न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार हे मुंबई येथे राहण्यास असतात. तक्रारदार यांचे पती कै. गुलाबराव महादेव नलवडे हे दि. 19/03/2014 रोजी मयत झाले आहेत. जाबदार क्र.1 संस्था ही नोंदणीकृत संस्था असून जाबदार क्र.2 ते 22 हे सदर संस्थेचे पदाधिकारी आहेत. तक्रारदार यांनी जाबदार बॅंकेत मुदत ठेव योजनेपोटी रकमा ठेवलेल्या होत्या त्याचा तपशील पुढील प्रमाणे –
अ.क्र. | पावती क्र. | ठेव रक्कम रु. | ठेव तारीख | मुदत संपणेची तारीख | मिळणारी रक्कम रु. |
1 | 103079 | 25,312/- | 05/12/2015 | 05/01/2017 | 28,603/- |
2 | 103080 | 25,312/- | 02/12/2015 | 02/01/2017 | 28,603/- |
3 | 103081 | 25,312/- | 05/12/2015 | 05/01/2017 | 28,603/- |
4 | 103082 | 25,312/- | 05/12/2015 | 05/01/2017 | 28,603/- |
5 | 101310 | 48,048/- | 22/06/2015 | 22/06/2016 | 53,854/- |
6 | 101311 | 74,960/- | 19/06/2015 | 19/06/2016 | 83,955/- |
7 | 101312 | 20,076/- | 28/06/2015 | 28/06/2016 | 22,485/- |
8 | 101313 | 74,960/- | 19/06/2015 | 19/06/2016 | 83,955/- |
9 | 100348 | 68,992/- | 29/04/2016 | 29/04/2017 | 77,271/- |
10 | 93896 | 80,304/- | 13/06/2015 | 10/09/2016 | 92,350/- |
11 | 23/2023470 | 21,074/- | 02/08/2015 | 02/08/2016 | 23,603/- |
12 | 23/2021785 | 42,347/- | 10/09/2015 | 10/09/2016 | 47,429/- |
13 | 23/2021786 | 42,347/- | 10/09/2015 | 10/09/2016 | 47,429/- |
तसेच बचत खाते क्र. 23/21125 यावर दि.8/11/2014 अखेरपर्यंत रु.202/- शिल्लक आहेत. ठेवींची मुदत संपलेनंतर तक्रारदारांनी जाबदार यांचेकडे अनेकवेळा हेलपाटे मारुन ठेव रकमेची तोंडी मागणी केली. परंतु जाबदार यांनी वर नमूद रकमा देण्यास टाळाटाळ केली आहे. म्हणून तक्रारदाराने जाबदार यांना दि. 12/11/2021 रोजी नोटीसा पाठविल्या. परंतु जाबदार यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देणेमध्ये त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून मुदत ठेवींची व्याजासहीत होणारी एकूण रक्कम व सदर रकमेवर रक्कम प्रत्यक्ष वसूल होऊन मिळेपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज मिळावे, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.30,000/- व अर्जाचा खर्च रु.30,000/- जाबदारकडून मिळावेत अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत ठेवपावत्यांच्या प्रती, तक्रारदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसचा न बजावता परत आलेला लखोटा, जाबदार संस्थेच्या संचालक मंडळाच्या यादीची प्रत इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. जाबदार क्र. 1 ते 6, 8 ते 18 व 20 ते 22 यांना नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. जाबदार क्र. 19 हे याकामी हजर झाले परंतु त्यांनी विहीत मुदतीत म्हणणे दाखल केले नाही. सबब, जाबदार क्र. 19 यांचेविरुध्द म्हणणे नाही असा आदेश करण्यात आला. जाबदार क्र.7 यांना दि. 12/03/24 चे आदेशानुसार प्रस्तुत प्रकरणातून वगळणेत आले.
5. प्रस्तुत कामी जाबदार क्र.1, 3, 4 व 19 यांनी त्यांचेविरुध्द एकतर्फा व विनाकैफियत आदेश पारीत झालेनंतर दि.10/04/2024 रोजी म्हणणे व शपथपत्र दाखल करणेस परवानगी मिळणेबाबत अर्ज दाखल केला. परंतु सदर अर्जासोबत त्यांनी म्हणणे दाखल न करता केवळ शपथपत्र दाखल केले आहे. तथापि जाबदार क्र.1, 3 व 4 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत झाला असल्याने व जाबदार क्र.19 विरुध्द विनाकैफियत आदेश पारीत झाला असल्याने सदरचे शपथपत्र विचारात घेण्यात आलेले नाही.
6. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार जाबदार यांचेकडून ठेव रक्कम व्याजासह परत मिळणेस पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार हा जाबदारांचा ठेवीदार ग्राहक आहे ही वस्तुस्थिती तक्रारदाराने दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे प्रतींवरुन शाबीत होते आहे. तक्रारदारांनी जाबदार पतसंस्थेत ठेव ठेवली हे तक्रारदाराचे कथन जाबदारांनी नाकारलेले नाही. त्यामुळे तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे.
मुद्दा क्र.2
8. तक्रारदाराचे कथनानुसार, ठेवींची मुदत संपलेनंतर तक्रारदाराने मागणी करुनही जाबदार यांनी त्यांना ठेव रक्कम व्याजासह अदा केलेली नाही. जाबदार क्र. 1 ते 6 व 8 ते 22 यांनी याकामी हजर होवून सदरची बाब नाकारलेली नाही. यावरुन जाबदारांना तक्रारदाराची तक्रार त्यांना मान्य आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे होणार नाही. ग्राहकाच्या ठेव रकमा मुदतीनंतर व्याजासहीत परत करणेचे जाबदार यांचेवर कायदेशीर बंधन आहे. त्याचे पालन जाबदारांनी केलेले नाही. सबब, जाबदार यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षास हे आयोग येत आहे.
9. सदरकामी तक्रारदारांची ठेव रक्कम व बचत खात्यातील रक्कम अदा करण्यास जाबदार क्र.1 बॅंक व जाबदार क्र.2 ते 6 व 8 ते 22 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सदरकामी हे आयोग खालील न्यायनिवाडयाचा आधार घेत आहे.
Appeal No. A/21/438 dated 11th May 2023
Namdevrao Mohite
Vs.
Sh. Sanjay Shankar Suryawanshi
Held – It is also necessary to mention that personal liability arises only in case of criminal act. But here, we are dealing a case of deficiency in service on the part of the society and therefore, the appellants who were Directors were collectively and jointly responsible for the acts of the society, unless shown otherwise. As such, we feel that the line of distinction has to be drawn as we are dealing with the deficiency in service under the Consumer Protection Act. As such, in view of discussion made, we are of the view that the judgments on which the reliance has been placed by Advocate for the Appellants, will not go to help the case of the appellants and will not be applicable in the peculiar facts of the present case, as here the complainants have not alleged any fraud on the part of the Directors but have alleged deficiency in service.
वरील निवाडा प्रस्तुत प्रकरणास लागू होतो असे या आयोगाचे मत आहे. वरील निवाडयात मा. राज्य आयोग, मुंबई यांनी नोंदविलेले निरिक्षण विचारात घेता प्रस्तुत प्रकरणात जाबदार क्र.1 बॅंक व जाबदार बॅंकेचे संचालक जाबदार क्र. 2 ते 6 व 8 ते 22 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या हे तक्रारदारांच्या ठेव रकमा देण्यास जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
10. जाबदार क्र.7 हे मयत असलेने त्यांना याकामी आयोगाचे दि.12/3/2024 चे आदेशाने वगळणेत आले आहे.
मुद्दा क्र.3
11. सबब, तक्रारदार हे नमूद ठेव पावत्यांच्या ठेवींच्या रकमेवर पावतीची मुदत संपेपर्यंत पावतीवरील नमूद व्याजदराने व्याज मिळणेस व ठेवपावत्यांचे मूळ रकमेवर ठेवीची मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदाराला मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच तक्रारदार हे बचत खात्यातील शिल्लक रक्कम बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय असणा-या व्याजासह परत मिळणेस पात्र आहेत.
12. तसेच जाबदारांनी तक्रारदारास सेवात्रुटी दिलेमुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच या आयोगात तक्रारअर्ज दाखल करावा लागला. या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु. 5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार क्र.1 बॅंक व जाबदार क्र. 2 ते 6 व 8 ते 22 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास ठेवपावती क्र.103079, 103080, 103081, 103082, 101310, 101311, 101312, 101313, 100348, 93896, 23/2023470, 23/2021785, 23/2021786 वरील ठेवींच्या रकमेवर पावतीची मुदत संपेपर्यंत पावतीवरील नमूद व्याजासह तसेच मुदत संपलेनंतर रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
- जाबदार क्र.1 बॅंक व जाबदार क्र. 2 ते 6 व 8 ते 22 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास बचत खाते क्र. 23/21125 मधील शिल्लक रक्कम अदा करावी व सदर रकमेवर बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय असणारे व्याज अदा करावे.
- जाबदार क्र.1 बॅंक व जाबदार क्र. 2 ते 6 व 8 ते 22 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन जाबदार यांनी निकालाची प्रत मिळालेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.