(पारीत व्दारा श्रीमती वृषाली जागिरदार, मा.सदस्या)
01. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष गुरुदत्त मंगल कार्यालय, भंडारा तर्फे प्रोप्रायटर/मालक याचे विरुध्द मंगल कार्यालयाचे बुकींगसाठी दिलेली अग्रीम रक्कम मिळावी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यां साठी ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम-35 खाली प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे यातील विरुध्दपक्ष हा गुरुदत्त मंगल कार्यालय, भंडारा या फर्मचा प्रोप्रायटर/मालक आहे. तक्रारकर्त्याने त्याचे मुलीचे नियोजीत विवाह सोहळयासाठी दिनांक-06.06.2020 व दिनांक-07.06..2020 अशा दोन दिवसां करीता विरुध्दपक्षाचे मंगल कार्यालयाची नोंदणी केली होती व त्या प्रित्यर्थ विरुध्दपक्ष मंगल कार्यालयाचे प्रोप्रायटर/मालक यास अग्रीम रक्कम म्हणून रुपये-7000/- दिले होते व पावती कं 341, दिनांक-08 फेब्रुवारी,2020 रोजी प्राप्त केली होती. अशाप्रकारे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे. दरम्यानचे काळात शासनाने कोवीड-19 रोगाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून लग्न, मंगल समारोह आयोजन यावर बंदी घातली होती, त्यामुळे तक्रारकर्त्याने त्याचे मुलीचा विवाह समारंभ हा त्याचे राहते घरीच शासनाचे पूर्व परवानगीने व कोवीड-19 च्या सर्व अटी व शर्तीचे पालन करुन मर्यादित स्वरुपात दिनांक-27.05.2020 रोजी पार पाडला. तक्रारकर्त्याने शासनाने लागू केलेल्या कोवीड-19 चे कालावधीतील निर्बंधाची माहिती विरुध्दपक्षास देऊन मंगल कार्यालयाचे नोंदणीपोटी दिलेली अग्रीम रक्कम परत मिळण्याची मागणी केली होती, त्यावेळी विरुध्दपक्षाने रक्कम परत करण्याची हमी दिली होती परंतु नंतर वारंवार विरुध्दपक्षाशी संपर्क साधूनही बुकींगपोटी दिलेली अग्रीम रक्कम आज पर्यंत परत केलेली नाही व तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिली. वस्तुतः तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे मंगल कार्यालयात कोणताही कार्यक्रम न घेतल्यामुळे त्याने मंगल कार्यालयाचे बुकींग पोटी भरलेली संपूर्ण रक्कम त्याला परत मिळणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्याने अधिवक्ता श्री महेंद्र एम. गोस्वामी यांचे मार्फतीने विरुध्दपक्षास दिनांक-17.12.2021 रोजीची रजिस्टर पोस्टाव्दारे कायदेशीर नोटीस पाठविली परंतु अग्रीम रक्कम परत केली नाही तर विरुध्दपक्षाने अधिवक्ता श्री पी.आर. भलावी यांचे मार्फतीने सदर नोटीसला दिनांक-23.12.2021 रोजी खोटे उत्तर पाठविले. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा विरुध्द खालील प्रकारे मागण्या केल्यात-
- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास मंगल कार्यालयाचे बुकींगपोटी अग्रीम दिलेली रक्कम रुपये-7,000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला परत करावी आणि सदर रकमेवर दिनांक-08.02.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो वार्षिक10 टक्के दराने व्याज तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षाने दयावे असे आदेशित व्हावे.
- विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक नुकसानी पोटी रुपये-15,000/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये-5000/- विरुध्दपक्षा कडून तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
03 विरुध्दपक्ष गुरुदत्त मंगल कार्यालया तर्फे श्री धनंजय दलाल याने आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तरात तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून कोणतीही सेवा घेतलेली नसल्याने तो विरुध्दपक्षाची ग्राहक होत नाही असे नमुद केले. तक्रारकर्त्याने त्याच्या मुलीचे नियोजित विवाह सोहळयासाठी विरुध्दपक्षाचे मंगल कार्यालय दिनांक-06.06.2020 व दिनांक-07.06.2020 करीता नोंदविले होते व त्या बाबत दिनांक-08 फेब्रुवारी, 2020 रोजी पावती क्रं 341 अन्वये विरुध्दपक्षास रुपये-7,000/- अग्रीम दिले होते ही बाब मान्य केली. तक्रारकर्त्याने त्याचे वकील श्री महेंद्र गोस्वामी यांचे मार्फतीने दिनांक-17.12.2020 रोजीची नोटीस विरुध्दपक्षास पाठविली होती व सदर नोटीसला विरुध्दपक्षाने दिनांक-23.12.2021 रोजी उत्तर दिले होते ही बाब मान्य केली. तक्रारीतील अन्य मजकूर हा नामंजूर केला.
आपले विशेष कथनात विरुध्दपक्षाने असे नमुद केले की, त्याचे मालकीचे गुरुदत्त मंगल कार्यालय आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे मंगल कार्यालयाची नोंदणी करताना त्याने सर्व नियम अटी व शर्ती त्याला समजावून सांगितल्या होत्या. सदर मंगल कार्यालयाचे पॅकेज पोटी (मंडप डेकोरेशन, भाडे व ईतर सामुग्री) तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास रुपये-17,000/- देण्याचे मान्य केले होते. वस्तुतः उभय पक्षांमध्ये ठरल्या प्रमाणे विरुध्दपक्ष हा पॅकेजची अर्धी रक्कम जमा करायला सांगतो परंतु तक्रारकर्त्याने उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे दिनांक-08 फेब्रुवारी,2020 रोजी बुकींगपोटी रुपये-7,000/- विरुध्दपक्षा कडे जमा केले होते. तक्रारकर्त्याने सर्व अटी व शर्ती वाचून बुकींग पावतीवर सही केली त्यामुळे त्या अटी व शर्ती तक्रारकर्त्यावर बंधनकारक आहेत. बुकींग पावतीचे मागे सुचना क्रं 1 मध्ये स्पष्टपणे नमुद आहे की, कार्य रद्द झाल्यास रक्कम परत मिळणार नाही. तक्रारकर्त्याने त्याचे मुलीचा विवाहसोहळा त्याचे राहते घरी दिनांक-27 मे, 2020 रोजी पार पाडला या बाबत कुठलीही माहिती विरुध्दपक्षास दिलेली नाही तसेच सदर मंगल कार्यालयाचे बुकींग रद्द करण्यासाठी तक्रारकर्ता कधीही विरुध्दपक्षाकडे आला नाही त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास बुकींगची रक्कम परत करतो अशी हमी देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्ररकर्त्याने विरुध्दपक्षास त्रास देण्याचे उद्देश्याने प्रस्तुत खोटी तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे असे विरुध्दपक्षा तर्फे नमुद करण्यात आले.
04. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर, उभय पक्षांचा शपथे वरील पुरावा तसेच दाखल दस्तऐवज याचे अवलोकन जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे करण्यात आले. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री महेंद्र गोस्वामी तर विरुध्दपक्षा तर्फे वकील श्री पी.आर. भलावी यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष न्याय निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | तक्रारकर्त्याने मंगल कार्यालय नोंदणीचे अग्रीमापोटी जमा केलेली रक्कम विरुध्दपक्षाने मागणी करुनही परत न केल्याने दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
02 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
-कारणे व मिमांसा-
मुद्दा क्रं 1 व 2
05. विरुध्दपक्षाचे श्री गुरुदत्त मंगल कार्यालय भंडारा येथे असून तक्रारकर्त्याने त्याचे नावे मुलीचे नियोजित लग्न समारोहा करीता दिनांक-06 जून, 2020 व दिनांक-07 जून, 2020 करीता विरुध्दपक्षाचे मंगल कार्यालयाची नोंदणी केली होती व त्या बाबत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास दिनांक-08 फेब्रुवारी, 2020 रोजी अग्रीम राशी रुपये-7,000/- दिली होती ही बाब उभय पक्षांना मान्य आहे. या बाबत विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे नावे दिनांक-08 फेब्रुवारी, 2020 रोजी रुपये-7,000/- मिळाल्या बाबत दिलेली पावती क्रं-341 ची प्रत अभिलेखावर दाखल आहे. दरम्यानचे काळात भारत सरकार/महाराष्ट्र शासनाने कोवीड-19 आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये या करीता लॉकडाऊन घोषीत केले होते आणि लग्न समारोह सार्वजनिकरित्या मोठया गर्दीचे प्रमाणात साजरा करण्यास प्रतिबंधीत केले होते या बाबी सुध्दा उभय पक्षांना मान्य आहेत.
06. तक्रारकर्त्याचे वकील श्री महेंद्र गोस्वामी यांनी पुराव्यार्थ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांनी निर्गमित केलेल्या आदेश क्रं-कक्ष/जिकाभं./जि.आ.व्य.अ./316/2020 दिनांक-18 मार्च, 2020 ची प्रत पुराव्यार्थ दाखल केली.सदर आदेशा मध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून भंडारा जिल्हयात दिनांक-19 मार्च,2020 ते 31 मार्च,2020 पर्यंत साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये भंडारा जिल्हयातील मंगल कार्यालय व लॉन यांचे आरक्षण स्विकारण्यात येऊ नये असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडारा यांनी त्यांचे दिनांक-30 मार्च, 2020 रोजीचे आदेशान्वये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव पाहता दिनांक-01.04.2020 पासून पुढील आदेशा पर्यंत खाजगी/सार्वजनिक मंगल कार्यालय बंद ठेवण्यास सुचित केलेले आहे असे दिसून येते. तक्रारकर्त्या तर्फे सदर आदेशाची प्रत पुराव्यार्थ अभिलेखावर दाखल आहे.
07. तक्रारकर्त्याचे आरोपा प्रमाणे प्रतिबंध लागल्यामुळे अग्रीम राशी परत करण्याची मागणी विरुध्दपक्षाकडे केली होती परंतु विरुध्दपक्षाने प्रतिसाद दिला नाही. ईतकेच नव्हे तर कायदेशीर नोटीस देऊनही आज पर्यंत अग्रीम रक्कम परत केलेली नाही. याउलट विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रारर्त्याने विरुध्दपक्षा कडील मंगल कार्यालयाचे केलेले आरक्षण रद्द केले नाही तसेच तक्रारकर्त्याने त्याचे घरीच मुलीचा विवाह सोहळा पार पाडला बाबत त्याला माहिती नाही. तसेच विरुध्दपक्षाचे वकीलांनी असाही युक्तीवाद केला की, सदर पावतीचे मागे सुचना क्रं 1 प्रमाणे स्पष्टपणे नमुद आहे की, एकदा दिलेली अग्रीम राशी परत मिळणार नाही.
08. या संदर्भात जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे स्पष्ट करण्यात येते की, केवळ पावतीवर अटी व शर्ती छापल्यामुळे त्या अटी व शर्ती संबधितांवर बंधनकारक ठरीत नाही या बद्दल वेळोवेळी मा.वरिष्ठ न्यायालयांनी न्यायनिवाडे पारीत केलेले आहेत. सदर पावती विरुध्दपक्षाची असून विरुध्दपक्षाने आपल्या सोयी प्रमाणे अट नमुद केलेली आहे. दुसरी बाब म्हणजे तक्रारकर्त्याने त्याचे नावे मुलीचे नियोजित लग्न समारोहा करीता दिनांक-06 जून, 2020 व दिनांक-07 जून, 2020 करीता विरुध्दपक्षाचे मंगल कार्यालयाची नोंदणी केली होती त्या कालावधीत भारत सरकार/महाराष्ट्र शासनाने कोवीड-2019 रोगाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन घोषीत केले होते त्यामुळे तक्रारकर्ता आपल्या मुलीचे लग्न सार्वजनिक ठिकाणी मोठया गर्दीचे प्रमाणात ठरलेल्या दिनांकास विरुध्दपक्षाचे मंगल कार्यालयात लावू शकत नव्हती ही बाब तेवढीच सत्य आहे.
09. तक्रारकर्त्याने त्याचे मुलीचा विवाह समारंभ हा त्याचे राहते घरीच शासनाचे पूर्व परवानगीने व कोवीड-19 च्या सर्व अटी व शर्तीचे पालन करुन दिनांक-27.05.2020 रोजी मर्यादित स्वरुपात पार पाडला. या बाबत तक्रारकर्त्याने पुराव्यार्थ उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांचे कार्यालय, भंडारा यांचे विवाहसोहळा पार पाडण्या करीता दिलेल्या परवानगी पत्राची प्रत दाखल केली, त्यामध्ये दिनांक-27 मे, 2020 रोजी जास्तीत जास्त 20 व्यक्तीसाठी केवळ दोन तासा करीता तक्रारकर्त्याचे राहते घरी सर्व अटी व शर्तीचे अनुपालन करावे यासह परवानगी देण्यात आल्याचे दिसून येते.
10. विरुध्दपक्षाने आपले शपथेवरील पुराव्यात असे नमुद केले की, तक्रारकर्ता हा एकदा पैसे परत मागण्या करीता आला असताना त्याने शिवीगाळ करुन बघून घेणार म्हणून निघून गेला, त्यावेळी तक्रारकर्ता यांना अर्धी रक्कम देण्यास तो तयार होता परंतु तक्रारकर्त्याला संपूर्ण रक्कम हवी होती. परंतु आता विरुध्दपक्ष हा रक्कम देऊ शकत नाही कारण तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा विरुध्द विनाकारण तक्रार केल्यामुळे वकीलांना फी दयावी लागत आहे. विरुध्दपक्षाने अन्य ग्राहक श्रीमती उमाबाई भुरे, प्रकाश भालेकरव अमोल रामटेके या ग्राहकांनी मंगलकार्यालय रद्द केले असता त्यांच्या त्यांच्या अर्ध्या रकमा परत केलेल्या आहेत व त्या पावत्यांच्या प्रती पुराव्यार्थ दाखल केलेल्या आहेत. वस्तुतः विरुध्दपक्षाचे नियमात बसत नसताना सुध्दा त्याने या ग्राहकांना अर्ध्या रकमा परत केलेल्या आहेत.
11. या संदर्भात जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, उपरोक्त नमुद ग्राहकांनी मंगल कार्यालय रद्द केले म्हणून जमा केलेल्या रकमे पैकी अर्धी रक्कम विरुध्दपक्षा कडून परत घेतली म्हणून तक्रारकर्त्याने सुध्दा अर्धी रक्कम परत घ्यावयास हवी होती असे होऊ शकत नाही, तो तक्रारकर्त्याचा अधिकार आहे त्यामुळे विरुध्दपक्षाचे या म्हणण्यात जिल्हा ग्राहक आयोगास कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
12. अशी परिस्थिती असताना नियोजित दिनांकास विरुध्दपक्षाचे मंगल कार्यालयात लावले नाही म्हणून तक्रारकर्ता अग्रीम राशी परत मिळण्यास पात्र नाही अशी जी विरुध्दपक्षाने भूमीका घेतलेली आहे तीच मूळात चुकीची आहे. तक्रारकर्त्याने नियोजित दिनांकास मुलींचे लग्न विरुध्दपक्षाचे मंगल कार्यालयात लावले नाही म्हणून विरुध्दपक्षाचे काही नुकसान झाले असे सुध्दा म्हणता येणार नाही कारण त्या कालावधीत सर्वच मंगल कार्यालये ही बंद होती. तक्रारकर्त्याने वारंवार मागणी करुनही तसेच कायदेशीर नोटीस पाठवून सुध्दा विरुध्दपक्षाने अग्रीम रक्कम परत केलेली नाही आणि ही त्याची कृती दोषपूर्ण सेवे मध्ये मोडते असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे म्हणून आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर “होकारार्थी” नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी आल्याने तक्रारकर्त्याची विरुध्दपक्षाची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
13. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष याचे कडून रसिद क्रं-341, दिनांक-08 फेब्रुवारी,2020 अनुसार दिलेली रक्कम रुपये-7,000/- आणि सदर रकमेवर दिनांक-08 फेब्रुवारी, 2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. या ठिकाणी जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे स्पष्ट करण्यात येते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे मंगल कार्यालयात नोंदणी केलेल्या दिनांकास साथीचा रोग कोवीड-19 उदभवल्या मुळे शासकीय प्रतिबंधामुळे लग्न पार पडले नाही, जर कोवीड-19 हा रोग उदभवला नसता तर विरुध्दपक्ष यांनी मंगल कार्यालयाची सेवा बुकींग प्रमाणे तक्रारकर्त्याला दिली असती यासाठी विरुध्दपक्ष यांना जबाबदार धरता येत नाही त्यामुळे तक्रारकर्त्याची शारिरीक व मानसिक त्रासाची मागणी मंजूर होण्या योग्य नाही असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. परंतु तक्रारकर्त्याने जमा केलेली अग्रीमाची रक्कम वेळेवर परत न केल्याने शेवटी तक्रारकर्त्याला अधिवक्ता यांचे मार्फतीने विरुध्दपक्षास कायदेशीर नोटीस दयावी लागली तसेच प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करावी लागली त्यामुळे तक्रारकर्त्याला कायदेशीर नोटीसचा खर्च तसेच तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल त्या अनुसार मुद्दा क्रं 2 प्रमाणे आम्ही खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्ता श्री छगन रेवनाथजी डेकाटे यांची तक्रार विरुध्दपक्ष श्री गुरुदत्त मंगल कार्यालय भंडारा ही फर्म आणि सदर फर्मचे प्रोप्रायटर/मालक श्री धनंजय उर्फ धनु पांडूरंगजी दलाल यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष श्री गुरुदत्त मंगल कार्यालय भंडारा ही फर्म आणि सदर फर्मचे प्रोप्रायटर/मालक श्री धनंजय उर्फ धनु पांडूरंगजी दलाल यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारर्त्याने विरुध्दपक्ष यांना रसिद क्रं-341, दिनांक-08 फेब्रुवारी,,2020 अनुसार दिलेली रक्कम रुपये-7,000/- (अक्षरी रुपये सात हजार फक्त) तक्रारकर्त्याला परत करावी आणि सदर रकमेवर दिनांक-08 फेब्रुवारी, 2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज तक्रारकर्त्यास दयावे.
- विरुध्दपक्ष श्री गुरुदत्त मंगल कार्यालय भंडारा ही फर्म आणि सदर फर्मचे प्रोप्रायटर/मालक श्री धनंजय उर्फ धनु पांडूरंगजी दलाल यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला कायदेशीर नोटीस व प्रस्तुत तक्रारीचे खर्चा दाखल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) दयावेत.
- सदर निकालपत्रातील अंतीम आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष श्री गुरुदत्त मंगल कार्यालय भंडारा ही फर्म आणि सदर फर्मचे प्रोप्रायटर/मालक श्री धनंजय उर्फ धनु पांडूरंगजी दलाल यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणितप्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
- तक्रारकर्ता यांच्या अन्य मागण्या या नामंजूर करण्यात येतात.
- उभय पक्षकारांना प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी.
- उभय पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांना निर्देशित करण्यात येते की, त्यांनी जिल्हाग्राहक आयोगा समक्ष प्रकरणात दाखल केलेले अतिरिक्त संच जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.