Dated the 31 Aug 2015
न्यायनिर्णय
(द्वारा सौ. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या)
तक्रारदार सामनेवाले सोसायटीचे सदस्य आहेत. सामनेवाले सोसायटीमध्ये असलेली सदनिका क्र. 306 बिल्डींग नं. H/6 तक्रारदारांच्या मालकीची आहे.
तक्रारदार सामनेवाले सोसायटीचे मेंटेनन्स चार्जेसनियमितपणे भरणा करतात. तक्रारदारांच्या फ्लॅटच्या पुढच्या व मागच्या भिंतीतून सन 2002 पासून पावसाळयामध्ये जास्त प्रमाणात गळती होत असून सामनेवाले सोसायटीकडे याबाबत दुरुस्तीबाबतची विनंती करुनही त्यांनी दुर्लक्ष केले. सामनेवाले सोसायटीने गळती संदर्भातील दुरुस्ती करण्यास दुर्लक्षित केल्यामुळे तक्रारदारांनी दि. 19/03/2007 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. तक्रारदारांना स्वतःच्या मालकीच्या जागेत, जास्त पाऊस झाल्यानंतर गळतीमुळे राहणे अशक्य होते.
तक्रारदारांनी गळतीबाबत दुरुस्ती करण्यासाठी लागणा-या खर्चाचे अंदाजपत्रक मंचात दाखल केले आहे. सामनेवाले सोसायटीने सदर अंदाजपत्रकाप्रमाणे दुरुस्ती करावी अथवा दुरुस्तीच्या खर्चाची रक्कम तक्रारदारांना दयावी या कारणास्तव प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सामनेवाले सोसायटीचे कायदेशीरित्या देय असलेले सर्व चार्जेसचा भरणा करुनही तक्रारदारांचे नांवे शेअर सर्टिफिकेट अदयापपर्यंत ट्रान्सफर केले नाही.
सामनेवाले यांचे लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या सदनिकेमध्ये गळती होत असल्याबाबतचा तज्ञ अहवाल मंचात दाखल नाही तसेच दुरुस्तीचे अंदाजपत्रकाचे कोटेशन शपथपत्रासहीत दाखल नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या सदनिकेची गळतीची बाब स्पष्ट होत नाही.
सामनेवाले सोसायटीला तक्रारदारांच्या सदनिकेतील दुरुस्तीबाबत मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर प्रथमच ज्ञात झाले. तक्रारदारांची या संदर्भातील कोणतीही नोटीस सोसायटीला प्राप्त झालेली नाही. सामनेवाले सोसायटीने मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर याबाबत तपासणी केली असता सोसायटीतील इतर 27 सदस्यांच्या सदनिकेतील गळतीसंदर्भातील माहिती मिळाली. सामनेवाले सोसायटीचे 240 सदस्य आहेत. सामनेवाले यांनी यासंदर्भात सदस्यांची सर्वसाधारण सभा दि. 25/07/2009 रोजी आयोजित केली. सभेची नोटीस प्राप्त होऊनही तक्रारदार या सभेला गैरहजर होते. सामनेवाले यांनी मिटींगमध्ये सभासदांनी गळतीसंदर्भातील दिलेल्या माहितीप्रमाणे याबाबतची किरकोळ दुरुस्ती केली आहे.
तक्रारदार सातत्याने सोसायटीच्या सभांना गैरहजर असतात. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे अदयापपर्यंत खरेदी करारनामा, सदस्य नोंदणी फॉर्म व नॉमिनेशन फॉर्म दाखल केले नाहीत. तक्रारदारांना शेअर प्रमाणपत्र दिलेले नसले तरी सामनेवाले यांनी सोसायटीतील सर्वसाधारण सोयी व सुविधांपासून तक्रारदारांना वंचित केले नाही. सामनेवाले यांनी सोसायटीच्या 11 इमारतीतील गळतीसंदर्भात कार्यवाही सोसायटीच्या बायलॉजनुसार सुरु केली आहे. सामनेवाले यांनी त्रुटीची सेवा दिलेली नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाले यांची लेखी कैफियत, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचा स्वतःचा व सामनेवालेचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. यावरुन खालीलप्रमाणे बाबी स्पष्ट होतातः
अ. लिकेज दुरुस्तीसाठी रक्कम रु. 30,00,000/- एवढा खर्च अपेक्षित असल्याबाबतचे अंदाजपत्रक दाखल केले आहे. सामनेवाले सोसायटी यांचे सर्व सदस्यांकडून रु. 8,000/- दुरुस्ती खर्चापोटी योगदान घेण्याचे दि.15/08/2009 रोजीच्या सभेत ठरले. त्यानंतर दि. 27/03/2011 रोजीच्या सभेत रु. 6,500/- रकमेचे सदस्यांचे योगदान ठरविण्यात आले. सामनेवाले यांनी दि. 28/06/2010 व दि. 24/11/2012 रोजी दाखल केलेल्या पुरसिसमध्ये सामनेवाले यांनी दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. साई एंटरप्राईजेस यांचे दि. 15/11/2011 रोजीचे पत्रानुसार तक्रारदार राहत असलेल्या बिल्डींगचे रंगकाम पूर्ण झाल्याबाबत नमूद केले आहे.
ब. सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार त्यांनी वेळोवेळी सदस्यांच्या सभा घेऊन दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करुन दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. परंतु तक्रारदार कोणत्याही सभेला हजर राहत नाहीत. तसेच त्यांनी दुरुस्तीच्या खर्चाचे रु. 6,500/- सामनेवाले यांना अदयापपर्यंत अदा केले नाही. सामनेवाले सोसायटीला याबाबतची कार्यवाही करण्याचा अधिकार आहे असे मंचाचे मत आहे.
क. प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी त्यांचे सदनिकेमध्ये सन 2002 पासून सदनिकेमध्ये होणा-या गळतीबाबतची केली आहे. सामनेवाले यांनी दाखल केलेल्या पुराव्यानुसार दुरुस्तीचे काम सन 2011 मध्ये केले आहे. यावरुन तक्रारदारांच्या सदनिकेत लिकेज होते व सोसायटीने सदर लिकेजची दुरुस्ती 2011 मध्ये तक्रारदारांनी मंचात तक्रार दाखल केल्यानंतर केली आहे.
ड. तक्रारदारांनी सदनिकेमध्ये किती प्रमाणात गळती होती? व सदर गळतीमुळे सदनिकेचे विदयुत कनेक्शनचे वगैरे किती नुकसान झाले याबाबतचा कोणताही पुरावा मंचात दाखल नाही. सबब तक्रारदारांनी दाखल केलेले दुरुस्ती अंदाजपत्रक कोणत्याआधारे केले याबाबत खुलासा होत नाही.
इ. सामनेवाले यांनी सन 2011 मध्ये इमारतीची द़़ुरुस्ती केली आहे. परंतु त्यानंतर तक्रारदारांच्या सदनिकेतील गळती बंद झाली आहे किंवा काय? याबाबतचा पुरावा मंचासमोर नाही.
ई. सामनेवाले यांनी तक्रारदारांना अदयापपर्यंत शेअर सर्टीफिकेट त्यांचे नांवे हस्तांतरीत केले नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे सभासद नोंदणीचा फॉर्म आवश्यक कागदपत्रांसह दाखल केल्याची बाब तक्रारीत नमूद नाही. त्याबाबत पुरावा दाखल नाही. तसेच सामनेवाले यांना लेखी पत्राद्वारे शेअर सर्टिफिकेटची मागणी करुन दिले नाही याबाबत पुरावा नाही. अशा परिस्थितीत सामनेवाले यांनी शेअर्स सर्टिफिकेटबाबत सेवेतील त्रुटी स्पष्ट होत नाही. परंतु तक्रारदारांनी सभासद नोंदणी फॉर्म आवश्यक कागदपत्रांसह दाखल केल्यास सामनेाले शेअर सर्टीफिकेट देण्यात तयार असल्याची बाब त्यांनी लेखी कैफियतीमध्ये स्पष्ट केली आहे.
सबब खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः
आ दे श
तक्रार क्र. 434/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
तक्रारदारांना यांना आदेश देण्यात येतो की सामनेवाले सोसायटीकडे सभासद नोंदणीचा फॉर्म, नॉमिनेशन फॉर्म, खरेदी करारनामा वगैरे कागदपत्र व आवश्यक फिससहीत दि. 15/10/2015 पर्यंत दाखल करावीत.
सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की तक्रारदारांकडून आदेश क्र. 1 मध्ये नमूद केलेली कागदपत्रे व नियमानुसार फीस् प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तक्रारदारांना दि. 01/12/2015 पर्यंत त्यांचे नांवे शेअर प्रमाणपत्र हस्तांतरीत करावे.
तक्रारदारांनी मागणी केलेल्या इतर मागण्या फेटाळण्यात येतात.
खर्चाबाबत आदेश नाही.
आदेशाची पूर्तता झाली अथवा न झालेबाबतचे शपथपत्र दि.01/12/2015 पर्यंत दाखल करावे.
आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
संचिकेच्या अतिरिक्त प्रती तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.