अॅड नारायण ढोकले तक्रारदारांकरिता
अॅड श्याम माहेश्वरी जाबदेणारांकरिता
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 27/ऑगस्ट/2013
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने विमा कंपनी विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटी साठी दाखल केलेली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
1. तक्रारदार हे मौजे कळंब, ता. आंबेगांव येथील रहिवासी असून त्यांचा शेती हा व्यवसाय आहे. त्यांनी सन 2011 मध्ये न्यु हॉलंड कंपनीकडून ट्रॅक्टर विकत घेतलेला होता. सदरच्या ट्रॅक्टरची नोंदणी राज्य परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांचेकडे दिनांक 29/02/2011 रोजी केली असून सदरहू ट्रॅक्टर साठी जाबदेणारांकडून विमा पॉलिसी घेतलेली होती. पॉलिसीचा नंबर 010053742900 असून विमा कालावधी 24/1/2011 ते 23/1/2012 असा होता. दिनांक 5/8/2011 रोजी एकलहरे गावाच्या हद्यीत ट्रॅक्टरचा अपघात होऊन बरेच नुकसान झाले. अपघाताच्या दिवशी तक्रारदारांनी जाबदेणार विमा कंपनीला अपघाताची माहिती दिली व पॉलिसीची रक्कम मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाचा नंबर 620363450 ए असा होता. जाबदेणार यांच्या प्रतिनिधी यांनी तक्रारदार यांचेकडे येऊन ट्रॅक्टरची पहाणी केली, फोटोग्राफ घेतले. अपघाताबाबतचे सर्व कागदपत्रे घेऊन खर्चाबाबत कोटेशन तयार केले. जाबदेणार यांच्या प्रतिनिधींच्या सांगण्यानुसार सदर ट्रॅक्टरची दुरुस्ती एकलहरे, ता. आंबेगांव येथील सुर्या कंपनीकडे करण्यात आली. सदर ट्रॅक्टरच्या दुरुस्तीचे काम दिनांक 2/10/2011 रोजी पूर्ण झाले. त्यासाठी एकूण रुपये 1,11,909.85 इतका खर्च आला. सदर खर्चाची मुळ बिले जाबदेणार यांचे प्रतिनिधी श्री. निलेश नाईक यांनी दिलेली आहेत. सदर बिलांप्रमाणे रक्कम देण्याचे आश्वासन श्री. निलेश नाईक यांनी दिलेले होते. परंतू सर्व कागदपत्रे देऊन, वारंवार पाठपुरावा करुनहीही तक्रारदारांना बिलांची रक्कम मिळाली नाही. जाबदेणार यांनी दिनांक 19/1/2012 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदार यांचा क्लेम चुकीच्या व खोटया कारणांवरुन नाकारला आहे. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणार यांच्याकडून रक्कम रुपये 1,11,909.85, त्यावरील व्याज, शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी म्हणून दाखल केली आहे.
2. जाबदेणार यांनी लेखी कैफियत दाखल करुन तक्रारदारांच्या तक्रारीतील सर्व कथने पूर्णपणे नाकारली आहेत. तक्रारदारांचा क्लेम नाकारुन जाबदेणार यांनी सेवेत त्रुटी निर्माण केल्याचे जाबदेणार नाकारतात. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केलेला असल्यामुळे त्यांचा क्लेम मंजूर करता येणार नाही. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार सदर अपघाताच्या वेळी ड्रायव्हर शिवाय अजून एक व्यक्ती ट्रॅक्टर मध्ये बसली होती व सदरची बाब ही पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग करणारी आहे. जाबदेणार यांच्याकडून असे प्रतिपादन करण्यात आले की त्यांनी नेमलेल्या सर्व्हेअरच्या अहवालानुसार सदर दुरुस्तीचा खर्च केवळ 57,418/- असा आलेला आहे. त्यामुळे जाबदेणार यांच्यावर त्या रकमेपेक्षा जास्त जबाबदारी येत नाही. तक्रारदार यांनी अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे ते ही रक्कम देखील मिळण्यास पात्र नाहीत. जाबदेणार यांनी तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
3. दोन्ही पक्षकारांची लेखी कथने, कागदोपत्री पुरावा, लेखी व तोंडी युक्तीवाद यांचा विचार करुन खालील प्रमाणे मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदर मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांच्या कथनानुसार तक्रारदार यांनी विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केलेला आहे काय | नाही |
2 | तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय | होय |
3 | अंतिम आदेश | तक्रार अंशत: मंजूर |
कारणे-
मुद्या क्र 1 ते 3-
4. प्रस्तुतच्या प्रकरणात तक्रारदार यांनी आपल्या ट्रॅक्टरची विमा पॉलिसी जाबदेणार यांच्याकडून घेतली होती व ती अपघाताच्या दिनांकारोजी अस्तित्वात होती याबाबत दोन्ही पक्षात वाद नाही. त्याचप्रमाणे सदरचा अपघात पॉलिसी अस्तित्वात असतांना झाला होता याबद्यलही जाबदेणार यांनी वाद घातलेला नाही. या प्रकरणात जाबदेणार यांनी तक्रारदार यांचा क्लेम दोन कारणांनुसार नामंजूर केलेला आहे. पहिले कारण म्हणजे तक्रारदार यांनी अपघाताच्या वेळी अटी व शर्तींचा भंग केलेला आहे व दुसरे कारणे म्हणजे तक्रारदार यांनी अवास्तव क्लेम केलेला आहे. यासाठी जाबदेणार यांच्यातर्फे सर्व्हेअर श्री. अशोक कुलकर्णी व इन्व्हेस्टिगेटर अश्चिनी पवार यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. श्री. अशोक कुलकर्णी यांच्या शपथपत्रानुसार सदर अपघाता बाबतचा दुरुस्ती खर्च रुपये 57,418/- होता. श्री. कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष घटना स्थळी भेट देऊन, चौकशी करुन व सुर्या ट्रॅक्टर वर्कशॉप यांच्या कडील बिलांचे अवलोकन करुन सदरचा अहवाल दिलेला आहे. सदर शपथपत्राच्या पुष्टयर्थ जाबदेणार यांनी कोणताही अहवाल दाखल केलेला नाही. श्री. अशोक कुलकर्णी यांच्या शपथपत्राचा विचार करता येणार नाही. याउलट तक्रारदार यांनी सुर्या ट्रॅक्टर यांच्याकडे ट्रॅक्टर दुरुस्त केल्याबाबतची बिले दाखल केलेली आहेत. त्या बिलांवर सेल्स टॅक्स नंबर आहे. त्यामुळे सदरची बिले खरी आहेत असे मानण्यास कोणतीही हरकत नाही. सदर बिलां नुसार ट्रॅक्टर दुरुस्तीचा खर्च रुपये 1,11,909.85 झालेला आहे हे स्पष्ट होते. जाबदेणार यांचे दुसरे साक्षीदार अश्चिनी पवार यांनी दाखल केलेल्या शपथपत्रावरुन असे दिसून येते की मंचर पोलिस ठाण्यास भेट देऊन संबंधित अपघाताची टिपणे घेतली व त्यांना असे दिसून आले की ट्रॅक्टर मध्ये ड्रायव्हरशिवाय अजून एक व्यक्ती परशुराम थावरु पवार हे ट्रॅक्टर वर बसलेले होते. जाबदेणार यांच्या वकीलांच्या युक्तीवादानुसार सदरची बाब पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग करणारी आहे. त्यामुळे तक्रारदार यांना अपघाताची नुकसान भरपाई मंजूर करता येणार नाही. सदर पॉलिसीच्या अटी व शर्तींचा विचार केला असता सदरच्या अटी व शर्तींचा स्पष्टपणे पॉलिसीमध्ये उल्लेख नाही. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार सदर ट्रॅक्टरच्या आर.सी.टी.सी बुक मध्ये सदरचे वाहन चालवितांना फक्त एकाच व्यक्तीची आवश्यकता आहे असे नमूद केलेले आहे. त्यामुळे अटी व शर्तींचा भंग होत आहे. जाबदेणार यांनी सदरचा अपघात होण्यास संबंधित व्यक्ती कारणीभूत होती असा कोणताही पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे सदरच्या अटी व शर्तींचा भंग व घडलेला अपघात यांच्यामध्ये संबंध होता हे दाखविण्यासाठी कोणताही पुरावा जाबदेणार यांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे जाबदेणार यांचा बचाव मान्य करता येणार नाही. जाबदेणार यांनी सर्व्हेअरचा अहवाल दाखल केलेला नाही. त्याचप्रमाणे अटी व शर्तींचा भंग झाल्यामुळे हा अपघात झाला हे सिध्द केले नाही. त्यामुळे जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. तक्रारदार यांनी ट्रॅक्टर दुरुस्तीची बिले दाखल केलेली आहे. त्याचप्रमाणे जाबदेणार यांच्या साक्षीदारांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये सदरच्या ट्रॅक्टर ची दुरुस्ती सुर्या कंपनीने केली होती ही बाब मान्य केली आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा हा संयुक्तिक वाटत असून त्यावर विश्वास ठेवण्यास कोणतीही हरकत नाही. या प्रकरणातील पुराव्यावरुन असे दिसून येते की जाबदेणार यांनी तक्रारदारांचा विमा क्लेम कोणतेही सबळ कारणाशिवाय नामंजूर केलेला आहे व सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. यासर्व बाबींचा विचार करुन मुद्यांचे निष्कर्ष त्याप्रमाणे काढण्यात येत आहेत व खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांचा विमा क्लेम कोणत्याही सबळ
कारणाशिवाय नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदार यांना रक्कम रुपये 1,11,910/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदार यांना सेवेतील त्रुटीसाठी नुकसान भरपाई, तसेच शारिरीक मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च यासाठी एकूण रक्कम रुपये 10,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
5. उभय पक्षकारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत घेऊन जावेत अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक – 27 ऑगस्ट 2013
[ श्रीकांत एम. कुंभार] [व्ही. पी. उत्पात]
सदस्य अध्यक्ष