-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्या.)
( पारित दिनांक-23 जानेवारी, 2017)
01. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्रं-NGP (C.T.Y.) R.S.R./C.R.-343/1986-87 नागपूर या सहकारी संस्थे मध्ये मुदती ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्रं-NGP (C.T.Y.) R.S.R./C.R.-343/1986-87 नागपूर ही एक सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्था असून विरुध्दपक्ष क्रं-(1) चंद्रभान रघुनाथ आपतूरकर हे तिचे अध्यक्ष आहेत तर विरुध्दपक्ष क्रं-(2) सदर पतसंस्थेचे संचालक मंडळ असून विरुध्दपक्ष क्रं-(3) सदर पतसंस्थेचे व्यवस्थापक आहे.
तक्रारकर्तीने सदर पतसंस्थे मध्ये मुदतीठेव पावती व्दारे “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे पुढील प्रमाणे रक्कम गुंतवली-
“परिशिष्ट-अ”
अक्रं | तक्रार क्रमांक (RBT/ CC/No.) | तक्रारकर्तीचे नाव | मुदती ठेव पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी 10/01/2010 रोजी देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
1 | 12/382 | Sau.Shobha Bhaskarrao Phalke | 1548 | 10/07/2004 | 20,000/- | 40,000/- |
| | | | | | |
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिने विरुध्दपक्ष पतसंस्थेत दिनांक
04/06/1994 रोजी बचत खाते उघडले असून त्याचा क्रं-685 असून तिचे बचतखात्यात दिनांक-04.11.2010 रोजी रुपये-5525/- शिल्लक आहेत. तिने पुढे असे नमुद केले की, तिला पैशाची अत्यंत गरज असल्याने तिने विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये जानेवारी-2011 मध्ये मागणी केली असता रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली, अशाप्रकारे विरुध्दपक्ष पतसंस्थेने रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे म्हणून
तिने सदर तक्रार दाखल करुन विरुध्दपक्ष पतसंस्थे विरुध्द पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी तक्रारकर्तीला मुदत ठेवी मधील परिपक्वता रक्कम रुपये-40,000/- परिपक्वता तिथी- 10.01.2010 पासून ते रकमेच्या अदायगी पावेतो वार्षिक 18 टक्के दराने व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे. तसेच तिचे बचतखात्यात जमा असलेली रक्कम रुपये-5525/- दिनांक-04.11.2010 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो वार्षिक 18 टक्के दराने व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षानां आदेशित व्हावे.
(02) तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- देण्याचे विरुध्दपक्षानां आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, नागपूर तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(1) चंद्रभान रघुनाथ आपतूरकर, अध्यक्ष तसेच विरुध्दपक्ष क्रं-(2) संचालक मंडळ असून विरुध्दपक्ष क्रं-(3) व्यवस्थापक यांचे नावे मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली, त्या संबधीच्या रजिस्टर पोस्टाच्या पावत्या पान क्रं 15 वर दाखल आहे, परंतु पोच प्राप्त न झाल्याने तक्रारकर्तीचे वकीलानीं विरुध्दपक्षाची जाहिर नोटीस वृत्तपत्रातून प्रसिध्द करण्यासाठी अर्ज सादर केला, अर्ज मंजूर करण्यात आला. त्यानुसार दैनिक महाविदर्भ दिनांक-12 ऑगस्ट, 2014 रोजीच्या वृत्तपत्रात विरुध्दपक्षांची जाहिर नोटीस प्रसिध्द करण्यात आली परंतु विरुध्दपक्ष गैरहजर राहिलेत म्हणून तिन्ही विरुध्दपक्षां विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात दिनांक-17.03.2016 रोजी मंचा तर्फे पारीत करण्यात आला.
04. तक्रारकर्तीने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून सोबत दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये मुदतीठेव पावतीची प्रत, बचत खाते उतारा प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला.
05. तक्रारकर्तीची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, लेखी युक्तीवाद, तसेच तक्रारकर्ती तर्फे दाखल केलेल्या दस्तऐवजाच्या प्रती आणि तक्रारकर्तीचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
06. विरुध्दपक्ष चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्रं-NGP (C.T.Y.) R.S.R./C.R.-343/1986-87 नागपूर ही एक सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्था आहे. (“विरुध्दपक्ष” म्हणजे चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड ही पतसंस्था आणि तिचे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(1) अध्यक्ष व विरुध्दपक्ष क्रं-(2) संचालक मंडळ असे समजण्यात यावे) तक्रारकर्त्याने “परिशिष्ट-अ” मध्ये नमुद केल्या प्रमाणे विरुध्दपक्ष सहकारी संस्थेत मध्ये मुदती ठेवी मध्ये रक्कम गुंतविल्या संबधाने मुदती ठेव पावतीची प्रत दाखल केली, ज्यावरुन असे दिसून येते की, तिने विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये दिनांक-10.07.2004 रोजी मुदती ठेवी मध्ये रुपये-20,000/- गुंतवले आणि परिपक्वता तिथी 10/01/2010 रोजी तिला एकूण रुपये-40,000/- मिळणार होते. तसेच तिचे विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये असलेले बचतखाते क्रं-685 ची प्रत अभिलेखावर दाखल केलेली असून, त्यामध्ये दिनांक-04/11/2010 रोजी तिचे बचतखात्यात रुपये-5525/- जमा असल्याचे दिसून येते, यावरुनही तिचे तक्रारीला पुष्टी मिळते. सदर मुदतीठेवीची पावती आणि बचतखात्याचा उतारा हा विरुध्दपक्ष संस्थे तर्फे निर्गमित केलेला असून पावतीवर विरुध्दपक्ष सहकारी संस्था ही सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत असल्याचे त्यावरील संस्थेच्या नोंदणी क्रमांका वरुन सिध्द होते.
07. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे मध्ये मुदती ठेव व बचत खात्या मधील रक्कम परत मिळण्यासाठी जानेवारी-2011 मध्ये मागणी करुनही तिला रक्कम देण्याचे विरुध्दपक्ष पतसंस्थेनी नाकारल्याचे तिचे म्हणणे आहे. तक्रारकर्तीची मागणी करुनही विरुध्दपक्ष संस्थेनी तिला मुदतठेवीची रक्कम त्यातील देयलाभांसह तसेच बचत खात्यातील जमा रक्कम परत केलेली नाही ही त्यांची दोषपूर्ण सेवा आहे आणि यामुळे तिला निश्चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
08. या ठिकाणी आणखी एक बाब महत्वाची नमुद करणे आवश्यक आहे की, विरुध्दपक्ष संस्थे तर्फे जी मुदतीठेवीची पावती तक्रारकर्तीचे नावे निर्गमित केलेली आहे, त्यामधील मुदती ठेव मध्ये रक्कम गुंतविल्याचा कालावधी तसेच देय व्याजाचा दर याचा हिशोब केला असता येणारी रक्कम आणि मुदतीठेवी पावत्यांवर परिपक्वता तिथी नंतर मिळणारी देय नमुद केलेली रक्कम या दोन्ही रकमां मध्ये ताळमेळ खात नसून त्यामध्ये फरक दिसून येतो. परंतु तक्रारकर्तीने ज्या कालावधीत म्हणजे सन-2004 मध्ये मुदती ठेव मध्ये रक्कम गुंतवली असल्याने त्या कालावधीत साधारणतः केंद्र सरकारच्या पोस्ट खात्यातील मुदती ठेवी मध्ये गुंतवणूक केलेल्या रकमा या साधारणतः 05 वर्ष आणि 06 महिने कालावधी नंतर दामदुप्पट होत होत्या, आम्ही हा हिशोब लक्षात घेऊन मुदतीठेवीच्या पावतीवर विरुध्दपक्ष संस्थे तर्फे परिपक्वता तिथी 10/01/2010 रोजी नमुद देय रक्कम रुपये-40,000/- हिशोबात घेत आहोत.
09. या ठिकाणी आणखी एक महत्वाची बाब नमुद कराविशी वाटते की, या तक्रारी मध्ये विरुध्दपक्ष क्रं-(3) म्हणून विरुध्दपक्ष पतसंस्थेचे व्यवस्थापक यांना प्रतिपक्ष केलेले आहे परंतु व्यवस्थापक हे पद सहकारी संस्थे मध्ये पदाधिकारी पद नसून ते नौकरीतील पद आहे आणि विरुध्दपक्ष संस्थेच्या “Employee” ला या तक्रारी मध्ये विरुध्दपक्ष संस्थेच्या कारभारा करीता जबाबदार धरता येत नाही त्यामुळे आम्ही विरुध्दपक्ष क्रं-(3) व्यवस्थापक यांना या तक्रारी मधून मुक्त करीत आहोत.
10. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही उपरोक्त नमुद तक्रारीं मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्ती सौ.शोभा भास्कररव फाळके यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-(1) चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्रं-NGP (C.T.Y.) R.S.R./C.R.-343/1986-87 नागपूर तर्फे अध्यक्ष चंद्रभान रघुनाथ आपतुरकर आणि विरुध्दपक्ष क्रं-2) चैतन्यवाडी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी नागपूर तर्फे संचालक मंडळ यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(1) आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्रातील “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे तक्रारकर्तीने मुदत ठेव मध्ये गुंतविलेली आणि परिपक्वता तिथी-10.01.2010 रोजी देय होणारी रक्कम रुपये-40,000/- (अक्षरी रुपये चाळीस हजार फक्त) परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह येणारी रक्कम प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्तीस परत करावी.
(03) विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी अनुक्रमे विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांना असेही आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्तीचे बचत खाते क्रं-685 मध्ये दिनांक-04/11/2010 रोजी जमा असलेली रक्कम रुपये-5525/- (अक्षरी रुपये पाच हजार पाचशे पंचविस फक्त) दिनांक-04/11/2010 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह येणारी रक्कम प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्तीस परत करावी.
(04) तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) विरुध्दपक्ष पत संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(1) व विरुध्दपक्ष क्रं-(2) यांनी तक्रारकर्तीस द्दावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष पत संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(1) व विरुध्दपक्ष क्रं-(2) यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) विरुध्दपक्ष क्रं-(2) व्यवस्थापक हे पद विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये नौकरीचे असल्याने व ते पद संस्थेच्या पदाधिकारी सज्ञेत नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-(2) व्यवस्थापकाला या तक्रारी मधून मुक्त करण्यात येते.
(07) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.