जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
किरकोळ अर्ज क्रमांक : 4/2020. अर्ज नोंदणी दिनांक : 11/08/2020.
अर्ज निर्णय दिनांक : 22/05/2024.
कालावधी : 03 वर्षे 09 महिने 11 दिवस
मिना भ्र. माधव गुराळे, रा. अंकुलगा राणी,
तालुका : शि. अनंतपाळ, जिल्हा : लातूर. :- अर्जदार
विरुध्द
(1) चेअरमन, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.,
अंकुलगा राणी, तालुका : शि. अनंतपाळ, जि. लातूर.
(2) सचिव, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.,
अंकुलगा राणी, तालुका : शि. अनंतपाळ, जि. लातूर.
(3) शाखाधिकारी (शेती कर्ज विभाग), लातूर जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँक लि., लातूर, मुख्य कार्यालय, टिळक नगर,
मेन रोड, लातूर, तालुका व जिल्हा : लातूर.
(4) विभागीय व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,
मालू बिल्डींग, हनुमान चौक, मेन रोड, शाखा लातूर,
तालुका व जिल्हा : लातूर. :- उत्तरवादी
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
अर्जदार यांचेकरिता विधिज्ञ :- ए.पी. मेखले / ए. के. जवळकर
उत्तरवादी क्र.1 ते 3 :- अनुपस्थित / एकतर्फा
उत्तरवादी क्र.4 यांचेकरिता विधिज्ञ :- सुरज एस. पाटील
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) अर्जदार यांनी प्रस्तुत किरकोळ अर्जाद्वारे ग्राहक तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब क्षमापीत करण्याची विनंती केलेली आहे.
(2) अर्जदार यांचे कथन असे की, त्यांचे पती मयत माधव गोविंद गुराळे (यापुढे "मयत माधव") हे विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 (यापुढे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 "सोसायटी" व विरुध्द पक्ष क्र. 3 "बँक") यांचे सभासद कर्जदार सभासद होते. सोसायटी व बँकेकडे त्यांनी रु.90/- विमा हप्ता भरणा केला आणि त्यांचा विमा हप्ता विरुध्द पक्ष क्र.4 (यापुढे 'विमा कंपनी') यांच्याकडे पाठविण्यात आला. विमापत्र क्रमांक 271401/47/13/9600000595 असून कालावधी दि.25/2/2014 ते 24/2/2017 आहे. दि.17/1/2017 रोजी झालेल्या वाहन अपघातामध्ये मयत माधव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर विमा रक्कम मिळण्याकरिता अर्जदार यांनी अर्जासोबत सादर केलेले कागदपत्रे सोसायटीकडे सादर केली आणि सोसायटीने बँकेकडे व बँकेने विमा कंपनीकडे पाठविले. त्यानंतर विमा कंपनीने अर्जदार यांचा विमा दावा प्रलंबीत ठेवण्यात आला आणि पाठपुरावा करुनही विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे अर्जदार यांनी विधिज्ञांमार्फत सोसायटी, बँक व विमा कंपनीस सूचनापत्र पाठविले असता त्यास उत्तर किंवा विमा रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे अर्जदार यांच्या ग्राहक तक्रारीस निर्माण झालेले वादकारण सातत्यपूर्ण असले तरी तांत्रिक कारणास्तव त्यांनी मयत माधव यांच्या मृत्यू तारखेपासून ग्राहक तक्रारीकरिता झालेला विलंब 1 वर्षे 6 महिने 13 दिवस क्षमापीत व्हावा, अशी विनंती केलेली आहे.
(3) सोसायटी व बँक जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(4) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल करुन ग्राहक तक्रारीस अवाजवी विलंब झाल्यामुळे अर्ज नामंजूर करण्याची विनंती केली. त्यांचे कथन असे की, अर्जदार यांनी विमापत्राबाबत विमा कंपनी किंवा बँकेकडे चौकशी केलेली नाही. दुप्पट नुकसान भरपाई मिळविण्याकरिता ग्राहक तक्रार दाखल केलेली असल्यामुळे विलंब क्षमापणाचा अर्ज नामंजूर करावा, अशी विनंती विमा कंपनीतर्फे करण्यात आली.
(5) उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकला. कागदपत्रांचे अवलोकन केले.
(6) अभिलेखावर विमापत्र क्रमांक 271401/47/13/9600000595 दाखल करण्यात आले आहे. बँकेचा पत्रव्यवहार पाहता मयत माधव याचा रु.90/- विमा हप्ता कपात केल्याचे व यादीमध्ये क्रमांक 127 असल्याचे नमूद आहे. बँकेचे दि.13/4/2017 रोजीचे पत्र पाहता मयत माधव यांचा विमा प्रस्ताव व कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविल्याचे दिसून येते. त्यानंतर मयत माधव यांच्या विम्याची रक्कम मिळण्याकरिता अर्जदार यांनी बँक व विमा कंपनीस सूचनापत्र पाठविलेले आहे.
(7) अभिलेखावर दाखल पत्रव्यवहार पाहता मयत माधव यांच्या मृत्यूपश्चात विमा रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याचे सिध्द होते. अर्जदार यांनी आवश्यक व अपेक्षीत कार्यवाही केलेली आहे. सकृतदर्शनी, अर्जदार यांचा विमा दावा विमा कंपनीकडे पाठविण्यात आल्याचे दिसून येते. त्यानंतर विमा दाव्याबद्दल काही निर्णय घेण्यात आल्याचे विमा कंपनीचे कथन नाही. अशा स्थितीत, विमा रक्कम मिळण्याकरिता अर्जदार यांच्या ग्राहक तक्रारीस निर्माण होणारे वादकारण सातत्यपूर्ण व निरंतर ठरते. अर्जदार यांनी केवळ तांत्रिक स्वरुपात त्रुटी राहू नये, याकरिता अर्ज सादर केलेला दिसतो. अंतिमत: खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आदेश
(1) किरकोळ अर्ज मंजूर करण्यात येतो.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-