तक्रार क्र. सी.सी./2016/286
दाखल दिनांक : 28 मार्च 2016
निकाल दिनांक : 16 जाने. 2017
(कालावधी : 09 महिने 19 दिवस)
श्री. सचिन नामदेव रोकडे .. )
रा. : फ्लॅट नं. 204, दुसरा मजला, .. )
नवजीवन स्वप्न बिल्डिंग, सर्व्हे क्र. 6/3ए, .. )
एन. डी. ए. शिवणे रोड, देशमुखवाडी, .. )
पुणे – 411 023 .. ) ... तक्रारदार
विरुद्ध
चिंतामणी कन्सट्रक्शन .. )
तर्फे प्रो. प्रा. श्री. महेश रामचंद्र तिखे .. )
1. रा. : गगन आशिष रेसिडेन्सी, .. )
फ्लॅट नं. 9, वारजे माळवाडी, .. )
पुणे – 411 0058 .. )
2. शिवसाई कॉम्प्लेक्स, पहिला मजला, .. )
एन. डी. ए. रोड, वारजे माळवाडी, .. )
पुणे – 411 058 .. ) .... जाबदेणार
तक्रारदार स्वत: हजर
जाबदेणार हजर (विनाकैफियत)
************************************************************************
द्वारा मा. श्री. ओंकार पाटील, सदस्य
** निकालपत्र **
(16/01/2017)
1. प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध बांधकाम सेवेतील त्रुटीसंदर्भात ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे.
2. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी की जाबदेणार यांनी कोंढवे-धावडे, तालुका – हवेली, जिल्हा – पुणे येथे चिंतामणी कन्सट्रक्शनची “श्री विष्णु नारायण कॉम्प्लेक्स” ही सदनिका बांधण्याची योजना वृत्तपत्रात जाहीर केली होती. त्याप्रमाणे जाबदेणार यांनी “श्री विष्णु नारायण कॉम्प्लेक्स” मधील ‘वरद’ या इमारतीतील स्टील्ट मजल्यावरील सदनिका क्षेत्र 49.72 चौ. मीटरची सदनिका क्र. 2 ही रक्कम रु. 10,70,000/- किंमतीमध्ये देण्याचे तक्रारदारास कबुल केले. त्या रकमेशिवाय नोंदणीकृत करार, वीज पुरवठा व सोसायटीची रक्कम वेगळी द्यायची होती. त्याप्रमाणे तक्रारदाराने एक लाख रुपये जाबदेणार यांच्याकडे जमा करुन सदनिका बुक केली. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे वेळोवेळी सदनिकेचे संपूर्ण रक्कम रु. 10,70,000/- अधिक एम.एस.ई.बी. व सोसायटी मिळून रक्कम रु. 85,000/- व व्हॅट मिळून रक्कम रु. 1,41,860/- भरले. तक्रारदाराने यासाठी बँकेचे कर्ज काढलेले आहे. जाबदेणार यांनी तक्रारदाराशी सदनिकेसंबंधीचा करार दि. 26/12/2013 रोजी केलेला आहे. सदर करारनाम्याचा मुद्रांक खर्च, नोंदणी फी, वकिल फी वगैरे खर्च देखील तक्रारदारानेच केलेला आहे.
3. जाबदेणार यांना संपूर्ण रक्कम प्राप्त होवूनदेखील त्यांनी तक्रारदार यांना सदर सदनिकेचा ताबा न देऊन सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. त्यासाठी तक्रारदाराने तक्रार अर्ज दाखल करुन ठरलेल्या किंमतीसच सदनिकेचा ताबा मिळावा. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,00,000/- नुकसान भरपाई तसेच सदनिका वेळेत न मिळाल्याने भरावे लागलेले घरभाडे ताबा मिळेपर्यंत मिळावे, अशी मागणी केलेली आहे.
4. जाबदेणार श्री. महेश रामचंद्र तिखे हे विद्यमान मंचासमोर स्वत: हजर झाले, परंतु त्यांना पुरेशी संधी देऊनदेखील त्यांनी लेखी जबाब दाखल केला नाही. म्हणून त्यांच्याविरुद्ध विनाकैफियत चौकशीचा आदेश पारीत करण्यात आला.
5. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र, हिशोबाचे कागदपत्र, करारनामा तसेच तक्रारदारांचे म्हणणे विचारात घेता खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात. सदरचे मुद्दे, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना वेळेत सदनिकेचा ताबा न देऊन सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय? | होय |
2. | अंतिम आदेश ? | तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. |
कारणमिमांसा :
6. तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये झालेला करार तसेच हिशोबाच्या पावत्या यावरुन जाबदेणार यांनी “श्री विष्णु नारायण कॉम्प्लेक्स” मधील ‘वरद’ या इमारतीतील स्टील्ट मजल्यावरील सदनिका क्र. 2, क्षेत्र 49.72 चौ. मी. रक्कम रु. 10,70,000/- किंमतीस विकण्याचे कबूल केल्याचे दिसून येते. हा करार दि. 26/12/2013 रोजी करण्यात आला. करारानुसार अन्य खर्चासह रक्कम रु. 12,96,860/- ही संपूर्ण रक्कम प्राप्त होऊनदेखील जाबदेणार यांनी सदर सदनिकेचा ताबा तक्रारदार यांना न देवून सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे, असे विद्यमान मंचाचे मत असल्याने, मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदार यांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी ही तक्रार दाखल केलेली आहे. जाबदेणार यांनी त्याबाबत कोणतीही कृती केली नाही. या मंचासमक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडण्याची तसदीदेखील जाबदेणार यांनी घेतली नाही. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचेकडून सदनिका खरेदीपोटी संपूर्ण रक्कम स्विकारुन, सदनिका तक्रारदारास हस्तांतरीत न करुन सेवेत त्रुटी केलेली आहे, हे सिद्ध होते. त्यामुळे तक्रारदार तक्रार अर्जात मागणी केल्याप्रमाणे करारनाम्यामध्ये ठरलेल्या किंमतीस सदनिका मिळण्यास पात्र आहेत, असे विद्यमान मंचाचे मत आहे.
8. तक्रारदार यांनी वेळेत सदनिकेचा ताबा न मिळाल्यामुळे भरावे लागलेल्या घरभाड्याच्या रकमेची मागणी केलेली आहे. परंतु त्यासंबंधीचा कोणताही नोंदणीकृत करारनामा अथवा भाडे पावत्या त्यांनी दाखल केल्याचे दिसून येत नाही. म्हणून तक्रारदाराची ही मागणी अमान्य करावी, असे या मंचाचे मत आहे.
9. तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 1,000/- मंजूर करणे, या मंचास न्यायोचित वाटते. वरील कारणे व निष्कर्ष यावरुन जाबदेणार यांनी तक्रारदारास सेवा देण्यात न्यूनता केली असल्याचे निर्णयाप्रत विद्यमान मंच आलेले असल्याने खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
** आदेश **
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज क्र. सीसी/2016/286 अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी त्यांना या निकालाची प्रत मिळाल्यापासून सहा महिन्यात कराराप्रमाणे तक्रारदारास “श्री विष्णु नारायण कॉम्प्लेक्स” येथील ‘वरद’ इमारतीमधील 49.72 चौ. मी. क्षेत्र असलेली स्टील्ट मजल्यावरील सदनिका क्र. 2 चा ताबा द्यावा. वरील कालावधीत जाबदेणार यांनी तक्रारदारास सदनिकेचा ताबा न दिल्यास या कालावधीनंतर जाबदेणार यांनी तक्रारदारास दरमहा रक्कम रु. 5,000/- (रु. पाच हजार मात्र) सदनिकेचा ताबा देईपर्यंत नुकसान भरपाई द्यावी.
3. जाबदेणार यांनी बांधकामासंबंधी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट (रेग्युलेशन ऑफ कन्सट्रक्शन सेल, मॅनेजमेंट आणि ट्रान्सफर) अॅक्ट, 1963 प्रमाणे सर्व तरतुदींची पुर्तता करावी. .
4. तक्रारदारास सदनिका नको असल्यास, जाबदेणार यांनी तक्रारदारास जमा केलेली रक्कम अधिक रकमा स्विकारल्यापासून संपूर्ण फेड होईपर्यंत द.सा.द.शे. 18% दराने व्याज द्यावे
5. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत आर्थिक आणि मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/-(रु. पाच हजार मात्र) आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- (रु. एक हजार मात्र) द्यावेत.
6. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
7. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 16/जाने./2017
(क्षितिजा कुलकर्णी) (ओंकार जी. पाटील (व्ही. पी. उत्पात)
सदस्य सदस्य अध्यक्ष
knk