अर्जदार तर्फे वकील - श्री.बी.व्ही.भुरे
गैरअर्जदार क्र.1 गैरहजर,
गैरअर्जदार क्र. 2 स्वतः हजर,
गैरअर्जदार क्र. 3 व 4 तर्फे वकील - श्री.एस.व्ही.राहेरकर
निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार क्र. 1 व 5 हे मयत वसंत विठठल होनशेटटे यांचे आईवडील असून अर्जदार क्र. 2 ते 4 हे मयत वसंत विठठल यांची मुले आहेत. मयत वसंत यास दिनांक 08.08.2011 रोजी शेतामाध्ये काम करीत अतसांना विषारी सापाने चावा घेतला, त्यास उपचाराकामी सरकारी दवाखाना उमरी व नंतर विठाई हॉस्पीटल नांदेड येथे उपचाराकामी शरीक केले. दिनांक 09.08.2011 रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. पोलीस पाटील बेलदरा तालुका उमरी यांनी वसंत विठठल होनशेटटे यांचा साप चावुन मृत्यु झाला असल्याचा अहवाल दिला. मयत वसंत हा व्यवसायाने शेतकरी होता,त्याचे नावाने बेलदरा तालुका उमरी ,जिल्हा नांदेड शिवारात गट क्रमांक 35/1 मध्ये 1 हेक्टर व 1 आर, गट क्रमांक 35/3 मध्ये 17 आर व गट कमांक 35/5 मध्ये 32 आर एवढी शेतजमीन होती. शेतकरी या नात्याने तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता, ज्याची पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडे महाराष्ट्र शासनाने घेतली होती. मयत वसंत विठठल यांचे पत्नी रेखाबाई वसंत होनशेटटे हीने पतीचे मृत्यु पश्चात तालुका कृषी अधिकारी,उमरी यांचेकडे विमा दावा दाखल केला. परंतु दुर्दैवाने दिनांक 11.08.2012 रोजी रेखाबाई हीचा पण मृत्यु झाला. त्यानंतर अर्जदार यांनी दिनांक 04.09.2012 रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह क्लेम फॉर्म रजि.पोस्टाने दाखल केला. त्यानंतर दिनांक 14.12.2012 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांचे मागणीप्रमाणे पुन्हा कागदपत्रे दाखल करुन त्रुटींची पुर्तता केली त्याची पोहोच पावती न्यायालयात दाखल केलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेकडे जाऊन विमा रक्कम देणेसाठी विनंती केली असता आज या उद्या या म्हणून टाळाटाळ करीत राहिले. अर्जदाराने पुन्हा दिनांक 21.12.2013 रोजी जाऊन विमा रक्कम मागणेसाठी गेले असता गैरअर्जदार यांनी विमा रक्कम देणेस नकार दिला. म्हणून अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी विम्याची रक्कम रु.1,00,000/- व्याजासह गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस तामील होऊनही ते प्रकरणात हजर झालेले नाहीत. गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांना नोटीस तामील झाल्यानंतर तक्रारीत हजर झाले. गैरअर्जदार 2 यांनी तसेच गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांनी स्वतंत्रपणे आपले लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. सदर प्रस्तावाची मुळ कागदपत्रे व प्रस्तावाबाबत कसलाही दावा सुचना त्यांना जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी,नांदेड यांचेकडून आजतागायत मिळालेला नाही. म्हणून प्रस्तुत प्रकरणात त्यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही व मंचास अशी विनंती केलेली आहे की, त्यांना सदर तक्रारीत जबाबदार धरण्यात येऊ नये.
गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
5. गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांनी अर्जदाराचे गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे तक्रारीतील बहूतांश कथन अमान्य केलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीविरुध्द आहे व त्याच प्रमाणे सदरील तक्रार ही मुदतबाहय आहे. कथीत घटना ही सन 2011 मध्ये झालेली दिसते जेव्हा की, अर्जदाराने मृत्यु दावा सन 2014 मध्ये दाखल केलेला आहे या कारणास्तव अर्जदाराची तक्रार खारीज होणे योग्य आहे. एखाद्या विमाधारकाचा अपघात झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत त्याबाबतचा क्लेम संबंधीताकडे दाखल करणे हे आवश्यक आहे. परंतु प्रस्तुत प्रकरणात अर्जदाराकडून गैरअर्जदार यांना कोणत्याही प्रकारचा विमा दावा प्राप्त झालेला नाही. त्यामुळे ते पुढील कार्यवाही करु शकले नाहीत. त्यामुळे सदरील तक्रार ही अपरिपक्व आहे. त्यामुळे अर्जदारास त्याचा विमा दावा गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह देणेसाठी निर्देशित करण्यात यावे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे बहुतांश म्हणणे अमान्य केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांनी मंचास अशी विनंती केलेली आहे की, अर्जदाराची तक्रार त्यांचेविरुध्द खर्चासह फेटाळण्यात यावी.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
7. अर्जदार यांचा मुलगा मयत वसंत विठठल होनशेटटे हा शेतकरी होता हे अर्जदाराने दाखल सातबारा उता-यावरुन स्पष्ट आहे. अर्जदाराचा मयत मुलगा हा शेतकरी या नात्याने महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता हे स्पष्ट आहे. अर्जदाराचा मुलाचा मृत्यु हा सर्पदंशाने झाला आहे असा अहवाल पोलीस पाटील बेलदरा तालुका उमरी यांनी दिला. सदर अहवालाची झेरॉक्स प्रत अर्जदाराने मंचात दाखल केलेली आहे.
मयत वसंत विठठल होनशेटटे यांची पत्नी रेखाबाई वसंतराव होनशेटटे यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे विमा दावा दाखल केलेला होता. परंतु दिनांक 11.08.2012 रोजी रेखाबाई यांचा देखील मृत्यु झाला आहे.
तालुका कृषी अधिकारी,उमरी यांनी दिनांक 12.09.2012 रोजी उमरी यांनी कृषी पर्यवेक्षक यांना पत्र पाठवून पुढील कार्यवाही करण्याचे सुचित केलेले दिसून येते. अर्जदाराने सदर पत्राची झेरॉक्स प्रत मंचात दाखल केलेली आहे. यावरुन असे दिसते की, प्रस्तुत प्रकरणातील विमा दावा हा In process (प्रलंबित) होता. गैरअर्जदार क्र. 2 यांनी मात्र सदरचा दावा त्यांचेकडे आलेला नाही असे म्हणणे दिलेले आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 3 व 4 संबंधीत विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, विमा दावा त्यांचेकडे आलेलाच नाही. त्यामुळे त्यांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. अर्जदार यांनी मंचात तक्रार दाखल करुन सर्व संबंधीत कागदपत्रे दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार यांना ती मिळालेली आहेत. तरीपण गैरअर्जदार यांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. दाखल केलेल्या कागदपत्रावरुन अर्जदार यांचा मुलगा हा शेतकरी असुन त्यांचा मृत्यु अपघाती झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा तो लाभार्थी आहे व पॉलिसीच्या नियम व अटी नुसार अर्जदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र असल्याचे स्पष्ट होते. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांनी अर्जदारास रक्कम रु.1,00,000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावेत.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
4. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.