जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : ५१/२०१८. तक्रार दाखल दिनांक : २३/०२/२०१८. तक्रार निर्णय दिनांक : १६/०६/२०२१.
कालावधी : ०३ वर्षे ०३ महिने २४ दिवस
देविदास बाबुराव साठे, वय ६३ वर्षे, व्यवसाय : सेवानिवृत्त वरिष्ठ लेखापाल,
रा. दत्त नगर, येडशी रोड, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(१) कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,
स्टार युनियन दाय – आयसीएचआय लाईफ इन्शुरन्स कं.लि.,
नोंदणीकृत कार्यालय, ११ वा मजला, विश्वरुप, आय.टी. पार्क,
प्लॉट नं.३४, ३५, ३८, सेक्टर – ३० अे एच.पी. वाशी,
नवी मुंबई – ४०० ७०३.
(२) व्यवस्थापक, स्टार युनियन दाय – आयसीएचआय लाईफ इन्शुरन्स कं.लि.,
कनाल प्लाझा, पहिला मजला, ८२ रेल्वे लाईन्स, डफरीन चौक,
सोलापूर, ता. जि. सोलापूर – ४१३ ००१. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
मा. श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- दि.वा पाटील (मेंढेकर)
विरुध्द पक्ष क्र.१ यांचेकरिता विधिज्ञ :- सी.के. मैंदाड
आदेश
मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(१) तक्रारकर्ते यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांचा मुलगा प्रशांत यांचे नांवे युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा आनंद नगर, उस्मानाबाद यांचेतर्फे विरुध्द पक्ष क्र.२ यांच्याकडे दि.९/३/२०१६ रोजी विमा उतरविण्यात आलेला होता. पॉलिसी क्रमांक ००९५२७३८ व विम्याचा वार्षिक हप्ता रु.२३,८०५/- होता. प्रशांत हे अचानक आजारी पडले. त्यांना दि.३०/१२/२०१६ रोजी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रशांत यांच्या मेंदुमध्ये गाठी झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते आणि नंतर दि.१/५/२०१७ रोजी त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु औषधोपचार सुरु असताना दि.५/५/२०१७ रोजी प्रशांत यांचा मृत्यू झाला.
(२) तक्रारकर्ता यांचे पुढे असे वादकथन आहे की, प्रशांत हे आजारी असल्यामुळे पॉलिसीचा दुसरा हप्ता विहीत मुदतीमध्ये भरु शकले नाहीत आणि त्याकरिता तक्रारकर्ता यांचा निष्काळजीपणा नव्हता. प्रशांत यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ता यांनी विमा रक्कम मिळण्याकरिता विरुध्द पक्ष यांच्या कार्यालयामध्ये लेखी अर्ज केला. परंतु विरुध्द पक्ष यांनी दि.१०/७/२०१७ रोजीच्या पत्राद्वारे विमा पॉलिसी बंद पडल्यामुळे व हप्ता ग्रेस पिरियड धरुन दि.९/४/२०१७ पर्यंत न भरल्यामुळे विमा रक्कम देता येणार नाही, असे कळविले.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे असे वादकथन आहे की, त्यांनी विमा रक्कम मिळण्याकरिता विधिज्ञांमार्फत विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठविली असता विमा रक्कम देता येत नाही, असे त्यांना कळविण्यात आले. उपरोक्त वादविषयाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी विमा रक्कम रु.३,००,०००/- व्याजासह देण्याचा व रु.५,०००/- तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
(४) विरुध्द पक्ष क्र.१ व २ यांनी संयुक्तपणे लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे कथन आहे की, तक्रारकर्ता यांचा मुलगा मयत प्रशांत देविदास साठे यांचे विमा संरक्षण मिळण्याकरिता प्रस्ताव प्रपत्र दाखल झाले आणि त्यांनी मयत विमेदारास जीवन पॉलिसी निर्गमीत केली. प्रथम हप्ता त्यांना प्राप्त झाला. पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार हप्ता रक्कम १० वर्षे भरावयाची होती; जो प्रतिवर्ष भरावयाचा होता आणि नुतनीकरण हप्ता भरण्याची तारीख ९/३/२०१७ होती. मयत विमेदाराने दि.९/३/२०१७ रोजी देय असणारा हप्ता भरला नाही आणि त्यानंतर ३० दिवसाच्या ग्रेस पिरियडच्या विहीत मुदतीमध्येही हप्ता भरला नाही. त्यामुळे विमेदराच्या मृत्यूपूर्वी दि.९/४/२०१७ रोजी जीवन विमा संरक्षण व्यपगत झाले. त्यामुळे त्यांनी योग्यरित्या तक्रारकर्ता यांचा दावा नाकारला आहे. सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.१ व २ यांनी केलेली आहे.
(५) तक्रारकर्ता यांची वादकथने, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन, उभय पक्षांनी दाखल केलेले कागदपत्रे इ. चे अवलोकन करण्यात आले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला असता न्यायनिर्णयासाठी खालीलप्रमाणे उपस्थित होणा-या मुद्यांचे सकारण उत्तरे त्यांच्यापुढे नमूद करुन कारणमीमांसा देत आहोत.
मुद्दे उत्तर
(१) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांचा विमा दावा नामंजूर
करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? नाही
(२) तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही
(३) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमीमांसा
(६) मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारकर्ता यांचा मुलगा प्रशांत देविदास साठे यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून SUD Life Guaranteed Money Back Plan ह्या प्रकाराखाली पॉलिसी क्र. ००९५२७३८ अन्वये रु.३,००,०००/- चे २० वर्षाकरिता विमा संरक्षण देण्यात आले, याबद्दल उभयतांमध्ये वाद नाही. तसेच पॉलिसीचा प्रतिवर्ष रु.२२,९७१/- याप्रमाणे १० वर्षे हप्ते भरण्याचे होते आणि दि.९/३/२०१६ पासून पॉलिसी सुरु झाली, ही बाब विवादीत नाही. तसेच द्वितीय हप्ता दि.९/३/२०१७ रोजी देय होता, ही बाब विवादीत नाही. विमा पॉलिसीचा प्रथम हप्ता भरल्यानंतर द्वितीय हप्ता विहीत मुदतीमध्ये भरण्यात आलेला नाही, ही बाब विवादीत नाही.
(७) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, प्रशांत हे आजारी असल्यामुळे पॉलिसीचा दुसरा हप्ता विहीत मुदतीमध्ये भरु शकले नाहीत आणि त्याकरिता तक्रारकर्ता यांचा निष्काळजीपणा नव्हता. प्रशांत यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ता यांनी विमा पॉलिसीप्रमाणे रक्कम मिळण्याकरिता अर्ज केला आणि विरुध्द पक्ष यांनी दि.१०/७/२०१७ रोजीच्या पत्राद्वारे विमेदाराच्या दि.५/५/२०१७ रोजी पॉलिसी व्यपगत स्थितीमध्ये असल्यामुळे विमा रक्कम देय नसल्याचे कळविण्यात आले.
(८) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांचा विमा दावा नाकारला, ही बाब विवादीत नाही. विरुध्द पक्ष यांचेतर्फे युक्तिवाद करण्यात आला की, नुतनीकरण हप्ता भरण्याची तारीख ९/३/२०१७ असताना मयत विमेदाराने दि.९/३/२०१७ रोजी देय असणारा हप्ता भरला नाही आणि त्यानंतर ३० दिवसाच्या ग्रेस पिरियडच्या विहीत मुदतीमध्येही हप्ता भरला नाही. त्यामुळे विमेदराच्या मृत्यूपूर्वी दि.९/४/२०१७ रोजी जीवन विमा संरक्षण व्यपगत झाले आणि त्यांनी योग्यरित्या तक्रारकर्ता यांचा दावा नाकारला.
(९) विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर विमा पॉलिसी दाखल केली आहे. पॉलिसीमध्ये अर्थउकल व संज्ञा (Interpretation & Definition) नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यातील कलम ४, ५ व ६ खालीलप्रमाणे आहेत.
4. PAYMENT OF PREMIUM
a. …………………
b. If due but unpaid premium is not paid to the Company by the Policyholder on or before the expiry of the grace period then, this Policy will lapse or become Reduced Paid Up and the benefit shall be payable by the Company as mentioned under Section 7.
5. GRACE PERIOD
A grace period of 30 days following the due date of subsequent premium is allowed for annual, half-yearly and quarterly frequency. A grace period of 15 days following the due date of subsequent premium is allowed for monthly frequency.
If death occurs during the grace period, the full sum assured along with the accrued guaranteed additions under the policy will be paid after deductions of the premium then due and all premiums falling due during policy year.
6. DISCONTINUANCE OF DUE PREMIUM
Lapse
If the policyholder has not paid the due premiums within the grace period, the policy lapses. If the policy lapses within the first three policy year, the life cover ceases and not benefits are payable under the lapsed policy.
(१०) असे दिसते की, वार्षिक, सहामाही व तिमाही हप्त्यांकरिता ३० दिवस हा सवलतीचा कालावधी आहे. सवलतीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी हप्ता अप्राप्त असल्यास पॉलिसी व्यपगत होते. तसेच पॉलिसी पहिल्या तीन वर्षामध्ये व्यपगत झाल्यास जीवन विमा संरक्षण संपुष्टात येते आणि व्यपगत पॉलिसीच्या अनुषंगाने लाभ देय नाहीत.
(११) विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर मा. दिल्ली राज्य आयोगाचा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ मे. हरचंद राय चंदन लाल, १ (२००३) सी.पी.जे. ३९३; मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रवनीत सिंग बग्गा /विरुध्द/ केएलएम रॉयल डच एअरलाईन्स व इतर, (2000) 1 Supreme Court Cases 66 व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या विक्रम ग्रीनटेक (इं) लि. /विरुध्द/ न्यू इंडिया अश्युरन्स कं.लि., २ (२००९) सी.पी.जे. ३४ (एस.सी.) या निवाडयांचा दाखला दिला.
(१२) मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडयातील तत्व पाहता पक्षांनी संविदेमध्ये नमूद केलेल्या शब्दांचा न्यायालयाने अर्थउकल केला पाहिजे.
(१३) तक्रारीतील वस्तुस्थिती पाहता प्रशांत यांची विमा पॉलिसी विहीत मुदतीमध्ये विमा हप्ता भरण्यात न आल्यामुळे व्यपगत झालेली होती. पॉलिसीमध्ये नमूद तरतुदीनुसार तक्रारकर्ता यांना विमा लाभ देय नाहीत. अशा स्थितीमध्ये विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांचा विमा दावा नाकारल्याचे कृत्य सेवेतील त्रुटी ठरत नाही. तक्रारकर्ता हे अनुतोषास पात्र नाहीत. मुद्दा क्र.१ व २ चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(१) तक्रार रद्द करण्यात येते.
(२) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. मुकुंद भगवान सस्ते) (श्री. किशोर दत्तात्रय वडणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद (महाराष्ट्र)
-००-
(संविक/स्व/६४२१)