(पारीत व्दारा श्री भास्कर बी. योगी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक-08 ऑक्टोंबर, 2021)
01. उभय तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा -2019 च्या कलम-35(1) खाली विरुध्दपक्ष ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी आणि इतर यांचे विरुध्द मृतक शेतक-याचे अपघाती मृत्यू संबधात शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारदारांच्या तक्रारी प्रमाणे या प्रकरणात विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं 3 ही एक विमा सल्लागार कंपनी असून ती प्राप्त दाव्यांची छाननी करुन विमा दाव्यातील त्रटीची संबधितां कडून पुर्तता करुन पुढे तो विमा दावा निश्चीतीसाठी विमा कंपनी कडे पाठविते. विरुध्दपक्ष क्रं 4 तालुका कृषी अधिकारी असून ते शासनाचे वतीने संबधित मृतक शेतक-यांचे वारसदारां कडून विमा दावे स्विकारतात व पुढे विमा दावे विमा सल्लागार कंपनीचे मार्फतीने पाठवितात. मृतक श्री नेपाल नारायण रामटेके हा व्यवसायाने शेतकरी होता व त्याचा विमा शासनाने काढलेला होता आणि विम्याचे वैध कालावधीत त्याचा अपघाताने मृत्यू झाला. मृतक शेतकरी श्री नेपाल रामटेके हा मृत्यूचे वेळी अविवाहित होता. यातील तक्रारकर्ती क्रं 1 श्रीमती निर्मला रामटेके ही मृतकाची आई असून तक्रारकर्ता क्रं-2 श्री प्रशांत रामटेके हा मृतकाचा भाऊ आहे आणि मृतकाचे कायदेशीर वारसदार या नात्याने विमा दाव्याची रक्कम मिळावी यासाठी त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगा समोर प्रस्तुत तक्रार दाखल केली. तक्रारी मध्ये नमुद केल्या प्रमाणे मृतक श्री नेपाल रामटेके याची माहिती खालील विवरणपत्रामध्ये देण्यात येते-
मृतक शेतक-याचे नाव | मृतकाचे नावे असलेल्या शेतीचा तपशिल | अपघाती मृत्यूचा दिनांक | मृत्यूचे कारण | वि.प.क्रं 4 तालुका कृषी अधिकारी यांचे कडे विमा दावा सादर केल्याचा दिनांक | त.क.चे विमा दाव्या संबधात सद्द स्थिती. निर्णया बद्दल त.क.ला विमा कंपनीने आज पर्यंत काही कळविल्या बाबत पुरावा आहे काय |
01 | 02 | 03 | 04 | 05 | 06 |
श्री नेपाल नारायण रामटेके | मौजा करंडला, तालुका लाखांदुर, जिल्हा भंडारा भूमापन क्रं-507 | 07.04.2019 | विहिरीत पाय घसरुन पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू | क्लेम फार्म सादर केल्याचा दिनांक-25.06.2019 | नाही. |
तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, सदर विमा पॉलिसी प्रमाणे अपघाती मृत्यू संबधात कायदेशीर वारसदारास रुपये-2,00,000/- एवढी रक्कम मिळणार होती. तक्रारकर्ती क्रं 1) श्रीमती निर्मला रामटेके ही मृतकाची आई होती परंतु अविवाहित मुलाचे मृत्यू नंतर तिची मनःस्थिती ठिक नसल्याने तिने विरुध्दपक्ष क्रं 4 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात तक्रारकर्ता क्रं-2 श्री प्रशांत रामटेके (मृतकाचा भाऊ) याचे मार्फतीने विमा दावा दिनांक-25.06.2019 रोजी आवश्यक दस्तऐवजांसह दाखल केला तसेच मागणी प्रमाणे आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता सुध्दा केली परंतु आज पर्यंत
त्यांना विमा दाव्या संबधात काहीही कळविलेले नाही. विमा दाव्या संबधाने काहीही कळविलेले नसल्याने तक्रारीचे कारण सतत घडत आहे. विमा दावा रक्कम व त्यावरील व्याजा पासून ते वंचीत झालेले आहेत. अशाप्रकारे विरुध्दपक्षांनी त्यांना दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे शारिरीक , मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेवटी त्यांनी प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यांना विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- विमा दावा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-25.06.2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्के दराने व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे.
- त्यांना झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-30,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्दपक्षां कडून मिळावा. या शिवाय योग्य ती दाद त्यांचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं-2 विमा कंपनी तर्फे एकत्रीत लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तरा प्रमाणे मृतक श्री नेपाल नारायण रामटेके याचे नावाने गट क्रं 507 जमीन होती, तो शेतीचा व्यवसाय करीत होता या बाबी मान्य आहेत. तसेच तो दिनांक-07.04.2019 ला मृत्यू पावला ही बाब सुध्दा मान्य आहे. मृतकाचे अपघाती मृत्यू संबधात विमा दावा प्रस्ताव व ईतर दस्तऐवज हे मृतकाचे वडील जिवंत असताना, मृतकाचा भाऊ तक्रारकर्ता क्रं 2 श्री प्रशांत रामटेके याने सादर केले होते, वडील वारसदार असताना मृतकाचा भाऊ यास विमा रक्कम देता येणार नाही या कारणास्तव विमा दावा फेटाळला होता. क्लेम फॉर्म 1,2,3 चे सहपत्रा मध्ये मृतक अविवाहित असल्यामुळे त्याचा वारसदार भाऊ आहे असा खोटा उल्लेख केलेला आहे, आई वडीलांना वारसदार दाखविलेले नाही. वस्तुतः वडीलांना वारसदार दाखविणे आवश्यक होते परंतु तसे केले नाही ते गैरकायदेशीर आहे. योग्य त्या वारसदारा व्दारे विमा दावा दाखल न केल्यामुळे तो फेटाळण्यात आला. तक्रारीमध्ये मृतकाची आई व भाऊ यांनी तक्रार दाखल केलेली आहे यावरुन तक्रारदार हे काही लपवू पाहत आहेत अशी शंका येते. उर्वरीत सर्व वारसदारांचे नाहरकत प्रमाणपत्र दाखल करावे अशा सुचना तक्रारकर्ता क्रं 2 श्री प्रशांत रामटेके यास दिलेल्या होत्या. योग्य त्या वारसदारा व्दारे विमा दावा दाखल न केल्या मुळे विमा दावा फेटाळण्याची विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीची कृती योग्य व कायदेशीर असल्यामुळे तक्रारदारांना शारिरीक, मानसिक त्रास देण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचे नमुद केले. तक्रारदारांच्या मागण्या या अमान्य असून तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं 3 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर यांनी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष लेखी उत्तर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरात नमुद केले की, मृतक शेतक-याचा विमा दावा प्रस्ताव दस्तऐवजासह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कडून त्यांना दिनांक-10.08.2019 रोजी प्राप्त झाला, विमा दावा प्रस्तावाची पाहणी केली असता फेरफार क्रं-6-क व पोलीस फायनल समरी अशा दस्तऐवजाची मागणी जिल्हा कृषी अधिकारी यांचे मार्फतीने तक्रारदार यांचेकडे करण्यात आली. विमा दावा प्रस्ताव व प्राप्त झालेले अपूर्ण दस्तऐवज त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी कडे दिनांक-02.05.2020 रोजी पाठविले. तक्रारदारांनी दस्तऐवजाची पुर्तता केल्यास विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी विमा दावा मंजूर करु शकते. त्यांनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
05. विरुध्दपक्ष क्रं 4 तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर, जिल्हा भंडारा यांनी लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांनी आपले लेखी उत्तरा मध्ये अपघाती मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव श्री नेपाल नारायण रामटेके असून त्याचा अपघात दिनांक-07.4.2019 रोजी झाल्याचे आणि त्याच दिवशी तो मृत्यू पावल्याचे नमुद केले. त्याचे मृत्यू नंतर शेतकरी अपघात विमा दावा प्रस्ताव त्यांचे कार्यालयात दिनांक-28.06.2019 रोजी दाखल करण्यात आला होता आणि त्यांनी पुढे तो विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचेकडे त्यांचे कार्यालयीन पत्र क्रं-1121, दिनांक-04.07.2019 रोजी पाठविला होता असे नमुद केले.
06. तक्रारदारांची तक्रार व दाखल दस्तऐवज, विरुध्दपक्षांची लेखी उत्तरे, तसेच तक्रारकर्तीचा शपथे वरील पुरावा आणि तक्रारकर्ती व विमा कंपनीचा लेखी व मौखीक युक्तीवाद यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे न्यायनिवारणार्थ उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | मृतक शेतक-याचे अपघाती मृत्यू संबधात विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने विमा दाव्या संबधी काहीही कार्यवाही न करता व न कळविता तसेच विमा रकमे पासून तक्रारकर्तीला वंचीत ठेऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय | -होय- |
2 | वि.प.क्रं 3 विमा सल्लागार कंपनीने विमा दावा प्रस्ताव उशिरा पाठवून दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय | -होय- |
3 | काय आदेश | अंतिम आदेशा नुसार |
मुद्दा क्रं 1 ते क्रं 3 बाबत-
07. या प्रकरणातील मृतक श्री नेपाल नारायण रामटेके याचे मालकीची मौजा करंडला, तहसिल लाखांदुर, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं 507 शेती होती व तो व्यवसायाने शेतकरी होता तसेच विम्याचे वैध कालावधीत त्याचा विमा होता या बाबी संबधात सर्व पक्षां मध्ये कोणताही विवाद नाही. मृतक श्री नेपाल नारायण रामटेके याचा दिनांक-07.04.2019 रोजी विहिरी मध्ये पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला होता या संबधात सुध्दा कोणताही विवाद विमा कंपनीने केलेला नाही.
08. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीचा संक्षीप्त विवाद असा आहे की, मृतक श्री नेपाल रामटेके याचे मृत्यू समयी आई व वडील जिवंत असताना त्याचा भाऊ श्री प्रशांत नारायण रामटेके याने विरुध्दपक्ष विमा कंपनी पासून आई वडील जिवंत असल्याची बाब लपवून ठेऊन मृतकाचा एकमेव कायदेशीर वारसदार भाऊ म्हणून विमा दावा प्रस्ताव दाखल केला.
या विमा कंपनीचे आक्षेपाचे संदर्भात आम्ही अभिलेखावरील दस्तऐवजाचे अवलोकन केले. तक्रारकर्ती क्रं 1 श्रीमती निर्मला नारायण रामटेके ही मृतकाची आई आहे परंतु तिने तक्रारी मध्ये नमुद केले की, तिचा मुलगा श्री नेपाल रामटेके याचा मृत्यू झाल्या नंतर तिची मनःस्थिती चांगली नसल्याने तिने तिचा मुलगा तक्रारकर्ता क्रं 2 श्री प्रशांत नारायण रामटेके याचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 4 तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर जिल्हा भंडारा यांचे कडे विमा दावा प्रस्ताव दाखल केला होता. विमा दावा प्रस्तावा वरुन असे दिसून येते की, तो वि.प.क्रं 4 यांचे कार्यालयात दिनांक-25.06.2019 रोजी दाखल केल्या बाबत वि.प.क्रं 4 कार्यालयाचा सही व शिक्का आहे. तसेच क्लेम फार्म मधील भाग-1 मध्ये अर्जदार श्री प्रशांत नारायण रामटेके असे नमुद असून मृतकाशी नाते भाऊ नमुद केलेले आहे. क्लेम फॉर्म भाग-1,2,3 चे सहपत्रा मध्ये अक्रं-3 गाव नमुना-6-क मध्ये तपशिला मध्ये मृतक अविवाहित असून त्याचे वारसान फक्त भाऊच आहेत व सदर वारसान आधीच दर्ज आहेत त्यामुळे 6-क ची आवश्यकता नसल्याचे नमुद आहे. गाव नमुना सात मध्ये भूमापन क्रं-507 भोगवटदार निलकंठ नारायण रामटेके, प्रशांत नारायण रामटेके (नेपाल नारायण रामटेके) अशी नावे नमुद आहेत. गाव नमुना आठ- अ मध्ये खातेदार म्हणून निलकंठ नारायण रामटेके व प्रशांत नारायण रामटेके अशी नावे नमुद आहेत. गाव नमुना 6 मध्ये असे नमुद आहे की, श्री नारायण काशीराम रामटेके यांनी अर्ज करुन नमुद केले की, भूमापन क्रं 507 खातेदार नेपाल नारायण रामटेके याचा दिनांक-07.04.2019 रोजी मृत्यू झालेला असून तो अविवाहित होता त्यामुळे त्याचे नाव 7/12 वरुन कमी केले त्या बाबतची फेरफार नोंद क्रं 1391 दिनांक-24.05.2019 रोजी घेतलेली आहे असे दिसून येते.
पोलीस निरिक्षक, अडयाळ यांचे अकस्मात मृत्यू सारांश अहवाल अकस्मात मृत्यू सुचना, घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषन प्रतिवृत्त या सर्व पोलीस दस्तऐवजी पुराव्या वरुन मृतक नेपाल नारायण रामटेके हा दिनांक-07.04.2019 रोजी विहिरीत पडलयाने पाण्यात बुडून त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द होते. वैद्दकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, अडयाळ यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवाला मध्ये सुध्दा मृतकाचे मृत्यूचे कारण हे “Drowning” असे नमुद केलेले आहे. या सर्व शेतीचे आणि पोलीस दस्तऐवजा वरुन मृतकाचे नावे शेती होती व त्याचा अपघाती मृत्यू झाला होता या बाबी सिध्द होतात.
09. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने लेखी उत्तरात नमुद केले की, त्यांनी विमा दावा हा मृतकाचे योग्य कायदेशीर वारसदारांनी दाखल न केल्यामुळे आणि सदर विमा दावा प्रस्ताव तक्रारकर्ता क्रं 2 याने दाखल केल्यामुळे त्यांनी तो विमा दावा फेटाळला होता परंतु असा विमा दावा नामंजूर केल्या बाबत व तसे तक्रारदारांना लेखी कळविल्या बाबत कोणतेही लेखी पत्र पुराव्या दाखल विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने दाखल केलेले नाही त्यामुळे तक्रारदारांचे म्हणण्या प्रमाणे त्यांना आज पर्यंत विमा दाव्या संबधी काहाही कळविण्यात आलेले नाही या त्यांचे विधाना मध्ये जिल्हा ग्राहक
आयोगास तथ्य दिसून येते. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने लेखी उत्तरात मोघम स्वरुपात असे नमुद केले की, त्यांनी तक्रारकर्ता क्रं-2 प्रशांत नारायण रामटेके यास योग्य त्या कायदेशीर वारसदारां बाबत सुचना दिल्या होत्या परंतु अशी सुचना दिल्या बाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. विरुध्दपक्ष क्रं 3 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज यांनी सुध्दा लेखी उत्तरा मध्ये मृतकाचा विमा दावा विमा कंपनीने नामंजूर केला होता असा कोणताही उल्लेख केलेला नाही. या सर्व घटनाक्रमा वरुन असे दिसून येते की, मृतकाचा विमा दावा अकारण विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने ईतके दिवस प्रलंबित ठेऊन तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली असल्याची बाब सिध्द होते. मृतक हा शेतकरी होता व त्याचा अपघाती मृत्यू झाला होता या बाबी दस्तऐवजी पुराव्या वरुन सिध्द झालेल्या असताना केवळ कायदेशीर वारसदारांचा मुद्दा जिल्हा ग्राहक आयोगा मध्ये प्रस्तुत तक्रार दाखल केल्या नंतर विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने उचललेला आहे. तक्रारकर्ती क्रं 1 श्रीमती निर्मला नारायण रामटेके हिने तक्रारी मध्ये नमुद केलेले आहे की, तिचे अविवाहीत मुलाचे मृत्यू नंतर तिची मनःस्थिती ठीक नसल्यामुळे तिचा मुलगा तक्रारकर्ता क्रं 2) श्री प्रशांत नारायण रामटेके याने विमा दावा प्रस्ताव दाखल केला, यामध्ये तक्रारकर्ता क्रं 2 याने कोणतीही विमा कंपनीची फसवणूक केल्याचे दिसून येत नाही. वस्तुतः मुलाचा मृत्यू झाल्या नंतर त्याचे आईला तिव्र दुःख होणे स्वाभाविक आहे आणि मुलाचे मृत्यू नंतर तिने विमा दाव्या संबधात संपूर्ण कार्यवाही करणे अभिप्रेत नाही असे जिल्हा ग्राहक आयोगाचे स्पष्ट मत आहे. जर विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीची मृतकाचा विमा दावा देण्याची तयारी असती तर त्यांनी त्या संबधाने लेखी स्वरुपात तक्रारकर्ता क्रं 2 श्री प्रशांत नारायण रामटेके यांचे कडे त्याचे आईची म्हणजे तक्रारकर्ती क्रं 1 हिची ना-हरकत-प्रमाणपत्राची मागणी केली असती व तशी पुर्तता करुन विम्याची रक्कम दिली असती परंतु तसे काहीही या प्रकरणात घडलेले दिसून येत नाही वा त्या संबधाने विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने कार्यवाही केल्या बाबत दस्तऐवजी पुरावा दाखल केलेला नाही. यावरुन विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने अपघाती मृत्यू संबधिचा विमा दावा प्रस्ताव निषकारण प्रलंबित ठेऊन तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते आणि त्यामुळे तक्रारदारांना शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून शेवटी प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करावी लागली. तसेच वि.प.क्रं 3 विमा सल्लागार कंपनीने तक्रारदारांशी कोणताही पत्रव्यवहार न करता उशिराने विमा दावा विमा कंपनीकडे पाठवून दोषपूर्ण सेवा दिली त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 व क्रं 2 चे उत्तर “होकारार्थी” नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 व क्रं 2 चे उत्तर “होकारार्थी” आल्याने मुद्दा क्रं 3 अनुसार तक्रारदारांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी आणि वि.प.क्रं 3 विमा सल्लागार कंपनी यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
10. आम्ही महाराष्ट्र शासनाचे कृषी, पशुसवंर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक-19 सप्टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रकाचे वाचन केले, त्यामध्ये विमा कंपनी या सदरा खाली विमा कंपनीस सुचना दिलेल्या आहेत, त्यामधील विमा दावा निकाली काढण्यासाठी काही सुचना पुढील प्रमाणे आहेत.
अक्रं-9 विमा कंपन्यांना सुस्पष्ट कारणां शिवाय विमा प्रस्ताव नाकारता येणार नाहीत. विमा कंपन्यांनी नामंजूर विमा दाव्या प्रकरणी सुस्पष्ट कारणमीमांसा संबधित शेतक-यांना कटाक्षाने मराठी भाषेतच कळविले व त्याची प्रत विमा सल्लागार कंपनी/आयुक्त कृषी/ सहसंचालक कृषी/ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविणे व विमा संगणक प्रणाली मध्ये नोंद घेणे अनिवार्य आहे.
अक्रं-10 विमा प्रस्तावात त्रुटी असल्यास त्या बाबतचे पत्र संबधित अर्जदारास पोहोच करावे व त्याची प्रत विमा सल्लागार कंपनी/ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दयावी. परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्या पासून 21 दिवसाच्या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर पुढे 15 टक्के व्याज देय राहील.
अक्रं-11 प्रकरण मंजूर केल्यावर पंधरा दिवसांच्या आत अनुज्ञेय नुकसान भरपाई संबधित लाभार्थ्यांच्या खात्या वर जमा करणे बंधनकारक राहील. अन्यथा तीन महिन्या पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर 15 टक्के व्याज देय राहील.
अक्रं-12 परिपूर्ण विमा दावा कंपनीकडे सादर झाल्या पासून त्यावर 21 दिवसांच्या आत कार्यवाही करणे विमा कंपनी वर बंधनकारक राहील. मात्र तरीही विमा कंपनीने कागदपत्रांची पुर्तता झालेल्या प्रकरणी मंजूरी योग्य प्रस्ताव नाकारल्यास विमा सल्लागार कंपनीने शेतक-यांच्या वतीने इर्डा ग्राहक तक्रार कक्ष/ विमा न्यायाधीश/ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच/ राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग/न्यायालय येथे दावे दाखल करेल.
अक्रं-13 शेतक-यांचा विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्या कालावधीत कधीही प्रापत झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील.
अक्रं-14 तथापी विमा पॉलिसी कालावधीच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसा पर्यंत पूर्वसूचना प्राप्त होणारे व संगणक प्रणाली मध्ये विहित कालावधीत कागदपत्रांसह नोंद झालेल्या पूर्वसूचना पत्रा नुसार विमा प्रस्ताव सुध्दा स्विकारणे विमा कंपनीस बंधनकारक राहील.
वरील प्रमाणे शासन परिपत्रकात सुचना विमा कंपनीसाठी निर्गमित केलेल्या आहेत.
11. विरुध्दपक्ष क्रं 3 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज या सल्लागार कंपनीने आपले लेखी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्ता यांचा विमा दावा त्यांना दिनांक-10.08.2019 रोजी प्राप्त झाला आणि त्यानंतर त्यांनी दिनांक-02.05.2020 रोजी विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला. यावरुन असे दिसून येते की, जवळपास 08 महिने 25 दिवस उशिराने विमा सल्लागार कंपनीने विमा दावा विमा कंपनीकडे दाखल केला. जेंव्हा की, महाराष्ट्र शासनाचे परिपत्रका नुसार परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्या पासून 21 दिवसाच्या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर पुढे 15 टक्के व्याज देय राहील असे स्पष्ट नमुद आहे त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 3 यांनी सुध्दा तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याचे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
12. आम्ही महाराष्ट्र शासनाचे कृषी, पशुसवंर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक-19 सप्टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रकाचे वाचन केले, तयामध्ये विमा कंपनीने विमा दावा प्रस्ताव प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 21 दिवसात निर्णय घेऊन विमा भरपाई रक्कम संबधित शेतक-याच्या वारसदारांच्या आधार लिंक्ड बॅंक खात्यात डी.बी.टी.ई/ईसीएसने जमा करावी असे नमुद आहे. तसेच परिपत्रकातील अक्रं 11 प्रमाणे प्रकरण मंजूर केल्यावर पंधरा दिवसांच्या आत अनुज्ञेय नुकसान भरपाई संबधित लाभार्थ्यांच्या खात्या वर जमा करणे बंधनकारक राहील. अन्यथा तीन महिन्या पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर 15 टक्के व्याज देय राहील. सदर परिपत्रका मध्ये कायदेशीर वारसदारां संबधात 1)अपघातग्रस्ताची पत्नी/पती 2)अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी 3) अपघातग्रस्ताची आई 4) अपघातग्रस्ताचा मुलगा 5) अपघातग्रस्ताचे वडील 6) अपघातग्रस्ताची सून 7) अन्य कायदेशीर वारसदार या प्राधान्यक्रमा नुसार विमा दाव्याची रक्कम देण्यात यावी असे नमुद केलेले आहे. प्रस्तुत तक्रारी मध्ये मृतक हा अविवाहीत असल्यामुळे त्याची कायदेशीर वारसदार म्हणून अक्रं-3) अनुसार त्याची आई म्हणजे तक्रारकर्ती क्रं 1 आहे त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्ती क्रं-1 हिला विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- आणि सदर रकमेवर विरुध्दपक्ष क्रं 3 सल्लागार कंपनीने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा दावा पाठविल्याचा दिनांक-02.05.2020 पासून विमा दावा निश्चीतीसाठी एक महिन्याची मुदत सोडून म्हणजे दिनांक-02.06.2020 पासून 03 महिन्या पर्यंत म्हणजे दिनांक-02.09.2020 पर्यंत द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज आणि त्यानंतर दिनांक-03.09.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्याच बरोबर तक्रारकर्ती क्रं 1 हिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा रकमा मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 विमा सल्लागार कंपनी यांनी सुध्दा तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे त्यांनी तक्रारकर्ती क्रं 1 हिला नुकसान भरपाई म्हणून रुपये-5000/- दयावेत. विरुध्दपक्ष क्रं 4 तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
13. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारदारांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे अनुक्रमे विभागीय व्यवस्थापक, पुणे आणि क्षेत्रीय व्यवस्थापक, नागपूर यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- तक्रारदारांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 3 जयका इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे मॅनेजर नागपूर यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ती क्रं 1) श्रीमती निर्मला नारायण रामटेके हिला तिचा अविवाहित मुलगा श्री नेपाल नारायण रामटेके याचे अपघाती मृत्यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) अदा करावी आणि सदर रकमेवर दिनांक-02.06.2020 पासून 03 महिन्या पर्यंत म्हणजे 02.09.2020 पर्यंत द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज आणि त्यानंतर दिनांक-03.09.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15 टक्के दराने व्याजाची रक्कम तक्रारकर्तीला अदा करावी. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीला असेही आदेशित करण्यात येते की, त्यांनी अंतीम आदेशा प्रमाणे नमुद आदेशित रकमा या शेतक-यांच्या/वारसदारांच्या आधार लिंक्ड बॅंक खात्यात डी.बी.टी./ईसीएसने डॉयरेक्ट जमा कराव्यात.
- तक्रारकर्ती क्रं 1 हिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अशा नुकसान भरपाईच्या रकमा विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ती क्रं 1 हिला अदा कराव्यात.
- विरुध्दपक्ष क्रं 3 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे मॅनेजर नागपूर यांनी तक्रारकर्तीला झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्ती क्रं 1 हिला दयावे.
- विरुध्दपक्ष क्रं 4 तालुका कृषी अधिकारी, लाखांदूर, जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत वि.प.क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) अनुसार देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- आणि त्यावर अंतीम आदेशातील मुद्दा क्रं 2 प्रमाणे नमुद केलेल्या कालावधी करीता आदेशित दराने व्याजाची रक्कम तक्रारकर्तीला दयावी. विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने न केल्यास आदेशित विमा रक्कम आणि त्यावर नमुद कालावधी करीता दिलेल्या दराने व्याज आणि त्यानंतर दिनांक-03.09.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15 टक्के दरा ऐवजी द.सा.द.शे. 18 टक्के दराने दंडनीय व्याज तक्रारकर्तीला देण्यास विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी जबाबदार राहिल.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- सर्व पक्षकारांनी अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.