(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019च्या कलम 35 खाली विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि इतर यांचे विरुध्द तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने पत्नी या नात्याने तथा कायदेशीर वारसदार म्हणून शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे तिचे पती श्री प्रकाश शामा खंडाते हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांचा विमा शासनाने काढलेला होता आणि विम्याचे वैध कालावधीत दिनांक-29.04.2016 रोजी त्यांचा अपघाताती मृत्यू झाल्याने मृतकाची पत्नी आणि कायदेशीर वारसदार या नात्याने विमा दाव्याची रक्कम मिळावी यासाठी तिने जिल्हा ग्राहक आयोगा समोर प्रस्तुत तक्रार दाखल केली. तक्रारी मध्ये नमुद केल्या प्रमाणे तिचे मृतक पतीची माहिती खालील विवरणपत्रामध्ये देण्यात येते-
मृतक शेतक-याचे नाव | श्री प्रकाश शाम खंडाते |
मृतकाचे नावे असलेल्या शेतीचा तपशिल | मौजा रोंघा, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं 61 |
अपघाती मृत्यूचा दिनांक | 29/04/2016 |
मृत्यूचे कारण | तक्ररकर्तीचे पतीचा मृत्यू हा ते मोटरसायकवर मागे बसून जात असताना एका दुस-या वाहनाने त्यांचे मोटरसायकला धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला |
तालुका कृषी अधिकारी यांचे कडे विमा दावा सादर केल्याचा दिनांक | विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकरी यांचे कार्यालयात दाखल केला |
त.क.चे विमा दाव्या संबधात सद्द स्थिती काय आहे | विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा मंजूर अथवा नामंजूरी बाबत कळविले नाही. |
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आहे. तर विरुध्दपक्ष क्रं 2 बजाज कॅपिटल इन्शुरन्स ब्रोकींग लिमिटेड हे प्राप्त विमा दाव्यांची तपासणी करुन त्रृटींची पुर्तता करवून घेऊन पुढे तो विमा दावा प्रस्ताव निश्चीतीसाठी विमा कंपनी कडे दाखल करतात. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी हे महाराष्ट्र शासनाचे वतीने विमा दावे स्विकारुन ते विमा दावे निर्णयार्थ विमा कंपनी कडे पाठवितात. सदर विमा पॉलिसी प्रमाणे अपघाती मृत्यू संबधात कायदेशीर वारसदारास रुपये-2,00,000/- एवढी रक्कम मिळणार होती. परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दाव्या संबधात तिला काहीही कळविले नसून दोषपूर्ण सेवा दिली, त्यामुळे तिला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तिने विरुध्पक्षांना वकीलांचे मार्फतीनेदिनांक-03.07.2021 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु नोटीसला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून शेवटी तिने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील मागण्या केल्यात-
1. विरुध्दपक्षांनी तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- विमा दावा प्रस्ताव दाखल दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्के दराने व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे
2. तिला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-40,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्दपक्षां कडून मिळावा. या शिवाय योग्य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी तर्फे लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तरा प्रमाणे त्यांनी तक्रारी मधील त्यांचे विरुध्दचे संपूर्ण आरोप तसेच तक्रारकर्तीच्या मागण्या या नामंजूर केल्यात. आपले विशेष कथनात नमुद केले की, शेतक-यांसाठी शासनाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरु केलेली असून या योजने अंतर्गत मृतक शेतक-याचे वारसदारास तालुका कृषी अधिकारी यांचे कडे विमा दावा आवश्यक दस्तऐवजासह दाखल करावायाचा असतो. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी पुढे तो विमा दावा इन्शुरन्स अॅडव्हायझर महणजेच विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे कडे पाठवितात व विरुध्दपक्ष क्रं 2 इन्शुरन्स अॅडव्हायझर यांनी संपूर्ण विमा दाव्याची छाननी केल्या नंतर व त्रृटींची पुर्तता संबधितां कडून करुन घेतल्या नंतर पुढे तो विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी कडे विमा दावा निश्चीतीसाठी पाठवितात. जरी तक्रारकर्ती यांनी विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे संपूर्ण दस्तऐवज सादर केले आहेत परंतु ते दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी कडे आज पर्यंत प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे तक्रारकर्ती हिचे कथन की, विमा दावा हा आज पर्यंत विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनीने अकारण प्रलंबित ठेवला या कथनामध्ये काहीही तथ्य दिसून येत नाही करीता तक्रार खर्चा सहीत खारीज करण्यात यावी. तक्रारकर्तीचा विमा दावा हा विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनीला आज पर्यंत मिळालेला नाही वा तक्रारकर्तीचा विमा दावा अस्तित्वात नाही वा प्रलंबित नाही. तक्रारकर्तीचा विमा दावाच मिळालेला नसल्याने त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब उदभवत नाही. सबब विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावीअसे नमुद केले.
04 विरुध्दपक्ष क्रं 2 बजाज कॅपीटल इन्शुरन्स ब्रोकींग प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपले लेखी उत्तर तसेच विविध मा. वरिष्ठ न्यायालयांचे निवाडयांच्या प्रती पोस्टाव्दारे जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांचे लेखी उत्तरा प्रमाणे यातील तालुका कृषी अधिकारी यांना शासनाचे मार्फतीने विमा दाव्या संबधीचे कामकाज करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत केलेले आहे. ते शासन आणि विमा कंपनी यांचे मध्ये मध्यस्थाची भूमीका बजावतात. सदर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा कालावधी हा दिनांक-01.12.2015 ते 30.11.2016 असा असून अपघाती मृत्यू आल्यास विमा रक्कम मृतक शेतक-याचे कायदेशीर वारसदार यांना रुपये-2,00,000/- देय आहे. तालुका कृषी अधिकारी यांचे कडून प्राप्त विमा दाव्याची छाननी करुन आणि विमा दाव्यातील त्रृटींची पुर्तता संबधितां कडून ते करवून घेतात. विमा दावा निश्चीतीचे अधिकार हे विमा कंपनीला आहेत. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे कृती बाबत त्यांची कोणतीही जबाबदारी येत नाही. दोघांना कायदया व्दारे वेगवेगळा दर्जा आहे. शासन, ते आणि विमा कंपनी यांचे मध्ये त्रीपक्षीय करार झालेला आहे. या संबधात त्यांनी विविध मा. वरिष्ठ न्यायालयांच्या निवाडयांच्या प्रती दाखल करुन त्यावर भिस्त ठेवली परंतु तक्रारकर्तीचा विमा दावा त्यांना कोणत्या दिनांकास प्राप्त झाला व त्यानंतर त्यांनी तो विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी कडे विमा दावा निश्चीतीसाठी कोणत्या दिनांकास पाठविला किंवा तक्रारकर्तीचा विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचेकडून त्यांना प्राप्त झाला किंवा कसे यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.
05. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी तुमसर, जिल्हा भंडारा यांनी त्यांना जिल्हा ग्राहक आयोगाची नोटीस मिळूनही मूळ तक्रारीमध्ये लेखी उत्तर दाखल केलेले नाही.
06. तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे लेखी उत्तरव शपथे वरील पुरावा, विरुध्दपक्ष क्रं 2 बजाज कॅपीटल इन्शुरन्स ब्रोकींग प्रायव्हेट लिमिटेड यांचे उत्तर तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री देवेन्द्र हटकर तर विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी तर्फे वकील कु. आयुषी दलाल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
07. तक्रारकर्तीचे मृतक परती श्री प्रकाश शामा खंडाते हे शेतकरी होते, त्यांचे नावे मौजा रौंधा, तहसिल तुमसर जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं 61 शेती होती. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा कालावधी हा दिनांक-01.12.2015 ते 30.11.2016 असा होता आणि विम्याचे वैध कालावधीत दिनांक-29.04.2016 रोजी अपघाती मृत्यू झाला होता या सर्व बाबी प्रकरणातील दाखल सात बारा उतारा, गाव नमुना 7 यावरुन सिध्द होतात. दाखल पोलीस स्टेशन अरेली, जिल्हा नागपूर यांचे एफ.आय.आर प्रती मध्ये असे नमुद आहे की, दिनांक-24.04.2016 रोजी सायंकाळी 18.00 वाजताचे सुमारास कोदामेंढी कडून अरोली कडे जाणारी मोटर सायकल क्रं- MH-31/DJ 3818 स्प्लेंडर प्लस हिला विरुध्द दिशेने जाणा-या मोटर सायकल क्रं-MH-40/TCD041 हिरो डिलक्सचा चालक आरोपी आशिष धनराज मोहतुरे याने आपल्या ताब्यातील मोटर सायकल भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून ठोस मारलयाने मोटर सायकल क्रं MH-31/DJ 3818 स्प्लेंडर प्लसचा चालक लहू खंडाते तसेच मागे बसलेले शत्रुघन दयाराम कोळवते तसेच प्रकाश शामराव खंडाते यांचे हाता पायाला व छातीला डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले व यातील प्रकाश शामराव खंडाते हा वैद्दकीय उपचारा दरम्यान दिनांक-29.04.2016 रोजी मरण पावला. जिल्हा शासकीय महाविद्दालय नागपूर यांचे शवविच्छेदन अहवाला मध्ये मृत्यूचे कारण हे Head Injury with blunt trauma to chest असे दर्शविलेले आहे. सदर पोलीस दस्तऐवज आणि जिल्हा शासकीय महाविद्दालय नागपूर यांचे शवविच्छेदन अहवालावरुन श्री प्रकाश शामा खंडाते यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बाब सिध्द होते. तसेच पोलीस दस्तऐवजा वरुन ही बाब सुध्दा सिध्द होते की, तक्रारकर्तीचा मृतक पती हा अपघाताचे वेळी स्प्लेंडर प्लस या वाहनावर मागे बसलेला होता, थोडक्यात मृतक हा अपघाताचे वेळी वाहन चालवित नव्हता. दुसरी महत्वाची बाब अशी सुध्दा आहे की, सदर अपघाता हा दुस-या वाहनाचा चालक श्री आशिष धनराज मोहतुरे याने निष्काळजीपणे जोराने वाहन चालवून धडक दिल्याने अपघात झाला. पोलीसांनी श्री आशिष मोहतुरे याचे वर गुन्हा सुध्दा नोंदविलेला आहे.
08. मृतक शेतकरी श्री प्रकाश शामराव खंडाते याची पत्नी शोभा प्रकाश खंडाते हिने अभिलेखावर तिने तालुका कृषी अधिकारी, तुमसर आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे नावे जो विमा दावा दाखल केलेला आहे त्यावर तिने आंगठा लावलेला आहे परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनीने आपले लेखी उत्तरा मध्ये असे नमुद केलेले आहे की, त्यांना तक्रारकर्तीचा विमा दावाच मिळालेला नाही. तक्रारकर्तीचा पती हा शेतकरी होता, त्याचा विम्याचे वैध कालावधीत कोणताही दोष नसताना अपघाती मृत्यू झाला होता या बाबी पुराव्यानिशी सिध्द होतात. तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 बजाज कॅपीटल इन्शुरन्स ब्रोकींग लिमिटेड यांनी त्यांचे लेखी उत्तरात विमा दाव्या बाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.
09. विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर यांनी तक्रारकर्तीने विलंब माफ होण्यासाठी जे किरकोळ प्रकरण जिल्हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे समक्ष MA/21/5 दाखल केले होते, त्यामध्ये दाखल केलेल्या लेखी उत्तरा मध्ये असे नमुद केले की, तक्रारकर्तीचे पती श्री प्रकाश शामराव खंडाते हे मौजा रोंगा तालुका तुमसर जिल्हा भंडारा येथील शेतकरी होते आणि त्यांचा दिनांक-29.04.2016 रोजी अपघाती मृत्यू झाला होता, त्यांची पत्नी श्रीमती शोभा प्रकाश खंडाते यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्यांचे कार्यालयास विमा दावा त्यांचे कार्यालयाचे आवक क्रं 54 दिनांक-12 जानेवारी, 2021 नुसार दाखल केला होता, ते सोबत सदर पत्राची प्रत पुराव्यार्थ दाखल करीत आहेत. श्री प्रकाश शामराव खंडाते यांचा अपघाती मृत्यू दिनांक-29.04.2016 रोजी म्हणजे सन-2015-2016 या वर्षा मधील होता आणि त्यावेळी नॅशनल इन्शुरन्स कंपनी कार्यरत होती परंतु ज्यावेळी विमा दावा सन 2021 मध्ये म्हणजे दिनांक-12 जानेवारी, 2021 रोजी दाखल केला होता त्यावेळी नॅशनल इन्शुरन्स कंपनी कार्यरत नव्हती, त्यामुळे सदर विमा दावा त्यांचे कार्यालयाचे पत्र क्रं 48 दिनांक-18.01.2021 अन्वये परत केल्या बाबत कळविले. तक्रारकर्तीचे अधिवक्ता श्री देवेंद्र हटकर यांनी सुध्दा विमा दाव्या संबधी दिनांक-06.07.2021 रोजीचे पत्राव्दारे विचारणा केली असता त्यांचे कार्यालयाचे पत्र क्र 859 दिनांक-08.07.2021 अन्वये अधिवक्ता श्री देवेंद्र हटकर आणि तक्रारकर्ती श्रीमती शोभा खंडाते यांना कळविण्यात आले होते, सोबत पत्राची प्रत जोडली आहे. यापूर्वी सुध्दा अन्य शेतकरी यांचा विमा दावा त्यांचे वारसदार श्रीमती सुधा कापसे यांनी दाखल केला होता, त्यांचे प्रकरणातील अपघात हा सन-2011-2012 मध्ये झाला होता परंतु विमा दावा प्रत्यक्षात सन-2019 मध्ये दाखल केला होता. सन 2011-2012 मधील विमा कंपनी ही सन 2019 मध्ये अस्तित्वात नसल्याने विमा कंपनीने विमा दावा स्विकारण्यास नकार दिल्या मुळे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा यांनी त्यांचे दिनांक-19.12.2019 रोजीचे पत्रान्वये तालुका कृषी अधिकारी तुमसर यांचे कडे विमा प्रस्ताव परत केला होता, सदर पत्राची प्रत सुध्दा त्यांनी पुराव्यार्थ दाखल केली.
10. सदर विरुघ्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी तुमसर यांचे उत्तर व पुराव्यार्थ दाखल केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती वरुन ही बाब सिध्द होते की, तक्रारकर्तीने दिनांक-12 जानेवारी, 2021 रोजी विमा दावा विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर यांचे कार्यालयात दाखल केला होता परंतु तिचा विमा दावा तिचे पतीचा अपघाती मृत्यू सन-2015-2016 मधील असल्याने आणि त्यावेळची विमा कंपनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी ही असल्याने आणि तिने सन 2021 मध्ये विमा दावा दाखल करते वेळी नॅशनल इन्शुरन्स कंपनी अस्तित्वात नव्हती. थोडक्यात विमा कंपनी बदलल्याने तिचा विमा दावा विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी तुमसर यांनी परत केला.
11. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, तक्रारकर्तीचे पती श्री प्रकाश खंडाते यांचा अपधाती मृत्यू सन 2015-2016 मध्ये झाला आणि त्यावेळी नॅशनल इन्शुरन्स कंपनी अस्तित्वात होती ही बाब तालुका कृषी अधिकारी तुमसर यांनी मान्य केलेली आहे परंतु तिने सन 2021 मध्ये विमा दावा दाखल करते वेळी नॅशनल इन्शुरन्स कंपनी अस्तित्वात नव्हती, थोडक्यात विमा कंपनी बदलली होती परंतु विमा कंपनी मध्ये जरी बदल झालेला असला तरी तक्रारी मधील गुणवत्ते मध्ये फरक पडू शकत नाही. सन 2015-2016 मध्ये नॅशनल इन्शुन्स कंपनी होती परंतु विमा दावा सन 2021 मध्ये विलंबाने दाखल केला एवढयाच कारणास्तव विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी अस्सल विमा दावा नाकारु शकत नाही. वर नमुद केल्या प्रमाणे तक्रारकर्ती ही निरक्षर असून ग्रामीण भागातील राहणारी आहे आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही कल्याणकारी योजना असून शेतक-याचे मृत्यू नंतर त्याचे कुटूंबियांना आर्थिक मदत मिळावी असा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे ही बाब वेळोवेळी मा. वरिष्ठ न्यायालयांचे निवाडयां वरुन स्पष्ट झालेली आहे. विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी तुमसर यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा विरुध्दपक्ष क्रं-1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी कडे विचारार्थ दाखल करणे आवश्यक होते परंतु वर नमुद केल्या प्रमाणे त्यांचे वरिष्ठ कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी यापूर्वी विलंबाने प्राप्त झालेला विमा दावा विमा कंपनी बदलल्यामुळे परत केला होता ही बाब लक्षात घेऊन तक्रारकर्तीचा विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये दाखल न करता सरळ सरळ परत केला ही त्यांनी दिलेली दोषपूर्ण सेवा आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे स्पष्ट मत आहे.
12. अशा परिस्थितीत तक्रारकर्तीचा विमा दावा अस्सल असल्याने तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रुपये-2,00,000/- विम्याची रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनीने अदा करावी असे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल. तक्रारकर्ती ही संपूर्ण निरक्षर असून ग्रामीण भागात राहणारी स्त्री असून त्यांना सदर विमा योजनेची कोणतीही माहिती नसते तसेच कोठे जावे, कशा प्रकारे विमादावा दाखल करावा याची माहिती नसते. अशा परिस्थितीत विमा दावा दाखल करण्यास जर काही उशिर झाला असेल तर तो विलंब क्षमापित करावा असे वेळोवेळी मा. वरिष्ठ न्यायालयांनी निवाडे दाखल केलेले आहेत, त्यामुळे तक्रारकर्तीला विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स विमा कंपनी मध्ये विमा दावा दाखल करण्यास झालेला विलंब जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे क्षमापित करण्यात येतो.
13. तक्रारकर्तीचे अधिवक्ता श्री देवेन्द्र हटकर यांनी खालील मा. वरिष्ठ न्यायालयांचे निवाडयांवर आपली भिस्त ठेवली-
IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY BENCH AT AURANGABAD-WRIT PETITION NO. 3725 OF 2016-ANUSAYABAI DATTARAM MAIDAMWAD-VERSUS- THE STATE OF MAHARASHTRA AND OTHERS. ORDER-30TH OCTOBER 2018
Considering the beneficial nature of the scheme, we are inclined to entertain the Writ Petition. The impugned order rejecting the claim of the petitioner for compensation under the scheme is quashed and set aside. The petitioner shall submit the necessary documents to the Insurance Company within a period of one month from today. Upon receipt of the documents the respondent Insurance Company shall decide the claim of the petitioner, on its own merits and preferably, within six months thereafter.
HONBLE STATE CONSUMER DISPUTES REDESSAL COMMISSION, MAHARASHTRA ,MUMBAI-APPEAL NO. –A/15/795-SHRI ROHIDAS HARI PARAB-VERSUS-NATIONAL INSURANCE COMPANY LTD. & OTHERS. ORDER-19TH MARCH 2018
Due to death of wife the complainant was in a shock. His wife was earning member in the family. After death of his wife he filed claim for claiming benefit under Shetkari Apaghat Vima Yojana with the Insurance Company. The policy was issued under the welfare scheme of the Government. The Govt. is behind scheme and intention of the Govt. is to protect the farmers. It is true that there is delay in filing consumer complaint. Delay does not appear to be intentional or deliberate. It is settled principle of law that while doing justice much importance cannot be given to the technicalities. Considering poor financial condition of the complainant /appellant, sudden death of his wife and the policy of the Government, the learned District Forum should have allowed the application for condonation of delay. If the delay is condoned no prejudice will cause to the opponent Insurance Company. On the other hand both parties will get the opportunity to put forth their case on merit. So appeal is allowed. Order passed by the learned District Forum in rejecting application for condonation of delay is hereby set aside. Application for condionation of delay is hereby allowed.
उपरोक्त मा. वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे हातातील तक्रारी मध्ये तंतोतंत लागू पडतात असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
14. उपरोक्त विवेचन केल्या प्रमाणे तक्रारकर्तीने सर्वप्रथम विहित नमुन्यात विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर, जिल्हा भंडारा यांचे मार्फतीने आवश्यक दस्तऐवजांसह फ्रेश विमा दावा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये दाखल करावा आणि असा विमा दावा प्रस्ताव प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे तक्रारकर्तीचे मृतक पती व शेतकरी प्रकाश रामा खंडाते यांचे अपघाती मृत्यू संबधात मृतकाची पत्नी आणि कायदेशीर वारसदार या नात्याने तक्रारकर्तीला विमा रक्कम रुपये-2,00,000/- अदा करावी आणि सदर विमा रकमेवर फ्रेश विमा दावा प्रस्ताव दाखल केल्याचे दिनांका पासून 45 दिवसा नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 7 टक्के दराने व्याज तक्रारकर्तीला दयावे असे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल. त्याच बरोबर विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर, जिल्हा भंडारा यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नॅशनल इन्शरन्स कंपनी कडे विचारार्थ न पाठविता त्यांचे अधिकारात सरळ सरळ विमा दावा तक्रारकर्तीला परत करुन दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- दयावा असे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 बजाज कॅपीटल इन्शुरन्स ब्रोकींग लिमिटेड तर्फे मॅनेजर, नवि दिल्ली यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. तक्रारकर्तीच्या अन्य मागण्या या प्राप्त परिस्थितीत नामंजूर करण्यात येतात.
15. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्ती श्रीमती शोभा प्रकाश खंडाते यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी तर्फे डिव्हीजनल मॅनेजर, भंडारा आणि विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर, जिल्हा भंडारा यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्ती श्रीमती शोभा खंडाते हिला विमा दावा दाखल करण्यास जो काही विलंब झालेला आहे तो क्षमापित करण्यात येतो. तक्रारकर्तीने सर्वप्रथम विहित नमुन्यात विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर, जिल्हा भंडारा यांचे मार्फतीने आवश्यक दस्तऐवजांसह फ्रेश विमा दावा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये दाखल करावा. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा हा विहित नमुन्यात आणि आवश्यक दस्तऐवजांसह आहे याची खात्री करुन त्यांचे कार्यालयाचे मार्फतीने त्वरीत तो विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे कार्यालयात दाखल करावा आणि असा फ्रेश विमा दावा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनीला प्राप्त झाल्या नंतर त्यांनी फ्रेश विमा दावा प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 45 दिवसांचे आत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे तक्रारकर्तीचे मृतक पती व शेतकरी प्रकाश शामराव खंडाते यांचे अपघाती मृत्यू संबधात मृतकाची पत्नी आणि कायदेशीर वारसदार या नात्याने तक्रारकर्तीला विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) अदा करावी आणि सदर विमा रकमेवर फ्रेश विमा दावा प्रस्ताव दाखल केल्याचे दिनांका पासून 45 दिवसा नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 7 टक्के दराने व्याज तक्रारकर्तीला दयावे.
- विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर, जिल्हा भंडारा यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) दयावा.
- तक्रारकर्तीच्या अन्य मागण्या या प्राप्त परिस्थितीत नामंजूर करण्यात येतात.
- विरुध्दपक्ष क्रं 2 बजाज कॅपीटल इन्शुरन्स ब्रोकींग लिमिटेड तर्फे मॅनेजर, नवि दिल्ली याचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर, जिल्हा भंडारा यांनी शक्य तेवढया लवकर तक्रारकर्तीचा फ्रेश विमा दावा तपासून व आवश्यक दस्तऐवजांची खात्री करुन त्यांचे कार्यालयाचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी कडे विमा दावा पाठवावा व विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला विमा दावा मिळाल्या बाबत खात्री करावी.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनीने तक्रारकर्तीचा फ्रेश विमादावा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी, तुमसर, जिल्हा भंडारा यांचे कडून प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 45 दिवसांचे आत करावे. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर, जिल्हा भंडारा यांनी सदर आदेशाचे अनुपालन प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- सर्व पक्षकारांनी अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.