Maharashtra

Bhandara

CC/22/75

विद्या जयप्रकाश लांडगे. - Complainant(s)

Versus

क्षेत्राीय अधिकारी, दि ओरयिंटल इंशुरन्‍स कं.लि. - Opp.Party(s)

श्री.उदय क्षीर्सागर

16 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/22/75
( Date of Filing : 17 May 2022 )
 
1. विद्या जयप्रकाश लांडगे.
रा.इंजेवाडा पो.कोका ता.जि.भंडारा.
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. क्षेत्राीय अधिकारी, दि ओरयिंटल इंशुरन्‍स कं.लि.
क्षेत्रीय कार्यालय, 4था मााळा,एस.के.टॉवर्स, नेलसन स्‍क्‍वेअर, छींदवाडा रोड, नागपूर 440013
नागपूर.
महाराष्‍ट्र
2. मॅनेजर, मे.जायका इंशुरन्स. ब्रोकर्स प्रा.लि
दुसरा मजला, जायका बिल्डीं ग, कमर्शियल रोड, सिवील लाईन्सस नागपुर 440001
नागपुर
महाराष्‍ट्र
3. तालुका कृषी अधिकारी, पवनी
ता.पवनी जि.भंडारा.
नागपुर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 16 Jan 2023
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्‍या)

                     

   

01.  तक्रारकर्तीने  प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या  कलम 35 खाली विरुध्‍दपक्ष ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर यांचे विरुध्‍द तिचा  मृतक पती याचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी दाखल केलेली आहे.

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे

    तक्रारकर्त्‍याचे  तक्रारी प्रमाणे तिचा  मृतक पती श्री जयप्रकाश गोपीचंद लांडगे हा शेतकरी होता  आणि त्‍याचा विमा शासनाने काढलेला होता आणि विम्‍याचे वैध कालावधीत त्‍याचा अपघाताने मृत्‍यू झाल्‍याने मृतकाची पत्‍नी आणि कायदेशीर वारसदार या नात्‍याने विमा दाव्‍याची रक्‍कम मिळावी यासाठी तिने जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर प्रस्‍तुत तक्रार दाखल केली. तक्रारी मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे तिचे मृतक पतीची माहिती खालील विवरणपत्रामध्‍ये देण्‍यात येते-

मृतक शेतक-याचे नाव

श्री जयप्रकाश गोपीचंद लांडगे

मृतकाचे नावे असलेल्‍या शेतीचा तपशिल

मृतक श्री जयप्रकाश गोपीचंद लांडगे याचे मालकीची मौजा इंजेवाडा, पोस्‍ट कोका , तालुका  जिल्‍हा भंडारा येथे भूमापन क्रं 273 शेती आहे.

अपघाती मृत्‍यूचा दिनांक

16/05/2018

 

मृत्‍यूचे कारण

दिनांक-16.05.2018 रोजी शेतात विषारी सर्पदंशाने मृत्‍यू झाला.

तालुका कृषी अधिकारी यांचे कडे विमा दावा सादर केल्‍याचा दिनांक

28/06/2018

.क.चे विमा दाव्‍या संबधात सद्द स्थिती काय आहे

विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तिचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर केल्‍याचे तिला आज पर्यंत  कळविलेले नाही.

 

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आहे तर  विरुध्‍दपक्ष क्रं 2 इन्‍शुरन्‍स ब्रोकर्स कंपनी असून  ते विमा दाव्‍यांची छाननी करुन विमा दावे    विमा कंपनी कडे निर्णयार्थ पाठवितात तर विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी असून त्‍यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा ब्रोकर्स कंपनी कडे विमा दावे पाठवितात. सदर विमा पॉलिसी प्रमाणे अपघाती मृत्‍यू संबधात कायदेशीर वारसदारास रुपये-2,00,000/- एवढी रक्‍कम मिळणार होती. परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दाव्‍या बाबत आज पर्यंत तिला न कळवून दोषपूर्ण सेवा दिली, त्‍यामुळे तिला  शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून शेवटी तिने  प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील मागण्‍या केल्‍यात-

 

1.    विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्तीला विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- विमा दावा प्रस्‍ताव दाखल केल्‍याचा दिनांक-26/06/2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचे आदेशित व्‍हावे

 

2.    तिला झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्‍दपक्षां कडून मिळावा. या शिवाय योग्‍य  ती दाद तिचे  बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स  कंपनीने आपले  लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे मृतक हा शेतकरी होता आणि शेतीचा व्‍यवसाय करीत होता ही बाब नामंजूर केली. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्तीचे पतीला दिनांक-27.04.2018 रोजी सर्पदंश झाला होता आणि दिनांक-16.05.2018 रोजी त्‍याचा मृत्‍यू झाला होता परंतु सर्पदंश झाल्‍या नंतर मृत्‍यू हा 20 ते 22 दिवसांनी झालेला आहे त्‍यामुळे मृत्‍यू हा सर्पदंशामुळेच झाला आहे असे म्‍हणता येणार नाही. तसेच अपघाती मृत्‍यू नसल्‍यामुळे मृतकाचे शवविच्‍छेदन करण्‍यात आलेले नाही. मृतकाचा मृत्‍यू हा सर्पदंशामुळेच झाला ही बाब निर्विवादपणे सिध्‍द झालेली नाही त्‍यामुळे मृतकाचा मृत्‍यू हा अपघाती मृत्‍यू मध्‍ये मोडत नाही. सबब तक्रारकर्तीच्‍या सर्व मागण्‍या या नामंजूर करण्‍यात येतात. विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली.

 

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 जयका इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट लिमिटेड नागपूर यांनी आपले लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्‍यांनी असे नमुद केले की, ते तालुका कृषी अधिकारी यांचे कडून प्राप्‍त विमा दाव्‍यांची छाननी करुन, विमा दाव्‍यातील त्रृटीची पुर्तता संबधितां कडून करवून घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनी कडे निर्णयार्थ पाठवितात. विमा दावा मंजूर अथवा नामंजूर करणे ही त्‍यांचे अधिकारातील बाब नाही. मृतकाचा विमा दावा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दिनांक-13.08.2018 रोजी प्राप्‍त झाला होता, त्‍यांनी तो प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी यांचे वरिष्‍ठ अधिकारी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-23.08.2018 रोजी सादर केला होता आणि जिल्‍हा अधिक्षक यांचे कडून  विरुध्‍दपक्ष क्रं 2 जयका इन्‍शुरन्‍स यांना सदर विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-04.05.2019 रोजी प्राप्‍त झाला होता, सदर विमा दाव्‍याची छाननी करुन त्‍यांनी तो विमा दावा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडे दिनांक-09.05.2019 रोजी दाखल केला  होता. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने सदर विमा दावा दिनांक-26.10.2020 रोजी नामंजूर केला.

 

05.   तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी आपले लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केला.  त्‍यांचे लेखी उत्‍तरा प्रमाणे मृतक श्री जयप्रकाश गोपीचंद लांडगे रा. इंजेवाडा, तालुका भंडारा हा शेतकरी होता व त्‍याला दिनांक-27.04.2018 रोजी सर्पदंश झाला होता आणि पुढे उपचारा दरम्‍यान दिनांक-16.05.2018 रोजी मृत्‍यू झाला होता. तक्रारकर्तीने तयांचे कार्यालयात दिनांक-28.06.2018 रोजी विमा दावा प्रस्‍ताव सादर केला होता परंतु सदर विमा प्रस्‍तावा मध्‍ये त्रृटी असल्‍याने तक्रारकर्तीला दिनांक-30.06.2022 रोजीचे पत्रान्‍वये मृतकाचे नावाचा गाव नमुना-6-क, गाव नमुना 6-ड जुना फेरफार आणि डॉक्‍टरांचे सर्टीफीकेट दाखल करण्‍यास सांगितले होते. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे पुणे कार्यालया कडून त्‍यांना दिनांक-28.08.2018 रोजीचे  तसेच दिनांक-27.04.2019 रोजीचे पत्रान्‍वये पुर्तता करण्‍यास कळविले होते, त्‍यानुसार त्‍यांचे कार्यालयाने तक्रारकर्तीला अनुक्रमे दिनांक-31.08.2018 रोजीचे आणि दिनांक-15.05.2019 रोजीचे  पत्रान्‍वये त्रृटीची पुर्तता करण्‍यास कळविले होते. त्‍यानंतर पुन्‍हा तक्रारकर्तीला त्रृटीची पुर्तता करण्‍यास त्‍यांनी दिनांक-02 मार्च, 2020 रोजीचे पत्रान्‍वये कळविले होते. त्‍यांचे कार्यालयाने दिनांक-27.07.2020 रोजीचे पत्रान्‍वये जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी भंडारा यांना शवविच्‍छेदन केले नसल्‍याने पोलीस पाटील व ग्रामपंचायत सरपंच तसेच ईतर गावकरी यांचे समक्ष केलेला पंचनामा सादर करण्‍यात आला. त्‍यांचे  कार्यालयाने विनाविलंब वरिष्‍ठ कार्यालयास विमा प्रस्‍ताव सादर केला तसेच विमा कंपनीने वेळोवेळी सुचविलेल्‍या त्रृटीची पुर्तता करण्‍या बाबत तक्रारकर्तीला कळविलेले आहे.  त्‍यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने तयांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी केली.

 

06.  तक्रारकर्तीची तक्रार, दाखल दस्‍तऐवज, शपथे वरील पुरावा व लेखी युक्‍तीवाद तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1  विमा कंपनीचे लेखी उत्‍तर व शपथे वरील पुरावा व लेखी युक्‍तीवाद त्‍याच प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 2 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकर सर्व्‍हीस यांचे लेखी उत्‍तर तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे लेखी उत्‍तर व  दाखल केलेले दस्‍तऐवज   ईत्‍यादीचे   अवलोकन  करण्‍यात आले. तक्रारकर्ती   तर्फे  वकील श्री उदय क्षिरसागर तर  विरुध्‍दपक्ष  क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती निला नशीने यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहे- 

                                                                                   ::निष्‍कर्ष::

07.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स  कंपनीने आपले  लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे मृतक हा शेतकरी होता आणि शेतीचा व्‍यवसाय करीत होता ही बाब नामंजूर केली. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्तीचे पतीचे सर्पदंशामुळे दिनांक-16.05.2018 रोजी निधन झाले परंतु सर्पदंश झाल्‍या नंतर मृत्‍यू हा 20 ते 22 दिवसांनी झालेला आहे त्‍यामुळे मृत्‍यू हा सर्पदंशामुळेच झाला आहे असे म्‍हणता येणार नाही. तसेच अपघाती मृत्‍यू नसल्‍यामुळे मृतकाचे शवविच्‍छेदन करण्‍यात आलेले नाही. मृतकाचा मृत्‍यू हा सर्पदंशामुळेच झाला ही बाब निर्विवादपणे सिध्‍द झालेली नाही त्‍यामुळे मृतकाचा मृत्‍यू हा अपघाती मृत्‍यू मध्‍ये मोडत नाही.

 

 

08.     जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, तक्रारकर्तीचे पतीचा सर्पदंशामुळे मृत्‍यू झाला होता ही बाब तपासण्‍यासाठी वैद्दकीय महाविद्दालय नागपूर येथील  प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजांचे अवलोकन होणे आवश्‍यक आहे. वैद्दकीय महाविद्दालय नागपूर येथील संदर्भ चिठठी “Referral Card” यामध्‍ये प्राथमिक निदान  Provisional Diagnosis  यामध्‍ये Snake Bite असे नमुद आहे. तर रुग्‍ण पत्रीके Medical Case Report  मध्‍ये “Snake Bite at Rt LL” असे स्‍पष्‍टपणे नमुद आहे तसेच “Swelling over Rt. Leg” असेही पुढे नमुद केलेले आहे.

MEDICAL COLLEGE & HOSPITAL NAGPUR , DEATH CERTIFICATE  यांचे व्‍दारा जारी दिनांक-16.05.2018 रोजी जारी केलेल्‍या प्रमाणपत्रात  खालील प्रमाणे नमुद केलेले आहे-

            This is to certify that Jaiprakash Gopichand Landge Reg. No. 1763594 who was admitted in Ward No. 24 ICU on 28/04/2018 died on 16/05/2018  time 9:30 am, and probable cause of death is Respiratory Failure c CRA.  Diagnosis Snake Bite

 

09   या शिवाय विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी मौजा इंजेवाडा, पोस्‍ट कोका तालुका जिल्‍हा भंडारा येथील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक आणि गावातील अन्‍य 08 लोकांनी दिनांक-19.05.2018 रोजी सर्वांचे सहयानिशी तयार केलेला पंचनामा दाखल केला, त्‍यामध्‍ये असे नमुद केलेले आहे की, मौजा इंजेवाडा येथील रहिवासी श्री जयप्रकाश गोपीचंद लांडगे हे दिनांक-27.04.2018 रोजी ऊसाचे शेताला पाणी देण्‍या करीता सायंकाळी अंदाजे 6.30 वाजताचे दरम्‍यान शेतावर गेले असता तयाचे डाव्‍या पायाला विषारी सापाने दंश केला  परंतु गावात खाजगी गाडया नसल्‍यामुळे व जंगलव्‍याप्‍त क्षेत्र असलयामुळे त्‍यांना दुसरे दिवशी किरायाची गाडी करुन शासकीय रुग्‍णालय भंडारा येथे नेण्‍यात आले परंतु प्रकृती गंभिर असल्‍यामुळे दिनांक-28.04.2018 रोजी वैद्दकीय महाविद्दालय नागपूर येथे भरती करण्‍यात आले  व उपचारा दरम्‍यान 20 ते 21  दिवसांनी दिनांक-16.05.2018 रोजी सकाळी 10.00 वाजता त्‍यांचा मृत्‍यू झाला परंतु अज्ञानीपणामुळे व तेथील डॉक्‍टरांचे सांगण्‍या प्रमाणे मृत्‍यू प्रमाणपत्रावरती विमा दावा मिळेल, शवविच्‍छेदन करण्‍याची गरज नाही असे सांगितल्‍याने शवविच्‍छेदन केले नाही तरी आम्‍ही खालील सहया करणार आमचे मते श्री जयप्रकाश गोपींचद लांडगे यांचा मृत्‍यू हा सर्पदंशामुळेच झालेला आहे व त्‍या कारणास्‍तव शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत भरपाई मिळण्‍या करीता हा पंचनामा लिहून दिलेला आहे असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे.

 

10.    प्रकरणातील अभिलेखावरुन असे दिसून येते की, तालुका कृषी अधिकारी भंडारा यांनी तक्रारकर्तीला दिनांक-30.06.2018 रोजीचे दिलेल्‍या पत्रा मये मृतकाचा 6-क, 6- जुना फेरफार आणि डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र इत्‍यादीची पुर्तता करण्‍यास सुचित केलेले होते. त्‍यानंतर तालुका कृषी अधिकारी , भंडारा यांनी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांना दिनांक-18.08.2022 रोजीचे पत्रा मध्‍ये मृतकाचा मृत्‍यू सर्पदंशामुळे दिनांक- 16.05.2018 रोजी झाल्‍याचे आणि त्रृटीची पुर्तता केल्‍या बाबत दस्‍तऐवज दाखल करीत असल्‍याचे नमुद केलेले आहे.  त्‍यानंतर पुन्‍हा विरुध्‍दपक्ष क्रं 2 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज यांनी दिनांक-28.08.2018 रोजी जिल्‍हा अधिक्षक कार्यालय, भंडारा यांना त्रृटी पुर्तता करण्‍या बाबत पत्र दिलेले आहे. त्‍यानंतर तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांना जे  दिनांक-27.07.2020 रोजीचे पत्र दिले त्‍यामध्‍ये मृतकाचा एफ.आय.आर. व पोस्‍टमार्टम झाले नसल्‍या बाबत पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामस्‍थ यांनी दिनांक-19.05.2018 रोजीचा पंचनामा दाखल करीत असल्‍याचे नमुद आहे.

     सदर पत्रव्‍यवहारा वरुन ही बाब सिध्‍द होते की, विमा दाव्‍या मधील बहुतांश तृटींची पुर्तता झालेली असून केवळ एफ.आय.आर. नोंदविलेला नसून तसेच पोस्‍टमार्टम झाले नसल्‍याचे नमुद आहे. परंतु पोस्‍टमार्टम करणे हा सर्वस्‍वी मृतक वैद्दकीय महाविद्दालय नागपूर यांचे अखत्‍यारीतील बाब आहे. दुसरी महत्‍वाची बाब अशी आहे की, वैद्दकीय महाविद्दालय नागपूर यांचे वैद्दकीय प्रमाणपत्रात स्‍पष्‍टपणे मृत्‍यूचे कारण सर्पदंश नमुद केलेले आहे.  मृतक हा ग्रामीण भागातील असून ते अर्धशिक्षीत लोक आहेत, त्‍यांनी पंचनाम्‍या मध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, वैद्दकीय प्रमाणपत्रात मृत्‍यूचे कारण सर्पदंश दिल्‍यामुळे आणि तेथील डॉक्‍टरांनी वैद्दकीय प्रमाणपत्राचे आधारे विमा दावा मिळेल असे सांगितल्‍याने त्‍यांनी शवविच्‍छेदन केले नाही.

 

 

11.    जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते, गावातील पोलीस पाटील, ग्राम सेवक, सरपंच व अन्‍य साक्षीदार गावातील 08 लोक यांनी तयार केलेला पंचनामा या मध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद आहे की, मृतकाचे डाव्‍या पायास विषारी सर्पाने दंश केला होता आणि वैद्दकीय महाविद्दालय नागपूर जेथे मृतकावर उपचार करण्‍यात आले होते तेथील रुग्‍णपत्रीके मध्‍ये सुध्‍दा स्‍पष्‍टपणे असे नमुद आहे की,  “Swelling over Rt. Leg” यावरुन मृतकाचे डाव्‍या पायास विषारी सर्पदंश झाला होता या बाबी पुराव्‍यानिशी सिध्‍द झालेल्‍या आहेत.

     

12.   तक्रारकर्तीने आपले  शपथे वरील पुराव्‍या मध्‍ये असे नमुद केलेले आहे की, दवाखान्‍यातील डॉक्‍टरांचे प्रमाणपत्रा नुसार तसेच पोलीस पाटील यांनी  केलेल्‍या पंचनाम्‍या नुसार मृतकाचा मृत्‍यू हा सर्पदंशामुळे झालेला आहे. तसेच शेतीचे दसतऐवजा वरुन अपघाती घटनेच्‍या वेळी मृतक शेतकरी होता या बाबी सिध्‍द झालेल्‍या आहेत.

 

13.  जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असेही मत आहे की महाराष्‍ट्र शासनाचे निर्णया नुसार एखादा दस्‍तऐवज उपलब्‍ध नसेल तर अन्‍य पर्यायी उपलब्‍ध दस्‍तऐवजांचे आधारे निष्‍कर्ष काढून अपघाती मृत्‍यू संबधात विमा दावा निकाली काढता येतो.  दुसरी महत्‍वाची बाब अशी आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले शपथे वरील पुराव्‍यात असेही नमुद केलेले आहे की, त्‍यांचे पुणे येथील कार्यालया मधून  तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्‍याचे पत्र दिनांक-16.10.2020 रोजी पाठविण्‍यात आले होते परंतु विमा दावा नामंजूरीचे पत्र तक्रारकर्तीला मिळाल्‍या बाबत त्‍यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही तसेच सदर विमा दावा नामंजूरीचे पत्राची प्रत सुध्‍दा अभिलेखावर दाखल केलेली नाही..  जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, मृतकाचा मृत्‍यू हा सर्पदंशा मुळे अपघातील झाला होता या संबधात ईतर अनेक पर्यायी दसतऐवज उपलब्‍ध असताना केवळ शवविच्‍छेदन अहवाल नसलयाने तक्रारकर्तीला निष्‍कारण इतके दिवस तिचे पतीचे अपधाती मृत्‍यू संबधात विमा रक्‍कम न देऊन विमा रकमे पासून वंचित ठेऊन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे, त्‍यामुळे तिला निश्‍चीतच आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या बाबी पुराव्‍यानिशी सिध्‍द झालेल्‍या आहेत

 

14.   तक्रारकर्तीचे वकील श्री उदय क्षिरसागर यांनी खालील मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयांवर भिस्‍त ठेवली, त्‍या निवाडयांचे जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे काळजीपूर्वक वाचन करण्‍यात आले -

 

  1. Order of Hon’ble National Commission in Revision Petition 89 of 2020 “Secretary Krushi Upaj Mandi Samiti-Versus-Anu Devi” dated-02/09/2021

                                      ***** 

  1. II (2008)CPJ 371 (NC)  -“New India Assurance Co.Ltd.-Versus-State of Harayana & Ors.

                                     ***** 

  1. II (2013)CPJ 486 (NC)  -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Jatinderkumar Sharma

                                    *****

  1.  2018 (1) CPR 305 (NC)  “Bajaj Allianze -Versus-Harpal Singh & Anr.”

 

                                     *****   

    

  1. 2011 (3) CPR 107  (MAH) “New India Insurance Company-Versus-Sau.Chanda Sunil Sawant”

                                    ***** 

      उपरोक्‍त नमुद मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडयां मधील काही तत्‍वे (Ratio) हातातील प्रकरणात काही अंशी लागू पडतात असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

                                          ***** 

 

15.   या संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे  खालील मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे  निवाडयावर भिस्‍त ठेवण्‍यात येते-

 

1)        III (2005) CPJ 224 Appeal No. 764 of 2002, Decided on-16/02/2005 “Laxman Manikrao Gawahane & Others-Versus-United India Insurance Company Ltd. & Others” 

 

             आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी पारीत केलेल्‍या सदर निवाडयाचे वाचन जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे करण्‍यात आले, त्‍यामध्‍ये आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग यांनी असे मत नोंदविले की, जिल्‍हा ग्राहक मंचाने (सध्‍या जिल्‍हा ग्राहक आयोग)  केवळ मृतकाचे व्‍हीसेरा अहवालाचा विचार करुन व्‍हीसेरा अहवाला प्रमाणे मृतकाचे शरिरात सर्पदंशाचे विष आढळून न आल्‍याने तक्रार खारीज केली परंतु सदर ग्राहक मंचाचा निर्णय चुकीचा असल्‍याचे नमुद करुन निवाडयात पुढे असे नमुद केले की, मृतकाचे शरिराचे रासायनिक विश्‍लेषण करताना अनेक कारणांमुळे मृत शरीरात विष आढळून येत नाही. परंतु अशा सर्पदंशाचे प्रकरणात संबधित न्‍यायाधिश यांनी निर्णय देताना अन्‍य शरीर लक्षणांचा सुध्‍दा विचार करायला पाहिजे, ज्‍यामध्‍ये मुख्‍यत्‍वे करुन शवविच्‍छेदन अहवाल आहे. आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग यांचे समोरील प्रकरणात प्राथमिक आरोग्‍य केंद्र नेवासा यांचा मृतक मंगला हिचे उजव्‍या हाताला सर्पदंश केल्‍याचे आढळून आल्‍या बाबत अहवाल दाखल आहे. पोलीसांनी केलेल्‍या इन्‍क्‍वेस्‍ट पंचनाम्‍या मध्‍ये सुध्‍दा मृतक मंगला हिचे उजव्‍या हातावर सर्पदंश झाल्‍याची खूण असल्‍याचे नमुद केलेले आहे. शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये सुध्‍दा मृतक मंगला हिचा सर्पदंशामुळे मृत्‍यू झाल्‍याचे नमुद आहे. अशाप्रकारे  दाखल असलेल्‍या अन्‍य आधारभूत (Supporting documents) दस्‍तऐवजांवरुन  सिध्‍द होते की, मृतक मंगला हिचा सर्पदंशामुळे मृत्‍यू झाल्‍याचा निष्‍कर्ष काढून आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग मुंबई यांनी तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले अपिल मंजूर करुन जिल्‍हा ग्राहक मंच, अहमदनगर यांनी दिलेला निकाल रद्दबातल ठरवून विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला विमा दावा रक्‍कम आणि नुकसान भरपाई तक्रारकर्त्‍याला देण्‍याचे आदेशित केले आहे.

 

16    आमचे समोरील हातातील प्रकरणात गावातील पोलीस पाटील, ग्राम सेवक, सरपंच व अन्‍य साक्षीदार गावातील 08 लोक यांनी तयार केलेला पंचनामा या मध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद आहे की, मृतकाचे डाव्‍या पायास विषारी सर्पाने दंश केला होता आणि वैद्दकीय महाविद्दालय नागपूर जेथे मृतकावर उपचार करण्‍यात आले होते तेथील रुग्‍णपत्रीके मध्‍ये सुध्‍दा स्‍पष्‍टपणे असे नमुद आहे की,  “Swelling over Rt. Leg” यावरुन मृतकाचे डाव्‍या पायास विषारी सर्पदंश झाला होता या बाबी सदर आधारभूत दस्‍तऐवजा (Supporting documents) वरुन सिध्‍द झालेल्‍या आहेत की, मृतकाचा मृत्‍यू हा सर्पदंशामुळेच झालेला आहे. त्‍यामुळे आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी उपरोक्‍त नमुद दिलेला न्‍यायनिवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे  स्‍पष्‍ट मत आहे, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला विमा दावा रकमे पासून वंचीत ठेऊन दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे  मत आहे.

 

 

17.  आम्‍ही महाराष्‍ट्र शासनाचे कृषी, पशुसवंर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक-19 सप्‍टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रकाचे वाचन केले, त्‍यामध्‍ये विमा कंपनी या सदरा खाली विमा कंपनीस सुचना दिलेल्‍या आहेत, त्‍यामधील विमा दावा निकाली काढण्‍यासाठी काही सुचना पुढील प्रमाणे आहेत.

 

अक्रं-9 विमा कंपन्‍यांना सुस्‍पष्‍ट कारणां शिवाय विमा प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत. विमा कंपन्‍यांनी नामंजूर विमा दाव्‍या प्रकरणी सुस्‍पष्‍ट कारणमीमांसा संबधित शेतक-यांना कटाक्षाने मराठी भाषेतच कळविले व  त्‍याची प्रत विमा सल्‍लागार कंपनी/आयुक्‍त कृषी/ सहसंचालक कृषी/ जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्‍याकडे पाठविणे व विमा संगणक प्रणाली मध्‍ये नोंद घेणे अनिवार्य आहे.

 

अक्रं-10 विमा प्रस्‍तावात त्रुटी असल्‍यास  त्‍या बाबतचे पत्र संबधित अर्जदारास पोहोच करावे व त्‍याची प्रत विमा सल्‍लागार कंपनी/ जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दयावी. परिपूर्ण प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍या पासून 21 दिवसाच्‍या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्‍यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर पुढे 15 टक्‍के व्‍याज देय राहील.

 

अक्रं-11 प्रकरण मंजूर केल्‍यावर पंधरा दिवसांच्‍या आत अनुज्ञेय नुकसान भरपाई संबधित लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍या वर जमा करणे बंधनकारक राहील. अन्‍यथा तीन महिन्‍या पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर 15 टक्‍के व्‍याज देय राहील.

 

अक्रं-12 परिपूर्ण विमा दावा कंपनीकडे सादर झाल्‍या पासून त्‍यावर 21 दिवसांच्‍या आत कार्यवाही करणे विमा कंपनी वर बंधनकारक राहील. मात्र तरीही विमा कंपनीने कागदपत्रांची पुर्तता झालेल्‍या प्रकरणी मंजूरी योग्‍य प्रस्‍ताव नाकारल्‍यास विमा सल्‍लागार कंपनीने शेतक-यांच्‍या वतीने इर्डा ग्राहक तक्रार कक्ष/ विमा न्‍यायाधीश/ जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच/ राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग/न्‍यायालय येथे दावे दाखल करेल.

 

अक्रं-13 शेतक-यांचा विमा प्रस्‍ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्‍या कालावधीत  कधीही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील.

   

अक्रं-14 तथापी विमा पॉलिसी कालावधीच्‍या अखेरच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्‍या पासून 90 दिवसा पर्यंत पूर्वसूचना प्राप्‍त होणारे व संगणक प्रणाली मध्‍ये विहित कालावधीत कागदपत्रांसह नोंद झालेल्‍या पूर्वसूचना पत्रा नुसार विमा प्रस्‍ताव सुध्‍दा स्विकारणे विमा कंपनीस बंधनकारक राहील.

 

   वरील प्रमाणे  शासन परिपत्रकात सुचना विमा कंपनीसाठी निर्गमित केलेल्‍या आहेत.       महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रका नुसार परिपूर्ण प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍या पासून 21 दिवसाच्‍या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्‍यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर पुढे 15 टक्‍के व्‍याज देय राहील असे स्‍पष्‍ट नमुद आहे.

   

 

18    उपरोक्‍त विवेचन केल्‍या प्रमाणे तक्रारकर्तीला  विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- मिळण्‍यास ती पात्र आहे. त्‍याच प्रमाणे  सदर विमा रकमेवर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे शपथपत्रा प्रमाणे विमा दावा नाकारल्‍याचा   दिनांक-16.10.2020 पासून  ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.15 टक्‍के दराने व्‍याज मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. त्‍याच बरोबर तिला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/-  आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-  मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

19.  उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

                                                                  ::अंतिम आदेश::

 

  1. तक्रारकर्ती श्रीमती विद्दा  जयप्रकाश लांडगे यांची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 दि ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर  यांचे  विरुध्‍द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 दि ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर  यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) अदा करावी आणि सदर रकमेवर विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-16.10.2020 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15 टक्‍के दराने व्‍याजाची रक्‍कम तक्रारकर्तीला  अदा करावी.

 

  1. तक्रारकर्तीला   झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं 1 दि ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांनी अदा करावेत.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 2 मे. जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकर्स प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा न दिल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं  3 तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी  तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा न दिल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1  दि ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर  यांनी प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झालयाचे  दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

 

  1. निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

 

  1. उभय पक्षकारांनी अतिरिक्‍त संच  जिल्‍हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.
 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.