालेस जबाबदार धरता येणार नाही
12. वरील कारणांवरुन आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
13. यापूर्वी सदर प्रकरण मंचाचा कार्यभार बघता व इतर प्रशासकीय कारणांमुळे निकाली काढता आले नाही.
आ दे श
तक्रार क्र. 25/2006 खारीज करण्यात येते.
खर्चाबाबत आदेश नाही.
आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना टपालाने निःशुल्क पाठविण्यात याव्यात.