जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 335/2022. तक्रार नोंदणी दिनांक : 01/12/2022.
तक्रार दाखल दिनांक : 14/12/2022. तक्रार निर्णय दिनांक : 25/09/2024.
कालावधी : 01 वर्षे 09 महिने 24 दिवस
पार्वती सोमनाथ निला, वय 40 वर्षे,
व्यवसाय : गृहिणी व शेती, रा. लिंबाळा, ता. निलंगा, जि. लातूर. :- तक्रारकर्ती
विरुध्द
(1) चेअरमन / सचिव, लिंबाळा विविध कार्यकारी सेवा
सहकारी संस्था मर्या., लिंबाळा, ता. निलंगा, जि. लातूर.
(2) मुख्य व्यवस्थापक, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
लातूर. कर्ज व नियंत्रण विभाग, मुख्य कार्यालय, सात मजली इमारत,
मेन रोड, लातूर, ता. जि. लातूर.
(3) व्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.,
सिंध टॉकीजसमोर, सुभाष चौक, लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. अमोल बा. गिराम, अध्यक्ष
श्रीमती वैशाली म. बोराडे, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. व्ही. एम. कंडारकर
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. एस. एम. इंगळे
विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. काशिनाथ जी. देशपांडे (साताळकर)
आदेश
मा. श्री. अमोल बा. गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की, त्यांचे पती सोमनाथ मन्मथ निला (यापुढे "मयत सोमनाथ") हे विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "सहकारी संस्था") यांचे कर्जदार सभासद होते. सहकारी संस्थेने त्यांच्या सर्व कर्जदार सभासदांकडून प्रत्येकी रु.215/- विमा हप्ता स्वीकारुन विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "जिल्हा बँक") यांच्याकडे जमा केला. मयत सोमनाथ यांचा कर्जदार सभासद यादीमध्ये 17 क्रमांक होता. त्यानंतर जिल्हा बँकेने विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे विमा हप्ता जमा करुन विमापत्र घेतले आणि विमापत्र क्रमांक 164400/47/2020/695 असून विमा कालावधी सन 2020 ते 2023 होता. त्यानुसार विमाधारकास कायमचे अपंगत्व आल्यास किंवा अपघाती मृत्यू झाल्यास रु.3,00,000/- देण्याची जोखीम विमा कंपनीने स्वीकारलेली होती.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दि.28/5/2022 रोजी मयत सोमनाथ हे गावातील ज्ञानेश्वर बालाजी सावळे यांच्या होंडा शाईन दुचाकी क्र. एम.एच. 24 बी.बी. 6187 वर बसून उस्तुरी येथून गावी परत येत असताना रस्त्यावरील कठड्यास धडक बसल्यामुळे झालेलया अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आणि सह्याद्री हॉस्पिटल, लातूर येथे उपचार सुरु असताना दि.29/5/2022 रोजी मृत्यू पावले. अपघाती घटनेबाबत पोलीस ठाणे, कासार शिरसी, ता. निलंगा, जि. लातूर येथे गुन्हा क्र.137/2022 अन्वये नोंद करण्यात आली. तसेच अपघाती घटनेबद्दल घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवचिकित्सा व अन्य कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दि.9/6/2022 रोजी सहकारी संस्थेने सभेमध्ये ठराव मंजूर करुन ठरावाच्या प्रस्तावासोबत विमा योजनेकरिता आवश्यक संपूर्ण कागदपत्रे व पोलीस कागदपत्रे बँकेमार्फत विमा कंपनी सादर केले. त्यानंतर विमा कंपनीने काढलेल्या त्रुटींची पूर्तता केली. मात्र, पाठपुरावा करुनही तक्रारकर्ती यांचा विमा दावा मंजूर करण्यास टाळाटाळ करण्यात आली आणि विमा दावा प्रलंबीत ठेवलेला आहे. अशाप्रकारे, सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे नमूद करुन उक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमापत्राप्रमाणे रु.3,00,000/-; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.15,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- अशाप्रकारे रक्कम विमा रक्कम अपघात तारखेपासून व्याजासह देण्याचा सहकारी संस्था, जिल्हा बँक व विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केली आहे.
(4) सहकारी संस्थेकरिता विधिज्ञ उपस्थित झाले; परंतु उचित संधी प्राप्त होऊनही सहकारी संस्थेकरिता लेखी निवेदनपत्र दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले.
(5) जिल्हा बँकेने लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश मजकूर त्यांच्या संबंधीत नसल्याचे व तो अमान्य असल्याचे निवेदन केले. त्यांचे कथन असे की, मयत सोमनाथ यांच्या विमा दाव्याबद्दल त्यांनी विमा कंपनीकडे पाठपुरावा व कार्यवाही केलेली आहे. तक्रारकर्ती यांनी त्यांच्याकडे विमा दावा दाखल न करता परस्पर विमा कंपनीकडे सादर केला. तक्रारकर्ती यांनी त्रुटीची पूर्तता केलेली नाही. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही आणि त्यांच्याविरुध्द ग्राहक तक्रार नामंजूर करावी, अशी विनंती केलेली आहे.
(6) विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य केलेले आहेत. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ती यांनी मागणी केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे तक्रारकर्ता यांची दावा संचिका बंद करण्यात आलेली असून दावा नामंजूर केलेला नाही. तक्रारकर्ती यांना अनेकवेळा स्मरणपत्रे देऊनही त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. अपघातसमयी मयत सोमनाथ यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता आणि त्यांनी शिरस्त्राण परिधान केलेले नव्हते. नियम व अटींचा भंग करणारी ग्राहक तक्रार असल्यामुळे खर्चासह रद्द करावी, अशी विनंती केलेली आहे.
(7) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, जिल्हा बँक व विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय (विमा कंपनीने)
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(8) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 एकमेकांना परस्परपूरक असल्यामुळे त्यांचे एकत्रित विवेचन करण्यात येते. अभिलेखावर दाखल करण्यात आलेल्या जनता वैयक्तिक अपघात (गट) विमा विमापत्र क्र.164400/47/2020/695 चे अवलोकन केले असता 114639 व्यक्तींसाठी प्रत्येकी रु.2,00,000/- प्रमाणे एकूण रु. 22,92,78,00,000/- रकमेचे विमा संरक्षण देण्यात आल्याचे निदर्शनास येते आणि त्याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. सहकारी संस्थेने जनता अपघात विमा योजनेसंबंधी तयार केलेल्या सभासद यादीमध्ये मयत सोमनाथ यांचा क्रमांक 17 दिसून येतो. मयत सोमनाथ यांचा रस्ता अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर तक्रारकर्ती यांनी विमा योजनेचा लाभ मिळण्याकरिता विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला, याबद्दल विवाद नाही. विमा कंपनीने विमा दाव्यासंबंधी कागदपत्रांची पूर्तता करण्याबद्दल तक्रारकर्ती यांच्याशी पत्रव्यवहार केला, याबद्दल मान्यस्थिती आढळते. विमा कंपनीच्या दि.10/8/2022 रोजीच्या पत्रानुसार तक्रारकर्ती यांना इन्क्वेस्ट पंचनामा, अंतिम अहवाल, दावा प्रपत्र व दुचाकी चालविण्याचा परवाना या कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली होती आणि त्या पत्राच्या प्रत्युत्तरामध्ये तक्रारकर्ती यांनी दि.29/8/2022 रोजी सर्व कागदपत्रे दाखल केलेले असताना पुनश्च: त्याच कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याबद्दल तक्रारकर्ती यांनी विमा कंपनीस कळविलेले आहे.
(9) विमा कंपनीने बचाव असा की, त्यांनी मागणी केलेल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तक्रारकर्ती यांनी केलेली नाही आणि त्यामुळे दावा संचिका बंद करण्यात आलेली असून दावा नामंजूर केलेला नाही. तसेच, अपघातसमयी मयत सोमनाथ यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता आणि त्यांनी शिरस्त्राण परिधान केलेले नव्हते.
(10) उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद पाहता व कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ती यांनी विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याबद्दल विमा कंपनीच्या पत्राच्या अनुषंगाने तक्रारकर्ती यांनी दि.29/8/2022 रोजी कागदपत्रे सादर करुन विमा दावा मंजूर करण्याबद्दल विनंती केल्याचे दिसून येते. मात्र, विमा कंपनीने विमा दाव्याबद्दल काय निर्णय घेतला, हे सिध्द होण्याकरिता पुरावा नाही. त्यामुळे तक्रारकर्ती यांचा विमा दावा विमा कंपनीकडे प्रलंबीत आहे आणि तो बंद केलेला नाही किंवा नामंजूर केलेला नाही, हेच अनुमान निघते.
(11) तक्रारकर्ती यांच्या कथनानुसार विमा योजनेचा लाभ मिळण्याकरिता त्यांनी प्रथम खबर, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवचिकित्सा अहवाल, अंतिम अहवाल, 7/12 उतारा, 8-अ उतारा, वाहन चालविण्याचा परवाना, मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, मयत व वारसदारांचे आधारपत्र, मयत सोमनाथ यांचे वय प्रमाणपत्र, विमा दावा प्रपत्र, सभासद प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, शपथपत्र इ. कागदपत्रे सादर केलेले आहेत. तसेच तक्रारकर्ती यांनी अभिलेखावर प्रथम खबर अहवाल, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवचिकित्सा अहवाल, मयत सोमनाथ यांचा वाहन चालविण्याचा परवाना व आधारपत्र इ. कागदपत्रे दाखल केलेले आहेत. तक्रारकर्ती यांनी दि.29/8/2022 रोजीच्या पत्राद्वारे सर्व कागदपत्रे दाखल केलेले असताना पुनश्च: त्याच कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याबद्दल विमा कंपनीस लेखी पत्र दिलेले आहे. मात्र, तक्रारकर्ती यांच्या विमा दाव्याबद्दल विमा कंपनीने उचित निर्णय घेतला नसल्याचे सिध्द होते. निर्विवादपणे, मयत सोमनाथ यांचा दुचाकी चालवत असताना रस्ता अपघातामध्ये मृत्यू सिध्द होते. तसेच, मयत सोमनाथ यांच्याकडे दुचाकी चालविण्याचा वैध वाहन परवाना असल्याचे निदर्शनास येते. अशा स्थितीत, विमा दावा निर्णयीत करण्यासाठी आवश्यक व उचित कागदपत्रे प्राप्त झाल्याचे दिसून येते. इतकेच नव्हेतर, मयत सोमनाथ किंवा तक्रारकर्ती यांच्याकडून विमापत्राच्या किंवा अन्य कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन झाले, असा पुरावा नाही.
(12) आमच्या मते, मयत सोमनाथ हे विमाधारक होते आणि रस्ता अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे सिध्द झालेले असताना विमा दावा प्रलंबीत ठेवून व तक्रारकर्ती यांना विमा रकमेपासून वंचित ठेवून विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. विमा कंपनीने मयत सोमानाथ यांच्या वारसांना विमा लाभ देण्याबद्दल अत्यंत अनुचित व उदासिन भुमिका ठेवलेली असून त्यांच्या अशाप्रकारच्या व्यवसायिक दृष्टीकोनाचे कदापि समर्थन होऊ शकत नाही.
(13) तक्रारकर्ती यांनी रु.3,00,000/- विमा रकमेची मागणी केली असली तरी कर्जदार सभासदांना प्रत्येकी रु.2,00,000/- चे विमा संरक्षण असल्यामुळे रु.2,00,000/- च्या मर्यादेत विमा रक्कम मिळण्याकरिता तक्रारकर्ती पात्र आहेत. विमा रक्कम अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने मिळण्यासंबंधी तक्रारकर्ती यांची विनंती पाहता ग्राहक तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि. 1/12/2022 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने विमा रकमेवर व्याज मंजूर करणे न्यायोचित ठरते.
(14) तक्रारकर्ती यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.15,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना वस्तुस्थितीदर्शक गृहीतक मान्य करावे लागतात. असे दिसते की, विमा कंपनीने विमा दावा प्रलंबीत ठेवल्यामुळे तक्रारकर्ती यांना विमा रक्कम मिळविण्याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. शिवाय, तक्रारकर्ती यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.7,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.5,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत येत आहोत.
(15) सहकारी संस्था व जिल्हा बँकेने त्यांच्या कर्जदार सभासदांना अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वापासून विमा संरक्षणाच्या माध्यमातून आर्थिक मदत होण्याच्या दृष्टीने विमापत्र घेतल्याचे दिसून येते. वाद-तथ्ये व पुराव्यानुसार त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत नाही.
(16) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र. 3 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.
ग्राहक तक्रार क्र. 335/2022.
तसेच, उक्त विमा रकमेवर दि.1/12/2022 पासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र. 3 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.7,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र. 3 विमा कंपनीने आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत उक्त आदेशाची अंमलबजावणी करावी.
(श्रीमती वैशाली म. बोराडे) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-