::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, प्र.अध्यक्ष)
(पारित दिनांक- 31 मे, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष विरुध्द अनुचित व्यापारी प्रथेच अवलंब केल्याचे आरोपा वरुन ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात सारांश खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) ही एक सहकारी कायद्दाखाली नोंदणीकृत सोसायटी असून तिचे अध्यक्ष श्री शेर खान समशेर खान (बाबूभाई) आहे. विरुध्दपक्ष क्रं-2) याचे मालकीचा, विरुध्दपक्ष क्रं-1) सोसायटीने पाडलेल्या मौजा नारा, पटवारी हलका क्रं 11, खसरा क्रं-180/3 येथील ले आऊट मधील भूखंड आहे. तक्रारकर्त्यास राहण्या करीता भूखंडाची आवश्यकता होती, त्यामुळे त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) याचेशी संपर्क साधला. सदर भूखंड क्रं 7, एकूण क्षेत्रफळ-1000 चौरसफूट विकत घेण्याचा सौदा तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) याचे मध्यस्थीने, विरुध्दपक्ष क्रं-2) याचेशी दिनांक-27/12/2007 रोजी एकूण रक्कम रुपये-1,30,000/- केला. विरुध्दपक्ष क्रं-1) याने तक्रारकर्त्यास सदर भूखंड विकत घेण्यासाठी सोसायटीचे ना-हरकत-प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शविली व दिनांक-28/12/2007 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1) याने तक्रारकर्त्यास ना-हरकत-प्रमाणपत्र आपले सहीनिशी दिले.
पुढे तक्रारकर्त्याने असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-2) याचेशी झालेल्या करारा प्रमाणे दिनांक-17/09/2007 ते दिनांक-27/12/2007 पर्यंत उर्वरीत रकमा विरुध्दपक्ष क्रं-2) याचे कडे जमा करण्यात आल्यात. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने भूखंडापोटी विरुध्दपक्ष क्रं 2 कडे वेळोवेळी भूखंडाची संपूर्ण रक्कम रुपये-1,30,000/- जमा केलेले आहेत. करारनाम्या प्रमाणे विरुध्दपक्ष भूखंडाचे विक्रीपत्र लावून देण्यास जबाबदार आहेत. तक्रारकर्त्याने सुध्दा विरुध्दपक्ष क्रं-1) सोसायटीचे सदस्यत्व आवश्यक कायदेशीर पुर्तता करुन पत्करले. त्याने विरुध्दपक्षाकडे करारा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून मिळण्यासाठी वेळोवेळी विनंती केली परंतु चार वर्ष उलटून सुध्दा विरुध्दपक्षाने भूखंडाचा ताबा दिलेला असला तरी कायदेशीर बाबींची पुर्तता करुन सर्व सोई सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत तसेच विक्रीपत्र नोंदवून दिले नाही
त्यामुळे विरुध्दपक्षानीं त्याला दिलेली सेवेतील ही त्रृटी आहे, म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्ष क्रं-2) याने करारा प्रमाणे भूखंडाची उर्वरीत रक्कम स्विकारुन व विरुध्दपक्ष क्रं-1) याने ना-हरकत-प्रमाणपत्र देऊन करारातील भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून द्दावे.
- विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तसेच अनुचित व्यापारी प्रथेच्या अवलंबामुळे त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) याने लेखी उत्तर ग्राहक मंचा समक्ष दाखल केले. त्याने त्याचे विरुध्द केलेली संपूर्ण तक्रार व तक्रारीमध्ये त्याचे विरुध्द केलेले सर्व आरोप नामंजूर केलेले आहेत, त्याने तक्रारकर्त्याला भूखंड दाखवून मध्यस्थाची भूमीका पार पाडल्याची बाब नाकबुल केली. तक्रारकर्त्याने दिनांक-27/12/2007 रोजी विरुध्दपक्ष क्रं-2) सोबत भूखंड खरेदी बाबत करार केला असल्याची बाब सुध्दा नाकबुल केली. त्याने तक्रारकर्त्याला ना-हरकत-प्रमाणपत्र दिनांक-28/12/2007 रोजी दिल्याची बाब नाकारली. त्याच प्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) कडे करारातील भूखंडापोटी जमा केलेल्या रकमा सुध्दा नाकारल्यात. त्याची भूखंड विक्री संबधाने कोणतीही जबाबदारी येत नसल्याचे नमुद केले. त्याचा तक्रारकर्त्याचे भूखंड व्यवहाराशी कोणताही संबध नाही, त्याच बरोबर विरुध्दपक्ष क्रं 2 याचेशी कोणताही संबध नाही, त्याने तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही करीता त्याचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) याचे नोटीस तामीली संदर्भात तक्रारकर्त्याला वेळोवेळी मंचा तर्फे संधी देण्यात येऊनही त्याने कोणतेही पाऊल उचललेले नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-2) विरुध्दची तक्रार खारीज करण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिनांक-08/11/2016 रोजी पारीत केला.
05. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत अक्रं 1 ते 4 दस्तऐवजांच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये विक्री करारनामा, ना-हरकत-प्रमाणपत्र, कब्जा पत्र, आममुखत्यारपत्र इत्यादीचा समावेश आहे.
06. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांच्या प्रती, तक्रारकर्त्याचे प्रतिज्ञालेख, विरुध्दपक्ष क्रं 1 चे उत्तर व लेखी युक्तीवाद आणि तक्रारकर्त्याचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचा समक्ष खालील मुद्दे उपस्थित होतात-
मुद्दा उत्तर
(1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा
ग्राहक होतो काय......................................... नाही.
(2) काय आदेश...............................................अंतिम आदेशा नुसार.
कारणे व निष्कर्ष
07. विरुध्दपक्ष क्रं-1) कोहीनुर को-ऑपरेटीव्ह सोसायटी असून तिचे कडून विरुध्दपक्ष क्रं-2) मो. सफी नईमुल्ला याने मौजा नारा, पटवारी हलका क्रं-11, खसरा क्रं-180/3 मधील भूखंड क्रं-7, एकूण क्षेत्रफळ 1000 चौरसफूट घेतला होता व विरुध्दपक्ष क्रं-1) सोसायटीने त्यास सदर भूखंडा संबधाने ना-हरकत-प्रमाणपत्र व कब्जापत्र दिले होते. पुढे विरुध्दपक्ष क्रं-2) ने तक्रारकर्त्यास सदर भूखंड विक्री करुन देण्या बाबत करार दिनांक-27/12/2007 रोजी केला व तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) यास वेळोवेळी भूखंडापोटी एकूण रक्कम रुपये- 1,30,000/- अदा केल्याची बाब दाखल करारा मध्ये मान्य केली असल्याचे दिसून येते.
08. परंतु सदर भूखंड क्रं-7) चे नोंदणीकृत विक्रीपत्र विरुध्दपक्ष क्रं-1) सोसायटीने विरुध्दपक्ष क्रं-2) याचे नावे करुन दिल्या बाबत कोणताही दस्तऐवज अभिलेखावर दाखल करण्यात आलेल नाही. विरुध्दपक्ष क्रं-2) मोहम्मद सफी व.नईमउल्ला याने सदर भूखंड क्रं 7 बाबत तक्रारकर्त्याचे नावे आममुखत्यारपत्र करुन दिल्याचे दिसून येते.
09. तक्रारकर्त्याचे भूखंड व्यवहारामध्ये विरुध्दपक्ष क्रं-1) सोसायटीचा कोणताही प्रत्यक्ष संबध दिसून येत नाही. तक्रारकर्त्याने भूखंडापोटी जो करारनामा केलेला आहे तो विरुध्दपक्ष क्रं-2) याचे सोबत केलेला आहे तसेच भूखंडापोटी ज्या काही रकमा दिलेल्या आहेत त्या विरुध्दपक्ष क्रं-2) ला दिलेल्या आहेत. तक्रारकर्त्याला वेळोवेळी मंचाने विरुध्दपक्ष क्रं 2 चे नोटीस तामीली संबधाने संधी देऊनही त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) चे नोटीस संबधाने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने ग्राहक मंचाने विरुध्दपक्ष क्रं-2) विरुध्द तक्रार खारीज केली होती त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-2) चे कोणतेही भाष्य मंचा समोर आलेले नाही.
10. तसेच तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-2 यांचे मध्ये भूखंडा संबधी झालेल्या व्यवहार पाहता तो व्यवहार उभय पक्षां मधील “वैयक्तिक स्वरुपाचा व्यवहार” असल्याने तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्दा अंतर्गत तरतुदी खाली मोडत नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी नुसार उभय पक्षांचा “ग्राहक” होत नाही. अशापरिस्थितीत तक्रारकर्त्याला योग्य
वाटल्यास तो आपल्या मागणीचे पुष्टयर्थ्य दिवाणी न्यायालयात जाऊन तेथे दाद मागू शकतो. उपरोक्त नमुद परिस्थिती पाहता तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन मंच तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश ::
(01) तक्रारकर्ता श्री विजय मारोतराव लक्षणे यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) कोहीनुर को-ऑप. सोसायटी लिमिटेड तर्फे अध्यक्ष शेरखान समशेर खान (बाबूभाई) आणि विरुध्दपक्ष क्रं-2) मो.सफी व.नईमुल्ला यांचे विरुध्दची खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) तक्रारकर्त्याला योग्य वाटल्यास तो आपल्या मागणीचे पुष्टयर्थ सक्षम अशा दिवाणी न्यायालयात जाऊन तेथे दाद मागू शकतो.
(04) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षांना निःशुल्क
उपलब्ध करुन देण्यात याव्यात.