निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार ही मयत बालाजी गंगाराम राजरपल्लू यांची पत्नी असून ती मौजे सोमठाना ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी आहे. अर्जदाराचा पती मयत बालाजी राजरपल्लू हा दिनांक 30/03/2013 रोजी मोटारसायकल वर धर्माबाद येथून बोधनकडे हनमंत बोमलेवार यांच्यासोबत जात असतांना मोटारसायकल क्र. ए.पी.25 क्यु.7897 च्या चालकाने निष्काळजीपणाने मोटारसायकल चालवून पाठीमागून धडक दिल्याने त्यात अर्जदाराचे पती गंभीर जखमी झाले. त्यांना बोधन येथील दवाखान्यात शरीक केले व तेथून पुढे गांधी हॉस्पीटल हैद्राबाद येथे उपचाराकामी शरीक केले असता उपचारादरम्यान दिनांक 04/03/2013 रोजी त्यांचा मृत्यु झाला. पोलीस स्टेशन बोधन यांनी गुन्हा क्र. 7/2013 मोटारसायकल ए.पी.25 क्यु.7897 चा चालक शेख अहमद यांच्याविरुध्द दाखल केला. मयत बालाजी हा व्यवसायाने शेतकरी होता. त्याच्या नावे मौजे सोमठाना ता. उमरी जि. नांदेड येथे गट क्र. 102 मध्ये 50 आर एवढी शेती होती. शेतकरी या नात्याने तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी होता. अर्जदाराने आपल्या पतीच्या मृत्युनंतर तालुका कृषी अधिकारी उमरी यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रासह विमा दावा दाखल केला. त्यानंतर परत दिनांक 28/02/2014 रोजी गैरअर्जदार यांच्या सुचनेप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे दाखल केली. सदर महिला ही अशिक्षीत असल्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास तिला विलंब झाल्यामुळे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे क्लेम दाखल करण्यास विलंब झाला. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे जावून विमा रक्कम मिळण्यासाठी विचारणा केली असता अर्जदारास गैरअर्जदाराने विमा रक्कम दिली नाही. अर्जदाराने पुन्हा दिनांक 28/08/2014 रोजी परत विमा रक्कमेची मागणी केली असता गैरअर्जदाराने त्यास नकार दिला म्हणून अर्जदाराने मंचात सदरची तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केली आहे की, अर्जदारास विमा रक्कम रु.1,00,000/- त्यावर तारीख 08/08/2011 पासून 18 टक्के व्याजासह अर्जदारास देण्याचा आदेश करावा. अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु.5,000/- देण्याबाबत आदेश करावा.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांना मंचाची नोटीस प्राप्त होवूनही त्यांनी मंचात हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केलेले नाही त्यामुळे दिनांक 24/02/2015 रोजी त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
4. गैरअर्जदार क्र.2 यांना मंचाची नोटीस तामील झाल्यानंतर ते वकीलमार्फत हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
5. प्रस्तुत प्रकरणातील मुळ कागदपत्रे व प्रस्तावाबाबत कसलाही दावा/सुचना त्यांना जिल्हा अधिक्षक, कृषी कार्यायालय, नांदेड यांच्याकडून आजतागायत मिळालेले नाही. जो पर्यंत त्यांच्याकडे जिल्हा अधिक्षक, कृषी कार्यालय यांच्याकडून प्रस्ताव येत नाही तो पर्यंत ते कोणत्याच प्रकारची पुढील कार्यवाही करु शकत नाहीत. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणात देखील पुढील कार्यवाही करता आलेली नाही त्यामुळे गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, प्रस्तुत तक्रारी अंतर्गत नुकसान भरपाईसाठी त्यांना जबाबदार धरण्यात येवू नये.
गैरअर्जदार क्र. 3 यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे.
6. या योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या फायदयासाठी प्रिमियमचा भरणा केलेला आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा करार झालेला नाही. त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होत नाही. महाराष्ट्र शासन व गैरअर्जदार क्र. 3 यांच्यातील करारानुसार काही वाद निर्माण झाल्यास तो जिल्हा स्तरावरील समिती सर्व पक्षकारांची बाजू ऐकूण घेवून 15 दिवसात त्यावर निर्णय घेईल. अर्जदाराने याप्रकारे कुठलेही उपाय न अवलंबिता सदर तक्रार दाखल केलेली असल्यामुळे सदरची तक्रार ही अपरिपक्व असून खारीज करण्यायोग्य आहे. गैरअर्जदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार कंपनीस अर्जदाराचा क्लेम मिळालेला आहे परंतू काही कागदपत्रे मिळालेली नाहीत. त्यामुळे सदर क्लेमबाबत गैरअर्जदार कुठलीही कार्यवाही करु शकलेले नाहीत. अर्जदाराने त्याचा क्लेम तालुका कृषी अधिकारी उमरी यांच्याकडे दाखल केला होता तो तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत पुढे असे म्हणणे आहे की, तो गैरअर्जदार विमा कंपनीस मिळाला असे दाखविणारे कुठलेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. त्यामुळे सदरील क्लेम बाबत अर्जदाराने कार्यवाही केलेली नाही. अर्जदाराचा क्लेम हा अपरिपक्व आहे. त्यामुळे गैरअर्जदार मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा तक्रार अर्ज गैरअर्जदार 3 विरुध्द खर्चासह खारीज करावा.
7. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
8. अर्जदार हिचा पती मयत बालाजी गंगाराम राजरपल्लू हा दिनांक 03/03/2013 रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी होवून दिनांक 04/03/2013 रोजी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पोलीस पेपर्स वरुन स्पष्ट आहे. मयत बालाजी हा शेतकरी होता हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या 7/12 च्या उता-यावरुन स्पष्ट आहे. मयत बालाजी हा शेतकरी असल्याने अर्जदार ही शेतकरी अपघात विमा योजनेची लाभार्थी आहे. त्यामुळे अर्जदाराने विमा रक्कम मिळण्यासाठी गैरअर्जदार क्र. 1 तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दिनांक 28/02/2014 रोजी विमा दावा दाखल केलेला आहे. गैरअर्जदार विमा कंपनी यांनी त्याच्या म्हणण्याच्या परिच्छेद क्र. 7 मध्ये हे मान्य केलेले आहे की, गैरअर्जदार विमा कंपनीस अर्जदाराचा विमा क्लेम मिळालेला आहे पण काही कागदपत्रे मिळालेली नाहीत. त्यामुळे ते सदर दाव्याबाबत निर्णय घेवू शकले नाहीत.
9. गैरअर्जदार विमा कंपनी यांनी त्यांना कोणते कागदपत्र मिळालेली नाहीत याचा उल्लेख केलेला नाही. तसेच प्रकरण मंचात दाखल झाल्यानंतर मंचासमोर कागदपत्र दाखल झालेली आहेत व ती सर्व गैरअर्जदार विमा कंपनीस मिळालेली आहेत. तरीपण गैरअर्जदार विमा कंपनीने त्यावर निर्णय घेतलेला नाही. जे की, अयोग्य असून सेवेत त्रुटी आहे, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास रक्कम रु.1,00,000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावी.
3. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.