जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 199/2020. तक्रार दाखल दिनांक : 02/12/2020. तक्रार निर्णय दिनांक : 20/07/2022.
कालावधी : 01 वर्षे 07 महिने 18 दिवस
राधेशाम पि. रामेश्वरजी लाहोटी, वय 53 वर्षे,
व्यवसाय : व्यापार, रा. पानगाव, ता. रेणापूर, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कौशिक केदार रासुरे, प्रोप्रा. रासुरे इको मोटार्स,
प्लॉट नं. 79, इंडस्ट्रीयल एरिया,उद्योग भवनच्या पाठीमागे, लातूर.
(2) चेअरमन, एन.डी.एस. ईको मोटर्स प्रा.लि., सर्व्हे नं. 61/1ए1,
पहिला मेन, सिपला रोड, जुना मद्रास रोड, विरगणानगर,
आव्हालाहाल्ली, बेंगलुरु (कर्नाटक) - 560 049. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- एस.जे. तापडिया
विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेकरिता विधिज्ञ :- जीवन एन. करडे
विरुध्द पक्ष क्र. 2 अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांनी माहे ऑक्टोबर 2018 मध्ये विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून रु.80,449/- किंमतीस इलेक्ट्रीक स्कुटर खरेदी केली. त्याचा एन.डी.एस. इको मोटर्स चेसीस नंबर M4D30L72181H00316, मोटर नंबर BD72V3000W18070026 व बॅटरी नंबर CWXN7220 AEA18F201AB0040 आहे. विरुध्द पक्ष क्र.2 हे इलेक्ट्रीक स्कुटरचे उत्पादक असून विरुध्द पक्ष क्र.1 हे वितरक आहेत. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी इलेक्ट्रीक स्कुटरसह बॅटरी, इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर इ. करिता दोन वर्षे किंवा 30000 कि.मी. पर्यंत गॅरंटी दिलेली होती. तसेच वाहनाची बॅटरी 4 तास चार्ज केल्यानंतर किमान 80 कि.मी. वाहन चालण्याची हमी दिलेली होती.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, त्यांनी 11 महिने वाहन चालविल्यानंतर दि.23/9/2019 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे सर्व्हीसिंग केली. त्यानंतर, त्यांच्या असे लक्षात आले की, वाहनाची बॅटरी 4 तास चार्ज केल्यानंतर हमीप्रमाणे 80 कि.मी. न चालता 20 कि.मी. पर्यंत गेल्यानंतर वाहन बंद पडू लागले. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे तक्रार केली असता रु.40,000/- रकमेची नवीन बॅटरी खरेदी करण्याचा सल्ला दिला. वॉरंटी कालावधीमध्ये बॅटरी नादुरुस्त झाल्यामुळे नवीन बॅटरी देण्याची विनंती केली असता नकार देण्यात आला. विधिज्ञांमार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी दखल घेतली नाही. उक्त कथनाच्या अनुषंगाने रु.40,000/- नुकसान भरपाई व्याजासह देण्याचा; अन्य रु.20,000/- नुकसान भरपाई देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी वाहन खरेदी केल्यानंतर काळजीपूर्वक वापरले नाही आणि वाहनाची वेळेवर सर्व्हीसिंग केली नाही. वाहनाबाबत असणा-या तक्रारीबाबत मॅन्युअल पान क्र.25 नुसार M/s NDS Eco Motors Pvt. Ltd.; Email : sales.service@ndsecomotors.in; Phone : 18002008565 दाद मागणे उचित होते. तक्रारकर्ता यांनी मॅन्युअल क्र.23 नुसार सूचनांचे पालन केले नसल्यामुळे तथाकथित दोष निर्माण झालेला आहे. तक्रारकर्ता यांच्या निष्काळजीपणाकरिता विरुध्द पक्ष क्र.1 जबाबदार नाहीत. तक्रारकर्ता यांनी व्यापाराकरिता वाहनाचा वापर केल्यामुळे वाहनामध्ये बिघाड झाला असण्याची शक्यता आहे.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 यांचे पुढे कथन की, तक्रारकर्ता यांनी वाहनाची त्या-त्या तारखांना सर्व्हीसिंग केलेली नाही. बंधनकारक सूचनांकडे तक्रारकर्ता यांनी दुर्लक्ष केले. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(5) विरुध्द पक्ष क्र.2 यांना सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना विक्री केलेल्या वादकथित
इलेक्ट्रीक स्कुटरच्या बॅटरीमध्ये दोष असल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 हे एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून वादकथित इलेक्ट्रीक स्कुटर खरेदी केली आणि त्याचे प्रतिफल अदा केले, ही बाब विवादीत नाही. मुख्य विवादाचा विषय असा की, वाहनाचा 11 महिने वापर केल्यानंतर तक्रारकर्ता यांनी दि.23/9/2019 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे सर्व्हीसिंग केली असता वाहनाची बॅटरी 4 तास चार्ज केल्यानंतर हमीप्रमाणे 80 कि.मी. न चालता 20 कि.मी. पर्यंत गेल्यानंतर वाहन बंद पडू लागले. त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे तक्रार केली असता रु.40,000/- रकमेची नवीन बॅटरी खरेदी करण्याचा सल्ला दिला. उलटपक्षी, विरुध्द पक्ष क्र.1 यांचा प्रतिवाद असा की, तक्रारकर्ता यांनी वाहन काळजीपूर्वक वापरले नाही आणि वाहनाची वेळेवर सर्व्हीसिंग केली नाही. वाहनाच्या मॅन्युअलमध्ये नमूद सूचनांचे पालन केले नसल्यामुळे तथाकथित दोष निर्माण झालेला आहे आणि त्याकरिता तक्रारकर्ता यांचा निष्काळजीपणा आहे.
(8) उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता यांच्या इलेक्ट्रीक स्कुटरच्या बॅटरीमध्ये दोष निर्माण होऊन अपेक्षेप्रमाणे स्कुटर 80 कि.मी. अंतर धावत नव्हती, असा वाद दिसून येतो. विरुध्द पक्ष यांचा बचाव असा की, तक्रारकर्ता यांनी मॅन्युअलच्या सूचनांचे पालन केले आणि वाहनाचा काळजीपूर्वक वापर केला नाही. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी स्वत:च्या शपथपत्राशिवाय त्यांचे मेकॅनिक श्री. लक्ष्मण नागनाथ जाधव यांचे शपथपत्र सादर केले आहे. लक्ष्मण नागनाथ जाधव यांच्या निवेदनानुसार तक्रारकर्ता यांच्या वाहनाची सर्व्हीसिंग ते करीत होते आणि तक्रारकर्ता यांनी मॅन्युअलमध्ये दिलेल्या सूचनांकडे दूर्लक्ष व निष्काळजीपणा केला आणि वाहनाच्या बॅटरीबाबत दोष आढळून आलेला नाही. मेकॅनिक श्री. लक्ष्मण नागनाथ जाधव यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी तक्रारकर्ता यांच्या वाहनाचे नियमीत सर्व्हीसिंग केलेले आहे. तक्रारकर्ता यांनी स्कुटरची सर्व्हीसिंग करण्यासंबंधी विरुध्द पक्ष क्र.1 व लक्ष्मण नागनाथ जाधव यांच्या शपथपत्रामध्ये विधानांमध्ये विसंगती आढळते. असे असले तरी, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या इलेक्ट्रीक स्कुटरचे सर्व्हीसिंग करताना ठेवलेल्या नोंदीबाबत स्वतंत्र पुरावा सादर केलेला नाही.
(9) तक्रारकर्ता यांच्या इलेक्ट्रीक स्कुटरकरिता 2 वर्षे किंवा 30000 कि.मी. पर्यंत वॉरंटी दिलेली होती, हे उभयतांना मान्य आहे. वॉरंटी तरतुद पाहता वेळोवेळी वापराप्रमाणे बॅटरी खराब होते. हळूहळू क्षमता कमी होणे अपेक्षित असल्यामुळे ते वाहनाच्या वॉरंटी अंतर्गत समाविष्ट नाही. परंतु कोणतेही उत्पादन दोष वॉरंटीद्वारे संरक्षित केले आहेत. तसेच स्वेच्छाधिकारानुसार नवीन, पुर्नउत्पादीत, वापरलेले किंवा अशा प्रकारचे व गुणवत्तेचे सुटे भाग बदलण्यासाठी संरक्षीत असतील.
(10) वादविषयाच्या अनुषंगाने इलेक्ट्रीक स्कुटरची बॅटरी खराब किंवा नादुरुस्त होण्यामागे कोणत्या बाबी कारणीभूत आहेत ? हा प्रश्न निर्माण होतो. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार दि.23/9/2019 रोजी सर्व्हीसिंग केल्यानंतर कथित दोष निर्माण झाला. असे दिसते की, विरुध्द पक्ष यांनी बॅटरीच्या गुणवत्तेबाबत उचित निर्णायक पुरावा सादर केलेला नाही. तसेच बॅटरी चार्ज केल्यानंतर इलेक्ट्रीक स्कुटर निश्चित किती किलो मीटर अंतर धावते ? याचे स्पष्टीकरण दिसून येत नाही. विरुध्द पक्ष यांच्या प्रत्यारोपानुसार तक्रारकर्ता यांच्या निष्काळजीपणामुळे बॅटरीमध्ये दोष निर्माण झाला, हे सिध्द होण्याइतपत पुरावा नाही. तसेच बॅटरी वापरानुसार अकार्यक्षम बनली, असे दिसून येत नाही. ज्यावेळी बॅटरी 11 महिन्यापर्यंत कार्यक्षम होती आणि सर्व्हीसिंग केल्यानंतर अचानक बॅटरी अकार्यक्षम झाली, त्यावेळी बॅटरीमध्ये दोष निर्माण झाला, हे मान्य करावे लागेल. बॅटरी नादुरुस्त होण्याकरिता तक्रारकर्ता यांचा निष्काळजीपणा असल्याचे सिध्द होत नाही.
(11) निर्विवादपणे, बॅटरी वॉरंटी कालावधीमध्ये नादुरुस्त झालेली आहे. त्यामुळे वॉरंटी कालावधीमध्ये बॅटरी नवीन बदलून न देण्याचे कृत्य विरुध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये त्रुटी ठरते. तक्रारकर्ता यांनी रु.40,000/- रकमेची मागणी केलेली आहे. वास्तविक पाहता, बॅटरीचे मुल्य किती आहे ? हे उभयतांनी स्पष्ट केलेले नाही. तसेच तक्रारकर्ता यांनी बॅटरीकरिता पर्यायी व्यवस्था काय केली, हे स्पष्ट केले नाही. अशा स्थितीमध्ये तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांच्याकडून त्यांच्या इलेक्ट्रीक स्कुटरसाठी नवीन बॅटरी बदलून मिळण्यास पात्र ठरतात.
(12) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी लेखी निवेदनपत्र सादर केलेले नाही. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद वादकथनांचे खंडण करण्यासाठी लेखी निवेदनपत्र व पुराव्याची कागदपत्रे सादर करण्याकरिता त्यांना संधी उपलब्ध होती. अशा स्थितीत तक्रारकर्ता यांच्या वादकथनांना व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांस विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याद्वारे आव्हानात्मक निवेदन व विरोधी पुरावा उपलब्ध नाही. विरुध्द पक्ष क्र.2 हे इलेक्ट्रीक स्कुटरचे उत्पादक आहेत. इलेक्ट्रीक स्कुटरमध्ये निर्माण झालेल्या दोषाकरिता वितरक व उत्पादक संयुक्त जबाबदार ठरतात.
(13) तक्रारकर्ता यांनी अन्य रु.20,000/- नुकसान भरपाईसह मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, तक्रारकर्ता यांच्या इलेक्ट्रीक स्कुटरीच्या बॅटरीमध्ये दोष निर्माण झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्ता यांना पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले, ही बाब स्पष्ट आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहोत.
(14) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत आदेश प्राप्तीनंतर 45 दिवसाच्या आत विरुध्द पक्ष क्र.1 किंवा 2 यांच्याकडे त्यांच्या इलेक्ट्रीक स्कुटरीची सदोष बॅटरी जमा करावी आणि विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी सदोष बॅटरी स्वीकारुन तात्काळ तक्रारकर्ता यांना इलेक्ट्रीक स्कुटरकरिता नवीन बॅटरी द्यावी.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- प्रस्तुत आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत द्यावेत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-